Friday 6 November 2015

कॅनडा डायरी - निसर्गाच्या रंगोत्सवाचा निरोप घेताना आणि कविता - फुलव तुझ्यासारखा मलाही

दिनांक – १७/१०/२०१५ – कॅनडा डायरी - निसर्गाच्या रंगोत्सवाचा निरोप घेताना

इथे टोरांटोला येऊन जवळ जवळ १७ दिवस कसे संपले ते कळलेच नाही, आता उद्या निघणार परत जायला. इथली जीवनशैली, इथली शहरे, प्रेक्षणीय स्थळे, दुकाने, मॉल्स, नायगरा सारखे जागतिक नैसर्गिक आश्चर्य असे अनेक पाहून झाले त्याहून महत्वाचे म्हणजे पानगळी (fall season) च्या आधीचा इथल्या निसर्गाचा रंगोत्सव मनसोक्त पाहून झाला. रंग बदलून पाने गळून जाण्याचा काळ ३० ते ४० दिवसाचा असतो, तो कालखंड लक्षात घेऊनच कॅनडाला जाण्याचे ठरवले होते आणि सुदैवाने त्यातले मधले सर्वोत्कृष्ट २० दिवस मला निसर्गाचा हा रंगोत्सव पाहायला मिळाला.

फॉलमध्ये पाने गळून इथली सारी सृष्टी ओकी बोकी, पांढऱ्या (बर्फाने झाकलेली), करड्या (सुकलेल्या वृक्षांची) आणि काळ्या रंगाची होण्याआधी इथल्या प्रत्येक लहान मोठ्या झाडाच्या पानांचा रंग हळूहळू बदलतो. प्रत्येक झाडाची आणि त्या झाडाच्या प्रत्येक पानाची रंग बदलण्याची छटा / तऱ्हा वेगळी त्यामुळे वेडे व्हायला होईल असे अगणित रंग पहायला मिळतात. जवळून एकेक पान पहिले की वेगळे सौंदर्य, थोडे दुरून संपूर्ण झाड पहिले की वेगळे, आणखी दुरून अनेक झाडे पहिली की दिसणारे आणखी वेगळे सौंदर्य, बऱ्याच दुरून जंगलाकडे पहिले की दिसणारे चित्र वेगळे.... अंतच नव्हता वेगवेगळी रंगचित्रे पाहण्याला, आनंदाला. सतत जाणवत होते निसर्ग नुसता भरभरून देतो आहे त्याच्याजवळचे दुसऱ्या अवस्थेत जाण्याआधी आणि मग हेही जाणवले की मी ही आता अगदी आयुष्याच्या पानगळीत नसलो तरी पानगळीच्या अवस्थेच्या उंबरठ्यावर..... उरलेल्या काळात मीही फुलले पाहिजे इतरांच्या आनंदासाठी, मीही या जगाकडून, समाजाकडून जे जे माझ्यात जमा केले आहे ते ते परत करावयास हवे ......ही कविता ही सारी अनुभूति मांडणारी .......

कविता – फुलव तुझ्यासारखा मलाही

(कल्पना – टोरांटोमध्ये अनेकदा फिरताना; लेखन १७/१०/२०१५ दुपारी १२.०० ते १२.३० श्रीपादचे  घरी – टोरांटो)

होण्याआधी येत्या पानगळीत
निष्पर्ण, रूक्ष, रंगहीन
निसर्गा आहेस तू मांडला
रंगोत्सव अगणित छटांचा
झाडोझाडी, पानोपानी
देण्या सर्वांना ओसंडून
देण्या सर्वांना भरभरून                        ||

निसर्गा तुझाच अंश मी ही
उंबरठ्यावर पानगळीच्या मी ही
वाटण्या सर्वांना भरभरून
माझ्यात जमवलेले सारे काही
फुलव तुझ्यासारखा मलाही 
होण्याआधी मी या पानगळीत

निष्पर्ण, निर्जीव, अस्तित्वहीन                  ||




 



Wednesday 4 November 2015

कॅनडा डायरी – सुरक्षित, सुंदर कोंदणातला अजस्त्र नायगरा

दिनांक – ०७/१०/२०१५ – कॅनडा डायरी – सुरक्षित, सुंदर कोंदणातला अजस्त्र नायगरा !!!


आयुष्यभर नायगरा विषयी वाचून, ऐकून, अप्रत्यक्ष अनेक माध्यमांतून पाहून झालेले होते, त्यातून १९९६ च्या अमेरिका प्रवासात तो पहायचा बाकी राहिला होता त्यामुळे तो पाहण्याची खूप उत्सुकता होती. कॅनडाला ३० सप्टेंबरला पोचल्यावर सर्वात पहिल्यांदा तो पहायला निघालो. अपेक्षेप्रमाणे रविवार ०४ ऑक्टोबर ची नायगरा धबधबा पाहण्याची सहल अविस्मरणीय ठरली. घरून  सकाळी ११ च्या सुमारास निघून अडीच तासात नायगरा येथे पोचलो. टोरांटो हून निघालो तेंव्हा टोरांटो मध्ये ढगाळ आणि थंड वाऱ्याचे वातावरण होते पण नायगरा येथे छान सूर्यप्रकाशाचे स्वच्छ वातावरण मिळाले. सुरवातीला डोंगर उतरून थेट नायगरा धबधब्यानंतर वाहणाऱ्या नायगरा नदीच्या काठावर जाऊन आलो मग जेवण आटपून ४ च्या सुमारास धबधब्याच्या समोर पोचलो. 

नायगरा पाहावा तर कॅनड्याच्या बाजूनेच  – धबधब्याचे दोन्ही भाग अमेरिकन आणि कॅनेडियन हे ह्या बाजूनेच छान दिसतात. इतका प्रचंड धबधबा आणि तो ही इतक्या जवळून आणि इतक्या सुंदर, सुरक्षित रीतीने पहावयास मिळतो की त्या साठी शब्दच अपुरे पडावे, नाहीतर आपल्या इथे धबधब्या पर्यंत पोचणे इतके दुर्गम असते किंवा त्याचा नीट view पण मिळत नाही, रूप पहायला मिळत नाही. हिरा अथवा रत्न हे मूलतः किंवा नुसतेही सुंदरच असते, तसे ते दिसतेही पण त्याला साजेसे सुंदर कोंदण बनवणे आणि त्या हिऱ्याच्या वा रत्नाच्या सौंदर्यात अनेक पटीने वाढ करणे ही खऱ्या जवाहीऱ्याची कला वा किमया असते अगदी तशी किमया, कला इथल्या सरकारने / स्थानिक प्रशासनाने साधली आहे. मला नायगरा इतकेच त्याचे कोंदण म्हणजे त्याच्या आजूबाजूचा विस्तार आवडला, ज्या कोणी ह्या साऱ्या विस्ताराचे नियोजन करून, विकसित केला आहे त्या साऱ्यांच्या सौंदर्य दृष्टीला मनापासून सलाम .....



धबधबा प्रत्येक जागेवरून – दुरून, बाजूने, समोरून, मागून, वरून, जवळून आणि नदीच्या पात्रात जाऊन असा कुठूनही पाहता येतो, कुठलाही अडसर नाही. उलट जागोजागी विचारपूर्वक त्याला छानपणे पाहता येण्याच्या जागा निर्माण केलेल्या आहेत. आपण वेडे होत जातो, फोटो घेत जातो आणि तरीही मन भरतच नाही अशी अवस्था ......


धबधबा पाहण्याची केलेली सर्वात सुंदर व्यवस्था म्हणजे नदीच्या पत्रातून मोठ्या बोटीने अगदी धबधब्याच्या जवळ जाणे....... सुमारे ५ वाजता बोटीत बसलो आणि बोट निघून लगेच धबधब्याच्या अमेरिकन भागासमोर आली – (हा भाग आडवा – सरळ आहे) आणि त्याच वेळेस सूर्य समोरून पूर्णपणे बाहेर आला आणि धबधब्याच्या तुषारांत इंद्रधनुष्य माझ्या डोळ्या देखत पसरले, इतर प्रवासी अजून कॅमेरे सज्ज करत होते, स्वतःला सावरत होते त्यांना ते कळलेही नव्हते, न राहवून त्यांना ते सांगीतले. डोळ्यांनी ते पाहू की फोटो घेऊ, विडीयो घेऊ तेच कळेना, पण दोन्ही केले. नव्या फोनने इतके सुंदर फोटो मिळाले की ते फेसबुकवर ठेवल्यानंतर काहींनी ते इतरांना शेअर पण केले आहेत.

इंद्रधनुष्य पहाता पहाता बोट धबधब्याच्या कॅनेडियन भागापर्यंत पोचली (हा भाग घोड्याच्या नालेच्या आकाराचा आहे) आणि श्वास थांबेल असे दृश्य डोळ्यासमोर उभे राहिले. शाळेत रामदास स्वामीची शिकलेली ओळ ‘धबाबा तोय आदळे’ आज समजली. अर्धवर्तुळाकार आकारात इतके प्रचंड पाणी कोसळत होते की पापणी पण लवायची थांबली, बोट त्या अर्धवर्तुळाच्या मध्याच्या जवळ गेली, अंगावर जोराचा पाऊस पडत होता, इतक्या वेळ कॅमेऱ्याने फोटो घेत होतो तो बंद करून ठेऊन दिला, मनात स्पष्टपणे हे जाणवले की जगातला कुठलाही कॅमेरा डोळ्यांना दिसणारे दृश्य पकडू शकणार नाही आणि मग त्या पाण्याकडे नुसता पहात राहिलो भान हरपून, साऱ्यांची तीच अवस्था होती. ह्या अर्धवर्तुळात पाणी इतके जोराने पडते आणि इतके सारे पडते की ते फुटून त्यातून जे तुषार निर्माण होतात त्याच्या ढग तयार होऊन सतत आकाशात जात असतो. काही मिनिटे हा अनुभव देऊन मग हळूहळू बोट मागे वळली परत निघाली – बोटीच्या वरच्या उघड्या डेकवर असल्यामुळे परतीच्या प्रवासातही धबधब्याला अनुभवणे चालूच राहिले.


बोटीतून उतरून वर काठावर आल्यावरही धबधब्याची सफर काठाने चालूच राहिली – दर ५० पावलांनी दिसणारे त्याचे रूप पाहत, फोटो घेत राहिलो ... शेवटी अगदी तुम्हाला धबधबा जेथून खाली पडतो तेथे पोचता येते आणि अवघ्या १०० फुटांवरून त्याचे खाली पडणारे प्रचंड पाणी पाहता येते अनुभवता येते. हे सारे पाहताना, अनुभवताना धबधब्याच्या काठाला रस्ते, पाळी, काठ इतके सुंदर बांधले आहेत, बसण्याच्या जागा इतक्या सुंदर आणि सुरक्षित उभ्या केल्या आहेत की मनात जराही भय वाटत नाही, मिळतो तो फक्त अविस्मरणीय आनंद, अनुभव. हे सारे होई पर्यंत संध्याकाळ होऊन गेली होती, चहा वगैरे घेई पर्यंत धबधब्यावर टाकलेले रंगीत प्रकाश झोत चालू झाले होते आणि धबधब्याचे एक वेगळेच मोहक रूप पहावयास मिळाले. जवळ जवळ अर्धा तास काठाने चालत ते अनुभवत गाडीकडे कडे परत आलो आणि ८.३० रात्री नायगरा सोडले आणि टोरांटो – मारखमला घरी १०.३० परत आलो. गाडीत सारा वेळ आणि परत आल्यावरही अजूनही नायगऱ्याची पाहीलेली – अनुभवलेली रूपे आठवत राहिली आहेत, पुनःप्रत्ययाचा अनुभव त्याचे फोटो आणि विडीयो देत आहेत.


ता.क. आणखी महत्वाचे म्हणजे नंतरच्या दिवसात कॅनडातील म्युझियम्समध्ये नायगऱ्याची २०० वर्ष जुनी पेंटिंग्ज पहायला मिळाली आणि जाणवले मी घेतलेले फोटो आणि त्या चित्रकारांनी टिपलेला नायगरा सारखा आहे. नायगऱ्याचे काही फोटो ब्लॉग सोबत ठेवले आहेत.... 

कॅनडा डायरी – मंडई, मॉल्स वरून कळावी शहराची सर्वसमावेशकता !!!

दिनांक – ०७/१०/२०१५ – कॅनडा डायरी – मंडई, मॉल्स वरून कळावी शहराची सर्वसमावेशकता!!!

शुक्रवार ०२ ऑक्टोबरला संध्याकाळी मारखम या टोरांटोच्या उपनगरातल्या (जेथे माझे वास्तव्य आहे) जनरल ग्रॉसरी स्टोर मध्ये गेलो आणि ह्या भेटीने मनात हल्ली फार चर्चेत असलेल्या समावेशक शहराची (inclusive city) ह्या संकल्पनेची एक नवी व्याख्याच सुचली / जाणवली. ज्या प्रमाणे कुठल्याही घराची स्वच्छता ही त्या घरातल्या स्वच्छतागृहाच्या (toilet) स्वच्छतेवरून कळते त्या प्रमाणे कुठलेही शहर हे किती पंचरंगी (कॉस्मोपॉलिटिन) आणि सर्वसमावेशक (inclusive) आहे हे त्या शहरातल्या सर्वसामान्य मंडईत मिळणाऱ्या भाज्या – फळे आणि सामान्य सुपरस्टोर वरून ठरावे. ह्या व्याख्येचे चपखल उदाहरण म्हणजे मारखम आणि त्या प्रकारची टोरोंटोची इतर उपनगरे !!!
मारखम हे टोरांटोचे साडेतीन लाख वस्तीचे उपनगर, मुख्यत्वे वस्ती कॅनेडियन आणि अमेरिकन गोरे, चायनीज, पर्शियन, उक्रेनियन आणि आशियाई म्हणजे भारतीय, पाकिस्तानी आणि श्रीलंकन लोकांची. भारतीय लोकांमध्ये शीख, गुजराती, हिंदी, मराठी आणि दक्षिण भारतीय (तामिळ, तेलगु आणि कन्नड) मुख्यत्वे आहेत. निग्रो वंशीयांची वस्ती फारशी नाही. ज्या प्रकारची वस्ती मारखम मध्ये आहे तशीच इतर उपनगरात आणि टोरांटो मध्ये आहे. अशा या वस्ती साठी ह्या जनरल सुपर स्टोर मध्ये काय काय मिळावे? तर त्यांच्या स्वतःच्या देशात अगदी त्यांच्याच विशिष्ट अशा वस्तू एका ठिकाणी मिळणार नाही इतक्या साऱ्या वस्तू आणि उत्कृष्ट दर्जाच्या, माफक दराच्या ह्या एका सध्या स्टोरमध्ये उपलब्ध होत्या.

गुजराती आणि शीख लोकांच्या पदार्थांचे तर बोलायलाच नको कारण मी जेवढ्या देशांमध्ये फिरलो आहे तिथे त्यांचे पदार्थ मिळालेच; अर्थात काही देशात ते जनरल नाही तर खास अशा दुकानांमध्ये पहायला मिळाले. मराठी पदार्थांचे मात्र तसे नाही जाणवले मी फिरलेल्या इतर देशांमध्ये पण येथे रेडीमेड फूड सेक्शन मध्ये चक्क बटाटे वडा आणि साबुदाणा वडा, पुरणपोळी असे पदार्थ उपलब्ध, आणायचे, गरम करायचे  आणि खायचे. जेवढ्या प्रकारचे भारतीय येथे आहेत तेवढ्या प्रकारचे मसाले, लोणची, पीठे सारे काही उपलब्ध. फणसाचे गरे पण होते फक्त विएतनाम मधून आलेले.

भारतीय स्तरावर विचार केला तर भारतात आढळणाऱ्या सर्व भाज्या उपलब्ध होत्या, फळे उपलब्ध होती त्याच बरोबर भारतात न मिळणाऱ्या पण जगाच्या पाठीवर होणाऱ्या अनेकविध भाज्या – फळे पण उपलब्ध होती. उदाहरण म्हणजे इथे भारतीय मिरची होती पण तिच्या सोबत जगात होणाऱ्या १५ प्रकारच्या मिरच्या उपलब्ध होता. १० प्रकारचे बटाटे, १० प्रकारचे कांदे उपलब्ध होते. असेच फळांचे पण.....भारतात बनणारे पोळीचे (रोटीचे) सर्व प्रकार तयार हजर होते. सोबत फरसाणचे प्रकार – समोसा, इडली, वडा, भारतीय गोड पदार्थ पण होतेच. सोबत फक्त वेगवेगळ्या जातीच्या मिरच्या, हलोविअन भोपळे  आणि बटाटे यांचे फोटो दिले आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहिले तर इटालीयन, फ्रेंच, ब्रिटीश, मेक्सिकन, चायनीज, जापनीज .... साऱ्या - साऱ्यांच्या खाद्य प्रकारांचा आणि संस्कृतींचा मेळावाच भरला होता ह्या सर्वसामान्य सुपरस्टोर मध्ये. काही शे प्रकारचे ब्रेड, धान्ये, पीठे, सॉस, जॅम्स, चीज, खाण्याचे (व्हेज  – नॉनव्हेज) पदार्थ येथे उपलब्ध होते – ग्लोबलायझेशन एट बेस्ट  -

या उलट आपल्या येथे अगदी मोठ्या किराण्याच्या दुकानांमध्ये तर हे शक्य नव्हतेच पण आता सुपरस्टोर उघडली असली तरी त्यात स्थानिक, आंतरराजीय आणि आंतरराष्ट्रीय विविध वस्तू मिळतात असे मुळीच नाही. उदा. बडोद्यातल्या सुपर स्टोर मध्ये बडोद्यात मोठ्या प्रमाणात मराठी वस्ती असूनही किंवा बडोदे कशाला अगदी महाराष्ट्रातील शहरांमधील सुपरस्टोर मध्ये सर्व खास मराठी पदार्थ मिळतात असे नाही. उदाहरण म्हणजे भाजणी, मेतकूट इत्यादी – ते पदार्थ मिळतात पण त्यासाठी खास अशा दुकानात जावे लागते. मराठी पदार्थ बहुसंख्य मराठी असणाऱ्या शहरात मिळू नयेत एकाच ठिकाणी तर मग भारतातील इतर प्रदेशातील लोकांचे पदार्थ मिळण्याची अपेक्षाच नको आणि खरच ते पदार्थ सहजपणे उपलब्ध नसतात. त्यांना ते अमुक विशिष्ट ठिकाणी जाऊन आणावे लागतात किंवा आपल्या राज्यातून आणावे लागतात.

थोडक्यात आपली शहरे कॉस्मोपॉलिटिन होऊ लागली आहेत पण ती सर्वसमावेशक (इंक्लूझिव) म्हणजे निरनिराळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्र राहणे, वा शहराच्या आयोजनात / विकासात समाजाच्या निरनिराळ्या घटकांचा सहभाग असणे, त्यांच्या गरजांचा विचार होणे अजूनही अनेक दृष्ट्‍या नाहीत. उदा. स्त्रियांसाठी पुरती जाहीर स्वच्छतागृहे नसणे, अपंगांसाठी जाहीर ठिकाणी योग्य सोयी नसणे इत्यादि; आपली शहरे खाद्य संस्कृती आणि त्यांच्या  उपलब्धतेच्या बाबतीत समावेशक कशी नाहीत हे मारखम सारख्या छोट्या पण पंचरंगी वस्ती असणाऱ्या शहराने जाणवून दिले मला ..................     
 


Saturday 3 October 2015

लादलेला एकांत, मुकेपण

ब्लॉग – दिनांक ०२/१०/२०१५ - लादलेला एकांत, मुकेपण

जीसेभी देखिये वो अपने आपमें गुम है   |
जुंबा मिली है मगर हमजुंबा नही मिलता   ||

स्वतः मध्ये गुंग असणारे, कोणाशी संवाद न करणारे लोक दिवसागणिक वाढत आहेत असे सतत जाणवत रहाते मला; अशा लोकांची संख्या वाढते आहे त्याहूनही महत्वाचे म्हणजे नको असला तरीही एकांत, मुकेपण, असंवाद लादला जातो आहे माझ्यावर, माझ्यासारख्या अनेकांवर ही भावना दृढ होत चालली आहे मनात. एकांताची, मौनाची कितीही महती असली, ती पटलेली असली, आचरली असली तरी रोज कमी जास्त प्रमाणात अनुभवावा लागणारा हा लादलेला एकांत – मुकेपण नकोसा वाटतो, मनात अनेक विचार निर्माण करतो.......

या भावना स्वगत म्हणून स्वतःशी व्यक्त करण्याचे मनात गेले अनेक दिवस येऊनही जमले नाही शेवटी मुंबई – टोरेंन्टो ह्या दीर्घ प्रवासाने त्यासाठी पुरेसे वातावरण उभे केले आणि हे लिखाण घडण्यासाठी आवश्यक तो धक्का दिला.

ऋत्विक कडून २९ सप्टेंबरला रात्री १०.३० ला निघालो आणि २५ तासांनंतर टोरेंन्टो – कॅनडा येथे ३० सप्टेंबर दुपारी १.३० ला श्रीपादला भेटलो तोपर्यंत बोललेल्या ८ ते १० please, thanks, sorry आणि escuse me या तत्सम शब्दांपलीकडे कोणाशीही कसलाही संवाद नाही, बोलणे नाही, नुसता लादलेला एकांत, मुकेपण – झोपून, सिनेमे पाहून, खिडकी बाहेर पाहून नाहीतर नुसतेच डोळे मिटून नको त्या विचारांच्या आवर्तनात वेळ संपवलेला. नको असला, टाळला तरी स्पर्श होत राहणाऱ्या शेजारच्या प्रवाशाशी पण कसलाही संवाद नाही. त्याचा आणि इतरांचा अटळ स्पर्श होत असतो पण त्यातही संवाद नसतो.....

कुणाला वाटेल विमान प्रवासात असे घडत असेल, आंतरराष्ट्रीय प्रवासात असे घडणे स्वाभाविकच.... पण तसे नाहीये भारतातील अगदी तासाहून कमी वेळेच्या विमान प्रवासात, रेल्वे प्रवासात, अगदी हल्ली केलेल्या मुंबई – पुणे – मुंबई या बस प्रवासातही, वा विमान, रेल्वे, बस स्थानकांवर; अनेकदा घडणार्‍या रिक्षा – taxi प्रवासातही सोबतच्या प्रवाशाशी कसलाच संवाद घडत नाही.

हल्ली कुठल्याही प्रवासात आधीच्या तुलनेत सारे कसे शांत शांत असते, जीवघेणे शांत असते. नाही म्हणायला कोण्या लहान मुलाने, (म्हणजे ज्याला ह्या नव्या रिती भाती समजावता येणे शक्य नाही अश्या वयाच्या मुलाने) अनाहूत संवाद साधला तर तात्पुरता प्रतिसाद समोरच्या व्यक्तीकडून येतो, पण त्या मुलाच्या पालकांना आपल्या मुलाच्या वागण्याची लाज वाटून त्याला त्या संवादातून काढले जात. त्याहून वयाने थोडी मोठी असलेली, समज आलेली मुले तर या नव्या एकटेपणाच्या, मौनाच्या संस्कृतीत घडलेली, घडणारी, अनोळखी व्यक्तीशी संवाद न करण्याचे शिकवलेली मुले तेंव्हा त्यांच्याशी संवाद तर अशक्यच. लहान मुले रडलीच तरच आवाज होतो प्रवासात आणि त्याचीही पालकांना लाज वाटते, वैताग होतो आणि पूर्वी सारखे कोणी दुसऱ्या प्रवाशाने त्या मुलाला गप्प करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रश्नच नाही उलट अनेकांना तर त्याच्या रडण्याचा त्रास होतो आहे तेही स्पष्ट जाणवते, जाणवून दिले जाते. नाही म्हणायला अजून भारतातल्या आणि परदेशातल्या प्रवासात जर ट्रिपला निघालेल्या भारतीय प्रवाश्यांचा आणि त्यातही गुजराथी आणि मराठी प्रवाश्यांचा समूह असेल तर मात्र भरपूर आवाज होत असतो किंबहुना आम्ही ट्रिपचा आनंद कसा मोकळेपणाने पूर्णपणाने साजरा करतो आहे हे इतरांना दाखविण्यासाठी वाजवी पेक्षा जास्त आवाज आणि दंगा केलेला असतो. प्रवासात कोणी कोणाशी बोलतच नाही त्यामुळे नव्या ओळखी होत नाही, ओळख वगैरे जाऊ द्या औट घटकेच्या साध्या निरर्थक गप्पाही होत नाहीत  –

पल दो पलका साथ हमारा, पल दो पालके याराने है,
इस मंझील पर मिलने वाले उस मंझील खो जाने है .......
किंवा यथा काष्ठंच काष्ठ

हे माहीत असूनही प्रवासाच्या वेळेत काही क्षणासाठी एकमेकांशी गुंतणे, आमच्या कडे जरूर या, पुन्हा जरूर भेटू असा भावुक निरोप घेणे आता घडत नाही. पु. ल. देशपांडे आणि त्यांच्या समकालीन लेखकांनी लिहिलेल्या कथा, कादंबऱ्यातून;  कलाकारांनी केलेल्या सिनेमातून, सुरवातीच्या दूरदर्शन मालिकांतून दिसणारे, मिळेल त्या माध्यमातून एक-दुसर्‍याशी संवाद करणारे समाजजीवन आणि माझ्या आणि माझ्या आधीच्या पिढ्यांनी अनुभवलेले, जगलेले जीवन आता राहिलेले नाही.   
नुसता प्रवासातच संवाद घडत नाही असे नाही, तर मॉल मध्ये गेल्यावर साऱ्या वस्तू मांडून ठेवलेल्या असतात, पाट्या असतात, नेहमीचे – कायमचे असे माणूस नसते,  हवी ती वस्तू घ्यायची बाहेर पडायचे. तेच हॉटेल्स मध्ये बुफे असेल तर हवे ते घ्यायचे आणि एकटे असाल तर एका कोपर्‍यात गप्प जेवायचे, अगदी जेवणाची ऑर्डर दिले तरी मोजकेच संवाद बोलायचे. शेजाऱ्यांपैकी क्वचित कोणाशी जुजबी बोलणे होते, सकाळी – रात्री चालायला गेलो तरी संवाद नाही कारण चालायला जाणारे पण एकटेच कानात इअरफोन घातलेले; बँकेत, पोष्टात आणि इतर अनेक ठिकाणी इंटरनेट मुळे जाण्याची गरजच उरलेली नाही त्यामुळे संवादाचा प्रश्नच नाही.

इतरांसारखे कानात इअरफोन घालून वा सतत पुस्तक वाचून असला हा सक्तीचा एकांत – मौन सुसह्य करावे म्हटले तर ते जमत नाही. संगीत ऐकायला आवडते, पुस्तक वाचायला आवडते पण का कोणास ठाऊक पण आजूबाजूचे जग त्यातले आवाज, घडामोडी, माणसे त्यांचे वागणे हे सारे सोडून संगीतात बुडवून घेणे वा पुस्तकात डोके खुपसून बसणे अजून तरी जमलेले नाही

दुसरी व्यक्ति संवाद करत नाही तर आपण पुढाकार घेऊन करावा म्हटले तर जाणवते की ती दुसरी व्यक्ति ‘अपने आपमें गुम है’ आणि आपण बोललो त्याच्याशी तरी तो ‘ हमजुंबा ‘ नसणार आहे, संवाद घडणार नाहीये. गरजेपेक्षा अधिक बोललेले पण चालत नाही हल्ली बहुतेकांना आणि त्यांचेही बरोबर आहे, जग किती वेगवान झाले आहे. ते तर परके असतात अगदी आपल्या ओळखीच्या लोकांकडे पण अनाहूत (भेट नक्की न करता) जाऊन अनौपचारिक गप्पा, बोलणेही अशक्य ...... प्रश्न हा आहे की कधी ठरवून का संवाद होतो, गप्पा होतात?

खरे तर स्वतःहून घेतलेला थोड्या काळाचा एकांत वा मौन किती चांगला अनुभव देते पण अशा या लादलेल्या एकांताने, मौनाने आत्मिक उन्नती वा शांती मिळत नाही उलट अशा या एकांतात, मौनात मनात अनावश्यक विचारांची आवर्तने चालत राहतात, थांबवता येत नाहीत. काही काळाच्या ध्यानात ती थांबवता येतात पण सतत चालणाऱ्या अशा या एकांतात मला तरी ते शक्य होत नाही पण हा एकांत संपवू कसा, हे मौन टाळू कसे........

‘स्वगत’ लिहिणे, म्हणजे स्वतःशी बोलणे (तेही होत नाही हल्ली) हा एक मार्ग दिसतो ह्यातून..... म्हणून आजचे हे ‘स्वगत’ .........         

Saturday 5 September 2015

गुरुचे (नांदेडकर सरांचे) काळाआड जाणे

ब्लॉग - दिनांक – ०५/०९/२०१५ – गुरुचे (नांदेडकर सरांचे) काळाआड जाणे


परवा  सकाळी ०३ सप्टेंबर रोजी पुण्यात नांदेडकर सरांचे निधन झाले. मी दुपारी शिकवत असताना फोन आला, फोनवर अर्थातच  त्यांचे नाव आले, घ्यावासा वाटला पण क्लास संपत आला होता म्हणून घेतला नाही, अर्ध्या तासाच्या आत क्लास संपला, मुले पांगली आणि एकटा पडल्यावर त्यांना फोन लावला, रिंग जाता असताना मनात विचार करत होतो हे सांगूया, ते सांगूया.....सर नर्म, खुसखुशीत विनोद करायचे त्यामुळे ते काय बोलतील ह्याची नेहमीसारखी उत्सुकता मनात होती.....   रिंग लांबली मनात विचार आला घरीच असतील तर घराच्या क्रमांकावर फोन करावा..... तेवढ्यात फोन घेतला गेला.... त्यांचा फोन तेच घेणार ही खात्रीच असल्याने त्यांच्या आवाजाची वाट न पाहता मी सुरवात केली ..... सर रवि बोलतो आहे तुम्ही फोन केला होता पण तेंव्हा मी शिकवत होतो ...... माझे वाक्य थांबवणारा अपरिचित स्त्रीचा आवाज – तुम्ही बडोद्याचे रवि जोशी बोलता आहात का ? मी गोंधळात हो म्हटले, थांबा हं म्हणत फोन दुसऱ्याला दिला गेला, तो देताना बडोद्याहून मी बोलतो आहे हे सांगीतले गेले ते मी ऐकले आणि मनात अभद्र आले .... सर गेले की काय? (सर आजारी आहेत असे सांगतील असे का नाही आले मनात? पण हे नेहमीचे आहे असा काही फोन आला वा कोणी प्रत्यक्षात बातमी सांगू लागले की कोणाच्या जाण्याची बातमीच मनात आधी उमटते माझ्या...) फोन वर मग आणखी एक अपरिचित स्त्री आवाज ‘नाना आज सकाळी गेले, मी त्यांची सून सुरेखा बोलते आहे ..... त्या सुन्नपणातही काय, कसे घडले अभावितपणे विचारले गेले .... दोन तीन दिवसांच्या आजाराने, हृदय विकाराने गेले ..... आता त्यांना नेण्याची तयारी चालू आहे मग फोनवर बोलू ... संपले संभाषण आणि हे ही जाणवले आपल्या अस्तित्वाचा एक भाग संपला........
जवळपास कोणीच नव्हते, कारमध्ये थोडावेळ बसून राहिलो... नुसता सुन्नपणा, स्व‍कीयांच्या मृत्यूचा अनुभव गाठीशी आहे आणि मनाने ‘जातस्य ध्रुवो मृत्युः’ आणि स्वत:चाही मृत्यू स्वीकारला आहे त्यामुळे सुन्नपणा येतो, कळ उठते, काही अश्रू ओघळतात पण काही वेळाने सारे सुरळीत होते आणि त्या व्यक्ती सोबतचे चांगले क्षण आठवू लागतात. तसेच झाले काही वेळाने गाडी सुरु केली घरी निघालो आणि सोबत सुरु झाला सरांच्या बरोबरच्या २९ वर्षांच्या आठवणींचा प्रवास...... त्या प्रवासात घरी आलो, घर उघडले, सारे शांत होते. मनाचा सुन्नपणा घालवण्यासाठी मग तासभर झोपून गेलो. झोपेतही तो आठवणींचा प्रवास चालूच होता. सरांविषयी हा लेख लिहावा असे झोपण्या आधीच वाटत होते पण नाही केले तसे, व्यस्तता तर होतीच त्याहून अधिक महत्वाचे म्हणजे गेले दोन दिवस जमेल तेंव्हा मनाला रमू दिले त्यांच्या आठवणीत आणि मगच आज लेख लिहिण्यास घेतला.
आज लेख लिहायला घेतला आणि जाणवले आज ‘शिक्षक दिन’ आहे....  शिक्षक दिनी त्यांच्या विषयी, इतर माझ्या शिक्षकांविषयी लेख लिहायला केंव्हाही आवडला असता, पण अशा संदर्भात नक्कीच नाही. खरे म्हणजे काही दिवसापूर्वी २१ ऑगस्टला ‘गुरु’ ह्या विषयी एक कविता सुचली, ती ब्लॉगवर ठेवणे लांबत गेले मग मधेच केंव्हातरी जाणवले शिक्षक दिन जवळच आहे तेंव्हा त्या दिवशी लेख लिहू आणि कविता  ब्लॉगवर ठेवू असे ठरवले, पण त्याआधीच सर गेले आणि आजच्या शिक्षक दिनी त्यांच्याविषयी असा हा लेख लिहिणे होत आहे. जी कविता सरांवरून, त्यांच्या माझ्या नात्याविषयी सुचली ती त्यांनाच सादर अर्पण ....

कविता – गुरु - मूळ लेखन – २१/०८/२०१५

(मूळ लेखन – २१/०८/२०१५ सकाळी ६.० ते ८.० बडोदे – अहमदाबाद प्रवास)

चुकलेल्या वासराने
चुकीच्या गाईंमागे
आई म्हणून जाऊ पहावे
गाईंनी झिडकारावे, दुर्लक्षावे
तसा अथांग फैलावलेल्या जागेत
अगणित दिशांना जाणाऱ्या
अगणित अनोळखी माणसांनी
दुर्लक्षिल्याने, झिडकारल्याने
कुठे जावे हे न समजल्याने 
हरवलेला, दिग्मूढ असा मी            |

अचानक माझा हात
कुण्या आश्वासक हातानी
हातात घेतलेला 
मुठीत माझ्या मग एक बोट
पुरेसा आधार देणारे
तरीही मोकळे ठेवणारे
त्या गर्दीतून योग्य वाटेवर नेणारे
माझी सर्व बोटे आता
अनेक हातानी धरलेली
इतके मला मोठे करणारे              ||

सरांनी मी त्यांच्या कडे Ph. D. करण्याच्या पहिल्या ५ – ६ वर्षात विषयाचे प्रत्यक्ष शिक्षण, ज्ञान; त्यानंतर लाईट हाउस सारखे अविरत अप्रत्यक्ष मार्गदर्शन आणि ओळख झाल्यापासून  २९  वर्ष मला वडीलांसारखे प्रेम दिले. एकही कटू प्रसंग नाही, कोरडा प्रसंग नाही, कुठलेही मनदुःख नाही त्यांच्या बरोबरचा प्रवास म्हणजे फक्त आनंदयात्रा ठरली. ज्ञानाचा अभिमान नाही, बडोद्यातून निवृत्त होऊन पुण्याला गेल्यावर गेली २० वर्षे म्हणजे वयाच्या ८२ व्या वर्षापर्यंत ज्ञानप्रबोधिनी या संस्थेद्वारा ज्ञानदानाचे सतत कार्य केले एवढे सांगणेच पुरेसे आहे त्यांच्याविषयी. ह्याशिवाय केलेले संशोधन, दिलेली व्याख्याने आणि केलेले लेखन वेगळेच. अनेक विध्यार्थी, IAS officers तयार झाले त्यांच्याकडून पण त्यांच्या हाताखाली Ph. D. करणारा मी एकटाच म्हणून मला त्यांचे विशेष प्रेम मिळाले..
त्यांच्याकडे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा हेवा वाटत असे मला, कारण मला Ph. D. करायला घेण्याआधीही आणि ती झाल्यावर ते पुण्याला आल्यापासून गेली २० वर्षे त्यांच्याकडून प्रत्यक्ष शिकायला मिळाले नाही, किंवा आमच्या विषयावर फारशी चर्चा पण करणे जमले नाही कारण अनेक दिवसांनी भेट व्हायची आणि मग कौटुंबिक गप्पा गोष्टीच व्हायच्या, आता तेही संपले. त्यांच्या कडून गेल्या २० वर्षात प्रत्यक्ष शिक्षण मिळाले नाही, पण कुठलेही नवे संशोधन करताना, लेख लिहिताना, व्याख्यानाची तयारी करताना, consultancy प्रोजेक्ट  सर ह्याचा कसा विचार करतील हा विचार मनात करत असे. Ph.D. चा अभ्यास करताना त्यांनी दिलेली शिकवण / शिस्त आठवत असे. एवढेच नव्हे माझ्याकडे थिसीस करायला प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांनी मला शिकवलेली पद्धत, विचार त्यांचा आवर्जून उल्लेख करून शिकवतो. आता ते नाहीत तेंव्हा त्यांचा विचार करून मनातल्या मनात त्यांचे मार्गदर्शन घेण्याचा प्रकार मी निवृत्त होई पर्यंत चालू ठेवावा लागणार.
आज अनेक विध्यार्थ्यान कडून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा मला मिळत आहेत पण तुम्हाला फोन करून माझी 
कृतज्ञता व्यक्त करायला सर तुम्ही नाहीत तेंव्हा या श्रध्दांजली लेखाने माझी कृतज्ञता तुम्हाला सादर करतो ..............  


Sunday 9 August 2015

कविता - फेरफटका छायाचित्रांतल्या आठवणीतून

दिनांक – ०९/०८/२०१५ - फेरफटका छायाचित्रांतल्या आठवणीतून


सगळ्यांचे माहीत नाही पण बहुतांशी लोकांच्या बाबतीत (अर्थात त्यात मीही आलो) गेल्या १०-१२ वर्षापासून म्हणजे जेंव्हापासून डिजीटल कॅमेरा आला आणि सर्वसामान्यांना तो सहजसाध्य झाल्यापासून आणि त्यामुळे छायाचित्रे घेणे बिनखर्चिक झाल्यापासून छायाचित्रे घेण्याचे पेवच फुटले.  त्यापुढे जाऊन सगळीकडे मोबाइल मध्ये कॅमेऱ्याची सोय झाल्यापासून तर एरव्ही ज्या गोष्टींचे छायाचित्र कोणीही घेतले नसते त्या गोष्टींची अगणित छायाचित्रे पण घेतली जाऊ लागली आहेत. पूर्वी साध्या कॅमेऱ्याने घेतलेले छायाचित्र एकदाच घेता येत असे आणि ते डेव्हलप करण्यासाठी खर्च येत असल्यामुळे सर्वजण छायाचित्रांचा मागे जात नसत आणि जे जात असत ते पण खूप विचारपूर्वक एक एक छायाचित्रं घेत असत. मी १९८५ सालानंतर जेंव्हा फोटोग्राफी करू लागलो तेंव्हा काही पुस्तके फोटोग्राफीवरची वाचली त्यात नाव आठवत नाही पण एका फार मोठ्या छायाचित्रकाराचे वाक्य वाचले होते, त्याचा अर्थ होता – photography is knowing when not to take a photograph  किंवा a good photographer is the one who knows when not to take photograph. आता ह्या वाक्याला कितपत अर्थ उरला आहे कोणास ठाऊक? कारण हे वाक्य माहीत असूनही आणि आधी ते पाळूनही गेले १० वर्ष हाती डिजिटल आणि मग मोबाइल कॅमेरा आल्यापासून अगदी कुठल्याही वा वाटेल त्या गोष्टींचे फोटो न घेऊनही, मी स्वतःच प्रचंड प्रमाणात फोटो घेतो आहे. अनेकदा जाणवते ज्या गोष्टीचे, प्रसंगाचे आपण छायाचित्र घेतो आहोत तिचा आनंद घेण्याऐवजी आपण छायाचित्रेच घेत बसतो. हे जाणवते तेंव्हा मी छायाचित्रे घेणे थांबवतो, पण पुन्हा विसरायला होते हे शहाणपण आणि फोटो घेणे सुरू होते ....

मूळ प्रसंग व घटनेला विसरून गरजेपेक्षा छायाचित्रे घेणे ह्याहून महत्वाचे मला जाणवले ते घेतलेली छायाचित्र पहिली न जाणे, कधीतरी पाहू असे म्हणत कधीच न पहाणे आणि खंडीभर नव्या छायाचित्रांची भर पडत असल्यामुळे दिवसागणिक न पाहिलेल्या छायाचित्रांची संख्या वाढतच जाते, वाढतच जाते. काम / अभ्यास तुंबले की त्याचे एक वेगळेच दडपण येऊन सामान्यत: जेवढे काम वा अभ्यास आपल्याकडून होऊ  शकतो तितकेही व्हायचे बंद होते आणि कामाचे वा अभ्यासाचे तुंबणे/बाकी पडणे वाढते.  इतरांचे वा तुमचे माहीत नाही पण माझे तरी असेच झाले होते, गेल्या अनेक वर्षात मी जमा झालेली छायाचित्रे पहिलीच नव्हती आणि जेवढे छायाचित्रे पाहण्याचे बाकी पडत गेले तेवढे ते आणखी मागे पडत गेले,  शेवटी अचानक योग आला, सगळी नाही पण खूपशी छायाचित्रे पहिली गेली आणि त्या अनुभूतितून ही कविता सुचली.........

एकच सांगावेसे वाटते की हा फेरफटका एक छान अनुभूति होती, तुम्ही जर नसतील पाहीली तुमची गोळा झालेली छायाचित्रे अनेक वर्षात तर जरूर वेळ काढा आणि मारून या छायाचित्रातील आठवणीतून फेरफटका .........

(संकल्पना ३०/०७/२०१५ लेखन ०६/०८/२०१५ बडोदे – चेन्नई प्रवास – दुपार ते रात्र)

अनादी, अनंत, अखंड  कालप्रपातात
वाहून जाणाऱ्या सुखद, रम्य क्षणांच्या  
घेतलेल्या अनेकविध छायाचित्रांचे
त्यांना जोडलेल्या आठवणींचे
एक निबिड जंगलच उभे झाले   
कुठल्याश्या अनामिक भीतीने
शिरलोच नाही मी कधीही ह्या जंगलात  
भीतीने दूर पळताना की काय
पण छायाचित्रांतल्या आठवणींच्या जंगलात 
शिरलो कसा, कधी, का कळलेच नाही                 ||

अनोळखी जंगलात वाट चुकलेल्या,
घाबरलेल्या वाटसरू सारखे
चाचपडू लागलो छायाचित्रांना
पानांच्या सळसळीने, अनोळखी आवाजांनी
वेड्यावाकड्या सावल्यांनी दचकावे, बिचकावे  
चालावे तर घुसावा काटा पायात
वा रूतावा पाय चिखलात
बोचकरावे अंगाला काटेरी झुडुपांनी
झाले तसे सुरवातीला छायाचित्रे पाहताना
त्यातल्या बंद आठवणी अनुभवताना                  ||

सरावले हळूहळू डोळे, कान, मन 
छायाचित्रांच्या त्या जंगलाला
आठवणीतील प्रवासाला
उघडला मग समोर अनमोल खजिना
छायाचीत्रांमधल्या आठवणींचा                        ||

पाहिले तर सभोवती फुलाला होता
रंगीबेरंगी, मोहक, प्रफुल्लित
फुलांसारख्या आठवणींचा मळा
बागडलो त्यात मनमुराद
बसलो मग निवांत पाय सोडून
झुळझुळत वाहणाऱ्या आठवणींच्या निर्झरात             ||

चढलो उत्तुंग झाडांसारख्या आठवणींवर
पाहिले छायाचित्रांतील विश्वाच्या पसाऱ्याला
झोपलो निवांत डेरेदार आठवणींनी
फैलावलेल्या घनदाट थंड सावलीत
कोसळल्या आठवणी छायाचित्रातून धबधब्यासारख्या
सोबत त्यांच्या मीही रडलो बांध तोडून                ||

जंगलात भेटली सभोवतालची माणसे नव्याने
काही मूळ रूपाने, काही अभावाने
मी ही भेटलो स्वतःला अनेक रूपाने
कळले हे ही, कायमची गेलेली माणसे
आहेत जिवंत इथेच आठवणींसह              ||

कोणास ठाऊक कसे आपोआप
अभावितपणे अनुसरले संकेत छायाचित्रांचे
आलो कसा बाहेर जंगलातून कळलेच नाही
आहे जाणवते एवढेच,
गेली ती अनामिक भीती
गेले ते भूतकाळापासून दूर पळणे
घेऊन आलो आहे मजसवे

छायाचित्रातल्या आठवणींचे समृद्ध जंगल              ||