Thursday 22 May 2014

कविता - चाहूल वादळाची

दिनांक – २२/०५/२०१४                                
२६/०१/२००१ चा गुजरात मधला भयानक भुकंप, त्यानंतर जस जसे दिवस जाऊ लागले तसतशी त्याची भयानकता अधिकाधिक जाणवत गेली. लोकांची जमीनदोस्त झालेली घरे, इतकी की पूर्णतः होत्याचे नव्हते झालेले. अनेक प्रकारची संकटे माणूस, झाडे, पक्षी झेलत असतात कारण त्यांच्या पायाखाली भक्कम आधार असतो. ह्या भूकंपातून जाणवले ते हे की भूकंप म्हणजे ज्या आधारावर आपण उभे असतो तो जाणे, अस्तित्वाचा पायाच जाणे; ह्या सर्व जाणीवेतून आलेली हि कविता .........
कविता - चाहूल वादळाची
माझे दोघेही शांत झोपलेले
येऊ शकणाऱ्या वादळाची कल्पनाही नसलेले;
उगाचच का चाहूल लागते आहे मला
क्षितिजापलीकडून उठू शकणाऱ्या वादळाची
त्यांच्यावर खिळलेली माझी नजर
पंखांसारखी फैलावून घेऊ पाहते त्यांना पंखांखाली
कोसळणारे आभाळ पंखांवर झेलण्याची
उमेद आहे माझ्यापाशी पण
घरट्याखालची फांदी वा झाडच     
उन्मळून पडले तर ?
माझे दोघेही शांत झोपलेले
येऊ शकणाऱ्या वादळाची कल्पनाही नसलेले
अन मी अंतर्बाह्य अशांत, झोप उडालेला
आधारावरचाच विश्वास उडालेला ||

(composed on 11/2/2001 during 1.15 to 1.30 am, last two line composed today 22/05/2014)

No comments:

Post a Comment