Saturday 5 September 2015

गुरुचे (नांदेडकर सरांचे) काळाआड जाणे

ब्लॉग - दिनांक – ०५/०९/२०१५ – गुरुचे (नांदेडकर सरांचे) काळाआड जाणे


परवा  सकाळी ०३ सप्टेंबर रोजी पुण्यात नांदेडकर सरांचे निधन झाले. मी दुपारी शिकवत असताना फोन आला, फोनवर अर्थातच  त्यांचे नाव आले, घ्यावासा वाटला पण क्लास संपत आला होता म्हणून घेतला नाही, अर्ध्या तासाच्या आत क्लास संपला, मुले पांगली आणि एकटा पडल्यावर त्यांना फोन लावला, रिंग जाता असताना मनात विचार करत होतो हे सांगूया, ते सांगूया.....सर नर्म, खुसखुशीत विनोद करायचे त्यामुळे ते काय बोलतील ह्याची नेहमीसारखी उत्सुकता मनात होती.....   रिंग लांबली मनात विचार आला घरीच असतील तर घराच्या क्रमांकावर फोन करावा..... तेवढ्यात फोन घेतला गेला.... त्यांचा फोन तेच घेणार ही खात्रीच असल्याने त्यांच्या आवाजाची वाट न पाहता मी सुरवात केली ..... सर रवि बोलतो आहे तुम्ही फोन केला होता पण तेंव्हा मी शिकवत होतो ...... माझे वाक्य थांबवणारा अपरिचित स्त्रीचा आवाज – तुम्ही बडोद्याचे रवि जोशी बोलता आहात का ? मी गोंधळात हो म्हटले, थांबा हं म्हणत फोन दुसऱ्याला दिला गेला, तो देताना बडोद्याहून मी बोलतो आहे हे सांगीतले गेले ते मी ऐकले आणि मनात अभद्र आले .... सर गेले की काय? (सर आजारी आहेत असे सांगतील असे का नाही आले मनात? पण हे नेहमीचे आहे असा काही फोन आला वा कोणी प्रत्यक्षात बातमी सांगू लागले की कोणाच्या जाण्याची बातमीच मनात आधी उमटते माझ्या...) फोन वर मग आणखी एक अपरिचित स्त्री आवाज ‘नाना आज सकाळी गेले, मी त्यांची सून सुरेखा बोलते आहे ..... त्या सुन्नपणातही काय, कसे घडले अभावितपणे विचारले गेले .... दोन तीन दिवसांच्या आजाराने, हृदय विकाराने गेले ..... आता त्यांना नेण्याची तयारी चालू आहे मग फोनवर बोलू ... संपले संभाषण आणि हे ही जाणवले आपल्या अस्तित्वाचा एक भाग संपला........
जवळपास कोणीच नव्हते, कारमध्ये थोडावेळ बसून राहिलो... नुसता सुन्नपणा, स्व‍कीयांच्या मृत्यूचा अनुभव गाठीशी आहे आणि मनाने ‘जातस्य ध्रुवो मृत्युः’ आणि स्वत:चाही मृत्यू स्वीकारला आहे त्यामुळे सुन्नपणा येतो, कळ उठते, काही अश्रू ओघळतात पण काही वेळाने सारे सुरळीत होते आणि त्या व्यक्ती सोबतचे चांगले क्षण आठवू लागतात. तसेच झाले काही वेळाने गाडी सुरु केली घरी निघालो आणि सोबत सुरु झाला सरांच्या बरोबरच्या २९ वर्षांच्या आठवणींचा प्रवास...... त्या प्रवासात घरी आलो, घर उघडले, सारे शांत होते. मनाचा सुन्नपणा घालवण्यासाठी मग तासभर झोपून गेलो. झोपेतही तो आठवणींचा प्रवास चालूच होता. सरांविषयी हा लेख लिहावा असे झोपण्या आधीच वाटत होते पण नाही केले तसे, व्यस्तता तर होतीच त्याहून अधिक महत्वाचे म्हणजे गेले दोन दिवस जमेल तेंव्हा मनाला रमू दिले त्यांच्या आठवणीत आणि मगच आज लेख लिहिण्यास घेतला.
आज लेख लिहायला घेतला आणि जाणवले आज ‘शिक्षक दिन’ आहे....  शिक्षक दिनी त्यांच्या विषयी, इतर माझ्या शिक्षकांविषयी लेख लिहायला केंव्हाही आवडला असता, पण अशा संदर्भात नक्कीच नाही. खरे म्हणजे काही दिवसापूर्वी २१ ऑगस्टला ‘गुरु’ ह्या विषयी एक कविता सुचली, ती ब्लॉगवर ठेवणे लांबत गेले मग मधेच केंव्हातरी जाणवले शिक्षक दिन जवळच आहे तेंव्हा त्या दिवशी लेख लिहू आणि कविता  ब्लॉगवर ठेवू असे ठरवले, पण त्याआधीच सर गेले आणि आजच्या शिक्षक दिनी त्यांच्याविषयी असा हा लेख लिहिणे होत आहे. जी कविता सरांवरून, त्यांच्या माझ्या नात्याविषयी सुचली ती त्यांनाच सादर अर्पण ....

कविता – गुरु - मूळ लेखन – २१/०८/२०१५

(मूळ लेखन – २१/०८/२०१५ सकाळी ६.० ते ८.० बडोदे – अहमदाबाद प्रवास)

चुकलेल्या वासराने
चुकीच्या गाईंमागे
आई म्हणून जाऊ पहावे
गाईंनी झिडकारावे, दुर्लक्षावे
तसा अथांग फैलावलेल्या जागेत
अगणित दिशांना जाणाऱ्या
अगणित अनोळखी माणसांनी
दुर्लक्षिल्याने, झिडकारल्याने
कुठे जावे हे न समजल्याने 
हरवलेला, दिग्मूढ असा मी            |

अचानक माझा हात
कुण्या आश्वासक हातानी
हातात घेतलेला 
मुठीत माझ्या मग एक बोट
पुरेसा आधार देणारे
तरीही मोकळे ठेवणारे
त्या गर्दीतून योग्य वाटेवर नेणारे
माझी सर्व बोटे आता
अनेक हातानी धरलेली
इतके मला मोठे करणारे              ||

सरांनी मी त्यांच्या कडे Ph. D. करण्याच्या पहिल्या ५ – ६ वर्षात विषयाचे प्रत्यक्ष शिक्षण, ज्ञान; त्यानंतर लाईट हाउस सारखे अविरत अप्रत्यक्ष मार्गदर्शन आणि ओळख झाल्यापासून  २९  वर्ष मला वडीलांसारखे प्रेम दिले. एकही कटू प्रसंग नाही, कोरडा प्रसंग नाही, कुठलेही मनदुःख नाही त्यांच्या बरोबरचा प्रवास म्हणजे फक्त आनंदयात्रा ठरली. ज्ञानाचा अभिमान नाही, बडोद्यातून निवृत्त होऊन पुण्याला गेल्यावर गेली २० वर्षे म्हणजे वयाच्या ८२ व्या वर्षापर्यंत ज्ञानप्रबोधिनी या संस्थेद्वारा ज्ञानदानाचे सतत कार्य केले एवढे सांगणेच पुरेसे आहे त्यांच्याविषयी. ह्याशिवाय केलेले संशोधन, दिलेली व्याख्याने आणि केलेले लेखन वेगळेच. अनेक विध्यार्थी, IAS officers तयार झाले त्यांच्याकडून पण त्यांच्या हाताखाली Ph. D. करणारा मी एकटाच म्हणून मला त्यांचे विशेष प्रेम मिळाले..
त्यांच्याकडे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा हेवा वाटत असे मला, कारण मला Ph. D. करायला घेण्याआधीही आणि ती झाल्यावर ते पुण्याला आल्यापासून गेली २० वर्षे त्यांच्याकडून प्रत्यक्ष शिकायला मिळाले नाही, किंवा आमच्या विषयावर फारशी चर्चा पण करणे जमले नाही कारण अनेक दिवसांनी भेट व्हायची आणि मग कौटुंबिक गप्पा गोष्टीच व्हायच्या, आता तेही संपले. त्यांच्या कडून गेल्या २० वर्षात प्रत्यक्ष शिक्षण मिळाले नाही, पण कुठलेही नवे संशोधन करताना, लेख लिहिताना, व्याख्यानाची तयारी करताना, consultancy प्रोजेक्ट  सर ह्याचा कसा विचार करतील हा विचार मनात करत असे. Ph.D. चा अभ्यास करताना त्यांनी दिलेली शिकवण / शिस्त आठवत असे. एवढेच नव्हे माझ्याकडे थिसीस करायला प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांनी मला शिकवलेली पद्धत, विचार त्यांचा आवर्जून उल्लेख करून शिकवतो. आता ते नाहीत तेंव्हा त्यांचा विचार करून मनातल्या मनात त्यांचे मार्गदर्शन घेण्याचा प्रकार मी निवृत्त होई पर्यंत चालू ठेवावा लागणार.
आज अनेक विध्यार्थ्यान कडून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा मला मिळत आहेत पण तुम्हाला फोन करून माझी 
कृतज्ञता व्यक्त करायला सर तुम्ही नाहीत तेंव्हा या श्रध्दांजली लेखाने माझी कृतज्ञता तुम्हाला सादर करतो ..............