Tuesday 5 September 2017

गर्दीत मी

दिनांक ०५/०९/२०१७

गर्दीत मी ...

कधी वाटले नव्हते मी गर्दीचा भाग घेईन, गर्दीची अनुभूति घेईन. आयुष्याची ५६ वर्षे मुंबईकर अथवा इतर मोठ्या शहरातले लोक गर्दी रोज नेमाने जशी जगतात तशी मी कधी अनुभवलीच नाही.  लहानपणी वा कॉलेजमध्ये जाताना बडोद्यात गर्दीच नव्हती, नंतर बडोद्यात २० वर्ष नोकरी केली पण कधीच गर्दीतून जावे लागले नाही, नंतरच्या १५ वर्षे कन्सलटन्सी करताना दैनंदिन आयुष्यातील गर्दीचा अनुभव येण्याचा प्रश्नच नव्हता.  क्वचित मुंबईला गेल्यावर लोकल च्या गर्दीतून प्रवास केला तेवढाच गर्दीचा अनुभव अथवा क्वचित उत्सवात आलेला गर्दीचा एखादा दुसरा अनुभव .....

एका नव्या कामाच्या निमित्ताने जुलै पासून दिल्लीत आलो आणि रोज सकाळ – संध्याकाळी नोकरीला जाण्याच्या निमित्ताने मेट्रोच्या आणि रस्त्यावरच्या गर्दीतून प्रवास सुरु झाला. अर्थात मुंबईच्या लोकलच्या गर्दी समोर दिल्लीच्या मेट्रोची गर्दी काहीच नाही पण तरीही गर्दी म्हणावी अशी ही गर्दी नक्कीच आहे. दिल्लीची गर्दी मुंबईच्या गर्दी समोर कमी आहे पण तिचा अनेकविध रीतीने अनुभव घेता येईल इतपत मोकळी आहे, मुंबईची गर्दी एकच एक अनुभव मिळेल इतकी घट्ट आहे !!!

गर्दी म्हटली की आपल्या नजरे समोर खूप गोंगाटाचे, कोलाहलाचे, लोकांच्या बडबडीचे दृश्य उभे रहाते पण ते आता बरेच बदलले आहे. रस्त्यावर वाहनांचे आणि इतर अनेक गोष्टींचे कर्कश्य आवाज असतात पण माणसांच्या संवादांचे, बोलण्याचे नसतात. आताची गर्दी जवळ जवळ मुकीच झाली आहे, त्यातून दिल्लीच्या आणि इतर शहरातल्या मेट्रोची गर्दी तर नक्कीच जवळ जवळ मुकी झाली आहे. अनोळखी माणसांनी एकमेकांशी बोलणे घडतच नाही, अगदीच दोन नात्यातली माणसे अथवा मित्र प्रवास करत असले तर आणि त्याहून महत्वाचे ते आपसा आपसात काही बोलले तरच, नाहीतर माणसे मोबाइल मध्ये गढलेली, संगीत ऐकण्यात – पुस्तक वाचण्यात रमलेली, झोपलेली नाहीतर त्रयस्थपणे नुसतीच स्वत:मध्ये हरवून बसलेली वा आजूबाजूच्या लोकांकडे – घटनांकडे शून्यपणे पाहत असलेली. अशा ह्या माणसां सोबत, गर्दी  सोबत माझाही प्रवास मुकेपणाने होतो आहे. एकही शब्द न बोलता विमान प्रवास करण्याचा तर गाढ अनुभव होताच आता तो मेट्रोत, मेट्रो स्टेशनवर, रस्त्यावर असणाऱ्या गर्दीतही घेतो आहे.   
गर्दी मुकी असली, स्वत:मध्ये हरवलेली, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींविषयी त्रयस्थ असली, unconcerned असली तरीही त्या गर्दी कडे डोळसपणे पहिले की तिची अनेक रूपे / आकार / आयाम जाणवू लागतात. गर्दीतल्या माणसांचे अंतरंग कळू लागते, त्यांचे गर्दीत असणे कळू लागते, आपले गर्दीतले अस्तित्व, स्थान कळू लागते. अशाच साऱ्या अनुभूतितून आकाराला आलेली ही कविता .......

कविता - गर्दीत मी 

(दिनांक ३१/०८/२०१७, सर्वोदय एनक्लेव्ह – दिल्ली, रात्रो ९ ते १२ )

गर्दी विवक्षित ठिकाणी जाणारी - परतणारी
गर्दी इतस्तत: कुठेही कशीही जाणारी
गर्दी चहूकडून एकत्र येणारी, चहूकडे पांगणारी

गर्दी कुठेही न जाणारी, घुटमळणारी
गर्दी क्षणोक्षणी निरनिराळे आकार, रूपे घेणारी
गर्दी संवेदनहीन, विचारशून्य, हिंस्र करणारी 

गर्दी भेदभाव तात्पुरते संपवणारी
गर्दी बंधने घालणारी,  स्वातंत्र्य हिरावणारी,
गर्दी ओळख, व्यक्तित्व, अहंकार मिटविणारी 

गर्दीत माणसे काळाच्याही पुढे धावू पाहणारी
आशेच्या, उमेदीच्या जादुई चाकांनी पळणारी
 महत्वाकांक्षांच्या स्वप्नांच्या ईन्धणाने चालणारी

गर्दीत माणसे नेमाने यंत्रवत जाणारी येणारी
सरणाऱ्या फोल क्षणांच्या ओझ्याने वाकून चालणारी
एकटेपण घालवण्या सरावाने, निरुपायाने येणारी

गर्दीत माणसे एकच एक त्रयस्थपणा  असणारी   
मुकी, अबोल, स्वतःत - कोषात हरवू पाहणारी
स्वतः भोवतीच्या कोषांना, बंधनांना तोडू पाहणारी

गर्दीत अशा ह्या मी ना कशाच्या पुढे वा – मागे पळण्या
ना स्वप्ने, ना महत्वाकांक्षा, ना अपेक्षा असण्या
ना कोषात जाऊ पाहणारा, ना कोषाला तोडू पहाण्या

गर्दीत अशा ह्या मी ओळख, अस्तित्व, अहं संपविण्या
ना भविष्यात, ना भूतात तर वर्तमानात जगण्या 
फक्त साक्षी भावाने उरण्या, सर्वार्थाने मुक्त होण्या