Saturday 29 November 2014

‘दादा भीक घाला हो’ / ‘भीक दे गे माय’

दिनांक – २९/११/२०१४

‘दादा भीक घाला हो’ / ‘भीक दे गे माय’

आपणा सर्वांसमोर जागोजागी निरनिराळे भिकारी निरनिराळ्या प्रकारे भीक मागतात आणि बहुतेक आपण सारे त्या भीक मागण्याला वेगवेगळ्या प्रकारे react होतो. कोणी भीक मागीतली तर तिला कसे react व्हावे हे अजूनही मला समजलेले नाही. बहुधा मी भीक देत नाही कारण भीक दिल्याने पुण्य मिळेल आणि माझा पुढला जन्म चांगला होईल ह्यावर माझा सुतराम विश्वास नाही. तेंव्हा धार्मिक कारणाने मी भीक कधीही कोणाला देत नाही पण मानवतेच्या कारणाचे काय? तिथेच सारा गोंधळ आहे मानवतेच्या दृष्टीकोनातून अनेकदा मी भीक देतो, अनेकदा देत नाही पण त्यात सातत्य व स्पष्ट भूमिका नाही मज जवळ. जागोजागी भेटणाऱ्या खोट्या भिकार्‍यांचा राग येतो, कधी भिकारी निर्माण करणाऱ्या एकूणच आपल्या सामाजिक-आर्थिक व्यवस्थेचा राग येतो, कधी खऱ्या भिकार्‍यांबद्दल खूप कणव दाटून येते  तर कधी खूप असहाय्य वाटते, कधी स्वत:चा राग येतो, कधी स्वत:च्या सुदैवाबद्दल, समृद्धी विषयी अपराधीपणाची भावनाही मनात दाटते आणि शेवटी काही न करता मन मारून टाकून ह्या वास्तवाकडे पाठ फिरवणेही करतो. या प्रश्नाकडे कायमची पाठ फिरवणे जमत नाही कारण फार तर काही तासानंतर अथवा फार तर काही दिवसांनंतर भीक मागणारा हात माझ्यापुढे पसरला जातो आणि वास्तव समोर उभे ठाकते आणि पुन्हा सुरुवात विसंवादी प्रतिक्रियेची.  
खरे – खोटे भिकारी, त्यांचे खरे-खोटे भीक मागणे ह्या पलीकडे जाणवते ती सर्व स्तरांच्या लोकांमध्ये असलेली भीक मागण्याची वृत्ती, जी  स्वत:मध्येही आढळली आणि तेंव्हा पासून भीक देण्याच्या बाबतीत जरी पूर्णतः गोंधळलेला, विसंवादी असलो तरी स्वतः मधल्या भि‍केच्या वृत्तीचा  समूळ नायनाट करण्याचा जाणीवपूर्वक. संनिष्ठ आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करतो आहे.


वरील साऱ्या अनुभूतिविषयी आणि विचारांविषयी (वीस वर्षापूर्वी लिहिलेल्या पण आजही माझ्यासाठी आणि परिस्थितीशी सयुक्तिक / relevant असलेल्या) दोन कविता ज्यांचे काही दिवसापूर्वी पुनर्लेखन केले त्या सादर करित आहे. सोबत आधी ब्लोगवर (१२/०४/२०१४ रोजी ) दुसर्‍या संदर्भात ठेवलेली पण ह्याच अनुभूतिविषयी असलेली ‘बदललेला तो’ ही कविता सादर आहे .......... 

कविता – हात – (मूळ लेखन १४/१२/१९९३ पुनर्लेखन ११/११/२०१४ )


मंदिराबाहेर, रेल्वेमध्ये
हॉटेल्स, लग्नमंडपांपुढे,
चार रस्त्यावर
एकूणच जागोजागी
आपल्यापुढे पसरणारे अनेक हात |
कधी झडलेले
कधी लहानुले
कधी तुटके
कधी लुळे
कधी धडधाकटही
साऱ्यांवर एकच वाक्य
‘दादा भीक घाला हो !’            ||

खोडून काढावस वाटत
ते दळभद्री वाक्य
प्रत्येक हातावरल
प्रत्यक्षात हुरूप संपतो
कळत  जेंव्हा -----
दुसराच कोणी भीक मागत असतो
सत्तेची, सन्मानाची
या हातांच्या उद्धाराची दुहाई देत          ||

त्या हातांसाठी मग मी काहीच करत नाही
पसरलेच जात राहतात हात
जागोजागी माझ्यापुढे अव्याहतपणे
घृणा वाटू लागते माझीच मला
घृणेतून क्रोध दाटतो रोमारोमात
कलम करून टाकावेसे वाटतात
भीक मागणारे सारे हात                 ||

कलम करण्या हात
सर्वात जधन्य भीक मागणाऱ्याचे
पाहता चहूकडे निरखून
आपणच सारे दिसलो
सत्तेची, संपत्तीची,
रुपाची, समाजमान्यतेची
हात पसरून भीक मागताना              ||

कलम करून टाकले त्याच दिवशी
उघडपणे भीक घालणारे
छुपेपणाने अनंत भीका मागणारे
माझे दुटप्पी हात                       ||
 (Originally written on 14/12/1993 during 0.30 to 1.00 am, revised on 11/11/2014)


कविता - तुम्ही काय करता? ( मूळ लेखन ०७/०९/१९९४, पुनर्लेखन २३/११/२०१४)


तुम्ही-आम्ही पैदासलेल्या
गलिच्छ उकिरड्याला
रोजगारासाठी उपसणारे
ते इवलेसे हात.........
लपवत फिरतो उकिरडा करणारे माझे हात
तुम्ही काय करता?         ||

तुम्ही – आम्ही फेकून दिलेल्या
डिशेश, फूडपॅकेट्स, कप्स
चाटणाऱ्या त्या लहानुल्या जिवण्या.........
काहीच उरू देत नाही मी त्यांना खाण्या
अश्या वेळेस तुम्ही काय करता?                ||

तुम्ही आम्ही केलेल्या
सुखाच्या प्रदर्शनाकडे
पाहणारे ते निस्तेज, आशाळभूत डोळे.........
कातडे ओढून डोळ्यावर मा‍झ्या टाळतो ते डोळे    
तुम्ही काय करता?               ||

 तुम्ही आम्ही उभारलेल्या
या जगाच्या भरडयंत्रात भरडून
छिन्नविछिन्न, उध्वस्त होणारी ती निश्राप जीवनं .......
मारून टाकतो मी, माझा आत्मा, माझे मन
सांगा ना, तुम्ही काय करता?       ||

(originally composed on 07/09/1994  during 1.0 to 2.0 pm, revised thoroughly on 23/11/2014 during 8.30 to 9.00 am)


कविता - बदललेला तो 

पूर्वी तो पायी चालणारा,
कधी तरी बसने फिरणारा होता
चार रस्त्यावर गाड्यांभोवती पडणारे 
भिकार्‍यांचे कोंडाळे त्याला व्यथित करीत असे
रागही येत असे भीक न घालणार्‍या  श्रीमंतांचा ।

क्वचित कोण्या भिकाऱ्याने चुकून पसरलाच हात त्याच्यासमोर
तर तो रिकामे खिसे उगाचच चाचपडत निघून जात असे अपराधीपणे ।

मेहनतीने वा  नशीबाने तो फिरू लागला स्वत:च्या वाहनाने,
रिक्षा, टॅक्सी वा  स्वत:च्या वाहनाने फिरताना
वाहनांच्या आत अगदी त्याच्यापर्यंत हात पसरवणाऱ्या
भिकार्‍यांचे कोंडाळे त्यालाही पडू लागले ।

बहुतेक वेळा तो चिडायचा त्या बिनमेहनतु लोकांवर,
क्वचित भीक द्यायचा मेहनत करण्याची शिकवण देत ।

आता तो फिरतो विमानात, शोफरवाल्या महागड्या गाड्यांमधून,
जागोजागी बंद काचेच्या त्याच्या गाडीला घेरणारे भिकारी  पाहून
चीडही येत नाही कोणाचीही वा व्यथितही  होत नाही तो कोणासाठी
नाही उरला तो अपराधी भाव, नाही ते मेहनतीची शिकवण देणे ।

त्याच्या भाव विश्वातून भिकारयाना, त्यांच्या विषयीच्या भावनांना
हद्दपार करण्याची श्रीमंती कला शिकला आहे तो आता  ।


Monday 10 November 2014

कोण्या एखाद्याचा आरसा, मुखवटे, पत्यांचा बंगला आणि यशाची शिडी



दिनांक - १०/११/२०१४

'कोण्या एखाद्याचा आरसा, मुखवटे, पत्यांचा बंगला आणि यशाची शिडी' !! 

तीन महिन्याहून अधिक काळानंतर माझ्या ब्लोगला माझी भेट, मग इतरांची काय कथा. आत्ता वाटते आहे अनेकदा ठरवूनही का नाही ब्लोग लिहिला - आळस? कि तो फार लोकांपर्यंत पोचू शकला नाही? किंवा लोकांनी तो follow केला नाही म्हणून आलेली निराशा कि तो लिहिण्या मागची प्रेरणा संपली?

फार लोकांनी तो follow करावा अशी कधीच अपेक्षा नाही, ज्या व्यक्तींनी तो वाचवा असे वाटते त्यांनी तो वाचला त्यात सारे आले. आळस आणि मनाला निवांतपणा नसणे हीच मुख्य करणे ब्लोग न लिहिण्याची.

मधल्या काळात जुन्या कवितांचे पुनर्लेखन मात्र चालू होते आणि यावेळेस एक एक कविता ठेवण्याऐवजी एका कालखंडातल्या, एका अनुभूतीच्या सर्व कविता एकत्र ब्लोगवर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. १५ ते २० वर्षापूर्वी लिहिलेल्या कच्या कवितांचे पुनर्लेखन करताना अनेकदा त्या पूर्णच बदलून जात आहेत, नव्याने कविता केल्याचा आनंद मिळतो आहे. ह्या वेळेस दोन कवितांच्या बाबतीत तर त्यांचा भाग दोन लिहिण्याची इच्छा झाली कारण त्या कवितां मध्ये एक प्रवास, एक त्यावेळेची स्थिती होती पण त्याचे पुनर्लेखन करणारा मीच जरी असलो तरी मी २० वर्षांचे आणखी आयुष्य जगलेला माणूस आहे, वेगळा आहे आणि त्यामुळे आजच्या मला त्या कवितांचा भाग दुसरा लिहावासा वाटला.

१९९० ला माझे प्रमोशन होऊन मी बडोदे महानगरपालिकेत चीफ अकौंटंट झालो, त्याच वर्षी माझी urban finance या विषयातील Ph. D. झाली आणि इतर अनेक चांगल्या गोष्टी घर, गाडी इत्यादी लगोलग घडल्या. महानगरपालिकेतील राजकारण, निर्णय प्रक्रिया, भ्रष्टाचार, भेटायला येणाऱ्या सामान्य लोकांचे प्रश्न, आयुष्यात एकामागोमाग मिळू लागले यश इत्यादी अनुभूतींना व्यक्त करून पाहणाऱ्या या काही कविता .......

ब्लोग खूप लांबला आहे कवितांमुळे तेंव्हा तुकड्या तुकड्याने वाचावा  ------

कविता – भाग्यनगरी – पुनर्लेखन दिनांक ०७/१०/२०१४


या समृद्ध स्वर्गमय भाग्यनगरीच्या
अभेद्य तटबंदीच्या अवतीभवती
कुंकुमतिलकासाठी भाग्यदेवीच्या
आशाळभूतपणे फिरणाऱ्यानो
एकेकाळी मी ही असाच वेडापिसा होऊन
               करीत असे प्रदक्षिणा भाग्यनगरीला    ||

भाग्यदेवी कधीही, केंव्हाही बाहेर येते,
कोणालाही भाग्यनगरीत घेऊन जाते,  
एकेदिनी नकळत मलाही ओढून नेले,
               या नगरीचा सन्मान्य रहिवासी केले ||
              
मनस्वीपणे, एकाधिकारे वसूलते
निर्मम, भावनाशून्य भाग्यदेवी
नगरीच्या प्रत्येक भाग्यवंताकडून
               तिच्या कृपेची किंमत   ||

भाग्यनगरीत अनेक तटबंदी
तटबंदीच्या आत उच्चासने,
एकाहून एक उच्च अन्तःवर्तुळे
त्या उच्चासनांवर, अन्तःवर्तुळात जाण्यासाठी
               अहोरात्र धडपडणारे भाग्यवंत   ||

भाग्यनगरीत जातपातीचे,
उच्चनीचतेचे भेदभाव
अधिक धारदार, अत्यंत कडवे
एकमेकांतील स्पर्धा, असूया वैर,
            जीवघेणी, क्रूर, रक्तपिपासू   ||

भाग्यनगरीतील भाग्यवंत
एकमेकांचे गळे घोटतात,
सर्वंकष युद्धे करतात
अंतिम विजय मात्र मिळत नाही
कोणालाही कुणावर
            भाग्यदेवीची कृपा असेपर्यंत     ||

भाग्यनगरीतून आमचे तुमच्यामध्ये येणे
तुम्हाला लुटण्या, नागवण्या, शोषण्यासाठी
तर क्वचित उद्धरण्या, उपकारण्यासाठी
नेमाने मात्र भाग्यनगरीत परतणे 
तुमचे आशीर्वाद, समाजमान्यता घेऊन
            तुमची कमाई, स्वप्ने, तुमचे श्रमधन लुटून    ||

तुमच्या कडून आणलेल्या
लुटीच्या, आशीर्वादांच्या, समाजमान्यत्येच्या
भांडवलावर लढले जाते मरणांत युद्ध
अन्तःवर्तुळात पोचण्याची
उच्चासनांवर चढण्याची
            भाग्यवंतांचा भाग्यवंत ठरण्याची     ||

भाग्यदेवीला राग येतो, कंटाळा येतो,
अव्याहत तिच्या इशार्‍यावर नाचणाऱ्या
तिच्या कृपेमुळे टिकलेल्या
परजीवी, कठपुतली भाग्यवंताचा
तोडून, मोडून, संपवून टाकते
            नकोश्या भाग्यवंताला      ||

प्रत्येक भाग्यवंताच्या दुर्दैवी अंताचे
खरे प्रेक्षक तुम्हीच
काहींसाठी सुखावणारे
काहींसाठी हळहळणारे
तरीही भाग्यदेवी समोर
बदली कामगारासारखे पसंदगीसाठी
            उभे राहणारे तुम्हीच     ||

भाग्यवंतांची ही शोकांतिका
कदाचित पोचेल न पोचेल तुमच्या पर्यंत
ती लिहिण्यापलीकडे मी काहीच करू शकत नाही
भाग्यदेवीने माझा आवाजच हिरावला आहे
            तिच्या कृपेच्या मोबदल्यात      ||

(Originally composed on 31-12-1992 revised on 07-10-2014 thoroughly)


कविता – यशाची शिडी – पुनर्लेखन दिनांक ०८/१०/२०१४
         
जाणता – अजाणता ठेवतो पाय
यशाच्या शिडीवर आपण
थोडे अधिक वर जाण्याच्या नादात
इतरांहून अधिक उच्च होण्याच्या ध्यासात
पायाखालची जमीन दिसेनाशी झालेली कळतच नाही
वर - खाली धुकंच धुंक असते
पोटात गोळा उठतो
खाली उतरावंस वाटंत
ते मात्र शक्य नसत
            खाली चढणाऱ्यांची रांगच रांग असते  ||

यशाची शिडी अत्यंत अरूंद
एकदा चढल्यावर ती उतरणे
बाजूला होऊन मागच्याला पुढे जाऊ देणे
दम खाण्या थांबणे
            काही काही शक्य नसते     ||

थांबता शिडीवर मृत्यू अटळ
मागचे खाली ढकलून मारतील
तुमच्याच देहाची शिडी करतील
यशाची शिडी चढणे त्यानाही अटळ
ह्यासाऱ्यापेक्षा खाली उडी टाकून
            वेळेवर जावे मुक्त होऊन      ||

पुरेसे नसते नियमाने यशाची शिडी चढणे
मागचा केंव्हा पाय खेचेल
गळ्यात कधी फास टाकेल
आपला कसा काटा काढेल
अशक्यच हे सारे जाणणे
मागच्याला म्हणूनच लगेच संपवणे
तोडत जाणे सतत खालची पायरी
चढता आपण वरची पायरी
बंद करण्या मार्ग इतरांचा
            आपल्याच हातानी आपल्या परतीचा     ||

अपरिहार्यपणे शिडी चढत गेल्यावर
यशाच्या शिडीवर खूप उंचावर
आपण अगदी एकटे असतो
हवा विरळ, गोठवणारी असते
श्वास रुंधू लागतो, जीव घाबरतो
शेवटचे भान हरवण्यापूर्वी
अवतीभवती पायऱ्या नसलेल्या शिड्याशिड्यांवर
दिसतील गोठलेले, निर्जीव यशवंत
कोणी असलाच जिवंत त्यातला
तरी तोही आपल्यासारखा संपलेला  
स्वतःच्या शिडीच्या टोकाला गोठलेला
            असहाय्य इतरा मदत करण्याला        ||

आपली ही यशस्वी शोकांतिका लवकरच संपेल
इतरांसारखे आपलेही गोठलेले पार्थिव लोंबकळत राहील
यशाच्या अत्युच्य शिखरी मेरुदंडासारखे
आपली ही शोकांतिका कुणालाच कळणार नाही
जमिनीवरच्या पामरांसाठी आपण असू
            यशःपुंज, यशवंत, यशस्वी, यशःसूर्य       ||
   

 कविता – पत्त्यांचा बंगला – पुनर्लेखन दिनांक १०/१०/२०१४


प्रत्येकजण बांधतोय पत्त्यांचा बंगला
शिक्षण, कारकीर्द, पैसा, अधिकार,
स्वप्नातले घर, मनाजोगा साथीदार, सुखी संसार,
सामाजिक प्रतिष्ठा, यश, कीर्ति, मान सन्मान ......
            अश्या इच्छारुपी पत्त्यांचा बंगला   ||

लागत नाहीत कोणालाच सगळे पत्ते
पायाचे, इमल्याचे, घेऊन जे मिळाले ते पत्ते
उभारत रहायचा पत्त्यांचा बंगला
छोटा-मोठा, सुबक – वेडावाकडा, बंदिस्त – मोकळा
            जसा जमेल तसा उभारत रहायचा पत्त्यांचा बंगला   ||

पत्ते उभे राहतात
पत्ते कोसळत राहतात
पुन्हा पुन्हा कोसळत राहतात
उभारत नाही पत्त्यांचा बंगला
अश्यावेळी वेडपिंस होऊन
व्यसन लावून घेऊन
            उभारत रहायचा पत्त्यांचा बंगला   ||

कधीतरी जमू लागतो पत्त्यांचा बंगला
हाव वाढते इमल्यावर इमले बांधण्याची
कोसळू न देण्या उंचच उंच वाढलेला
तकलादू पत्त्यांचा बंगला
साऱ्यांना दूर सारून
सारी कवाडे बंद करून
कापऱ्या हातांना निर्जीव करून
भयाकुल मनाला गाडून
स्वत:चा श्वासही रोखून
            उभा राखायचा पत्त्यांचा बंगला    ||

नसेलच जर जमणार हे सारे
भिरकावून द्यावे लावण्याआधीच
इच्छारुपी पत्ते मिळालेले
बांधावा घट्ट नात्यांनी बनलेला
            चिरंतर टिकणारा पत्त्यांशिवायचा बंगला ||
 


अगदी आता आतापर्यंत

मी नेमाने आरशात

स्वत:ला नीट न्याहाळत असे

एखाददुसरा डाग, मुरूम दिसताच

त्याला निपटून टाकत असे

आरशालाही सतत स्वच्छ ठेवत असे

माझा आरसा, चेहरा दोघेही नितळ होते    ||


अचानक एक प्रवास सुरू झाला

जागोजागी आरसे असतातच म्हणून

माझा आरसा बरोबर घेतलाच नाही

प्रवासात घाम, धूळ, धूर, घाण

चेहर्‍यावर, अंगावर बसतेच

‘व्यक्तीचे डोळे आरसा असतात’ म्हणून

सहप्रवाश्यांच्या डोळ्यात स्वत:ला निरखले  

काहींचे आरसे गढूळ, काहींचे छिन्नविछिन्न

काहींचे भकास, कावेबाज तर काहींचे फसवे  

त्या आरश्यांवरचा विश्वासच उडला 

जेंव्हा जसे आरसे तसे प्रतिबिंब दिसले माझे

सहप्रवाश्यांच्या अश्या आरशांच्या गर्दीत

कधीतरी, कुठेतरी, निसटत दिसायचे

मलिन झालेले प्रतिबिंब माझे 

‘व्यक्तीचे डोळे नितळ आरसा नसतात’ म्हणून

मी ते सपशेल नाकारले         ||


रस्त्यात जागोजागी होते अनेकविध

सामाजिक आरसे भले थोरले

त्यांच्यासमोर थबकून स्वत:ला निरखले

लोकांच्या त्यातील मलिन, भकास, कावेबाज वगैरे

प्रतिबिंबांच्या गर्दीत सापडले नाही प्रतिबिंब माझे

दिसलेच कधी तर ते इतरांहून स्वच्छ असे

शेवटी मी नादच सोडला

इतरांच्या आरश्यांत स्वत:ला पारखण्याचा          ||


परतलो घरी काही दिवसापूर्वी

पुढच्या प्रवासाच्या तयारीसाठी

आल्या आल्या चेहरा, शरीर चांगले स्वच्छ करून

उभा राहिलो आरश्यासमोर अत्यंत आत्मविश्वासाने

पाहण्या स्वतःचे स्वच्छ, नितळ, निर्मल प्रतिबिंब

मा‍झ्या आरश्यात पडलेले माझे हे प्रतिबिंब

प्रवासात इतरांच्या आरशात पाहिलेल्या प्रतिबिंबाहून

होते अधिक मलिन अन छिन्नविछिन्नही

मा‍झ्या आरश्याचाच पारा उडला आहे जागोजागी          ||


(originally composed on 16/11/1990  0.20 to 0.50 am, revised thoroughly on 11/10/2014 from 1.0 to 4.0 pm)


 कविता – आरसा २ (१९-२० /१०/२०१४)


मा‍झ्या आरशाचा उडलेला पारा सांधण्यासाठी

बदलली मी प्रवासाची दिशा, सहप्रवासी बदलले,

प्रवासाचा प्रकार, हेतू, ध्येय सारे काही बदलले

आरसा, प्रतिबिंब पुन्हा स्वच्छ, निर्मळ होण्यासाठी         ||


वर्षानुवर्षे प्रवासात घाम, धूळ, धूर टाळले

वागणे, बोलणे, विचारणे, जगणे बदलले,

आरसा, प्रतिबिंब स्वच्छ, निर्मळ झालेही  

पूर्ण स्वच्छ, एकसंध झाले नाही ते तरीही                ||


स्वच्छ-एकसंध प्रतिबिंब असणाऱ्याना पुसले

साऱ्यांकडून एकच एक उत्तर मिळाले

पूर्ण स्वच्छ, एकसंध प्रतिबिंब तुला साध्य होईल

निर्मळ, संजीवक, प्रेम करणाऱ्या डोळ्यांनी जर ते पाहीले         ||


मजवर प्रेम करणाऱ्या स्वच्छ डोळ्यांत पारखले

प्रतिबिंब अधिक पूर्ण, एकसंध तरीही अपुरेच जाणवले

अचानक पूर्ण प्रतिबिंब दिसले, अनपेक्षित डोळ्यांत

क्षणार्धात झोकले स्वतःला त्या निर्मळ, प्रेमळ डोहात            ||


मिळाले जरी हवेहवेसे पूर्णत्व आरशाला, प्रतिबिंबाला

नुरली आता गरज त्यांची मजला

पामता मी आश्वासक, संजीवक डोळ्यांच्या सखीला

निर्मळ, प्रेमळ, शुद्ध अंत:करणाच्या सखीला             ||


 कविता – मुखवटे (पुनर्लेखन १३-१४ /१०/२०१४ मूळ कविता नोव्हेंबर १९९०)

चेहर्‍यावर मी पहिल्यांदा मुखवटा घातला
आप पर भाव जेंव्हा मला समजू लागला
घालावेत मुखवटे काळ, परिस्थिती, व्यक्ति पाहून 
झालो खरा समजूतदार मी हे कळले तेंव्हा पासून   ||

होते ओबडधोबड, एकरंगी, भावशून्य मुखवटे माझे
आता सुबक, रंगीबेरंगी, भावपूर्ण, मुखवटे माझे
बहुतेकांचे मुखवटे एक-भावी वारंवार बदलावे लागणारे 
मजपाशी मुखवटे लवचिक हवा तो भाव दाखवणारे ||

अभ्यासतो सतत मुखवटे इतरांचे मुखवट्या आडून
रंग, रूप, भावांचा खोटेपणा घेतो निगुतीने टिपून   
आणतो नित नवे मुखवटे मिळेल त्या मार्गाने शोधून
घडवतो बेमालूम त्यांना मनासारखे दिवसरात्र झटून        ||

आता मज जवळ अगणित मुखवटे प्रत्येक प्रसंगासाठी
प्रत्येक काळ वेळ, प्रत्येक माणूस, त्याच्या मुखवट्यासाठी
आता नाही मज जवळ खरा चेहरा मा‍झ्या स्वत:साठी
राहून सतत मुखवट्यात झाला अनोळखी तो मजसाठी     ||  

 कविता – मुखवटे २  (१९/१०/२०१४)


प्रत्येक काळवेळ, प्रत्येक माणूस अन त्याच्या मुखवट्यासाठी
मज जवळ अगणित बेमालूम मुखवटे प्रत्येक प्रसंगासाठी
असण्याचा, वापरण्याचा जमा‍ना गेला,
मीच तो स्वत: उत्क्रांत होऊन बदलला                        ||

खरा चेहरा मिळविण्यासाठी, पारदर्शी होण्यासाठी  ?
चुकलात, मूळ चेहराच मुखवट्यासारखा वापरण्यासाठी           ||

असले मुखवटे कितीही हलके, लवचिक, बेमालूम
चेहरा खाजतो, उबतोच, अनोळखी राहतो स्वत:साठी
मूळ चेहराच काळ, परिस्थिती, व्यक्तिनुसार बदलण्यासाठी
अंतरंगातच प्रत्यारोपित केले मुखवटे लवचिक, बेमालूम          ||

  

कविता – एखाद्याला (24/10/2014)


एखाद्याला स्वप्नातही कल्पिले नव्हते
असे यश मिळू लागते
यशस्वी होणे मग अंगवळणी पडते
सहजगत्या जमू लागते            ||

चालतेही कधी दीर्घकाळ
ही चढती भांजणी यशाची
उतरण मात्र अटळ
एक दिवस या चढत्या आलेखाची    ||

कधी चक्रनेमिक्रमाच्या न्यायाने
बहुधा व्यक्तीमधील अपुर्णतेने
कोणी म्हणेल, मोठं होता होता व्यक्तीने
दूर करावी अपूर्णता स्वत:तली सभानतेने    ||

कितीही इच्छिले तरी ते शक्य होत नाही
नाही जमले इडीपसला
कर्णाला, अश्वत्थाम्याला
मानवी इतिहासाच्या मानबिंदूना           ||

जमले मात्र या सर्वांना
पतनातही उंची गाठणे
धीरोदात्तपणे दुर्दैवाला सामोरे जाणे
अंती आत्मिक मुक्ती मिळविणे          ||

अटळ पतनातही मिळवता यावी
मुक्ती, अजरामर सहानुभूती तुमची  
या साऱ्यांनी मिळवलेली
या एखाद्याला                        ||

( originally composed on 15/04/1995 2.30 to 2.45 pm, revised on 24/10/2014)