Sunday 2 February 2014

कविता - पुन्हा कवितेकडे


पुन्हा कवितेकडे

खूप पूर्वी
कधी अचानक
कधी लपत छपत
कधी चाहूल देत,
कधी आढेवेढे घेत
तुझे मजपाशी येणे
व्यक्त होण्यासाठी
मोकळे होण्यासाठी
स्वतःला विसरण्यासाठी-समजण्यासाठी
माझे तुजपाशी येणे
अनेकविध रंगाने, ढंगाने, रूपाने
आपले अशरीर, अमूर्त एकत्र येणे होत असे.
तुझ्या सान्निध्यात उजळायचा अंतरीचा गाभा,  
अस्तित्वच बदलून जायचे अंतर्बाह्य
शब्द ल्यायचे अर्थांचे अगणित पदर
केलीडोस्कॉपिक भावछटा झळकवणारे
शब्दांच्या भाव-अर्थांची संगती लावताना
तू माझी व्हायची, माझ्यातुन मूर्त व्हायची
विश्वाच्या क्षणभंगुरतेची वाळवी
मनात केंव्हा शिरली
शब्द, सृजन, अस्तित्व सारे काही
निरर्थक केंव्हा झाले
कळलेच नाही
त्यानंतरच्या आपल्या भेटीत                      
क्षणभंगुरतेच्या कृष्णविवराने
शोषून घेतला तुझा दिव्य प्रकाश,
सृजनाची शक्ती, जीवनरस
भारून टाकला अंतरीचा गाभा निरर्थकतेने
मी बंद केले तुझ्याकडे येणे
जगत राहिलो आयुष्य वांझपणे
  
उमजले अखेरीस मला
क्षणभंगुर असले सृजन, जीवन, सारे विश्व
असते ते रसरशीत, परीपूर्ण, अक्षर
ज्या क्षणापुरते ते असते

परतलो आहे पुन्हा तुजकडे
जगण्यासाठी, सृजनासाठी
क्षणाच्या अमरत्वासाठी
भंगू दे काठीण्य माझे