Monday 19 May 2014

कविता - बकुळीच्या फुलांचा सडा

दिनांक – १९/०५/२०१४
माझ्या लहानपणीची एक आठवण जी माझ्या पुढच्या, अगदी आजच्या आयुष्याचा भाग आहे त्यावरची हि कविता जवळ जवळ वीस वर्षे मनात असलेली, अनेकदा डोकावणारी, लुप्त होणारी, विस्मृतीत जाणारी शेवटी आज झाली.
माझ्या लहानपणी आमच्या मोहल्ल्यात आमच्या गल्लीच्या शेवटी राहणारे अप्पा भागवत ज्यांच्याशी लहानपणी तर नाहीच पण मी मोठा झाल्यावरही क्वचित एखादे वेळेस माझे त्यांच्याशी बोलणे झाले असेल. ते आमच्या घरात कधी आल्याचेही मला आठवत नाही किंवा एकमेकांच्या घरातील शुभ प्रसंगांना जाण्याइतके कौटुंबिक संबंध तर नव्हतेच. पण इतके कमी संबंध असूनही हे अप्पा भागवत भल्या सकाळी रस्त्यालगत असलेल्या आमच्या घराच्या दारातून morningत्यांच्या morning walk वरून घरी परत जाताना मुठभर बकुळीची फुले ठेऊन जात असत. आमच्याच घरी नाही तर आमच्यासारखेच फक्त राम राम किंवा कसे काय – बरे आहेना इतपत बोलण्या इतके संबंध असणाऱ्या आमच्या गल्लीच्या जवळ जवळ पंधरा – वीस घरी बकुळीची फुले देत जात असत.
कुठलीही अपेक्षा नाही, कुठलाही अभिनिवेश नाही, त्या विषयी कधी काही बोलणे नाही, एक अत्यंत सहज, नैसर्गिक क्रिया होती ती त्यांच्यासाठी. त्यांच्याशी कधी न बोलता, कुठलेही संबंध नसता, त्यांच्या वर्तनाचा अर्थही न समजण्याच्या बाल वयात त्यांचे प्रसंगचित्र मनावर इतके खोल बिंबले कि १९९१ साली जेंव्हा स्वतःचे घर बांधले तेंव्हा जी पहिली  झाडे लावली त्यात आठवणीने आवर्जून बकुळीचे झाड लावले, काही काळातच त्याचा मोठा वृक्ष आणि दारामध्ये सडा पडू लागला आणि गेली अनेक वर्ष तो पडतो आहे. सुरुवातीची काही वर्षे क्वचित मीही बकुळीची फुले गोळा करीत असे आणि इतरांना देत असे पण पुढे तेही थांबले. कधीतरी एखादे दिवशी कोणीतरी आमच्या बकुळीचा सडा पाहून थांबते, फुले गोळा करू लागते आणि फार बरे वाटते. आम्हाला वेळ असल्यास आम्ही बाहेर जाऊन त्या व्यक्तीला फुले गोळा करण्यात मदत करतो पण वसा घेतल्यासारखे नेहमी येऊन बकुळीचा सडा वेचणारे कोणी नाही, अगदी मी हि नाही. बकुळीचाच नव्हे तर मागल्या दारी पडणारा प्राजक्ताच्या फुलांचा सडा गोळा करणारे कोणी नाही त्यात मी हि आलो. आणि हे दृश्य मला जागो जागी दिसते. फुलांचा सडा वेचण्याचा वसा असणारी, पुढल्या पिढीला देणारी पिढीच लुप्त झाली का? किंबहुना असे छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याला शिकवणारी, निसर्गाच्या सानिध्यात रमायला शिकवणारी पिढीच लुप्त झाली का? तसे न व्हावे पण हे सांगण्याचा हक्क मला नाहीच  कारण मी कुठे तो वसा सांभाळला वा माझ्या मुलांना तो दिला? पण तरीही कुठेतरी फुलांचा सडा वेचण्याची संस्कृती असावी, टिकावी असे मनात वाटत राहते.         
अनेक वर्षापासून मनात असलेली हि कविता बाहेर आली कारण काल रात्री घरी आलेल्या माझ्या मिलिंद काटदरे या मित्राने दारात पडलेल्या बकुळीच्या सड्याचे कौतुक तर केले पण त्याच्यावरून चालत यावे लागते ह्याबद्दल हळहळ व्यक्त केली आणि मनामध्ये हि कविता फिरू लागली. 
कविता - बकुळीच्या फुलांचा सडा
कुठेतरी दूर असलेल्या
बकुळीच्या फुलांचा सडा
भल्या पहाटेला वेचून
घरोघरी तो वाटत जाणाऱ्या
अप्पा भागवत तुमचे स्मृतीचीत्र
जीवनात शक्य होताच
दारात बकुळीचे झाड लावण्याइतके
मनावर खोल बिंबले
फुलांचा सडा वेचण्याचा – वाटण्याचा तुमचा वसा
घ्यायला चुकलेल्या अश्या माझ्या दारामध्ये
न वेचल्याने पायदळी जाणारा
मातीत विरणारा
तरीही मातीलाच सुगंधी करणारा
बकुळीच्या फुलांचा सडा ||
जमले नाही घेणे
फुले वेचण्या-वाटण्याचा वसा
घेतलाय म्हणून
मैत्र वेचण्या-वाटण्याचा वसा
मनी माझ्या आता
बकुळीच्या फुलांचा सडा ||

(composed on 19/05/2014 during 8 to 10 am in Baroda, last stanza composed on 20/05/2014 at 11-12 am.) )

No comments:

Post a Comment