Saturday 24 January 2015

कारण जीवन उत्सवाचे

दिनांक - २४/०१/२०१५

आज ब्लॉगवर ठेवत आहे ती कविता माझी आजी (वडिलांची आई) गेल्यानंतर केलेली. दिनांक ०९/१२/१९९४ ला आजी गेली, तिच्या अंत्यदर्शनाला सुद्धा जाता आले नाही. तिचा सर्वात लाडका असूनही तिच्या शेवटच्या क्षणी मला हजरही राहता आले नाही. अनेक मृत्यू पहिले असले, नवे विज्ञान, जुनी शास्त्रे वाचलेली असली तरी स्वतःच्या  प्रिय व्यक्तीचे जाणे अनुभवण्याची पहिलीच वेळ होती माझी कारण आमच्या जोशी कुटुंबात ५२ वर्षांनी मृत्यू घडला होता.......त्या साऱ्या अनुभूतीची ही कविता

कविता – कारण जीवन उत्सवाचे - मूळ कविता १४/१२/१९९४ मूळ कविता १४/१२/१९९४


(मूळ कविता १४/१२/१९९४ दुपारी ४.० ते ४.३० पुनर्लेखन २३/०१/२०१५ संध्याकाळी ५.० ते ६.०)

विचारतायेत सारेच
कारण माझ्या जीवन उत्सवाचे
तेही आजी नुकतीच गेली असतानाचे             ||

खरं तर स्वत:शी एकांत साधताच
आजी नसल्याची जीवघेणी जाणीव उठतेच
ती गेलीय न परतीच्या वाटेन
जायचे आपणालाही एक दिवस त्या वाटेन
जाऊनही त्या वाटेवरून
तिची-माझी, आपल्या कोणाचीही एकमेकांशी
भेट होणार नाहीये कधीच
जे काही जगायचे एकमेकांशी
ते इथेच, हे ही जाणवलंय तेंव्हाच                      ||

ही जाणीवच
कारण माझ्या जीवन उत्सवाचे

आजी नुकतीच गेली असतानाचे           ||

Thursday 22 January 2015

कविता – माणूस घडतोय माझ्यातला

दिनांक - २२/०१/२०१५

अर्ध शतक किंवा पूर्ण शतक झाल्यानंतर फलंदाज लगेच एक धाव घेऊन त्या धाव संख्येच्या पुढे जायचा प्रयत्न करतो. जितका तो अर्ध अथवा पूर्ण शतक पूर्ण होण्यासाठी हव्या असलेल्या एका धावेसाठी आतुर असतो तितकाच तो ते पूर्ण झाल्यावर आणखी एक धाव घेऊन त्या milestone च्या पुढे जाण्यासाठी आतुर असतो. तसेच मी काहीसे केले. ५० व्या ब्लॉग वर गाडी अडकून पडायला नको म्हणून पुढली पोस्ट लगेच लिहित आहे. या वेळेस अगदी सुरवातीच्या काळात म्हणजे कविता करू लागलो होतो तेंव्हाची म्हणजे १९८२ च्या म्हणजे जवळ जवळ ३३ वर्षापूर्वीची कविता जी तशीच कच्ची पडून होती ती सारखी करून आज ब्लॉग वर ठेवत आहे....

 कविता – माणूस घडतोय माझ्यातला  - मूळ कविता १९८२  आधीची, पुनर्लेखन २१/०१/२०१५

(मूळ कविता १९८५ आधीची, पुनर्लेखन २१/०१/२०१५ संध्याकाळी, २२/०१/१५ सकाळी)

सागरभरती सारख्या प्रचंड लाटा
उमटतात मनात कणवेच्या, माणुसकीच्या
स्वार्थाचे, द्वेषाचे कंगोरे झाकणाऱ्या लाटा 
प्रयत्नात माझ्यातला माणूस जागवण्याच्या        ||

बेफाम लाटांनाही असते किनाऱ्याचे बंधन
आपटून किनाऱ्यावर विरावे त्यानाही लागते
मनाच्या चिरेबंदी, कातळी भिंतीवर आपटून
माणुसकीच्या लाटांनाही विरावे लागते             ||

मनाचा स्वार्थी, अमानवी किनारा
उघडा पाडणाऱ्या ओहटीचे ते अटळ येणे
स्वतःला ओळखूही न येणारा
माझा दगडी, तीक्ष्ण आत्मा उघडा पडणे           ||

पुन्हा हव्याहव्याश्या भरतीचे येणे
सारे स्वार्थ, सारे कंगोरे बुडून जाणे
सागरासारखे अथांग विशाल होणे
माझे माणूस होणे, वैश्विक होणे                 ||

भरतीचे असहाय्यपणे ओसरणे
स्वतःलाही न सामावण्याइतके आक्रसणे
भरती-ओहटीचे पुन्हा पुन्हा येणे जाणे
माझेही पुनःपुन्हा विशालणे- संकुचित होणे         ||

अंत या चक्राचा ठाऊक अनंतालाच
ठाऊक माझे मला मात्र एवढंच
भरतीने ढासळतायेत चिरे तटबंदीचे
ओह्टीने झिजतायेत कंगोरे स्वार्थाचे              ||

चक्रनेमिक्रमाने भरती-ओहटीच्या
विस्तरतायेत कक्षा जाणीवेच्या  
घडतोय माणूस माझ्यातला

आपुले मानणारा मानवा मानवाला               ||


सुवर्ण महोत्सवी ब्लॉग पोस्ट !!!

दिनांक - २२/०१/२०१५ - सुवर्ण महोत्सवी ब्लॉग पोस्ट !!! चार कविता

पाहता पाहता ५० व्या पोस्ट पर्यंत हा ब्लॉग पोचला, अर्थाथ ब्लॉग लिहिणे फारसे झालेले नाही पण जुन्या - नव्या कविता सारख्या करून ब्लोग ठेवणे झाले. वाटले नव्हते की इतके सातत्य राहील ब्लॉग वर लिखाण नाही पण कविता तरी ठेवण्यात. कोण माझा ब्लोग वाचते आहे ते एक दोन व्यक्ती सोडल्यास कळत नाही आणि तेच चांगले आहे, पण काही जण ब्लॉग आवर्जून वाचतात ही गोष्ट मनाला फार सुखावणारी आहे. जे कोणी माझा ब्लॉग वाचत असतील त्यांचे, आणि कधीतरी एकदाका होईना वाचला असेल त्या साऱ्यांचे मनःपूर्वक आभार. लवकरच ब्लॉग सुरू केल्याला  वर्ष पूर्ण होणार तेंव्हा ब्लॉगचा प्रवास मांडायचा विचार आहे. तूर्तास, म्हटले तर चार भाग असलेली दीर्घ कविता किंवा एका कल्पनेचा धागा असलेल्या चार जोड कविता ब्लॉग ठेवत आहे. बऱ्याच जुन्या म्हणजे १९९४ सालच्या आहेत या कविता, नुकत्याच  त्यांना गेले वर्षभर चालले आहे त्याप्रमाणे सारख्या केल्या नव्याने लिहिल्या........

1.    कविता – पाहता चांदण्या – मूळ कविता – २५/१२/१९९४ पुनर्लेखन १९/०१/२०१५

(मूळ कविता – २५/१२/१९९४ रात्री ११.० वाजता; पुनर्लेखन १९/०१/२०१५ दुपारी १.० ते २.०)

बरे झाले पहायला मिळत नाही
निरभ्र आकाशातल्या चांदण्या
पूर्वीसारखे काव्यमय राहिले नाही
आता हरवून ते पहाणे चांदण्या      ||

ब्रह्मांडातल्या असंख्य महाविश्वांतील
एका मंदाकिनी महाविश्वातील
निखर्व ताऱ्यातील एका ताऱ्याच्या
एका ग्रहावरील अब्जावधी माणसांपैकी
एक नगण्य, मर्त्य माणूस असण्याचे सत्य
त्याची थंडगार जाणीव उध्वस्त करील
सारे आधार अस्तित्वाचे
तुमच्या व्यक्तित्वाचे
जर खरच रमलात कधी पहात चांदण्या     ||

बरे झाले पहायला मिळत नाही
निरभ्र आकाशातल्या चांदण्या
आत्मघातीच झाले आहे
रात्री एकांती ते पहाणे चांदण्या      ||

2.    कविता – मोजता ऐतिहासिकता - मूळ कविता – २५/१२/१९९४ पुनर्लेखन १९/०१/२०१५

(मूळ कविता – २५/१२/१९९४ रात्री ११.३ ० वाजता; पुनर्लेखन १९/०१/२०१५ दुपारी ३.० ते ४.०)

एखाद्या व्यक्तीची, वस्तूची, घटनेची
ऐतिहासिकता मोजणे रोमांचकारी राहिलेले नाही
त्या छंदातून पाने उलटत इतिहासाची
खरच गेलात मागे तर काहीच मिळणार नाही  ||

काही सहस्त्र वर्षाची मानव संस्कृती
काही लाख वर्षाची मानवजात
काही अब्ज वर्षाची अनेकदा निःपातलेली ही पृथ्वी
अनादी काळाचा एक क्षण असल्याचे सत्य
खोडून काढेल सारे दावे
कालातीत संकृतीचे,
अक्षर वाङमयाचे
अजरामर कलाकृतींचे, घटनांचे, व्यक्तींचे     
तुटून जातील सारे आधार तुमच्या अस्तित्वाचे

एखाद्या व्यक्तीची, वस्तूची, घटनेची
ऐतिहासिकता मोजणे रोमांचकारी राहिलेले नाही
शोधत खरच गेलात काळाच्या कृष्णविवरात
तर अस्तित्वलोपाशिवाय काहीच मिळणार नाही  ||

3.    कविता – शोधता उत्तरे - मूळ कविता – २६/१२/१९९४ पुनर्लेखन २०/०१/२०१५

(मूळ कविता – २६/१२/१९९४ सकाळी १० ते १०.३०; पुनर्लेखन २०/०१/२०१५ सकाळी ११.० ते १२.०)

केल्याने पारायणे वेद, उपनिषद, धर्मग्रंथांची
मनाला शांती लाभेलच असे नाही
जीवनविषयक कालातीत शाश्वत प्रश्नांची 
समर्पक उत्तरे मिळतीलच असे नाही              ||
इडीपससारखा स्व-शोधाचा हा आत्मघाती प्रयत्न
चुकूनही करू नका
चिऊकाऊच्या घासांवर,
चांदोबाच्या अंगाईगीतांवर
आजी-आजोबांनी सांगितलेल्या
पौराणिक कथांनी घडलेल्या
तुमच्या धार्मिक – तात्त्विक श्रद्धांचे
सर्वंकष द्वंद्व सुरु होईल
तुमच्यातल्या स्व ला छीनविच्छिन्न करणारे
तुम्ही संपेपर्यंत चालणारे                 ||
केल्याने पारायणे वेद, उपनिषद, धर्मग्रंथांची
मनाला शांती लाभेलच असे नाही
जीवनविषयक कालातीत शाश्वत प्रश्नांची 
समर्पक उत्तरे मिळतीलच असे नाही              ||

4.    कविता – अनुभवता विज्ञानाला - मूळ कविता – २८/१२/१९९४ पुनर्लेखन २०/०१/२०१५

(मूळ कविता – २८/१२/१९९४ दुपारी २.० ते २ .३०; पुनर्लेखन २०/०१/२०१५ दुपारी १.० ते २.०)
विज्ञानाच्या प्रगतीने स्तिमित व्हावं
असे काहीच नाही
वाढत्या विज्ञानसत्तेने पुलकित व्हावं
असे काहीच नाही                      ||
शोधांच्या दूरगामी परिणामांचा विचार
सहज चाळा म्हणूनही करू नका
निसर्गाच्या, माणसाच्या सृजनशीलतेला
निसर्गाच्या निसर्गपणाला
मानवाच्या मानवपणाला  
एक दिवस गिळंकृत करणाऱ्या
विज्ञानसत्तेच्या वाढत्या ऑक्टोपसचे
फैलावणारे विक्राळ सहस्त्रकर
चिरडून नष्ट करतील तुमची जिजीविषा
पुढल्या पिढ्या पाहण्याची
विज्ञानयुग पाहण्याची .......                    ||
विज्ञानाच्या प्रगतीने स्तिमित व्हावं
असे काहीच नाही
वाढत्या विज्ञानसत्तेने पुलकित व्हावं

असे काहीच नाही                      ||

Wednesday 14 January 2015

शतखंडित बहुरूपी मी

दिनांक - १४/०१/२०१५  - शतखंडित बहुरूपी मी

ही कविता १९९४ मधिली, नोकरीतल्या कविता सदराखालील.  महानगरपालिकेतील नोकरीचा अनुभव एक प्रकारे वेगळा, समृद्ध करणारा पण त्याच बरोबर स्वतःचे सारे विचार, श्रद्धा, अस्तित्व हलवणारा होता. त्यामुळे त्या अनुभवाविषयी अनेक कविता झाल्या, त्यातलीच ही, तेंव्हाही नीट न जमलेली, आत्ताही अजून पाहिजे तशी न जमलेली आणि म्हणूनच इतक्या उशिरा संस्कारित केलेली.

महानगरपालिकेत काम करणे म्हणजे आपल्याकडे शेकडो माणसांचे वेगवेगळे अंतस्थ हेतू घेऊन रोज येणे आणि सर्वांचे समाधान करणे शक्य नाही, योग्य नाही हे माहित असूनही कुशलतेने त्यांच्याशी व्यवहार करणे. हे सारे करताना आपल्या सत्वाला सांभाळायचे म्हणजे जणूकाही स्वतःला शतखंडित करून बहुरूपी होऊन ज्याच्या त्याच्याशी ज्या त्या प्रकारे वागणे. हे जमले तर तुम्ही यशस्वी ठरता. बर हे शतखंडित बहुरूपीत्व काही काळापुरते घेऊन पुरत नाही तर ते कायम साठी वागवावे लागते कारण मनात असले तरीही प्रत्येक वेळी वा वेळोवेळी शतखंडित होणे/बहुरूपी होणे  आणि पुन्हा परत एकसंध स्वरुपात येणे सहज शक्य नसते, त्रास होतो. कायमचे शतखंडित बहुरुपित्व अंगिकारले की जेंव्हा गरज नसेल तेंव्हा एकसंध स्वरूप होता येईल की नाही ही भीत / चिंता  मनात कायमची त्या काळी होती. अश्या पार्श्वभूमीवरची ही कविता -----

कविता – शतखंडित बहुरूपी – १२/०१/२०१५

(मूळ कविता ०९/१२/१९९४ दुपारी १.३० तो ३.००, पुनर्लेखन १२/०१/२०१५ सकाळी ९.० ते १२.०)
हे अवाढव्य व्यवस्थातंत्र चालवणाऱ्या
अनेक सत्ताकेंद्रातील

एक केंद्र माझा हुद्दा, केबिन ..... मी             ||


हुद्दा, खुर्ची, केबिन सभोवती
सत्तेचे एक गूढ अतिनील वलय,
माणसाला आमुलाग्र बदलणारे

केबिनमध्ये खुर्चीवर बसताच

सामान्य मला, असामान्य करणारे         ||

केबिनचा दरवाजा उघड बंद होत राहतो

माणसे आत येत जात राहतात………….

मदतीसाठी, न्यायासाठी हक्कांसाठी,

कधी लांगूलचालनासाठी, 
कधी धमकावण्यासाठी,
कधी मला खरीदण्यासाठी,
त्यांच्या त्यांच्या अंतस्थ हेतूंसाठी                ||


हाताळण्या साऱ्यांना एकाच वेळी 
सत्तेच्या अतिनील सामर्थ्याने
होतो बहुरूपी शतखंड 

घाबरतो, वाकतो, विकला जातो

बांडगुळांना पोसतो, निर्बलांवर राज्य करतो  

काहींना न्याय देतो, काहींचे हक्क राखतो    
कधी मागितलेली मदतही करतो                    ||

सत्तेची ती झूल उतरवून
दररोजचे ते एकसंध स्वरूप होणे


वेदनामय, तरी केले नेमाने
आता मात्र शतखंडच राहतो 

केंव्हाही कोणालाही हवा तो प्रतिसाद देण्यासाठी           ||

नसेल एक दिवस ही सत्तेची आभा मजजवळ

लोकांसाठी मग मी निरूपयोगी, अस्तित्त्वहीन

संपेल गरज बहुरूपी होण्याची शतखंड होऊन
तरीही उरणार मी मात्र शतखंडित बहुरूपी
स्व-रुपात येण्याचे, एकसंध होण्याचे सामर्थ्य हरवलेला           ||


Monday 5 January 2015

सर तुमच्यासारखी टोपी घालता .......

दिनांक ०४/०१/२०१५ - सर तुमच्यासारखी टोपी घालता .......


या गुरुपौर्णिमेला ‘तुमच्यासारखे गुरु कसे व्हायचे’ हा ब्लॉग लिहिला तेंव्हा मा‍झ्या चार गुरुंपैकी नांदेडकर सरांविषयी ब्लॉग लिहिला होता, बाकीच्या गुरुंविषयी मनात असूनही लिहिणे जमले नाही. पण गेल्या आठवड्यातील घटनेने माझे नाट्यकलेचे गुरु यशवंत केळकर यांच्याविषयी लिहिण्याचा योग आला.

मा‍झ्या डोक्याला आता जवळ जवळ टक्कल पडले असल्यामुळे आता मला डोक्यावर टोपी (hat) घालायला हवी असे मी गंमतीने बोलून दाखवले होते. २७/१२/२०१४ ला पुण्यात आम्ही खरेदी करण्यासाठी गेलो आणि मुलासाठी कपड्याची खरेदी करताना तिथे एक कॅप दिसली. ती घालून पहिली आणि जाणवले ती केळकर सर घालत असत त्या प्रकारची आहे. ती घालून पहिली पण ती घेण्याचा माझा विचारही नव्हता पण त्याच दिवशी सकाळी वर म्हटल्याप्रमाणे डोक्यावर टोपी घालण्याचे बोलणे झाले होते त्यामुळे घरचे मागे लागले आणि ती कॅप घेतली गेली. खरं तर मी तरीही घेतली नसती पण ती टोपी घालताच मनात काही शब्द सुचू लागले होते आणि ती  केळकर सरांसारखी आहे हे बोलले गेले होते, जाणवले होते म्हणून मग ती घेतलीच. टोपी घालताच सुचू लागलेल्या ओळी पुढल्या दिवसात साकार झाल्या त्या अशा ---

३.८ कविता – तुमच्यासारखी टोपी घालता – २७/१२/२०१४

(कल्पना २७/१२/२०१४, लेखन – ३१/१२/२०१४ संध्याकाळी ६.० ते ७.० )

केळकर सर, तुम्हाला पहिल्यांदा भेटलो
त्या वयाचा, पांढर्‍या दाढीचा झालो,
विरळ केसांचा झालो
कसा का होईना शिक्षकही झालो           ||

वाटले आता घालावी टोपीही तुमच्यासारखी
शेवटी टोपी घेतली, घातली तुमच्यासारखी
टोपीतल्या मला आरशात न्याहाळत
कल्पिले स्वत:ला तुमच्याजागी मनात            ||
मोठ्यांचे बूट इवल्याश्या पायात घालून फिरणार्‍या
असमंजस, अनभिज्ञ अजाण लहान्याचे
चित्रच फक्त उमटले मनात .........        ||

केळकर सरांना मी पहिल्यांदा १९८१ साली ‘आस्वाद’ ने आयोजित केलेल्या नाट्यकलेच्या कार्यशाळेत भेटलो, त्याआधी त्यांच्याविषयी काहीच माहिती नव्हती, एवढंच नव्हे तर मला नाटकाची आवड असूनही नाट्यकला शिकण्याचा प्रयत्न केला नव्हता वा त्याविषयी काही माहितीही नव्हती. केळकर सरांना भेटलो आणि जाणवले मा‍झ्या आवडीची गोष्ट शिकण्यासाठी मला योग्य गुरु मिळाला आणि आता मला कुठेही जाण्याची गरज नाही. त्यानंतर १९८२ साली यूनीव्हर्सिटीच्या जर्मन विभागाने आयोजित केलेल्या नाट्य कार्यशाळेत पुन्हा त्यांच्याकडे शिकायला मिळाले. १९८३ साली अॅडमिशनची वेळ निघून गेल्यानंतरही त्यांनीच नाट्यकलेच्या डिग्री कोर्सला प्रवेश मिळवून दिला आणि मी नाट्यकला शिकलो. कॉलेज मध्ये आणि इतरांकडून जे काही शिकलो त्याहून अधिक त्यांची नाटके पाहून आणि त्यांच्याकडून शिकलो. १९८१ साली सुरू झालेला संबंध कलाकलाने वाढतच गेला तो शेवटापर्यंत.


एकच शल्य कायम मनात राहिले, मा‍झ्या वेगळ्या विषयातील / क्षेत्रातील करियरमुळे मला त्यांच्याकडे इतरांपेक्षा आणि मला हवे होते त्यापेक्षा कमी शिकायला मिळाले, त्यांचा सहवासही कमी मिळाला आणि नाट्यक्षेत्रातही फार कमी काम करावयास मिळाल्याने त्यांच्याकडून जे काही शिकलो ते सारे लोकांसमोर करावयास जमले नाही. मी जी नाटके केली ती दुर्दैवानी त्यांनी पाहिली नाही, ओळखीचे सांगत राहिले तुझे नाटक पाहून केळकर सरांची आठवण झाली. आजही अनेकदा वाटते की सध्याचे सारे काही सोडावे आणि नाट्यक्षेत्रात जाऊन चांगले काम करून त्यांच्याकडून जे शिकलो त्याला न्याय करावा कारण सर एकदा म्हणाले होते ‘अनेकांच्या बाबतीत असे वाटते की त्यांनी केळकर सर माझे गुरु असे सांगू नये पण तू माझे नाव गुरु म्हणून सांगीतलेच तर मला आवडेल’ !!!!  देवाजवळ तसे घडो हीच प्रार्थना.

Sunday 4 January 2015

कविता - संबंध

दिनांक - ०४/०१/२०१५

 कविता संबंध

(मूळ कविता – १९९४-९५, पुनर्लेखन ०२/०१/२०१५ सकाळी ८.० ते ९.०)
प्रत्येकजण
ताणलेल्या, गोठलेल्या,
चिघळेल्या, तुटलेल्या
संबंधांनी ग्रासलेला
फरफटलेला,  घायाळलेला          ||

धोकादायकच झालंय संबंध बांधणे
कोण त्यांचा बाजार मांडेल
शिडी करून वर चढेल
सुखाना गळफास लावेल
ठरवताच येत नाही               ||

‘कुठलाच संबंध नको’ च्या परिस्थितीत
सखे तू असतेस ग्रीष्माच्या उन्हाने
भाजलेल्या मातीसारखी
संबंधासाठी आतुरलेली
आडदांड पहिला पाऊस होऊन
कसही तुझ्यात सामावायचे
तुझ्या मृद्‍गंधासमवेत शतसहस्त्र होऊन
रुजून यायचे, वाढायचे फुला-फळायचे       ||
मित्रा तू असतोस निरपेक्ष बहरलेला
आपुलकीच्या इंद्रधनु रंगानी रंगलेला
हव्याहव्याश्या गंधाने दरवळलेला
फक्त फुलपाखरू होऊन
तुझ्या रंगानी – गंधांनी लहडून जायचे      ||

त्याचं असणे तर कणाकणात, चराचरात
कुठल्याही संबंधाने जाऊन त्याच्याकडे
मुक्त व्हायचे साऱ्याच संबंधातून          ||