Wednesday 12 April 2017

शोध अज्ञाताचा, साधण्या संवाद अज्ञाताशी ११ - कविता - गरज तुला माझ्या अस्तित्वाची

दिनांक  – १२/०४/२०१७ - शोध अज्ञाताचा, साधण्या संवाद अज्ञाताशी ११  

हे विश्व निर्माण कसे झाले? त्याचा निर्माता कोण? ते कसे चालते? कोण चालवते ह्या विश्वाला? ह्या विश्वाला चालवणारी शक्ती (देव) आहे की नाही, असलाच तर गुणाने, रूपाने, रंगाने, आकाराने, स्वभावाने कसा आहे, त्याची ह्या जगाच्या अवाढव्य पसाऱ्या मध्ये भूमिका काय? माणसासमोर पडलेल्या अशा अनेक प्रश्नां मुळे माणसाच्या कल्पकतेची परिसीमा देव ह्या संकल्पनेच्या बाबतीत घडलेली जाणवते. जे गुणविशेष माणसाशी निगडीत आहेत म्हणजे मर्त्यपणा, ज्ञानाची सिमितता इत्यादि ते अर्थातच देवाच्या बाबतीत संभवत नाहीत हे जरी खरे असले तरी त्या निर्गुण निराकाराला सगुण साकार होण्यासाठी माणसाची कल्पकताच आवश्यक असते अशा प्रकारचे विचार आधीच्या कवितेतही मांडले गेले आहेत, ह्याही कवितेत ते आणखी वेगळ्या प्रकारे व्यक्त झाले आहेत ..........

कविता - गरज तुला माझ्या अस्तित्वाची – लेखन – बडोदे घरी - सकाळी ०२/११/२०१६


अनादी तू, अनंत तू माझ्या तोकड्या आयुष्याने

अज्ञात तू, अकल्प तू माझ्या सीमित ज्ञानाने     

अमर तू अक्षर तू माझ्या मर्त्यपणाने

तरीही माझे एकच म्हणणे

निर्गुणा सगुण होण्या गरज तुला माझ्या भावनांची

निराकारा साकार होण्या गरज तुला माझ्या कल्पनांची

कृपाळा कृपेला तुझ्या गरज माझ्या अपराधांची


देवा अस्तित्वाला तुझ्या गरज माझ्या अस्तित्वाची 

Tuesday 11 April 2017

शोध अज्ञाताचा, साधण्या संवाद अज्ञाताशी १० - कविता - सज्ज मी नियतीशी लढायाला

दिनांक - ११/०४/२०१७


शोध अज्ञाताचा, साधण्या संवाद अज्ञाताशी १०  

तो निर्गुण निराकार अस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न जरी बाजूला ठेवला तरी त्याचे सगुण, साकार रूप हे मानवाच्या बुद्धीने-भावनेने जन्माला घातलेले आहे ह्यात शंकाच नाही आणि म्हणूनच सगुणाकडून निर्गुणाकडे वाटचाल आणि शेवटी त्या निर्गुणाला पावणे असा मार्ग शास्त्रांनी सांगितला आहे. दिनांक ०७/०५/२०१५ च्या ब्लॉग मध्ये मी हाच विचार वेगळ्या प्रकारे मांडला होता. आपल्याला देव हा आपल्या आई वडिलांकडून, ज्या धर्मात, जातीत जन्माला आलो, ज्या समाजात वाढलो त्यातून मिळतो, म्हणजे संस्कारातून मिळतो, पण असा देव अनेकदा आपला वाटत नाही,  देव विकत, उधार घेता येत नाही तो आपल्यातून जन्माला आला तर तो आपला वाटेल, आपल्याला पटेल ह्या विचारातून आकाराला आलेली कविता ब्लॉगवर ठेवली होती.

 सगुण रुपातला देव जर माणसाच्या बुद्धीने – भावनेने जन्माला येत असेल तर त्या माणसाच्या मृत्यू बरोबर त्या माणसाने कल्पिलेले त्याचे सगुण साकार रूप ही संपते, लयाला जाते, म्हणजेच सगुण रूपातला देव माणसाबरोबर मरतो. माणसाच्या मनातले व्यक्तिगत सगुण रूप कशाला, जेंव्हा जेंव्हा देवाने सगुण रूप धारण केले अथवा संपूर्ण समाजाने त्याला ते दिले, ज्याला आपण अवतार म्हणतो ते संपले आहेत. मरण शब्द आपण नाही वापरत – अवतार कार्य संपले असे म्हणतो पण त्यामागचे तत्व / सत्य तेच रहाते. अनेक संस्कृती लयाला गेल्या त्यांच्या सोबत त्यांच्या देव संस्कृती लयाला गेल्या आहेत. देवाचे सगुण रुपाला पण लय आहे, नियती आहे. सगुण रूपाच्या मागच्या निर्गुण तत्वाकडे जावे, त्याला पावावे तर ते निष्क्रिय, कशातही ढवळाढवळ न करणारे, नियती पासून न वाचविणारे.

देवाच्या सगुण आणि निर्गुण रुपाची नियती शरणता आणि नियतीची सर्वोपरिता कोणी बोलून जरी नाही दाखवली तरी प्रत्येक माणसाला, त्याच्या मनाला – बुद्धीला पडलेला आणि न सुटलेला यक्षप्रश्न आहे. हा प्रश्न सोडविण्याच्या प्रयत्नातूनच अनेक धार्मिक आणि तात्त्विक सिद्धांतांचा जन्म झालेला आहे.  दुःख, दुर्दैव, मृत्यू ह्यांची अनिश्चित अटळता आणि त्या निर्गुणा वा सगुणाची नियती पुढील हतबलता अशा अनेक विचारातून जन्माला आलेली ही कविता .......

कविता – सज्ज मी नियतीशी लढायाला – दिनांक ०३/०३/२०१६

(संकल्पना १५/०२/२०१६ पासून, प्रत्यक्ष कविता लेखन – ०३/०३/२०१६ – सकाळ आणि दुपार – नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन )

अनेक सभ्यता, संस्कृती, पंथ जन्मले – अस्तले
संपले त्यांच्या सोबत सगुणरूप तुझे त्यांनी निर्मिलेले
सगुण रूप तुझे तसेच नेमाने रहाते संपत
प्रत्येक मरणाऱ्या माणसा माणसा सोबत
उमजले तुही नियतीने बद्ध, असहाय आमच्यासारखा
अकारण जन्मणारा – मरणारा आमच्यासारखा       ||

कसे पटावे आम्हाला तुझे नियती शरण सगुण रूप
कल्पिले आम्हीच मग तुझे अनादी, अनंत निर्गुण रूप
नियतीच्या पाशातून मुक्त असे स्वयंभू रूप
नियतीच्या पाशातून सोडविणारे सर्वशक्तिमान रूप             
उपयोगच झाला नाही तुला निर्गुण रुपात कल्पण्याचा, भजण्याचा
अखंड चालूच आहे मनस्वी, निरंकुश, निर्दयी कारभार नियतीचा                    ||

कसे पटावे आम्हाला निर्गुणा तुझे अपयश नियतीला आवरण्याचे
कल्पिले आम्हीच मग थोतांड कर्मविपाकाचे, पुनर्जन्माचे
पाप - पुण्याचे, स्वर्ग – नरकाचे, मायावादाचे
जन्म – मृत्युच्या, नियतीच्या चक्रातून सुटण्याचे अर्थात मोक्षाचे
जन्मदात्यांनी वाचवत राहावे अपत्याला साऱ्या दोषांपासून
तद्वत शतकानुशतके वाचवत आहोत आम्ही तुला साऱ्या दोषांपासून                ||

चार्वाक – बुद्धा पासून अनेकांनी नाकारले तुला
स्वीकारले डोळसपणे, निर्भयपणे दुःख, दुर्दैव, मृत्यूला
खरे तर आम्ही साऱ्यांनी मिटवावयाला हवे तुला
द्यायला यथार्थ मान, सन्मान, लढा नियतीला
आधी घडले नाही, पुढेही बहुधा घडणार नाही
तू वास्तवात नसूनही बहुतेक तुला नाकारणार नाही                          ||

मी मात्र आता नाकारतो तुला, तुझ्या अस्तित्वाला

सज्ज मी नियतीशी माझी लढाई लढायाला                                      ||

Sunday 2 April 2017

ठरवावे एक आणि व्हावे भलतेच २ - कविता - काय करू ?

दिनांक ०२/०४/२०१७

ठरवावे एक आणि व्हावे भलतेच - २

हेच शीर्षक देऊन १०० वा ब्लॉग दिनांक ०२/०२/२०१७ म्हणजे बरोबर १४ महिन्यांपूर्वी हा  ब्लॉग  सुरु करून दोन वर्षे पूर्ण झाली म्हणून लिहिला होता, तेंव्हा मनात पुढे खूप काही लिहिणे होते पण झाले भलतेच ..... अशा काही गोष्टी घडत गेल्या की त्या पुढला ब्लॉग लिहिला गेलाच नाही.

दोन महिन्यापूर्वी ब्लॉग पुन्हा लिहावा असे वाटू लागले, पण खूप काही लिहिण्यासाठी मनात दाटून आल्याने सारा गोंधळच उडाला मनात आणि अर्थात प्रत्यक्षात काही लिहिणे झालेच नाही. एकीकडे ब्लॉग सुरु करण्याचे मुहूर्त शोधणे झाले - कुणाचा वाढदिवस, सणाचा दिवस, जीवनातील महत्वाच्या घटनेचा दिवस पण तेही दिवस साधले गेले नाहीत - शेवटी कुढल्या दिवसाची, घटनेची, मुहूर्ताची वाट न पाहता ज्या क्षणी आज आत्ता मनात आले त्या क्षणी हे शब्द लिहिले. नशिबाने काल आणि आज मिळून एक नवी कविता गझल फॉर्म मध्ये आकाराला आली होती तीच आता आज ब्लॉग वर ठेवत आहे.

परवा वाचताना एक उर्दू शेर आवडला, त्याचा मजा म्हणून स्वैर अनुवाद केला आणि फेसबुक वर पुढील प्रमाणे काल  सकाळी ठेवला

मैं नाकाम-ए-मसर्रत हूँ मगर हँसता ही रहता हूँ
करूँ क्या मुझ को क़ब्ल-अज़-वक़्त मर जाना नहीं आता
अख़्तर शीरानी

नाकाम-ए-मसर्रत = ख़ुशियों से वंचित  /  क़ब्ल-अज़-वक़्त = समय से पहले

स्वैर मराठी अनुवाद

सुखांनी वंचीत असूनही, हसत जगत राहतो

करू काय वेळे आधी मरता येत नाही ना मला

पण हळूहळू कविता आकारात गेली मनात पुढीलप्रमाणे, अर्थात कवितेत काल अनुवाद केलेला शेर बदलला 

कविता - करू काय - लेखन - दिनांक १-२ एप्रिल, २०१७

गरज नसूनही, साऱ्यांसाठी समभावे फुलत राहतो
करू काय, कुणा एकासाठी फुलता येत नाही ना मला            ||१||

मान्य नसूनही तुम्हा अनेकांना, सर्वांना आपले मनात राहतो
करू काय, कुणा एकासाठी दुसऱ्याला नाकारता येत नाही ना मला ||२||

कदर नसूनही, बिनाशर्त कर्तव्य, प्रेम करत राहतो
करू काय, अटींनी बद्ध कर्तव्य, प्रेम मान्य नाही ना मला        ||३||

जाता पुढे नसे मागे परतणे, जाणूनही हे पुढे वाहत राहतो
करू काय, काळ प्रवाहाला थांबवता येत नाही ना मला         ||४||

कुठलेच पाश, इच्छा उरली नसूनही, मी जगत राहतो
करू काय, वेळे आधी मरता येत नाही ना मला                    ||५||

देवा नाकारूनही तुला, साऱ्यांसाठी पुजत राहतो
करू काय, तुझ्यासारखे त्यांचे योगक्षेम सांभाळणे शक्य नाही ना मला ||६||

ब्लॉगची ही पुन्हा केलेली सुरवात किती काळ चालेल ते ठाऊक नाही, पण जो पर्यंत चालेल तो पर्यंत लिहित राहीन ....