Thursday 25 December 2014

कविता - कालक्षण

दिनांक - २५ / १२/२०१४ 

 कविता – कालक्षण  

अनादी, अनंत, अनाकलनीय काळ
समस्त ब्रम्हांड, माणसे, त्यांच्या संस्कृती, सृजने
सार सार त्याच्या अखंड प्रपातात वाहून नेणारा           ||

सर्वशक्तिमान, निर्मम, प्रपाती काळाचा विचार
सर्वार्थाने छिन्नविछिन्न करीत असताना
तिच्या होकाराचा क्षण,
बाळाच्या पहिल्या स्पर्शाचा क्षण
आपले माणूस काळाआड जाण्याचा क्षण
असे अनेकानेक जिवंत क्षण
येतात अमृतकुंभ होऊन
जीवन संजीवनी घेऊन                  ||

जिजीविषा संपवणाऱ्या
अस्तित्व मिटवणाऱ्या
अज्ञातात ओढून नेणाऱ्या
निर्गुण, निराकार काळाचेच हे क्षण  
आहेत आज तेच माझे जीवन

आहेत आज तेच माझे अस्तित्व           || 

(मूळ लेखन १९९५-९६, पुनर्लेखन २५/१२/२०१४)

Wednesday 17 December 2014

कविता – वाडा

दिनांक - १७/१२/२०१४ 
वयाच्या ५ ते ७ या वर्षांमध्ये (१९६६ ते १९६८) मी कोकणात कासार्डे या कणकवली जवळच्या गावी आजी बरोबर ज्या वाड्यात राहिलो होतो त्या वाड्याला १९७१ साली भेट दिली होती. मग तिथे माझे कधीच जाणे झाले नाही.  अचानक नोव्हेंबर १९९१ मध्ये गोव्याहून परतताना मावळतीच्या सुमारास त्या वाड्याला भेट देण्याचा योग आला. वाड्यासमोर उभा राहिलो आणि जे अनुभवले ते मांडू पहाणारी ही कविता .....

कविता – वाडा

मनात वर्षानुवर्षे

पिंपळपानासारखा जपलेल्या वाड्यासमोर

उत्सुक, आतुर, धडधडत्या हृदयाने पोचलो

भव्य चिरेबंदी वाड्याचे होते

भग्नावशेष विखुरलेले चहूकडे

बालपणीच्या तरल भावस्मृतींचे फ्रेस्को

खळ्ळकन फुटले छिन्नविछिन्नले चहूकडे         ||


मनात कुठेतरी प्रचंड पडझड झाली 

खोलवर एक जीवघेणी कळ उठली

सागर संमिश्र आवेगांचा उधाणाला   

झिरपला कंठात, डोळ्यात ओलावा         ||


वाड्याच्या भग्नावेशातून अधीरपणे फिरलो

एकनएक कानाकोपरा चाचपला

ओळखीच्या साऱ्या खुणा शोधल्या

जुळवल्या आठवणी बालपणीच्या विखुरलेल्या             ||


डोळ्यात तरळलेल्या अश्रूंच्या बिल्लोरी काचेने

एकसंधला वाडा पुन्हा,  सजीवले वातावरण सारे

कानातले डूल झुलवत

इवल्याश्या पावलांनी बागडू लागलो

बोबड्या बोलातले श्लोक

आजीने सांगितलेल्या गोष्टी

नवजात भावाचे रडणे ऐकू लागलो 

पायात घोटाळणाऱ्या भाटीच्या

गोजिरवाण्या पिल्लांशी खेळू लागलो

अंगणातल्या गारा वेचू लागलो            ||


काही क्षणातच गारांचे पाणी झाले

ओंजळीतून ओघळून गेले

ढाण्या कुत्र्याने पिल्लांना मारले

कानातले डूल निघाले,

बोबडे बोल, बालपण संपले

नकळत वाडा सोडणेही झाले

एकेक चिरे निखळले,

वासे कलथून गेले

वाडा भंगला पुन्हा, फलॅशबॅकही संपला

डोळ्यात तरळणाऱ्या आठवणी अश्रू होऊन ओघळता             ||


पुन्हा आम्ही दोघेच उरलो ...


उध्वस्त वाडा, सजीवपण हरवलेला

मी, वाड्यासोबत बालपण हरवलेला  ||

Friday 12 December 2014

कविता – तू अनादी – अनंत

कविता – तू अनादी – अनंत

(मूळ लेखन–दिनांक २५/०८/१९९५ रात्री १०.० ते १०.३०; पुनर्लेखन दिनांक – ११/१२/२०१४ सकाळी ८.० ते दुपारी ३.० )

तुला आरंभ – अंत नाही
तुला रूप, रंग, गंध, मिती नाही
तुझ्या अस्तित्वाचा पुरावा नाही
तरीही अनेकांना तुझ्या असण्याचा विश्वास
मलाही वाटते तू चराचरात आहेस .......
बांडगूळ मानवी बुद्धीवर मनावर पोसणारे
पॅरासाईट प्रत्येक सजीवावर - पेशीवर पोसणारे                      ||

प्रत्येक झाडाचे बांडगूळ निराळे
प्रत्येक जीवावरचे पॅरासाईट निराळे
तसा प्रत्येकाला गवसलेला तू निराळा
फक्त त्याचाच त्याचा इतका निराळा
ह्या बहुरुपतेपायीच
अश्या परजीवितेपायीच
तू निरर्थक नाहीस
तू अरूप, अमिती नाहीस
तुला आरंभ नाही
तुला अंत नाही                                    ||

असा युगानुयुगे तू आहेस
अनादी अनंत आहेस
कधी सगुण, कधी निर्गुण होऊन
कोणासाठी अमुक, कोणासाठी तमुक होऊन
खगोलशास्त्रापुढे अनंत ब्रम्हांड होऊन
क्वांटम सिद्धांतापुढे केऑस सिद्धांत होऊन       ||

नाकारतोय तरीही शोधतोय तुला
मला हव्याश्या स्वरुपातला
नको आहे मला तू इतरांनी दिलेला
वा बांडगूळासारखा मनावर वाढलेला
हवास मला तू अंतरी प्रकाशलेला
विश्वात्मक करणारा मा‍झ्या आत्म्याला
नाकारता नाकारता तुला
ज्ञानियांसारखा कधीतरी सापडशील मला
माझे अस्तित्व, माझा आत्मशोधच

जन्म घालणार आहे तुला                      ||

Wednesday 10 December 2014

कविता – जाणवणे तुझे असणे

कविता – जाणवणे तुझे असणे  (०८/१२/२०१४ संध्याकाळ ते रात्र)


वेडापिसा वारा सैरभैर वाहता
झाडे, पाने, वेळूनी शीळ घालता  
आसमंती अनाहत नाद निनादणे
जाणवणे तुझे असणे                    ||

पावसाने आकंठ न्हाऊ घातल्यावर 
तिरप्या सोनेरी किरणांनी सजवल्यावर
कातळांचे हिरव्याने सजीव होणे
एकांतात ऐकलेल्या निसर्ग गोष्टी सांगणे
जाणवणे तुझे असणे                    ||

रखरखणाऱ्या उन्हाने जाळता सृष्टीला
सावली शोधणाऱ्या प्राण्यांना, प्रवाशाला
खुरट्या झुडुपाच्या सावलीचे विशाल होणे
मायाळू पंखांखाली घेणे
जाणवणे तुझे असणे                    ||

आपल्यातल्या कोण्या एकाने
सारे स्वार्थ, भेदाभेद विसरणे
कणनकण दुसर्‍यांसाठी झिजवणे  
अनाथांचा नाथ होणे
जाणवणे तुझे असणे              ||

असे अव्यक्त तुझे जाणवत राहणे
मृगजळासारखे तुझे दूर दूर पळणे
पाऱ्यासारखे पकडता न येणे
तू न मिळण्याने असण्यातला विश्वासच उडणे
अचानक कधीतरी माझ्यातला मी लोपणे         

लक्कन मा‍झ्यातच जाणवणे तुझे असणे          ||

Sunday 7 December 2014

कविता - तो आणि मी


दिनांक - ०७/१२/२०१४ 

 कविता – तो आणि मी

(मूळ लेखन १९९४-९५ पुनर्लेखन ७/१२/२०१४ सकाळी ८.३० ते ९.३०)

खोल रुतलेल्या बाभळीच्या काट्याचा ठणका
हाडांत उठवणाऱ्या थंडीत
मर्क्युरी, सोडियम दिव्यांच्या
भगभगीत पण शवासारख्या थंड-मृत प्रकाशात
दुतर्फा निर्जीव घरे,
लाकूडलेली अनेक शरीरे
गोठलेले घाणीचे ढिगारे
घेऊन थिजवलेल्या रस्त्यावर
तो आणि मी चालणारे                   ||

नदीकाठच्या गवतासारखा पोसलेला
रसरशीत मी,
कातळावरील तृणासारखा सुकलेला
फाटक्या शरीराचा तो,
थंडीला सुखासीन, गुलाबी करणाऱ्या
उबदार कपड्यातला मी,
अपुऱ्या कपड्यांना, थंडीला न झाकणाऱ्या
जुनाट मळक्या कांबळ्यातला तो                ||

त्या निर्जनतेत
सोबतीला दुसरा असावा
असे वाटूनसुद्धा
वेगवेगळ्या व्यवस्थेतले
वेगवेगळे चालणारे आम्ही          ||

दुतर्फा छोटे-मोठे देह फाटक्या चीरगुटांत कुडकुडलेले
लुळे, पांगळे, चुरगळलेले, झिजलेले, विझलेले
बेवारशी कुत्री त्यातच गुरफटलेली
उघड्या स्तनांना तोंडात धरून तान्हुली विश्र्वसलेली         ||

हिरवटपणे ते स्तन पाहत
त्या देहांच्या थंडाईने शहारत
माझ्यावरल्या उंची ऊनी कपड्यात
अधिकच गुरफटून घेत
दुर्भाग्याची संगती लावू पाहणारा मी ......
एका उघड्या देहावर त्याचं कांबळं पांघरून
झोपडपट्टीच्या कुठल्याश्या बोळात वळून
नाहीसा झालेला तो                     ||

क्षणार्धात डांबरी रस्त्यासारखा

उघडा-बोडका, निर्जीव, थंड पडलेला मी      ||

Friday 5 December 2014

कविता – संकेत आपला ठरलेला आणि कविता तू माझा सांगाती

दिनांक - ५/१२/२०१४

गेले काही महिने माझ्या सर्व जुन्या कवितांचे त्यांना ब्लॉगवर ठेवण्याआधी म्हणजेच लोकांपुढे आणण्याआधी त्यांचे पुनर्लेखन  करतो आहे. कवितेचे पुनर्लेखन सुरु करताना ते सोपे वाटले होते कारण ही सहज प्रक्रिया आपण करतोच, कविता किंवा कुठलेही लेखन लिहिल्यावर ते लेखन आपण लगेच किंवा अल्प मुदतीतच  revise अथवा सारखे करतो. असे करताना अनेक वेळा ते पुन्हा लिहितो, काही वेळा ते पूर्ण बदलूनही जाते पण ह्या साऱ्या प्रक्रियेत एक सलगता, एकसंधता असते आणि पुनर्लेखनाची प्रक्रिया वेगळी अशी कळतही नाही.

माझ्या कविता मी जेंव्हा लिहिल्या तेंव्हा त्यांना सारख्या न करता, त्यांच्या कडे पुन्हा वळूनही न पाहता  १० ते २० वर्षापर्यंत तश्याच ठेवून दिल्या होत्या. ह्या वर्षी अचानक मनात आले आणि हा कवितांच्या पुनर्लेखनाचा प्रकल्प हाती घेतला पण आता कळले आहे अनेक वर्षांनी जर कृतीचे /कवितेचे पुनर्लेखन करावयास घेतले तर ही प्रक्रिया नव्या सृजना इतकीच आपल्याला  स्वतःच्या अंतरंगात उतरायला लावणारी, स्वतःला आरश्यासमोर उभे करणारी, एक प्रकारे वेदनामय आणि तरीही सुखकारक, समृद्ध करणारी असते.

खर तर प्रत्येक कविता पुनर्लेखन करताना कमी जास्त प्रमाणात बदलून जाते आहे, अनेकदा मनात प्रश्नही उभे करते आहे की पुनर्लेखन केलेली कविता ही मूळ कवितेशी प्रमाणिक आहे का की पूर्णच बदलून गेली आहे. स्वतःच्याच कविता revise करतो आहे, सारख्या करतो आहे म्हणून हे प्रश्न विचारणारा आणि उत्तर देणाराही मीच आहे, अन्यथा असल्या प्रश्नांची उत्तरे देणे अवघड आहे.

पुनर्लेखन करता नव्या कल्पना तर सुचतातच, आधी न उमजलेला अर्थ, दृष्टीकोन समजतो आहे पण काही वेळा तर मूळ कवितेची जोड कविता अथवा भाग २ अश्याही कविता होत आहेत. कालही तसेच झाले 'संकेत आपला ठरलेला' ही कविता सारखी करावयास घेतली आणि नवी कविताच सुचू लागली. मग काय कालचा संपूर्ण दिवस 'तू माझा सांगाती' ह्या नव्या कविते मागे गेला आणि मग आज 'संकेत आपला ठरलेला' ही कविता पुनर्लेखीत झाली. अर्थात ही नव्याने सारखी करताना कालच्या नव्या कवितेच्या कल्पनांचा फायदा झाला.

अश्या या दोन जोड कविता एक १५ - २० वर्षापूर्वीची आणि एक नवी गेल्याकालची .............


कविता – संकेत आपला ठरलेला 


प्रत्येकाला तू सावलीसारखा चिकटलेला

श्वासोच्छवासा इतका अस्तित्वाचा भाग असलेला

सुखी असतात ते, ज्यांना भान नसते तुझ्या अस्तित्वाचे
कळतही नाही तुझ्या हातून मिटणे त्यांच्या अस्तित्वाचे    ||

काहींना जाणवते तुझे हे सावलीरूपी अस्तित्व
तुझ्यापासून सुटण्याची त्यांची केविलवाणी धडपड
तू पिसाळतोस अन बसतोस त्यांच्या मानेवर       
भयगंड होऊन सिंदबादच्या म्हाताऱ्यासारखा             ||

तुझे माझे संबंध मैत्रीचे, निर्भेळ संवादांचे
हातात हात धरून चालण्याचे, गळ्यात गळा घालण्याचे
बदलून तुझी रूपं मनासारखी माझ्या
न चुकता पाळतोस धर्म संवगड्याचा                   ||

संकेत ठरलाच आहे आपला
घेऊन जा केव्हाही घरी तुझ्या खेळायला
तो पर्यंत जगून घेतो जगाला
खेळून घेतो जीवनाला                               ||

कधीतरी पाहून होईल काना कोपरा ह्या जगाचा  
तेंव्हा तूच दाखव रस्ता पारदर्शक तुझ्या घराचा
स्वतःहून येईन तुझ्याकडे सोडून या खेळाला

हाही संकेत आपला ठरलेला                       ||            

(मूळ लेखन १९९५ पुनर्लेखन ०५/१२/२०१४ पहाटे १.० ते २.०)


कविता - तू माझा सांगाती 


नकोश्या तुला, कल्पनेतही विसरू पाहणारे
अशक्य असूनही सारे तुला टाळू पाहणारे
तुझ्यापासून दूर पळणारेच बहुतेक सारे      ||

मोजकेच धर्म, देशासाठी तुला कवटाळणारे
ध्येय, प्रेमासाठी धैर्याने मात करणारे
तरीही तुझ्याशी प्रेम, संवाद नसणारे        ||  

नचिकेतानंतर साऱ्यांनी अव्हेरलेला
कुणाशी संवाद नसलेला, एकाकी पडलेला
तू, किती दचकलास, चिडलास
थयथयाटही केलास
सुरू करता संवाद मी तुझ्याशी            ||

काय हा अगोचरपणा
क्षणार्धात संपवीन तुझे अस्तित्व
गरजलास धक्का ओसरल्यावर            ||

तो एकाधिकार तुझाच
पण वेळ आल्यावरच, खरे ना
मग होऊया की मित्र तो पर्यंत
संपवण्या एकाकीपण तुझे – माझे, मी उत्तरलो     ||

धुमसत, धुसपुसत शांत झालास
गहिवरलेले ओले हसलास
एकाकीपण युगायुगांचे मिठीत संपवलेस     ||

झालास तेंव्हा पासून तू माझा सांगाती
खेळवीशी अंगा-खांद्या-मांडीवरी
शिकविशी जीवनाची गुह्ये सारी
चालविशी हाती धरुनिया                 ||

(मूळ लेखन ०४/१२/२०१४ – सकाळी ८ ते ९ मग दुपार पर्यंत )