Tuesday 26 January 2016

कविता – गावातले घर म्हणाले .......

ब्लॉग दिनांक २६/०१/२०१६ - कविता – गावातले घर म्हणाले .......

कोकणात मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा ह्या गावानंतर गोव्याच्या दिशेला गेल्यावर येते  पाली गाव आणि तेथून चार – पाच किमी वर असलेले असोडे हे आमचे गाव. अंदाजे १३० वर्षापूर्वी ह्या गावी आमचे पूर्वज आले असावे. गावातले १९०५ साली बांधलेले घर, जे १९९४ पर्यंत पूर्णपणे राहते होते ते गेल्या पाच-सहा  वर्षात पडू लागले आणि ते पुन्हा दुरूस्त करण्याचे आयोजन करण्यासाठी जे गावी जाणे झाले त्या वेळेस घराशी मनात एक संवाद घडत होता, २९-३० डिसेंबर २०१५ च्या शेवटच्या भेटीत घर दुरुस्त करण्याचा निश्चय झाला आणि हा संवाद एक प्रकारे पूर्ण झाला ..... गावातल्या घराशी मनात झालेला संवाद मांडणारी ही कविता .......   

कविता – गावातले घर म्हणाले .......

(कविता लेखन – दिनांक १८/०१/२०१६, सकाळ ते दुपारी ३.० पर्यंत, उज्जैन मध्ये)

का येता तुम्ही सारे पुन्हा पुन्हा
माझे हे झिजत संपणे पहायला?
एकदाच संपूर्ण पाडून संपवा ना
हे हाल तुमचे आणि माझे.......
वर्षांच्या मौनानंतर बोलले अखेरीस मला  
कोसळू लागलेले गावातले घर
या भेटीत माझ्या ....

आज न उद्या कधीतरी
संपणारच ना अस्तित्व माझे – तुमचे
मग का अडकला आहे जीव तुमचा माझ्यात
पाडून टाकून छोटेसे देवघर ठेवा
लोकांचा हा सल्ला योग्यच आहे ऐकावा
पुढे म्हणाले मला
कोसळू लागलेले गावातले घर
या भेटीत माझ्या ....

कोणासाठी टिकवू पाहता आहात मला
कमी जास्त जोडलेली आहे नाळ
माझी तुमच्या पिढीशी, तुमची माझ्याशी
पण जोडलीत नाहीत नाळ तुम्हीच
माझी पुढल्या पिढीशी
रोखठोक सुनावत म्हणाले मला          / (कान उघडणी करत )
कोसळू लागलेले गावातले घर
या भेटीत माझ्या ....

आमच्यासाठी टिकवू पाहतो आहे तुला
आमच्या आधी तुझे संपणे नकोय आम्हाला’
बदलली आहे पिढी पुढची
जुळण्या तुझी नाळ त्यांच्याशी
टिकवू, थोडासा बदलू पाहतो आहे तुला
अंतरीच्या उमाळ्याने, आर्जवाने
उत्तरलो कोसळू लागलेल्या गावातल्या घराला 
या भेटीत माझ्या ....

येणार असाल जर तुम्ही सारे
जगण्या आळी पाळीने सोबत माझ्या
जोडणार असेल नाते पुढच्या पिढीशी
तर आहे मी तयार नव्याने उभारी घ्यायला
घडायला, बदलायला, सजायला
उत्साहाने म्हणाले मला
कोसळू लागलेले गावातले घर

या भेटीत माझ्या ....




Sunday 24 January 2016

ब्लॉग - ललाटलेख - कविता - ललाटलेख

ब्लॉग - दिनांक - २४/०१/२०१६

आपणा साऱ्यांना आपला  ललाटलेख वाचून घेण्याची / भविष्य जाणून घेण्याची किती उत्सुकता असते, त्याच उत्सुकतेमधून ज्योतिषशास्त्राची आवड निर्माण झाली पण फार प्रगती करता येत नाही कारण त्यासाठी लागणारा अभ्यास करणे होत नाहीये. ही आवडही स्वान्तसुखाय त्यामुळेही ह्या विषयात प्रगती करण्याची इच्छा कधी झाली नाही.

तरीही अभ्यास म्हणून, कुतूहल म्हणून कधीतरी कुणाची पत्रिका पाहतो, ते करताना एक जाणवले की काही वेळा पत्रिकेतले कोडे  अगदी सहज सुटू लागते तर काही काही पत्रिकेच्या बाबतीत ते जमतच नाही. पत्रिका त्यातले ग्रह, तारे, नक्षत्रे  काहीच बोलत नाही, संवाद साधत नाही. असे का घडावे? - अपुरे ज्ञान, अनुभव हे कारण तर खरेच पण जे ज्ञान आहे, जी पद्धत माहिती आहे ती एका कुंडलीला  लागू पडते पण तशाच दुसऱ्या कुंडलीला लागू पडत नाही.  ह्या साऱ्या पार्श्वभूमीवर झालेली ही कविता ...

कविता – ललाट लेख – मुंबई विमानतळ - दिनांक २६-११-२०१५

(लेखन – मुंबई विमानतळावर दिनांक २६-११-२०१५ सकाळी – नागपूरला पोचल्यावर दिवसभर)

सटवाई कडून तू लिहिलेला
ललाटलेख वाचण्यासाठी
ग्रह नक्षत्रांचा आराखडा घेऊन
माझ्यापुढे कुणाचेही येणे

समजते मला आपोआप
तुला खेळायचा आहे खेळ
तू लपण्याचा मी तुला शोधण्याचा
तुझ्या असण्या नसण्याचे
न संपणारे कोडे सोडविण्याचा

अनेकांच्या ललाटलेखांत
ग्रह नक्षत्रांच्या आराखड्यात
आढळतच नाही तुझे दैवी तत्व
तुझ्या नसण्याची खात्रीच पटावी इतका
सापडतच नाहीस तू कितीही शोधले तरी

उलट कधी सहज उलगडतो
ललाटलेख सोबत तू ही 
त्या ग्रह-नक्षत्रांच्या आराखड्यातून
टाळाही बसतो त्या कुणाच्या उत्तरातून
अंदाजलेले भविष्य खरे होण्यातून मिळतो
तुला शोधल्याचा, समजल्याचा आनंद
जागते तुझ्या अस्तित्वाचे कोडे सुटण्याची आशा

पण पुढल्या अनेकांच्या बाबतीत
तू नसण्याची खात्री पटवत
तू गायब त्यांच्या ललाट लेखांतून
ग्रह-नक्षत्रांच्या आराखड्यातून
लपाछपिचा खेळ अर्धवट टाकून
अस्तित्वाचे कोडे गुंतागुंतीचे करून

ललाटलेख वाचून घेण्या
लोकांचे अनाहूतपणे येणे
त्यांत तुझे असणे नसणे
मला उमजणे न उमजणे
हे सारे निव्वळ योगायोग ?
वा तुझी माझ्यासाठीची खास योजना ?
ह्या प्रश्नांची उत्तरे कशी कळणार ?......
माझा ललाटलेख मीच कसा वाचणार  ?.......

Saturday 23 January 2016

ब्लॉग - शोकांतिका आणि कविता - कविता – न घडलेली शोकांतिका

ब्लॉग - दिनांक – २३/०१/२०१६

नटसम्राट सिनेमा १० जानेवारीला पाहीला – नाना पाटेकरांचा अप्रतिम अभिनय तर खराच पण त्याहून महत्वाचे म्हणजे नाटकाचे अतिशय सुंदर पद्धतीने सिनेमा मध्ये केलेले रुपांतर. रुपांतर इतके समजदार पणे केले आहे की मूळ नाटकापेक्षाही नुकताच कट्यार काळजात घुसली या नाटकाचे सिनेमात केलेले रुपांतर पहिले होते पण तेथे ते फसले; इथे ते इतके जमले की मूळ नाटकापेक्षाही सिनेमा अधिक शोकात्म झाला आहे. नट सम्राटाची शोकांतिका अधिक उंचीवर नेली आहे प्रभावी केली आहे आणि नाटकापेक्षा एक प्रकारे अधिक आव्हानात्मक अशी भूमिका सुंदर निभावली आहे.

शोकांतिका एकीकडे आपल्याला रडवते, शोकाकुल करते पण त्यानंतर आपल्याला ती एक आगळ्या वेगळ्या प्रकारे आनंदी करते, एक वेगळेच समाधान, सुख देते आणि म्हणून आपणाला शोकांतिका आवडते, आपण ती आवर्जून ऐकतो, वाचतो, पाहतो आणि इतरांना सांगतो. आपल्या आयुष्यात, आपल्या स्व‍कीयांच्या आयुष्यात कुठलीही शोकांतिका कुणालाच घडावयास नको असते, पण ती घडली तर काय? असेही विचार मनात अनेकदा घोळतात. असे का घडते? शोकांतिकेचे रसायन काय आहे त्याचा शोध निरनिराळ्या लोकांनी घेतला आहे अजून घेतला जातो आहे. त्यांची उत्तरे काहीही असो. ट्रेजेडी किंवा  शोकांतिका साहित्य आणि इतर कला प्रकारांमध्ये अनंत काळापर्यंत अनन्य राहणार .....
नटसम्राट पहिला आणि मग मनात जे अनेक विचार घोळू लागले त्यातून सुचलेली ही कविता...  
  
कविता – न घडलेली शोकांतिका

(लेखन – दिनांक – ११/०१०/२०१६, बडोदे घरी दिवसभर)

उत्तुंग प्रचंड कड्याची कोसळून
अगणित नगण्य शकले होण्यासारखे
पार दुभंगून कोसळायचे होते मला
      अंगाखांद्यावरच्यांच्या विचाराने
      नाही जमले, बघे हो, माफ करा .......

स्वतःच्याही नियंत्रणाबाहेर गेलेल्या
भ्रमिष्ट, भरकटलेल्या तुफाना सारखे
बेफाम, बेलगाम, बेछूट व्हायचे होते मला
      माझ्या मंद झुळूकीवर डोलणाऱ्यांच्या विचाराने
      नाही जमले, बघे हो, माफ करा  .......

निर्दयी, पिसाटलेल्या वादळाच्या विरोधात
उभ्या ठाकणाऱ्या, न वाकणाऱ्या वृक्षासारखे
उन्मळून, मोडून पडायचे होते मला
      वाचण्या वादळांपासून आश्रयणाऱ्यांच्या विचाराने
      नाही जमले, बघे हो, माफ करा ......

अकल्पित, मनस्वी नियतीपुढे न हरता
तत्वांसाठी विनाश पावणाऱ्या नायकासारखे
धीरोदात्तपणे बळी जायचे होते मला
      माझी आस असणार्‍यांच्या विचाराने
      नाही जमले, बघे हो, माफ करा ......

न घडलेल्या शोकांतिकांच्या माझ्या या शोकांतिकेला
शोकाकुल, भयाकुल करणारी,
अघटितचा अर्थ लावणारी,
अस्तित्वाचा शोध घेणारी,
शोकांतिका करून तुमच्या पर्यंत पोचविणे

      नाहीच जमले, बघे हो, माफ करा ......

Friday 15 January 2016

ब्लॉग - सरता वर्ष २०१५ (२) - कविता - येणे क्षणांचे

ब्लॉग - दिनांक - १५/०१/२०१६ - सरता वर्ष २०१५ (२)

२०१५ संपण्याच्या निमित्ताने लिहिलेल्या ब्लॉगमध्ये जरी आढावा घेणे एक प्रकारे निरर्थक वाटले असे मी लिहिले आहे तरी प्रत्यक्षात मनाने तो घेतलाच आणि लिहावा असेही वाटले म्हणून हा त्या ब्लॉगचा  दुसरा भाग .....

ब्लॉग लिहावयास घेतला आणि जाणवले की गेल्या वर्षभरात ४८ ब्लॉग मी नोव्हेंबर २०१५ पर्यंत लिहिले होते म्हणजे आणखी दोन लिहिले गेले असते तर हाफ सेन्चुरी झाली असती ब्लॉगची वर्षभरात .... पण लगेच मनात विचार आला काय अर्थ आहे ५० च्या आकड्याला वा अर्ध शतक ह्या शब्दांना .....

१९८५ च्या आधी ३१ डिसेंबरला वर्ष संपण्याचे काही महत्त्वच नव्हते, अर्थात गुढी पाडव्याला सुरु होणाऱ्या किंवा गुजरात मध्ये असल्याने दिवाळीत सुरु होणाऱ्या नव्या वर्षाचे महत्त्व होते, साजरे करणे पण होते. १९८५ नंतर मुख्यत्वे tv वरील विविध वाहिन्या आणि नंतर प्रसार माध्यमातून ३१ डिसेंबर साजरा करण्याचे लोण घराघरात पोचले आणि आम्ही ही १९९१ नंतर वर्ष बदल साजरा करू लागलो. १९९३ ते २०१४ या २१ वर्षाच्या काळात माझ्या घरी दर ३१ डिसेंबरला पार्टी रंगली. मी आणि माझे ८ मित्र आणि त्याची कुटुंबे यांच्यामध्ये हे अव्याहत घडत  राहिले. आम्हाला मुले होते गेली तशी पार्टी मेम्बर्सची संख्या वाढत गेली, नंतर मुले जशी मोठी होत गेली घराबाहेर गेली, तस तशी गेली १० वर्षे ती कमी कमी होत होती पण तरीही आम्ही ८ – ९ जोडपी तर भेटत होतोच. पण कुठल्याही चांगल्या गोष्टीत कधी तर बदल येतोच तो या वर्षी आला. या वर्षी आम्हीच बडोद्यात नसल्यामुळे २१ वर्षांनी ३१ ला पार्टी झाली नाही आणि त्या दिवशी रात्री पुण्यात असल्याने आणि कुठेही न गेल्याने १९९० च्या आधी ज्या साधेपणाने ३१ ची रात्र साजरी करत असू तशी केली – missed all my friends and party with them ...

२०१५ असेच अनेक बदलाचे गेले – वर्षामध्ये खूप प्रवास झाला, फिरणे झाले आणि या वेळेचे फिरणे व्यावसायिक कमी आणि व्यक्तिगत किंवा कौटुंबिक अधिक होते. व्यावसायिक फिरणे कमी झाले कारण वर्षाचे जवळ जवळ ७ महिने मला कामच नव्हते. २००२ ला नोकरी सोडल्यावर पहिल्यांदा असे घडले की मला व्यावसायिक कामच मिळाले नाही. या आधीच्या साऱ्या वर्षात मी काम नाकारत असे इतके काम येत असे. काम नाही अर्थात आर्थिक उत्पन्न पण नाही. काम नसणे वा उत्पन्न कमी होणे ह्याहून महत्वाचे म्हणजे ही काम नसण्याची परिस्थिती का निर्माण झाली आहे आणि ती कशी तात्पुरती आहे असे सारे सारे ठाऊक असूनही या पुढे मनात काम नाही मिळाले तर काय हा विचार काही वेळा काही क्षणासाठी का होईना चमकून गेला, अमुकाला फोन करून पहावा असाही मनात विचार डोकावला. एक अनामिक भीतीची शिरशिरीही चमकून गेली. हे ही जाणवले एक अगदी सूक्ष्म फट पुरते मनाची अभेद्य वाटणारी तटबंदी ढासळायला....

दुसरे महत्वाचे हे जाणवले की व्यावसायिक काम फारसे नसल्याने वेळ भरपूर होता तरी पण त्याचा उपयोग करून ज्या अनेक गोष्टी इतर वेळेस कराव्याशा वाटतात पण  करता येत नाहीत त्या काही फार प्रमाणात माझ्या हातून झाल्या नाहीत. व्यावसायिक कामात व्यस्त असताना मनात सतत हे येत असते की ह्यामुळे वाचन बाजूला राहते आहे वा अमुक एक आवडीची गोष्ट करता येत नाही आणि मग त्या व्यस्ततेतून जसा वेळ मिळेल तसा तो काढून आपण त्या गोष्टी करत राहतो आणि त्यामुळे त्या होतात. म्हणजे व्यस्त असताना आपण इतर ऐच्छिक गोष्टी जेवढ्या साध्य करतो तेवढ्या त्या आपण मोकळे असताना होत नाही हे समजले.

कोणी म्हणेल किंवा माझेच एक मन म्हणाले काय हरकत आहे काहीच नाही केले अथवा नाही झाले तर. प्रत्येक क्षणातून काहीतरी मिळवलेच पाहिजे असा अट्टाहास का? प्रत्येक क्षण उत्पादक (productive) वा सृजनशील (creative) का असायला हवा? ह्या वृत्तीने हल्लीच्या लहान मुलांचे आयुष्य पालकांनी व्यस्त करून टाकले आहे. शाळा नसेल तेंव्हा अभ्यास, हे दोन्ही नसेल तेंव्हा व्यक्तित्व विकासाचे वेगवेगळे क्लासेस, नाहीतर कुठली तरी कला शिकण्याचे क्लासेस किंवा आणखी काही.

काहीच न करण्याचा, नुसता वेळ घालवण्याचा विचार फारसा पटला नाही पण काम नव्हते आणि मोकळ्या वेळात फार काही उत्पादक वा सर्जक घडले नाही त्यामुळे निरूद्योगीपणाची वा वेळ वाया घालवण्याची अनुभूति मिळाली आणि सोबत वर्षभर भरपूर आराम आणि फिरणे  झाले. ह्या वेळ घालवण्याचे छान उदाहरण म्हणजे हा ब्लॉग ३०-३१ डिसेंबरला वा शेवटी १ -२ जानेवारीला लिहिला जाण्या ऐवजी आज १५ जानेवारीला लिहिला जातो आहे...... थोडक्यात असे आगळे वेगळे अनुभव देत सरले माझे वर्ष २०१५ !!!  

आत्ता जरी नुसताच काही न करता वेळ घालविणे एक प्रकारे योग्य ठरवित असलो तरी तसे क्षण घालविणे अवघड असते .... ब्लॉग लिहताना आलेल्या ह्या उलट सुलटं विचारातून सुचलेल्या काही ओळी पुढील प्रमाणे ........

कविता – येणे क्षणांचे

सुख-दुःखाचे, भरलेले – रिकामे,
सर्जक – वांझ, बंदिस्त – मोकळे
जखडणारे - घडविणारे - मोडणारे
अगणित प्रकारचे अकल्पित
अविरत, अखंडपणे येणारे क्षण .........

क्षणांना टाळण्याचे वा निवडण्याचे
स्वातंत्र्य कुठे कुणाला असते ? ||

येता सतत सुखी, भरलेले, सृजनाचे क्षण वाट्याला
लागले वाटू ओझेच तयांचे
जणू दुःख असावे अतीव सुखाचे
येता शेवटी रिकामे, मोकळे, वांझ क्षण वाट्याला
कळले असते ओझे असह्य तयांचे
जणू मोडल्या खांद्यांवर प्रिय च्या देहाचे    ||

क्षणांना टाळण्याचे वा निवडण्याचे

स्वातंत्र्य कुठे कुणाला असते ? ||

Wednesday 13 January 2016

ब्लॉग - सरता वर्ष २०१५ - (१) कविता - कालमापन

ब्लॉग दिनांक - १३/०१/२०१६ - सरता वर्ष २०१५ - (१)

हा ब्लॉग लिहिण्याचे वर्ष २०१५ संपत आले  त्या आधी पासून घोळत होते पण ते काही झाले नाही. २७/१२/२०१५ ते  ०४/०१/२०१६ पासून कोकण प्रवासात असल्याने काही लिहिणे शक्य झाले नाही. पण जे सारे विचार मनात वर्ष संपताना आणि ब्लॉग लिहिण्याच्या निमित्ताने घोळत होते त्यांना अनुसरत ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नवी कविता मात्र झाली ती पण येथे द्यायची राहिली. गेले काही महिने प्रोफेशनल काम काहीच नाही त्यामुळे वेळच वेळ असूनही इतर काहीच कामे मार्गी लागली नाहीत - एक सर्वंकष बेशिस्त, unorganised, unproductive, नोन-क्रिएटीव्ह आयुष्य जगणे चालू आहे त्याचाच एक भाग म्हणजे ब्लॉग लिहिला न जाणे. मनात विचार असूनही, काही कविता लिहिल्या गेल्या तरीही नव्हेंबर नंतर ब्लॉग लिहिणे झालेच नाही .........

वर्ष संपंत आले की सरलेल्या वर्षाविषयी लिहिण्याची एक पद्धत सर्व स्तरावर रूढ झाली आहे त्याला मी ही अपवाद नाही. अगदी लिहिले नाही तरी मनात आपसूक विचार येतात.  कालमापनाच्या ज्या निरनिराळ्या पद्धती आहेत त्यानुसार एकदा कालखंड संपत आला की मनात विचार येतो की सरलेल्या विशिष्ट कालखंडात काय घडले, सहजच त्या कालखंडाचा आढावा घेतला जातो.... त्यावरून अनेकदा नव्या वर्षासाठी  वा कालखंडासाठी अनेकजण संकल्प घेतात पुरे करतात, मोडतात पुन्हा आणखी एक वर्ष वा कालखंड संपतो पुन्हा आढावा असे हे चक्र चालूच रहाते व्यक्तिगत, सामाजिक ते राष्ट्रीय - वैश्विक स्तरापर्यंत. पण या साऱ्यात मजा वा गम्मत ही आहे की निरनिराळ्या पद्धतीने, निरनिराळ्या स्तरावर  आपण काळ  नामक वस्तू वा परिमाण मोजत असतो, त्याच्या संदर्भात आढावे घेतो, आठवणी जपतो,  इतिहास लिहिला जातो विश्लेशीला जातो, त्याला ह्याचे काहीच नसतो, तो हे कालांतराने आपल्यालाच नव्हे संपूर्ण जातीला, समाजाला, राष्ट्राला आणि संस्कृतीला त्याच्या सोबत घेऊन जाऊन सारे पुसून टाकत असतो.

हे सारे कालमापन, त्याचे निरनिराळे खंड, आढावे, विश्लेषण, आठवणीना आठवत राहण्याचा अट्टाहास असे सारे काही जे अंगवळणी पडले आहे, गरजेचे वाटते, महत्वाचे पण आहे एकदम निरर्थक वाटू लागले ...... अशा साऱ्या विचारातून वर्षाच्या शेवटच्या दिवशी  जी कविता साकारली ती इथे देत आहे  

कविता – कालमापन लेखन दिनांक - ३१/१२/२०१५ – ०१/०१/२०१६

(सुह्र्दच्या घरी, कोणार्क नगर, विमान नगर पुणे  ३१/१२/२०१५ मध्यरात्र ते ०१/०१/२०१६ दुपार)

ना आरंभ ना अंत
असा तू अनादी अनंत
ना रूप ना आकार
असा तू निराकार
ना तू स्थिर ना प्रवाही
मोजण्या पलीकडलाही 
मोजत राहतो तुला तरीही
अनेक तोकड्या मोजपट्यांनी आम्ही        ||

आजही अशाच एका मोजपट्टीने मोजला
प्रत्येकाने आपआपल्या परीने तुला  
देऊन निरर्थक २०१५ संज्ञा त्या कल्पित तुकड्याला
कडू गोड आठवणी, प्रसंग, घटना गुंडाळल्या
तुला काहीच नाही रे या साऱ्याचे
मूर्तिमंत उदाहरण तू निर्विकाराचे
मिटवतोस तुला मोजणाऱ्याना
सोबत त्यांच्या साऱ्या संदर्भांना 
निरर्थक जरी तुला कल्पणे, मोजणे, तोडणे
मोजू, कल्पू तुला पुनःपुन्हा निरर्थकतेने
बांधत राहू त्यात सरलेले क्षण सवयीने
सांगण्या, समजण्या, आठवण्या तुझ्या संदर्भाने                 ||