Monday 14 July 2014

‘गुरूला अनुसरता एक दिवस, कोणाचे तरी गुरु व्हावे’ - कविता – तुमच्यासारखा गुरु कसे व्हायचे ?

दिनांक १२/०७/२०१४ (१४/०७/२०१४)

गुरूला अनुसरता एक दिवस, कोणाचे तरी गुरू व्हावे’


आज गुरूपौर्णिमा, अगदी लहानपणी शाळेमध्ये पण हा दिवस साजरा होत नसे आजही नसेल होत फारसा, कारण ह्या दिवसाचा संदर्भ आध्यात्मिक/धार्मिकच अधिक होता. पूर्वी ह्या दिवशी वर्तमानपत्रात गुरू महात्म्यावर एखादा लेख, एखाद्या गुरूतुल्य व्यक्तीवर लेख, एखाद्या मोठ्या प्रसिद्ध व्यक्तीचा त्यांच्या गुरूविषयक लेख आणि ‘बाबा’ संप्रदायातल्या भक्तांसाठी आयोजित कार्यक्रमाच्या नोंदी असावयाच्या. रेडीओवर नेहमीची गुरूविषयक ठरलेली गाणी (आता ‘गुरू’वरची नवी गाणीच बनत नाहीत), दूरदर्शनवर एखाद-दुसरी मुलाखत, शिष्यांनी म्हटलेल्या गाण्यांचा कार्यक्रम इत्यादी.

मात्र गेल्या तीन–चार वर्षात social media चे (facebook, twitter, blog, whats app, hangouts) पेव फुटल्यापासून एकदमच सारे बदलून गेले आहे. एक क्रांती घडली आहे individual expressionच्या किंवा व्यक्तीने व्यक्त होण्याच्या बाबतीत. पूर्वी मनात असूनही स्वतःच्या भावना, विचार, अनुभव लिहून लोकांपर्यंत पोचवणे शक्य नव्हते कारण संवादाची साधने मर्यादित होती. आपण लिहिले, व्यक्त (express)  केले तरी ते वर्तमानपत्रे, रेडीओ, दूरदर्शन इत्यादी ते लोकांना प्रसारित करतील ह्याची खात्री सर्वसामान्याला नव्हती आणि सगळ्यांचे लिखाण आणि इतर प्रकारचे एक्स्प्रेशन लोकांपर्यंत घेऊन जाण्याची क्षमता प्रसार माध्यमांचीही नव्हती.

ह्या नव्या साधनांनी सर्वसामान्याला व्यक्त होण्यासाठी एक सहजसाध्य मंच दिला आहे आणि किती सुंदर प्रकारे लोक व्यक्त होऊ लागली आहेत या माध्यमांद्वारे. अर्थात या सोबत मोठ्या प्रमाणात इतर अनेक दोष पण लोक ज्या प्रमाणे व्यक्त होतात त्यात आले आहेत, त्यातला एक म्हणजे कुठल्याही घटनेचा, सणाचा एक “hype” होणे आणि मग जो जो म्हणून या साऱ्या सोशल मिडियावर आहे तो तो मग त्या सणाच्या दिवशी लिहू लागतो, अनेक प्रकारची पोस्टर्स, चित्रे, संदेशकार्ड तयार केले जातात आणि एकदा ती या महाजालात ठेवली कि सर्व दूर पसरत जातात. हे सारे व्यक्त होणे खुपसे सुमार असले तरी मुळात मला असा हा व्यक्त होण्यासाठीचा सहजसाध्य मंच/पर्याय आणि त्यामुळे झालेली revolution of expression and democratisation of expression  हे सारे मनापासून पटते, आवडते आणि त्यातूनच मलाही लिहिण्याची प्रेरणा मिळाली आहे, मिळते आहे. आजचे हे लिखाण या व्यक्त होण्याच्या क्रांतीमुळे.

मला अनेक गुरू लाभले, आजही लाभत आहेत आणि नव्या गुरूंना स्वीकारायलाही खूप आवडते पण आहे. माझ्या अनेक  गुरुंपैकी चार जण माझ्यासाठी सर्वकालीन दीपस्तंभासारखे आहेत. पहिल्या माझ्या सासूबाई मालती मुळे, दुसरे ज्यांच्या हाताखाली मी डॉक्टरेट केली ते प्राध्यापक नांदेडकर सर, तिसरे ज्यांच्या कडून मी नाट्यशास्त्र शिकलो ते प्राध्यापक यशवंत केळकर सर आणि चवथे गुरू  सौंदर्यशास्त्राचे प्राध्यापक, शिल्पकार दीपक कन्नल ज्याला आम्ही भैया म्हणतो. ह्यातले दोन गुरू माझ्या सासूबाई आणि केळकर सर आज या जगात नाहीत पण आजही मला ते मार्गदर्शन करत आहेत.

गेली ३० वर्षे त्यांना गुरूस्थानी मानूनही मी त्यांच्याविषयी कधी नाही लिहिले, गुरूपौर्णिमेला त्यांच्याशी संवाद साधणे वा अनेकदा न साधणे एवढेच केले. त्यांच्याकडून शिकता शिकता प्रेरणा घेता घेता मी केंव्हा इतरांचा गुरू होऊ लागलो ते कळलेच नाही. जेंव्हा इतरांनी मला गुरूस्थान द्यायला सुरवात केली तेंव्हा मला माझे गुरू आणखी समजून येऊ लागले. आपण कोणाचे गुरू होणे हा स्वतःला अत्यंत समृद्ध करणारा, उन्नत करणारा, नम्र करणारा आनंददायी अनुभव असतो असे मला वाटते. आपल्याला गुरू असणे आणि आपण गुरू होणे हे आपल्याला आई असणे आणि आपण आई होण्यासारखे आहे. आज गुरूपौर्णिमाच्या दिवशी अनेकांनी छान विचार लिहिले आहेत, मला स्वानुभवाने सांगावेसे वाटते आयुष्यात जमले तर कोणाचातरी खरा गुरू व्हावे. लहानपणीची शाळेत शिकलेल्या विंदांच्या एक प्रसिद्ध कवितेच्या ओळी होत्या -
 
‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे,
घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे’,

ह्या ओळींच्या धर्तीवर विंदांची माफी मागत म्हणावेसे वाटते

‘गुरूने ज्ञान देत जावे, शिष्याने घेत जावे,
गुरूला अनुसरता एक दिवस, कोणाचे तरी गुरू व्हावे |  

आजच्या या दिवशी माझ्या मनातला विचार – ‘गुरूला अनुसरता एक दिवस, कोणाचे तरी गुरू व्हावे’

माझ्या गुरुंविषयी लिहावयाचे आहे सविस्तर पण ते पुढल्या लेखात. आज माझे गुरू प्राध्यापक नांदेडकर यांच्याविषयी आज गुरूपौर्णिमाला (ह्या नव्या व्यक्त होण्याच्या क्रांतीतून प्रेरणा घेऊन) केलेल्या कवितेने जी इतर गुरूनाही लागू पडते तिने हा लेख थांबवतो -


कविता – तुमच्यासारखा गुरू कसे व्हायचे
    

पूर्ण पटते आहे, शिक्षक झाल्यावर
गमतीदार पण सत्य असे तुमचे म्हणणे
‘शिक्षक हा फक्त एक तासाने
ज्ञानी असतो विद्यार्थ्यापेक्षा ||


हे नाही कळले मात्र अजूनही
आयुष्यभर शिष्याला दीपस्तंभ होऊन
मार्गदर्शन देणारा, पुढे नेणारा
तुमच्यासारखा गुरू कसे व्हायचे ||


उरलेले हे एकच आता शिकवा
कसे रहायचे तुमच्यासारखे
शिष्याच्या आयुष्याला
अवकाशासारखे भरून 
तरीही ध्येयक्षितीजरुपी
मार्गदर्शक गुरू होऊन   ||


(composed during 4.30 to 5.0 pm on 12/07/2014 at residence baroda)

No comments:

Post a Comment