Wednesday 17 June 2020

कोरोना नंतरचे जग - धर्मस्थळे

दिनांक १७/०६/२०२०

कोरोना नंतरचे जग - धर्मस्थळे 

कोरोना महामारीने जगाला आणि आपल्या सर्वांना अंतर्बाह्य हलवले आहे, सगळीकडे सर्व स्तरावर कोरोना नंतरचे जग कसे असेल ह्या विषयी चर्चा आणि तदनुषंगिक पावले उचलणे सुरु झाले आहे. 'कोरोना नंतरचे जग' ह्या विषयावर घडणाऱ्या काही चर्चासत्रात सहभागी होणे होते आहे त्यामुळे त्याविषयी काही विचार मनात येत आहेत त्यातूनच हे लिखाण -

२५ मार्चला लॉकडाउन जाहीर झाले आणि सर्व धर्मस्थळे बंद करण्यात आली, ती बंद नसती केली तरी लॉकडाउन असल्यामुळे कुणाला घरातून बाहेर निघून धर्मस्थळी जाणे शक्य नव्हते, १ मे पासून लॉकडाउन मध्ये सवलती देणे सुरू झाले पण धर्मस्थळे उघडण्याची सूट सरकारने दिली नव्हती, शेवटी ८ जून पासून धर्मस्थळे उघडण्याची सवलत देण्यात आली आहे आणि ती उघडली आहेत. धर्मस्थळे उघडल्यावर तुम्ही मंदिरात जाणार का ? ह्या प्रकारची पहाणी करण्यात आली आणि ५४ टक्के लोकांनी धर्मस्थळे उघडली असली तरी सध्या आम्ही तिथे जाणार नाही असे सांगितले.

सरकारने धर्मस्थळे उघडली पण खरे पाहता इतर अनेक गोष्टी उघडण्याची मागणी करणारे लोकं  धर्मस्थळे उघडण्याची मागणी उघडपणे करताना दिसली नव्हती, ना ते रस्त्यावर आले होते, ना तसे आवेदन केल्याचे टीव्हीवर वा वर्तमानपत्रात आले नव्हते, माध्यमान मध्ये  तशी चर्चा होते आहे असेही नव्हते ह्या साऱ्यामुळे मला भाबडेपणाने असे वाटत होते की दोन महिन्याहून अधिकच्या लॉकडाउन मध्ये  आत्ममंथनाची अशी न भुतो न भविष्यती संधी आपणासर्वांना प्रथमच मिळाली होती त्यामुळे लोकांना जाणवले असेल की देवाची भक्ती करण्यासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही,  घरात पूजा केली किंवा नुसती त्याची मनोमन प्रार्थना केली तरी पुरेशी आहे.  देव चराचरात आहे, देव भावाचा - भक्तीचा भुकेला आहे, देवाच्या भक्तीसाठी मंदिरात जाण्याची, कर्मकांड करण्याची गरज नाही इत्यादी सर्व संतानी  दिलेल्या शिकवणींची प्रचीती लोकांना आली असेल आणि म्हणूनच मंदिरे उघडण्याची मागणी लोकं करीत नाहीयेत असे मला वाटले पण माझी समजूत चुकीची होती. धर्मस्थळे उघडली आहेत, भक्त जाऊ लागले आहेत काही दिवसात धर्मस्थळे पूर्वीसारखी भरून व्हावू लागतील.

सरकारने मंदिरे उघडण्याची सवलत दिली त्यात सरकारचे चुकले असे मुळीच नाही - दुकाने, दारूची दुकाने, ऑफिसेस, मोल्स इत्यादी उघडण्याची सवलत दिली आहे तेंव्हा धर्मस्थळे उघडण्याची सवलत न दिली असती तर सरकारचे चुकले असते. शेवटी धर्मस्थळावर अगदी भिकाऱ्यापासून, गरीबांपासून, व्यापाऱ्यांपासून ते थेट विशिष्ट प्रकारच्या श्रीमंतांची / लोकांची आजीविका अवलंबून असते.

लॉकडाउन मध्ये लोकं मंदिरात आली नाही म्हणून देवाने कोणाचे वाईट केले नाही कारण तो परम कृपाळू आहे, मंदिरात दानधर्म केला नाही म्हणूनही कोणाचे वाईट केले नाही, तो तर नुसती मनोभावे केलेली प्रार्थना गोड मानून घेणारा आहे. ज्या लोकांनी लॉकडाउन मध्ये माणुसकीचा धर्म पाळला, गरजूंना मदत केली त्यांच्या पदरी त्याने
नक्कीच दामदुप्पट पुण्य घातले असणार.

बराच प्रमाणात लॉकडाउन उठविण्यात आला आहे पण अगदी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा असे सांगितले जाते आहे त्या रितीवर सगळ्यांना सांगावेसे वाटते अगदी आवश्यक वाटेल तेव्हांच धर्मस्थळी जरूर जा आणि मनातल्या भावभक्ती व्यतिरिक्त आपल्याकडील इतर जे देवाला द्यावेसे वाटते आहे ते धर्मस्थळी न देता गरिबांना, गरजून द्या, तो चराचरात आहे तेंव्हा ते त्याला नक्कीच पोचेल.

धर्मस्थळे सुस्थितीत ठेवण्यासाठी आणि तेथे येणाऱ्या भक्तांना मुलभूत सुविधा, स्वच्छता देण्यासाठी खर्च येतो तेवढा धर्मस्थळाना भक्तांकडून दान रूपाने मिळावा पण जेंव्हा गरजेपेक्षा प्रचंड प्रमाणात पैसा मिळतो तेंव्हा धर्मस्थळे फक्त पुजास्थळे - भक्तीस्थळे न रहाता व्यापाराची, आर्थिक आणि राजकीय सत्तेची केंद्र बनतात. हल्ली अनेक धर्मस्थळे भक्तांकडून मिळालेल्या ह्या अतिरिक्त दानातून - शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स आणि अनेक समाज उपयोगी कार्य करतात पण हे सारे कार्य आणि त्यासाठी होणारा खर्च त्यांना मिळणाऱ्या दानाच्या रकमे समोर खूप कमी असतो. धर्मस्थळे मिळालेल्या दानाची रक्कम किती आणि कशावर वापरतात ह्या पेक्षाही महत्वाचे हे आहे की धर्मस्थळानी हे सारे करणे तत्वतः चुकीचे आहे कारण हे सारे करण्यातून एक मोठे संस्थान उभे होते, दिवसेंदिवस ते वाढत जाते, त्याची आर्थिक आणि राजकीय सत्ता / ताकत वाढत जाते. धर्मस्थळे ही भक्ताला शांतपणे, प्रसन्नपणे देवाची भक्ती करता येण्याची, चांगला वेळ घालविण्याची, एकमेकांशी संवाद करण्याची सामाजिक स्थळे असली पाहिजेत, ती राजकीय, आर्थिक सत्ता केंद्र होणे सर्वथा चुकीचे आहे. 

काही दिवसापूर्वी श्री पृथ्वीराज चव्हाण ह्यांनी धर्मस्थळा कडील अतिरिक्त पैसा (जो एक लाख करोड हून अधिक भरेल) सरकारने  कोरोना महामारीशी लढण्यासाठी काही काळासाठी व्याजाने घ्यावा असे सुचवले आणि त्याला अर्थातच विरोध झाला आणि सरकारने तसे काही केले नाही. मी तर पुढे जाऊन म्हणेन की आजमितीस धर्मस्थळाकडे असलेला सगळा अतिरिक्त पैसा सरकारने घेऊन कोरोना महामारीसाठी वापरावा आणि पुढील वर्षांमध्येही वर  म्हटल्याप्रमाणे धर्मस्थळ सुस्थित ठेवण्यापुरता पैसा देऊन दरवर्षी प्राप्त होणारा अतिरिक्त पैसा एक खास निधी निर्माण करून त्यात जमा घेऊन गरिबांसाठी वापरावा.

कोरोना नंतरच्या जगात  धर्मस्थळांच्या बाबतीत असे घडावे ..........

Friday 12 June 2020

अस्तित्वात नसणाऱ्या देवा / चराचरात असणाऱ्या देवा

दिनांक - १२ /०६/२०२०

कोरोनाने जगभर जे थैमान घातले आणि त्यामुळे जगात होणारे मृत्यू आणि जगात - भारतात जो लॉकडाऊन जाहीर करण्यात आला त्यात धर्मस्थळे पण बंद करण्यात आली. आधुनिक काळात किमान तुम्हा-आम्हांच्या जीवनात पहिल्यांदाच राजसत्तेने धर्मस्थळे बंद केली.  ह्या सर्व पार्श्वभूमीवर एप्रिल २०२० च्या अंती सुचलेली कविता.


कविता – अस्तित्वात नसणाऱ्या देवा 

ह्या कोरोना महामारीत
ओस पडली आहेत
तुझी पूजा स्थळे, प्रार्थना स्थळे
कारण – अकारण तुझ्या स्थळी धावणाऱ्या
तुझ्यासाठी एकत्र जमणाऱ्या तुझ्या भक्तांना
थांबवले आहे, रोकले आहे
तुझा अन त्यांचा मतलबी उपयोग करणाऱ्या
राज्यसत्तेने
अस्तित्वात नसणाऱ्या देवा तुला
काय फरक पडणार आहे म्हणा ..................

संकटात तुझ्या पायी यायचे तर
तुझ्या स्थळी येण्यापासून
थांबवले आहे भक्तांना
तुझ्याच स्वघोषित दलालांनी
तथाकथित साधू, संत, महात्मे, गुरु पुजाऱ्यांनी
साऱ्या धर्मधुरंधरांनी धर्मसत्तेने
भक्त जगले तरच तुझे अन त्यांचे अस्तित्व
असा विचार करून;
अर्थात अस्तित्वात नसणाऱ्या तुला
काय फरक पडणार आहे म्हणा ..................

जगलेल्या, वाचलेल्या भक्तांना
देतील तुझे स्वघोषित प्रेषित ग्वाही
तुझ्या त्यांच्या वरच्या प्रेमाची
भक्तांचे ह्या महामारीतून वाचणे
ठरेल तुझ्या अस्तित्वाची, दायाळूपणाची प्रचीती
पुन्हा उतू जाऊ लागतील तुझी पूजास्थळे, प्रार्थनास्थळे
अर्थात अस्तित्वात नसणाऱ्या तुला
काय फरक पडणार आहे म्हणा ..................

ह्या महामारीत लाखो मेले, लाखो मरतील
तुझ्या नसण्याचे सत्य सोबत घेऊन
लाखोंचा विश्वास उडेल तुझ्यावरचा
त्यांची स्वप्नेच नव्हे, आयुष्ये उध्वस्त होऊन
पण संभाव्यतेच्या नियमाने घडतील
अशक्य असे चमत्कार, योगायोग
टिकून राहील त्याने तुझे अस्तित्व
प्रत्यक्षात नसूनही
कोणाचेही काहीही न करूनही
अर्थात अस्तित्वात नसणाऱ्या तुला
काय फरक पडणार आहे म्हणा ..................

तुला मी मानले – न मानले काय
असे हे सारे लिहिले - न लिहिले काय
कोणी ते वाचले – न वाचले काय
काहींनी – साऱ्यांनी तुला स्वीकारले – नाकारले काय
अस्तित्वात नसणाऱ्या तुला
काय फरक पडणार आहे म्हणा ..................


ज्यांचा देवाच्या अस्तित्वावर विश्वास आहे त्यांना ही कविता कदाचित आवडणार नाही पण 'अस्तित्वात नसणाऱ्या तुला' ह्या शब्दांच्या ऐवजी 'चराचरात असणाऱ्या देवा तुला' हे शब्द घेऊन किंवा देवाचे इतर गुणविशेष घेऊन जरी ही कविता खालील प्रमाणे बदलून लिहिली तरी कवितेतील विचारांचा गाभा - त्यांची यथार्थता बदलणार नाही असे मला वाटते ......

कविता - चराचरात असणाऱ्या देवा 


ह्या कोरोना महामारीत
ओस पडली आहेत
तुझी पूजा स्थळे, प्रार्थना स्थळे
कारण – अकारण तुझ्या स्थळी धावणाऱ्या
तुझ्यासाठी एकत्र जमणाऱ्या तुझ्या भक्तांना
थांबवले आहे, रोकले आहे
तुझा अन त्यांचा मतलबी उपयोग करणाऱ्या राज्यसत्तेने
चराचरात असणाऱ्या देवा
तुझे कार्य तू करणारच म्हणा ..................

संकटात तुझ्या पायी यायचे तर
तुझ्या स्थळी येण्यापासून
थांबवले आहे भक्तांना
तुझ्याच स्वघोषित दलालांनी
तथाकथित साधू, संत, महात्मे, गुरु पुजाऱ्यांनी
साऱ्या धर्मधुरंधरांनी धर्मसत्तेने
भक्त जगले तरच तुझे अन त्यांचे अस्तित्व
असा विचार करून;
अर्थात सर्वांचे योगक्षेम पाहणाऱ्या देवा
तुझे कार्य तू करणारच म्हणा ..................

जगलेल्या, वाचलेल्या भक्तांना
देतील तुझे स्वघोषित प्रेषित ग्वाही
तुझ्या त्यांच्या वरच्या प्रेमाची
भक्तांचे ह्या महामारीतून वाचणे
ठरेल तुझ्या अस्तित्वाची, दायाळूपणाची प्रचीती
पुन्हा उतू जाऊ लागतील तुझी पूजास्थळे, प्रार्थनास्थळे
सर्वज्ञ, परम कृपाळू देवा तुला
काय फरक पडणार आहे म्हणा ..................

ह्या महामारीत लाखो मेले, लाखो मरतील
तुझ्या नसण्याचे सत्य सोबत घेऊन
लाखोंचा विश्वास उडेल तुझ्यावरचा
त्यांची स्वप्नेच नव्हे, आयुष्ये उध्वस्त होऊन
पण संभाव्यतेच्या नियमाने घडतील
अशक्य असे चमत्कार, योगायोग
लाखो वाचतील, नवे जीवन पामतील
टिकून राहील लाखोंचा विश्वास तुझ्यावरचा
प्रत्यक्षात असूनही - नसूनही
कोणाचेही करूनही - न करूनही
अर्थात निरपेक्ष अशा तुला
काय फरक पडणार आहे म्हणा ..................

भक्त मंदिरी आले – न आले काय
तुझ्यापाशी आले – न आले काय
तुला भजिले काय – न भजीले काय
तुला दान दिले – न दिले काय
सर्वज्ञ, परम कृपाळू देवा तुला
चराचरात असणाऱ्या तुला
काय फरक पडणार आहे म्हणा ...........  

तुला मी मानले – न मानले काय
असे हे सारे लिहिले - न लिहिले काय
कोणी ते वाचले – न वाचले काय
काहींनी – साऱ्यांनी तुला स्वीकारले – नाकारले काय
चराचरात असणाऱ्या तुला
काय फरक पडणार आहे म्हणा ..................