Thursday 26 February 2015

पहिल्या वहिल्या गोष्टी

दिनांक – २६/०२/२०१५ – पहिल्या वहिल्या गोष्टी  

आयुष्यात केलेला पहिल्या वहिल्या गोष्टींचे महत्त्व, अप्रूप, आठवणी वेगळ्याच असतात, त्याला कोणीही अपवाद नाही, काही हे सारे छान पणे व्यक्त करतात, करू शकतात, काही नाही करू शकत किंवा नाही करत. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यातील सगळ्याच पहिल्या वहिल्या गोष्टी नाही सांभाळून ठेवता येत, काही जमतात काही काळ पण बहुतेक गोष्टींबाबत अनेक कारणांनी ते शक्य होत नाही; पण मन मात्र हे समजून घेत नाही आणि त्याला आपले वाटत राहते आपण हे केले असते तर ती गोष्ट टिकवता आली असती, ते केले असते तर हे करता आले असते इत्यादि. मला माझी स्कूटर २७ वर्ष टिकवायला जमली आहे आजही वापरतो पण ती ही अजून किती काळ वापरू शकेन मी हा प्रश्नच आहे.

आमचे पहिले घर १९८७ साली घेतलेला ओनरशिप flat होते त्यात चार वर्ष राहिलो, मनामध्ये लहानपणापासून जमिनीसकटचे बाग करता येईल अश्या घराचे स्वप्न असल्याने तशी संधी येताच flat विकून आणखी लोन घेऊन १९९१ साली नव्या मोठ्या घरात गेलो पण पहिल्या घराच्या स्मृती कायमच्या बरोबर घेऊन गेलो. ह्या अनुभूतिची १९९२ साली लिहिलेली ही कविता .......

कविता – भिंती (मूळ लेखन – ०३/११/१९९२ पुनर्लेखन २४/०२/२०१५ )


फिरता चार भिंतींमध्ये त्या
घर मन-स्वप्नातले  साकारले
होता भिंती आमच्या त्या
      क्षण शब्दातित अनुभवले                ||

म्हणालो भिंतींना, सजवायला तुम्हाला
      काहीच नाही मजपाशी आजला
म्हणाल्या भिंती काहीच नको आम्हाला
      घेऊन या हसत्या खेळत्या वसंताला        ||

प्रतीक्षा बाळाच्या आगमनाची
      तयारी त्याच्या स्वागताची
बाळाचे येणे, हसणे, रडणे
      बाळाचे खेळणे, धडपडणे बोलणे
आम्ही एकत्रच अनुभवले
      सुख-दुःख वाटून घेतले                  ||

बाळ वाढले भिंतीच्या ऊबेत, मायेत 
मोठा झालो मी ही, जास्तच कदाचित
आधी उत्तुंग वाटलेल्या
भिंती खुज्या वाटू लागल्या
नव्या भिंतींच्या मोहात
सोपल्या त्यांना दुसर्‍याच्या हातात               ||

पाय जड झाला – अडला
      त्या भिंती सोडता 
परी न थांबला 
मनातली घरचौकट बदलता               ||

आठवणीनी त्या भिंतींच्या
ओलावतात कडा डोळ्यांच्या
वाटते त्या भिंतींमध्ये परतावे 
      पुन्हा जगावे, तिथेच मरावे
नाही शक्य हे आता 
भिंती दुसऱ्यांना सोपता                  ||

उमजले मला जे
उमजेल तुम्हालाही ते
करता आपण घर भिंतींमध्ये
भिंतीही करतात घर मनामध्ये
येते सोडता, तोडता, विकता भिंतींना

      येत नाही विसरता त्यांच्या स्मृतींना        ||

Saturday 21 February 2015

कुणाला कसे ते कळणे

ब्लॉग – दिनांक २१/०२/२०१५ - कुणाला कसे ते कळणे’


ब्लॉगच्या वर्धापनदिनाचा ब्लॉग लिहिल्यावर जमलेच नाही ब्लॉग लिहायला. खरं तर मनाशी ठरवले होते कवितेशिवायचे इतरही विषयांवर ब्लॉग लिहावयाचे, पण ते जमलेच नाही. आजही पुन्हा एक जुनी कविता पुनर्लेखीत केली म्हणून हा ब्लॉग लिहिला जातोय. नेहमीप्रमाणे ब्लॉगवर नुसतीच कविता ठेवता आली असती पण या कवितेच्या पुनर्लेखनाने एक वेगळाच अनुभव दिला.

ही कविता १९९२ ची फक्त एकाच कडव्याची शीर्षक नसलेली आणि अर्धवट राहिलेली. गेले वर्षभर इतक्या साऱ्या कविता पुनर्लेखन करताना ज्या कवितांचे पुनर्लेखन अवघड वाटले वा जमेल असे वाटले नाही त्यांना बाजूला टाकल्या होत्या त्यातली ही कविता. पण परवा १९ फेब्रुवारीला सकाळी उदयपूर मध्ये कामाच्या गडबडीत असूनही ते एक कडवे पुनर्लेखीत करण्याचा सूर लागला आणि मग पुढली दोन कडवी सुचून कविता पूर्ण झाली, त्यातला विचार पूर्ण झाला. अर्थात मूळ कडवे लिहिले त्यावेळी काय विचार होता, २२ वर्षापूर्वी एक कडवं लिहिल्यावर आणखी काय सुचत होते ते काहीच आठवत नव्हते पण पुढली दोन कडवी सुचली खरी आणि एक नवी अनुभूति देऊन गेली आणि म्हणून हे सारे ब्लॉग मध्ये लिहिले. अशी ही अत्यंत दीर्घकाळानंतर पूर्ण झालेली कविता ‘कुणाला कसे ते कळणे’    

३.१० कविता – कुणाला कसे ते कळणे (मूळ लेखन १३/११/१९९२, पुनर्लेखन १९/०२/२०१५)


भावनावेगाने
मनाचे तटतटणे
मजपाशी शब्दांचे नसणे
कधीतरी मूकपणे
मनाचे फुटणे
आवाजहीन भळभळणे
शब्दांचेही नसणे
कसे कुणाला ते कळणे
कुणाला कसे ते कळणे            ||

दुखाःवेगाने
मनाचे पिळवटणे
मजपाशी अश्रुंचे नसणे
मनाचे रडणे 
कोरडेच वाहणे
अश्रुंचे नसणे
कसे कुणाला ते कळणे
कुणाला कसे ते कळणे            ||

पोरकेपणाने, एकटेपणाने
मनाचे व्याकुळणे
मायेचे कुणीच नसणे
मनाचे आसुसणे
प्रेमवंचित जगणे
आपले असे कुणीच नसणे
कसे कुणाला ते कळणे
कुणाला कसे ते कळणे            ||


(पहिल्या कडव्याचे मूळ लेखन १३/११/१९९२ सकाळी ७.० पुनर्लेखन १९/०२/२०१५ सकाळी ८.० वाजता, बाकीच्या कडव्यांचे मूळ लेखन १९/०२/२०१५ सकाळी ९.० ते १०.० )

Monday 2 February 2015

पुन्हा कवितेकडे – पुन्हा जीवनाकडे

दिनांक – ०२/०२/२०१५ – पुन्हा कवितेकडे – पुन्हा जीवनाकडे

‘स्वगत’ हा माझा ब्लॉग लिहावयास लागल्यास आज एक वर्ष पूर्ण झाले. ब्लॉगची सुरवात ‘पुन्हा कवितेकडे’ ही कविता फक्त ब्लॉगवर ठेऊन झाली होती, दुसरे काही लिहिले नव्हते ब्लॉगवर. मग वर्षभर मुख्यत्वे कविता (नव्या आणि पुनर्लेखन केलेल्या जुन्या) आणि त्यातल्या काही कवितांच्या अनुषंगाने जे मनात सुचले ते ‘स्वगत’ रुपात मांडले. नाही नाही म्हणता वर्षभरात ५२  ब्लॉग झाले आणि त्याद्वारे ६० हून अधिक कविता ब्लॉगवर ठेवल्या गेल्या. प्रत्येक ब्लॉगच्या रूपाने शब्दांशी, कल्पनाशी, स्वत:शी सर्जक संवाद साधला गेला आणि हे वर्ष अविस्मरणीय झाले. ह्या वर्षात पुन्हा कवितेकडे, पुन्हा ह्या प्रकारच्या सर्जकतेकडे आणि त्यातूनच पुन्हा जीवनाकडे वळणे झाले!!!

वर्ष २०१४ सुरू झाले आणि का कोणास ठाऊक पण मनात कविता करावी असे येऊ लागले, जसे २०११ च्या शेवटला १९९६ नंतर पुन्हा नाटकाकडे वळावे असे वाटले आणि २०१२ – २०१३ मध्ये मी ‘मर्मबंधातली ठेव ही’ हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आणि ‘हे बंध रेशमाचे’ हे संगीत नाटक दिग्दर्शित केले. तसेच काहीसे २०१४ च्या सुरवातीला जवळ जवळ १२ वर्षांनी कवितेविषयी वाटू लागले आणि योगायोगाने बऱ्याच वर्षांनी माझे कवी मित्र हेमंत जोगळेकर यांचे २५ जानेवारीला घरी येणे, राहणे आणि कविता वाचणे झाले. त्या रात्री त्यांनी वाचलेल्या त्यांच्या नव्या अप्रसिद्ध कविता, नंतरच्या एक दोन दिवसात त्यांच्या नव्या कवितासंग्रहाचे आणि काही जुन्या कवितासंग्रहांचे केलेले वाचन ह्यातून मनात ‘पुन्हा कवितेकडे’ ही कविता आकारात गेली आणि ती लिहिली १-२/०२/२०१४ ला आणि लगेच ०२/०२/२०१४ ला ब्लॉगवर ठेवून ब्लॉग सुरू केला.

खरे पाहता ब्लॉग ही संकल्पना २०१०-११ च्या सुमारास आली तेंव्हाच मी ‘अभिज्ञा’ नावाचा ब्लॉग निर्माण पण केला होता पण एखादं दूसर्‍या पोस्ट नंतर त्यावर काही लिहिलेच नाही आणि तो शेवटी विलीनही झाला. २०१४ च्या जानेवारीतच मी अनघा आपटे हिचा ‘मी ... माझे ...मला’ हा ब्लॉग पाहीला, वाचला, आवडला आणि खरच तिच्या ब्लॉगवरून प्रेरणा घेऊन ‘स्वगत’ हा माझा ब्लॉग ०२/०२/२०१४ ला निर्माण केला आणि त्यावर एका तपानंतर केलेली कविता ठेवली आणि हा स्वत:ला अतिशय समाधान देणारा सृजन प्रवास सुरू झाला त्याचे आज एक वर्ष पूर्ण होते आहे. माझा मुलगा सुह्र्द ह्याच्या ब्लॉग सुरू करण्याच्या सुमाराच्या, ‘not being creative or not living creatively, is just being dead’, वाक्याने मला आतून हलवले आणि जुन्या कविता संस्कारित करण्याला, नव्या कविता करण्याला, ब्लॉग लिहिण्याला उद्युक्त केले. कवी श्री. हेमंत जोगळेकर, अनघा आणि सुह्र्द तुमच्यामुळे सुरू झालेल्या सर्जकतेच्या आनंदयात्रेविषयीचा आजचा हा ब्लॉग तुम्हाला अर्पण.

कविता मी अनेकजण करू लागतात अशा वयात (२० च्या आसपास), कॉलेजमध्ये आणि प्रेमात असण्याच्या कालखंडात म्हणजे १९८०-८१ च्या सुमारास करू लागलो. १९८० ते १९८५ हा त्या प्रकारच्या कवितांचा कालखंड, मग एक विराम आणि १९८९ ला मी बडोदे महानगरपालिकेचा चीफ अकौंटंट झाल्यावर जे मला महानगरपालिकेतल्या जीवनाचे वेगळे स्वरूप दिसून येऊ लागले त्याविषयक कविता झाल्या ज्या ब्लॉगवर नोकरीतल्या कविता म्हणून ठेवल्या आहेत, मग १९९२  पासून मराठी वाङ्मय परिषद-बडोदे, बरोडा अॅमॅच्युअर्स ड्रमॅटीक्स क्लब, भाषा संस्था अश्या संस्थांशी काम करताना अनेक साहित्यिकांशी, कलाकारांशी संबंध आला त्यातून निरनिराळ्या प्रकारच्या कविता घडल्या. शेवटी २००२ ला मी महानगरपालिकेची नोकरी सोडली तेंव्हाच्या अनुभवाविषयी कविता झाल्या. पण २००२ पासून मी कविता लिहिणे थांबवले ते २०१४ पर्यंत कारण सर्जनतेच्या प्रक्रियेत / प्रवासात एक टप्पा स्वतःचे सर्जन न आवडू लागण्याचाही येतो. तेव्हाही आणि आजही मला माझे लिखाण, कविता क्लिष्ट, बोजड, शब्दबंबाळ वाटतात, सहज सुंदर नाही लिहिता येत. स्वतःचे सर्जन न आवडण्याच्या ह्या टप्याच्या नंतर मनामध्ये साऱ्याच गोष्टींच्या क्षणभंगुरतेचा विचार शिरला, इतरही काही कारणे घडली. २००२ नंतर मी पूर्णतः non-deterministic life style धारण केली (काही ठरवून करावयाचे नाही काळाबरोबर नुसते वाहत जायचे) अर्थात ती आजही चालू आहे. मुख्य म्हणजे ह्या साऱ्यामुळे  मी creative writing थांबविले, नाट्यक्षेत्रातला आणि साहित्य क्षेत्रातला सहभाग थांबवला. फक्त सल्लागार व्यवसाय आणि शिकवणे चालू ठेवले. व्यवसायाच्या निमित्ताने लिहिणे थोडे फार घडत राहिले.  अर्थात व्यावसायिक लिखाणातही सर्जकता असावी लागते, शिवाय संशोधन आणि अभ्यासही लागतो त्याचप्रमाणे शिकवतानाही एक सृजनशीलता असावी लागते त्यामुळे या मधल्या कालखंडात एकप्रकारे सृजनाची भूक भागत राहिली.

२६ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०१४ ‘पुन्हा कवितेकडे’ ही जी कविता घडली गेली त्या कवितेत वरील सारा प्रवास, माझा प्रतिभेशी बदलत गेलेला संबंध मांडला गेला आहे. ही कविताही पुनर्लेखनातून कशी सुटावी. बरोबर एक वर्षाने हा ब्लॉग लिहताना तिचा इथे संदर्भ देताना जाणवले की ही कविताही नीट सारखी करायला हवी आहे, पुनर्लेखीत करायला हवी आहे आणि त्याप्रमाणे ती केली. पुनर्लेखीत केलेली कविता येथे दिलेली आहे, मूळ कविता सर्वात पहिल्या ब्लॉगवर आहे ..... 

खूप पूर्वी
कधी अचानक, अनपेक्षित  
कधी लपत छपत
कधी चाहुल देत,
कधी आढेवेढे घेत
तुझे मजपाशी येणे                            ||

व्यक्त होण्यासाठी
मोकळे होण्यासाठी
स्वत:ला विसरण्यासाठी-
अधिक समजण्यासाठी
माझे तुजपाशी येणे
अनेकविध रंगाने, ढंगाने, रूपाने
आपले अशरीर, अमूर्त एकत्र येणे                    ||

उजळायचा तुझ्या सान्निध्यात गाभा अंतरीचा
अंतर्बाह्य बदलायचा अर्थ अस्तित्वाचा
शब्द ल्यायचे अगणित पदर अर्थांचे
झळाळत्या केलीडोस्कोपिक भावछटांचे
लावताना संगती शब्दांच्या भाव-अर्थांची
तू माझी व्हायची, माझ्यातून मूर्त व्हायची         ||

वाळवी विश्वाच्या क्षणभंगुरतेची
शिरली मनात केंव्हा
शब्द, सृजन, अस्तित्व सारेची
कळलेच नाही निरर्थले  केंव्हा                  ||
नंतरच्या आपल्या भेटींत                               

क्षणभंगुरतेच्या कृष्णविवराने
शोषून तुझा दिव्य प्रकाश, सृजनशक्ती, जीवनरस
भारून टाकला अंतरीचा गाभा निरर्थकतेने
मी बंद केले तुझ्याकडे येणे
जगत राहिलो आयुष्य वांझपणे                                      ||
  
अखेरीस माझेच मला उमजले
सृजन, जीवन, विश्व जरी क्षणभंगुर असले
रसरशीत, परिपूर्ण, अक्षर ते असते
ज्या क्षणापुरते ते असते                                                  ||

परतलो आहे पुन्हा तुजकडे जगण्यासाठी,
सृजनासाठी, क्षणाच्या अमरत्वासाठी
भंगू दे काठीण्य माझे
भंगू दे काठीण्य माझे                        ||

-- अशाप्रकारे ‘पुन्हा कवितेकडे’ या कवितेने सुरू झाली ही सर्जनानंदाची यात्रा/ब्लॉगची यात्रा !!

१९८१ ते २००२ ह्या कालखंडात मी अधूनमधून जरी कविता लिहित होतो तरी कविता लिहिण्या मागची प्रेरणा स्वान्तसुखाय होती. मनात विचार कवितेच्या स्वरुपात / घाटात येत असत, त्यांना मी फक्त कागदावर उतरवित असे. कविता सुचताना-लिहून काढताना सृजनाची प्रक्रिया, ते क्षण अनुभवीत असे आणि मग पुढे काहीच करत नसे. कवितेच्या/सर्जनाच्या अनुभूतिने मिळालेले समाधान, आनंद इतका अंतिम असे की उस्फुर्त पण वेड्या वाकड्या, तोडक्या-मोडक्या शब्दात, घाटात अवतरलेल्या त्या कवितेला मी जराही सारखी करत नसे. त्यामुळे त्या प्रसिध्द करणे बाजूला पण काही अतिशय जवळचे कवी मित्र सोडल्यास इतर कोणालाही त्या दाखवण्याचाही प्रश्न नव्हता.

शिवाय कवितेच्या आणि सृजनशील लेखनाच्या विषयी माझा विचार (चुकीचा ???) हा होता की कविता अथवा इतर साहित्य लिहिताना जो सृजनाचा आनंद मिळतो तोच अंतिम, ती कृती दुसऱ्या कोणी  पहिली काय, त्यांना ती आवडली काय आणि नाही काय हे सारे गौण. कविता वा साहित्य सर्जन इतरांना दाखवले नाही तरी आपल्याला सर्जक म्हणून मिळालेल्या आनंदात तसूभर कमीपणा येत नाही - येणार नाही. त्यामुळे मी कविता कुठेही प्रसिद्धीला पाठविली नाही; अर्थात नाही पाठवल्या ते बरे झाले कारण आजही मला मा‍झ्या कविता संस्कारित करून पुनर्लेखीत केल्यानंतरही त्या इतर छोट्या-मोठ्या कवींच्या चांगल्या कवितांच्या तुलनेत पहाता प्रसिद्ध लायकीच्या वाटत नाहीत.

कविता लिहिणे ही एक गोष्ट, ती जशी येते तशी तेंव्हा लिहावी पण मागाहून तिला संस्कारित करावी, तसे करणे चुकीचे नाही हे मला माझे मित्र सुप्रसिद्ध कवी निरंजन उजगरे यांनी सांगितले, समजवले होते. एवढेच नव्हे तर माझ्या एक दोन कवितांना संस्कारित करून त्याचे प्रात्यक्षिक दिले होते. पण मी काही ते २०१४ पर्यंत मनावर घेतले नाही. माझ्या दोनच कविता आत्तापर्यंत प्रसिद्ध झाल्या त्याही निरंजन यांनी पुढाकार घेऊन संस्कारित करून स्वतः छापून आणल्या म्हणून. निरंजन आता आपल्यात नाहीत पण गेले वर्षभर मी हे (जुन्या कवितांना संस्कारित करणे, नव्या लिहिणे, मासिक, वर्तमानपत्रात प्रसिद्ध नाही तर ब्लॉगवर त्यांना प्रसिद्ध करणे) जे काही केले त्याने त्याचा आत्मा नक्कीच सुखावला असेल.

एकमात्र खरे, चुकीचे गृहीतक, आडमुठेपणा वा आळस म्हणा किंवा योग आला नव्हता म्हणून पण ज्या त्या वेळेस कविता संस्कारित केल्या नव्हत्या ते एकप्रकारे बरे झाले कारण जवळजवळ सर्वच कवितांचे संस्करण/पुनर्लेखन १२ ते २० वर्षाच्या कालावधीनंतर केले त्यामुळे प्रत्येक कविता पुन्हा लिहिताना पुनःप्रत्ययाचा आणि सर्जनाचा परिपूर्ण आनंद मिळाला. ह्या रीतीने पाहिल्यास गेल्या वर्षात ८० नव्या कविता केल्या. मूळ कवितेशी / कल्पनेशी इमान राखण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण काही कवितांचे बाबतीत गाभा तोच राहूनही रूप खूपच बदलले कारण गेल्या १५ – २० मी बदललो आहे. कवितांच्या पुनर्लेखनात त्यांचे रूप बदलणे, नव्या कल्पना मूळ कवितेत add होणे इत्यादि प्रकारांच्या पुढे जाऊन हल्ली सिनेमाचे जसे भाग दोन, तीन (sequels) येतात त्याप्रमाणे काही कवितांचे भाग-२ लिहिले गेले. २० वर्षापूर्वी लिहिलेल्या मूळ कवितेला जोड कविता सुचण्याचा अनुभव तर अगदी विलक्षण ठरला.

माझी कवितेच्या मागची सर्जक प्रेरणा स्वतःला स्वतःसाठी, स्वतःपाशी अभिव्यक्त होण्याची/करण्याची होती / स्वान्तसुखाय होती, आजही तशीच आहे तर कवितेच्या शिवाय इतर बाबती म्हणजे अभिनयदिग्दर्शनसामाजिक कार्यसंशोधननिरनिराळ्या ठिकाणी शिकवायला जाणे इत्यादि मागची प्रेरणा सर्जकतेची उर्मी निरनिराळ्या मार्गांनी आणि निरनिराळ्या माध्यमातून पूर्ण करण्याचीसेल्फ इम्पृव्हमेन्टचीइतरांशी संवाद साधण्याचीजीवनात नावारूपाला येण्याची होती. अशा प्रकारे माझा सृजनशील क्षेत्रातला प्रवास काही बाबतीत अत्यंत खासगीस्वान्तसुखाय तर काही बाबतीत दुसऱ्या टोकाचा म्हणजे पूर्णतः लोकानसाठीजाहीर स्वरूपाचा म्हणजे एक प्रकारे विरोधाभासी (diamatrically opposite ) राहिला आहे.  माझ्या ब्लॉगच्या नावामागे, त्याच्या स्वगतोक्ती स्वरुपामागे सर्जकतेच्या ह्या दोन्ही (खासगी आणि जाहीर) पदराची प्रेरणा कारणीभूत आहे.


आत्तापर्यंत कविता प्रसिद्ध न करणारा मी हा ब्लॉग का लिहितो आहे? वर्षभरात किती लोकांनी तो पाहीला / वाचला? ब्लॉग किती लोकांनी पाहीला – वाचला हा प्रश्न गौण आहे कारण माझे ब्लॉग लिहिणे हे माझे स्वगत आहे, माझा माझ्याशी झालेला संवाद, तसा वैयक्तिक तरी नाटकातील स्वगतोक्तीप्रमाणे सर्वांपर्यंत जाणीवपूर्वक पोचवलेला....... तो किती जणांनी ऐकला, वाचला हे त्यात महत्वाचे नाहीच आहे. या ब्लॉगच्या निमित्ताने / या माध्यमातून माझा माझ्याशी, मा‍झ्या प्रतिभेशी गेले वर्षभर सर्जक संवाद घडला ह्यात सारे आले..... पुढल्या वर्षांमध्येही सृजनाची आनंदयात्रा चालू राहो .....