Tuesday 2 February 2016

१०० वा ब्लॉग – ठरवावे एक, व्हावे भलतेच - कविता – न लिहिलेली रोजनिशी

ब्लॉग – दिनांक ०१/०२/२०१६ – १०० वा ब्लॉग – ठरवावे एक, व्हावे भलतेच 

२४/०१/२०१६ ला ब्लॉग लिहिला तेंव्हा जाणवले पुढले ब्लॉग हा ९९ वा आणि त्यानंतर १०० वा (शतकी) असणार आहे, त्याच वेळेस मनात आले की किती चांगला योग आहे की हे दोन्ही ब्लॉग गेल्या महिन्यात गावाला दिलेल्या भेटी विषयी आणि २७/१२/२०१६ ला योजलेल्या गावातल्या घराच्या दुरुस्ती साठीच्या भेटी विषयी लिहिता येईल !!! त्यानुसार २६ जानेवारीला ९९ वा ब्लॉग लिहिला आणि १०० व्या शतकी ब्लॉग साठी ‘पूर्वजांची ठेव जपताना’ असा ब्लॉग जवळ जवळ लिहून तयार ठेवला. आयोजन हे की २६ ला रात्री मुंबईहून निघून २७ ला गावी पोचलो आणि दिवसा दुरुस्तीचे काम कंत्राटदारा सोबत फायनल करायचे, कामाचा मुहूर्त करायचा आणि त्या दिवशी संध्याकाळी ‘शतकी’ ब्लॉग जाहीर करायचा साऱ्यांसाठी.

पण ह्यात मी एक विसरलो की जिथे पुढल्या क्षणाचा भरवसा नाही तिथे मी दुसऱ्या दिवसाची घटना, भविष्य आधीच लिहून ठेवले !!! काय हा अगोचरपणा, अति आत्मविश्वास की ठरवले आहे तसेच घडणार. आणि झालेही तसेच संध्याकाळी रत्नागिरीची बस पकडण्यासाठी जाताना मी माझी laptop bag इतर अनेक मौल्यवान वस्तूंसकट असलेली रिक्षेत विसरलो आणि गावी जाऊ शकलो नाही. अर्थात इतरांच्या मुळे ठरल्याप्रमाणे गावी कंत्राटदारा सोबत काम नक्की होऊन ते मार्गी लागले पण माझे जाणेही राहिले आणि तो लिहिलेला ब्लॉग ही हरवलेल्या laptop सोबत गेला त्यामुळे प्रसिद्ध करणे बाजूला राहिले. ‘ठरवावे एक आणि व्हावे भलतेच’ असे झाले ..........

पाहता पाहता दोन वर्षात ‘स्वगत’ ह्या माझ्या ब्लॉगने शंभरी गाठली, आधी वाटले नव्हते इतकी वाटचाल होईल कारण अगदी समजायला लागल्यापासून थोरा – मोठ्यांच्या जीवनातून प्रेरणा (???) मिळून रोजनिशी लिहिण्याचे एक आदर्शवादी वेड/खूळ डोक्यात होते अजूनही आहे त्यामुळे कर्तृत्वाने फार मोठे न होतही पुन्हा पुन्हा रोजनिशी लिहिण्याचे झटके येऊन अधून अधून दोन चार दिवस लिखाण होत राहिले; पण रोजनिशी कधी बोटावर मोजता येईल एवढ्या दिवसाकडे लिहिली गेली नाही पण कसे काय घडले पण गेल्या दोन वर्षात अनियमित पणे का होईना पण १०० ब्लॉग लिहिले गेले. अर्थात गेल्या वर्षी ५० व्या ब्लॉग मध्ये लिहिले त्याप्रमाणे मुख्यत्वे ते कवितेच्या अनुषंगाने लिहिले गेले आहेत.

मध्ये मला विचारले गेले ‘तू रोजनिशी लिहित होतास का?’ मी म्हटले नाही पण मनात प्रश्न उभे राहिले - हा ब्लॉग मी लिहितो आहे ते काय आहे, त्याला रोजनिशी म्हणता येईल का ? काहीशा नेमाने ब्लॉग लिहितो आहोत पण आपण रोजनिशी का नाही लिहू शकलो? ती कोरीच का राहिली इत्यादि. ह्या प्रश्नातून पुढील कविता ‘ न लिहिलेली रोजनिशी’ सुचली ....

कविता लिहिलेली रोजनिशी   २४/११ संध्याकाळ / २५/११ सकाळ कल्याण

काही भरलेली पाने
काहींवर दोन तीन शब्दांच्या नोंदी   
बाकी सर्व कोरीच पाने पाहून
टाकून देऊ नका माझी रोजनिशी .......

पुन्हा हातात घेऊन अंतर्मनाने पहा   
त्रोटक नोंदी असलेली पाने
अथवा ती संपूर्ण कोरी पाने,
दिसू लागेल लिखाणाने
गच्च भरलेली रोजनिशी त्या पानांवर
तुम्ही आणि मी लिहिलेली ........

तिच्याशी पहिली भेट,
प्रेमाचा होकार, पहिले मिलन
बाळाचा जन्म, नव्या घरातला पहिला दिवस,
वडीलांचे आईचे वा आवडत्या व्यक्तीचे जाणे
तिच्यापासून कायमचे वेगळे होणे
अशा अनेक त्रोटक नोंदी असलेल्या
कोऱ्या पानांवर आता वाचू लागाल
तुमच्याच आठवणींची रोजनिशी ...........

माझ्या रोजनिशीतल्या संपूर्ण कोऱ्या पानांवर तर
तुम्ही वाचू लागाल आता
मनात खोल स्वतःपासून दडवलेली
कधीच कोणालाही सांगितलेली रहस्ये,
व्यक्ति, घटना, व्यवस्थेविषयक विचार भावना  
चुकांची कबुली, आचरलेला खोटेपणा, कोतेपणा,
गिळलेले अपमान, अनाहूत भीती असे अनेक ..........     

मोजकेच शब्द लिहिलेली पाने
वा कोरीच असलेली पाने पाहून
टाकून देऊ नका माझी रोजनिशी 
वाचू शकाल त्या पानांवर
तुम्ही आणि मी लिहिलेली रोजनिशी  .........||


माझे हे ब्लॉग लिहिणे नक्कीच रोजनिशी लिहिणे नाही. हे मी आधी लिहिल्या प्रमाणे ‘स्वगत’ आहे जाणीवपूर्वक लोकांपर्यंत पोचवलेले. इथे मी तेवढेच लिहितो आहे जे खरे आहे, प्रमाणिक आहे पण जे मला ‘स्वगतोक्ती सारखे’ माझ्या स्वतःशी बोलावेसे वाटते आणि लोकांपर्यंतही पोचवावेसे वाटते. मनात उठलेले प्रश्न, सुचलेली कविता यावरून खरे तर हे जाणवले  की मी रोजनिशी आळसामुळे वा इतर कुठल्या कारणाने नव्हे तर ती खऱ्या अर्थाने लिहिण्यासाठी लागणारी नग्नमनस्कता, तो प्रांजळपणा अनेकदा त्या अनुभवाला सामोरे जाण्याची तटस्थता माझ्या जवळ नाही आणि ती बहुतेकांकडे नसते म्हणून आपणां सर्वांची रोजनिशी बहुधा कोरीच असते........ पण म्हणून ती टाकून द्यायची नसते, त्या कोऱ्या पानांवर न लिहिलेले खूप काही असते ते वाचायचे असते ......

Tuesday 26 January 2016

कविता – गावातले घर म्हणाले .......

ब्लॉग दिनांक २६/०१/२०१६ - कविता – गावातले घर म्हणाले .......

कोकणात मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा ह्या गावानंतर गोव्याच्या दिशेला गेल्यावर येते  पाली गाव आणि तेथून चार – पाच किमी वर असलेले असोडे हे आमचे गाव. अंदाजे १३० वर्षापूर्वी ह्या गावी आमचे पूर्वज आले असावे. गावातले १९०५ साली बांधलेले घर, जे १९९४ पर्यंत पूर्णपणे राहते होते ते गेल्या पाच-सहा  वर्षात पडू लागले आणि ते पुन्हा दुरूस्त करण्याचे आयोजन करण्यासाठी जे गावी जाणे झाले त्या वेळेस घराशी मनात एक संवाद घडत होता, २९-३० डिसेंबर २०१५ च्या शेवटच्या भेटीत घर दुरुस्त करण्याचा निश्चय झाला आणि हा संवाद एक प्रकारे पूर्ण झाला ..... गावातल्या घराशी मनात झालेला संवाद मांडणारी ही कविता .......   

कविता – गावातले घर म्हणाले .......

(कविता लेखन – दिनांक १८/०१/२०१६, सकाळ ते दुपारी ३.० पर्यंत, उज्जैन मध्ये)

का येता तुम्ही सारे पुन्हा पुन्हा
माझे हे झिजत संपणे पहायला?
एकदाच संपूर्ण पाडून संपवा ना
हे हाल तुमचे आणि माझे.......
वर्षांच्या मौनानंतर बोलले अखेरीस मला  
कोसळू लागलेले गावातले घर
या भेटीत माझ्या ....

आज न उद्या कधीतरी
संपणारच ना अस्तित्व माझे – तुमचे
मग का अडकला आहे जीव तुमचा माझ्यात
पाडून टाकून छोटेसे देवघर ठेवा
लोकांचा हा सल्ला योग्यच आहे ऐकावा
पुढे म्हणाले मला
कोसळू लागलेले गावातले घर
या भेटीत माझ्या ....

कोणासाठी टिकवू पाहता आहात मला
कमी जास्त जोडलेली आहे नाळ
माझी तुमच्या पिढीशी, तुमची माझ्याशी
पण जोडलीत नाहीत नाळ तुम्हीच
माझी पुढल्या पिढीशी
रोखठोक सुनावत म्हणाले मला          / (कान उघडणी करत )
कोसळू लागलेले गावातले घर
या भेटीत माझ्या ....

आमच्यासाठी टिकवू पाहतो आहे तुला
आमच्या आधी तुझे संपणे नकोय आम्हाला’
बदलली आहे पिढी पुढची
जुळण्या तुझी नाळ त्यांच्याशी
टिकवू, थोडासा बदलू पाहतो आहे तुला
अंतरीच्या उमाळ्याने, आर्जवाने
उत्तरलो कोसळू लागलेल्या गावातल्या घराला 
या भेटीत माझ्या ....

येणार असाल जर तुम्ही सारे
जगण्या आळी पाळीने सोबत माझ्या
जोडणार असेल नाते पुढच्या पिढीशी
तर आहे मी तयार नव्याने उभारी घ्यायला
घडायला, बदलायला, सजायला
उत्साहाने म्हणाले मला
कोसळू लागलेले गावातले घर

या भेटीत माझ्या ....




Sunday 24 January 2016

ब्लॉग - ललाटलेख - कविता - ललाटलेख

ब्लॉग - दिनांक - २४/०१/२०१६

आपणा साऱ्यांना आपला  ललाटलेख वाचून घेण्याची / भविष्य जाणून घेण्याची किती उत्सुकता असते, त्याच उत्सुकतेमधून ज्योतिषशास्त्राची आवड निर्माण झाली पण फार प्रगती करता येत नाही कारण त्यासाठी लागणारा अभ्यास करणे होत नाहीये. ही आवडही स्वान्तसुखाय त्यामुळेही ह्या विषयात प्रगती करण्याची इच्छा कधी झाली नाही.

तरीही अभ्यास म्हणून, कुतूहल म्हणून कधीतरी कुणाची पत्रिका पाहतो, ते करताना एक जाणवले की काही वेळा पत्रिकेतले कोडे  अगदी सहज सुटू लागते तर काही काही पत्रिकेच्या बाबतीत ते जमतच नाही. पत्रिका त्यातले ग्रह, तारे, नक्षत्रे  काहीच बोलत नाही, संवाद साधत नाही. असे का घडावे? - अपुरे ज्ञान, अनुभव हे कारण तर खरेच पण जे ज्ञान आहे, जी पद्धत माहिती आहे ती एका कुंडलीला  लागू पडते पण तशाच दुसऱ्या कुंडलीला लागू पडत नाही.  ह्या साऱ्या पार्श्वभूमीवर झालेली ही कविता ...

कविता – ललाट लेख – मुंबई विमानतळ - दिनांक २६-११-२०१५

(लेखन – मुंबई विमानतळावर दिनांक २६-११-२०१५ सकाळी – नागपूरला पोचल्यावर दिवसभर)

सटवाई कडून तू लिहिलेला
ललाटलेख वाचण्यासाठी
ग्रह नक्षत्रांचा आराखडा घेऊन
माझ्यापुढे कुणाचेही येणे

समजते मला आपोआप
तुला खेळायचा आहे खेळ
तू लपण्याचा मी तुला शोधण्याचा
तुझ्या असण्या नसण्याचे
न संपणारे कोडे सोडविण्याचा

अनेकांच्या ललाटलेखांत
ग्रह नक्षत्रांच्या आराखड्यात
आढळतच नाही तुझे दैवी तत्व
तुझ्या नसण्याची खात्रीच पटावी इतका
सापडतच नाहीस तू कितीही शोधले तरी

उलट कधी सहज उलगडतो
ललाटलेख सोबत तू ही 
त्या ग्रह-नक्षत्रांच्या आराखड्यातून
टाळाही बसतो त्या कुणाच्या उत्तरातून
अंदाजलेले भविष्य खरे होण्यातून मिळतो
तुला शोधल्याचा, समजल्याचा आनंद
जागते तुझ्या अस्तित्वाचे कोडे सुटण्याची आशा

पण पुढल्या अनेकांच्या बाबतीत
तू नसण्याची खात्री पटवत
तू गायब त्यांच्या ललाट लेखांतून
ग्रह-नक्षत्रांच्या आराखड्यातून
लपाछपिचा खेळ अर्धवट टाकून
अस्तित्वाचे कोडे गुंतागुंतीचे करून

ललाटलेख वाचून घेण्या
लोकांचे अनाहूतपणे येणे
त्यांत तुझे असणे नसणे
मला उमजणे न उमजणे
हे सारे निव्वळ योगायोग ?
वा तुझी माझ्यासाठीची खास योजना ?
ह्या प्रश्नांची उत्तरे कशी कळणार ?......
माझा ललाटलेख मीच कसा वाचणार  ?.......

Saturday 23 January 2016

ब्लॉग - शोकांतिका आणि कविता - कविता – न घडलेली शोकांतिका

ब्लॉग - दिनांक – २३/०१/२०१६

नटसम्राट सिनेमा १० जानेवारीला पाहीला – नाना पाटेकरांचा अप्रतिम अभिनय तर खराच पण त्याहून महत्वाचे म्हणजे नाटकाचे अतिशय सुंदर पद्धतीने सिनेमा मध्ये केलेले रुपांतर. रुपांतर इतके समजदार पणे केले आहे की मूळ नाटकापेक्षाही नुकताच कट्यार काळजात घुसली या नाटकाचे सिनेमात केलेले रुपांतर पहिले होते पण तेथे ते फसले; इथे ते इतके जमले की मूळ नाटकापेक्षाही सिनेमा अधिक शोकात्म झाला आहे. नट सम्राटाची शोकांतिका अधिक उंचीवर नेली आहे प्रभावी केली आहे आणि नाटकापेक्षा एक प्रकारे अधिक आव्हानात्मक अशी भूमिका सुंदर निभावली आहे.

शोकांतिका एकीकडे आपल्याला रडवते, शोकाकुल करते पण त्यानंतर आपल्याला ती एक आगळ्या वेगळ्या प्रकारे आनंदी करते, एक वेगळेच समाधान, सुख देते आणि म्हणून आपणाला शोकांतिका आवडते, आपण ती आवर्जून ऐकतो, वाचतो, पाहतो आणि इतरांना सांगतो. आपल्या आयुष्यात, आपल्या स्व‍कीयांच्या आयुष्यात कुठलीही शोकांतिका कुणालाच घडावयास नको असते, पण ती घडली तर काय? असेही विचार मनात अनेकदा घोळतात. असे का घडते? शोकांतिकेचे रसायन काय आहे त्याचा शोध निरनिराळ्या लोकांनी घेतला आहे अजून घेतला जातो आहे. त्यांची उत्तरे काहीही असो. ट्रेजेडी किंवा  शोकांतिका साहित्य आणि इतर कला प्रकारांमध्ये अनंत काळापर्यंत अनन्य राहणार .....
नटसम्राट पहिला आणि मग मनात जे अनेक विचार घोळू लागले त्यातून सुचलेली ही कविता...  
  
कविता – न घडलेली शोकांतिका

(लेखन – दिनांक – ११/०१०/२०१६, बडोदे घरी दिवसभर)

उत्तुंग प्रचंड कड्याची कोसळून
अगणित नगण्य शकले होण्यासारखे
पार दुभंगून कोसळायचे होते मला
      अंगाखांद्यावरच्यांच्या विचाराने
      नाही जमले, बघे हो, माफ करा .......

स्वतःच्याही नियंत्रणाबाहेर गेलेल्या
भ्रमिष्ट, भरकटलेल्या तुफाना सारखे
बेफाम, बेलगाम, बेछूट व्हायचे होते मला
      माझ्या मंद झुळूकीवर डोलणाऱ्यांच्या विचाराने
      नाही जमले, बघे हो, माफ करा  .......

निर्दयी, पिसाटलेल्या वादळाच्या विरोधात
उभ्या ठाकणाऱ्या, न वाकणाऱ्या वृक्षासारखे
उन्मळून, मोडून पडायचे होते मला
      वाचण्या वादळांपासून आश्रयणाऱ्यांच्या विचाराने
      नाही जमले, बघे हो, माफ करा ......

अकल्पित, मनस्वी नियतीपुढे न हरता
तत्वांसाठी विनाश पावणाऱ्या नायकासारखे
धीरोदात्तपणे बळी जायचे होते मला
      माझी आस असणार्‍यांच्या विचाराने
      नाही जमले, बघे हो, माफ करा ......

न घडलेल्या शोकांतिकांच्या माझ्या या शोकांतिकेला
शोकाकुल, भयाकुल करणारी,
अघटितचा अर्थ लावणारी,
अस्तित्वाचा शोध घेणारी,
शोकांतिका करून तुमच्या पर्यंत पोचविणे

      नाहीच जमले, बघे हो, माफ करा ......