Tuesday 2 February 2016

१०० वा ब्लॉग – ठरवावे एक, व्हावे भलतेच - कविता – न लिहिलेली रोजनिशी

ब्लॉग – दिनांक ०१/०२/२०१६ – १०० वा ब्लॉग – ठरवावे एक, व्हावे भलतेच 

२४/०१/२०१६ ला ब्लॉग लिहिला तेंव्हा जाणवले पुढले ब्लॉग हा ९९ वा आणि त्यानंतर १०० वा (शतकी) असणार आहे, त्याच वेळेस मनात आले की किती चांगला योग आहे की हे दोन्ही ब्लॉग गेल्या महिन्यात गावाला दिलेल्या भेटी विषयी आणि २७/१२/२०१६ ला योजलेल्या गावातल्या घराच्या दुरुस्ती साठीच्या भेटी विषयी लिहिता येईल !!! त्यानुसार २६ जानेवारीला ९९ वा ब्लॉग लिहिला आणि १०० व्या शतकी ब्लॉग साठी ‘पूर्वजांची ठेव जपताना’ असा ब्लॉग जवळ जवळ लिहून तयार ठेवला. आयोजन हे की २६ ला रात्री मुंबईहून निघून २७ ला गावी पोचलो आणि दिवसा दुरुस्तीचे काम कंत्राटदारा सोबत फायनल करायचे, कामाचा मुहूर्त करायचा आणि त्या दिवशी संध्याकाळी ‘शतकी’ ब्लॉग जाहीर करायचा साऱ्यांसाठी.

पण ह्यात मी एक विसरलो की जिथे पुढल्या क्षणाचा भरवसा नाही तिथे मी दुसऱ्या दिवसाची घटना, भविष्य आधीच लिहून ठेवले !!! काय हा अगोचरपणा, अति आत्मविश्वास की ठरवले आहे तसेच घडणार. आणि झालेही तसेच संध्याकाळी रत्नागिरीची बस पकडण्यासाठी जाताना मी माझी laptop bag इतर अनेक मौल्यवान वस्तूंसकट असलेली रिक्षेत विसरलो आणि गावी जाऊ शकलो नाही. अर्थात इतरांच्या मुळे ठरल्याप्रमाणे गावी कंत्राटदारा सोबत काम नक्की होऊन ते मार्गी लागले पण माझे जाणेही राहिले आणि तो लिहिलेला ब्लॉग ही हरवलेल्या laptop सोबत गेला त्यामुळे प्रसिद्ध करणे बाजूला राहिले. ‘ठरवावे एक आणि व्हावे भलतेच’ असे झाले ..........

पाहता पाहता दोन वर्षात ‘स्वगत’ ह्या माझ्या ब्लॉगने शंभरी गाठली, आधी वाटले नव्हते इतकी वाटचाल होईल कारण अगदी समजायला लागल्यापासून थोरा – मोठ्यांच्या जीवनातून प्रेरणा (???) मिळून रोजनिशी लिहिण्याचे एक आदर्शवादी वेड/खूळ डोक्यात होते अजूनही आहे त्यामुळे कर्तृत्वाने फार मोठे न होतही पुन्हा पुन्हा रोजनिशी लिहिण्याचे झटके येऊन अधून अधून दोन चार दिवस लिखाण होत राहिले; पण रोजनिशी कधी बोटावर मोजता येईल एवढ्या दिवसाकडे लिहिली गेली नाही पण कसे काय घडले पण गेल्या दोन वर्षात अनियमित पणे का होईना पण १०० ब्लॉग लिहिले गेले. अर्थात गेल्या वर्षी ५० व्या ब्लॉग मध्ये लिहिले त्याप्रमाणे मुख्यत्वे ते कवितेच्या अनुषंगाने लिहिले गेले आहेत.

मध्ये मला विचारले गेले ‘तू रोजनिशी लिहित होतास का?’ मी म्हटले नाही पण मनात प्रश्न उभे राहिले - हा ब्लॉग मी लिहितो आहे ते काय आहे, त्याला रोजनिशी म्हणता येईल का ? काहीशा नेमाने ब्लॉग लिहितो आहोत पण आपण रोजनिशी का नाही लिहू शकलो? ती कोरीच का राहिली इत्यादि. ह्या प्रश्नातून पुढील कविता ‘ न लिहिलेली रोजनिशी’ सुचली ....

कविता लिहिलेली रोजनिशी   २४/११ संध्याकाळ / २५/११ सकाळ कल्याण

काही भरलेली पाने
काहींवर दोन तीन शब्दांच्या नोंदी   
बाकी सर्व कोरीच पाने पाहून
टाकून देऊ नका माझी रोजनिशी .......

पुन्हा हातात घेऊन अंतर्मनाने पहा   
त्रोटक नोंदी असलेली पाने
अथवा ती संपूर्ण कोरी पाने,
दिसू लागेल लिखाणाने
गच्च भरलेली रोजनिशी त्या पानांवर
तुम्ही आणि मी लिहिलेली ........

तिच्याशी पहिली भेट,
प्रेमाचा होकार, पहिले मिलन
बाळाचा जन्म, नव्या घरातला पहिला दिवस,
वडीलांचे आईचे वा आवडत्या व्यक्तीचे जाणे
तिच्यापासून कायमचे वेगळे होणे
अशा अनेक त्रोटक नोंदी असलेल्या
कोऱ्या पानांवर आता वाचू लागाल
तुमच्याच आठवणींची रोजनिशी ...........

माझ्या रोजनिशीतल्या संपूर्ण कोऱ्या पानांवर तर
तुम्ही वाचू लागाल आता
मनात खोल स्वतःपासून दडवलेली
कधीच कोणालाही सांगितलेली रहस्ये,
व्यक्ति, घटना, व्यवस्थेविषयक विचार भावना  
चुकांची कबुली, आचरलेला खोटेपणा, कोतेपणा,
गिळलेले अपमान, अनाहूत भीती असे अनेक ..........     

मोजकेच शब्द लिहिलेली पाने
वा कोरीच असलेली पाने पाहून
टाकून देऊ नका माझी रोजनिशी 
वाचू शकाल त्या पानांवर
तुम्ही आणि मी लिहिलेली रोजनिशी  .........||


माझे हे ब्लॉग लिहिणे नक्कीच रोजनिशी लिहिणे नाही. हे मी आधी लिहिल्या प्रमाणे ‘स्वगत’ आहे जाणीवपूर्वक लोकांपर्यंत पोचवलेले. इथे मी तेवढेच लिहितो आहे जे खरे आहे, प्रमाणिक आहे पण जे मला ‘स्वगतोक्ती सारखे’ माझ्या स्वतःशी बोलावेसे वाटते आणि लोकांपर्यंतही पोचवावेसे वाटते. मनात उठलेले प्रश्न, सुचलेली कविता यावरून खरे तर हे जाणवले  की मी रोजनिशी आळसामुळे वा इतर कुठल्या कारणाने नव्हे तर ती खऱ्या अर्थाने लिहिण्यासाठी लागणारी नग्नमनस्कता, तो प्रांजळपणा अनेकदा त्या अनुभवाला सामोरे जाण्याची तटस्थता माझ्या जवळ नाही आणि ती बहुतेकांकडे नसते म्हणून आपणां सर्वांची रोजनिशी बहुधा कोरीच असते........ पण म्हणून ती टाकून द्यायची नसते, त्या कोऱ्या पानांवर न लिहिलेले खूप काही असते ते वाचायचे असते ......