Tuesday 5 September 2017

गर्दीत मी

दिनांक ०५/०९/२०१७

गर्दीत मी ...

कधी वाटले नव्हते मी गर्दीचा भाग घेईन, गर्दीची अनुभूति घेईन. आयुष्याची ५६ वर्षे मुंबईकर अथवा इतर मोठ्या शहरातले लोक गर्दी रोज नेमाने जशी जगतात तशी मी कधी अनुभवलीच नाही.  लहानपणी वा कॉलेजमध्ये जाताना बडोद्यात गर्दीच नव्हती, नंतर बडोद्यात २० वर्ष नोकरी केली पण कधीच गर्दीतून जावे लागले नाही, नंतरच्या १५ वर्षे कन्सलटन्सी करताना दैनंदिन आयुष्यातील गर्दीचा अनुभव येण्याचा प्रश्नच नव्हता.  क्वचित मुंबईला गेल्यावर लोकल च्या गर्दीतून प्रवास केला तेवढाच गर्दीचा अनुभव अथवा क्वचित उत्सवात आलेला गर्दीचा एखादा दुसरा अनुभव .....

एका नव्या कामाच्या निमित्ताने जुलै पासून दिल्लीत आलो आणि रोज सकाळ – संध्याकाळी नोकरीला जाण्याच्या निमित्ताने मेट्रोच्या आणि रस्त्यावरच्या गर्दीतून प्रवास सुरु झाला. अर्थात मुंबईच्या लोकलच्या गर्दी समोर दिल्लीच्या मेट्रोची गर्दी काहीच नाही पण तरीही गर्दी म्हणावी अशी ही गर्दी नक्कीच आहे. दिल्लीची गर्दी मुंबईच्या गर्दी समोर कमी आहे पण तिचा अनेकविध रीतीने अनुभव घेता येईल इतपत मोकळी आहे, मुंबईची गर्दी एकच एक अनुभव मिळेल इतकी घट्ट आहे !!!

गर्दी म्हटली की आपल्या नजरे समोर खूप गोंगाटाचे, कोलाहलाचे, लोकांच्या बडबडीचे दृश्य उभे रहाते पण ते आता बरेच बदलले आहे. रस्त्यावर वाहनांचे आणि इतर अनेक गोष्टींचे कर्कश्य आवाज असतात पण माणसांच्या संवादांचे, बोलण्याचे नसतात. आताची गर्दी जवळ जवळ मुकीच झाली आहे, त्यातून दिल्लीच्या आणि इतर शहरातल्या मेट्रोची गर्दी तर नक्कीच जवळ जवळ मुकी झाली आहे. अनोळखी माणसांनी एकमेकांशी बोलणे घडतच नाही, अगदीच दोन नात्यातली माणसे अथवा मित्र प्रवास करत असले तर आणि त्याहून महत्वाचे ते आपसा आपसात काही बोलले तरच, नाहीतर माणसे मोबाइल मध्ये गढलेली, संगीत ऐकण्यात – पुस्तक वाचण्यात रमलेली, झोपलेली नाहीतर त्रयस्थपणे नुसतीच स्वत:मध्ये हरवून बसलेली वा आजूबाजूच्या लोकांकडे – घटनांकडे शून्यपणे पाहत असलेली. अशा ह्या माणसां सोबत, गर्दी  सोबत माझाही प्रवास मुकेपणाने होतो आहे. एकही शब्द न बोलता विमान प्रवास करण्याचा तर गाढ अनुभव होताच आता तो मेट्रोत, मेट्रो स्टेशनवर, रस्त्यावर असणाऱ्या गर्दीतही घेतो आहे.   
गर्दी मुकी असली, स्वत:मध्ये हरवलेली, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींविषयी त्रयस्थ असली, unconcerned असली तरीही त्या गर्दी कडे डोळसपणे पहिले की तिची अनेक रूपे / आकार / आयाम जाणवू लागतात. गर्दीतल्या माणसांचे अंतरंग कळू लागते, त्यांचे गर्दीत असणे कळू लागते, आपले गर्दीतले अस्तित्व, स्थान कळू लागते. अशाच साऱ्या अनुभूतितून आकाराला आलेली ही कविता .......

कविता - गर्दीत मी 

(दिनांक ३१/०८/२०१७, सर्वोदय एनक्लेव्ह – दिल्ली, रात्रो ९ ते १२ )

गर्दी विवक्षित ठिकाणी जाणारी - परतणारी
गर्दी इतस्तत: कुठेही कशीही जाणारी
गर्दी चहूकडून एकत्र येणारी, चहूकडे पांगणारी

गर्दी कुठेही न जाणारी, घुटमळणारी
गर्दी क्षणोक्षणी निरनिराळे आकार, रूपे घेणारी
गर्दी संवेदनहीन, विचारशून्य, हिंस्र करणारी 

गर्दी भेदभाव तात्पुरते संपवणारी
गर्दी बंधने घालणारी,  स्वातंत्र्य हिरावणारी,
गर्दी ओळख, व्यक्तित्व, अहंकार मिटविणारी 

गर्दीत माणसे काळाच्याही पुढे धावू पाहणारी
आशेच्या, उमेदीच्या जादुई चाकांनी पळणारी
 महत्वाकांक्षांच्या स्वप्नांच्या ईन्धणाने चालणारी

गर्दीत माणसे नेमाने यंत्रवत जाणारी येणारी
सरणाऱ्या फोल क्षणांच्या ओझ्याने वाकून चालणारी
एकटेपण घालवण्या सरावाने, निरुपायाने येणारी

गर्दीत माणसे एकच एक त्रयस्थपणा  असणारी   
मुकी, अबोल, स्वतःत - कोषात हरवू पाहणारी
स्वतः भोवतीच्या कोषांना, बंधनांना तोडू पाहणारी

गर्दीत अशा ह्या मी ना कशाच्या पुढे वा – मागे पळण्या
ना स्वप्ने, ना महत्वाकांक्षा, ना अपेक्षा असण्या
ना कोषात जाऊ पाहणारा, ना कोषाला तोडू पहाण्या

गर्दीत अशा ह्या मी ओळख, अस्तित्व, अहं संपविण्या
ना भविष्यात, ना भूतात तर वर्तमानात जगण्या 
फक्त साक्षी भावाने उरण्या, सर्वार्थाने मुक्त होण्या

Tuesday 15 August 2017

बेरेहेम आसमा मेरी मंझील बता है कहा

दिनांक - १५ ऑगस्ट, २०१७

ह्या माहितीच्या महाजाळ्याने / समुद्राने आयुष्यच बदलून टाकले आहे - समुद्रात बुडी मारून मोती, रत्ने शोधावी तसे ह्यात शोधत जायचे आणि मग अनेक माहित असलेल्या पण अप्राप्य /असाध्य गोष्टी तर काही वेळेस माहित नसलेल्या गोष्टी अचानक गुप्त धन सापडावे त्याप्रमाणे ह्या माहिती जाळात मिळतात, असेच काहीसे मला आज सापडले .......

तलत महमूद हा माझा अतिशय आवडता गायक आणि त्याच्या अनेक आवडत्या गाण्यांपैकी खूप आवडणारे गाणे म्हणजे 'बेरेहेम आसमा, मेरी मंझील बता है कहा' ......

बेरेहेम आसमा... मेरी मंझील बता है कहां...

जो न सोचा था वो हो गया
क्यूं नसीबा मेरा सो गया...
गम की ऐसी घटा छा गयी
चैन दिल का कहीं खो गया
ये बता. किसलीये ले रहा है मेरा इम्तेहां
बेरेहेम आसमा...

बुझ गया है ये दिल इस तरह
चांद पिछले पेहेर जिस  तरह...
इतनी तारीकीयो में  ये बता
राह ढूंढे कोई किस तरह
खो गयी मंझिले हो गया गुम काही कारवां
बेरेहेम आसमा...

जा रहे है न जाने किधर
देख सकती नही कुछ नजर
छोड दी नांव मजधार में
किस किनारे लागे क्या खबर...
क्या करें दूर तक रोशनी का नहीं है निशां
बेरेहेम आसमा...


वर्षानुवर्षे हे गाणे ऐकत आलो, गाण्याची ही तीन कडवी तोंड पाठ केलेली पण गाणे नेहमीच थोडे अधुरे वाटायचे, 'मतला' - गझल ला पुरा करणारा शेर असतो तसे ह्या गाण्याला पूर्ण करणारे कडवे आले नाही असे नेहमी वाटायचे.

पूर्वीची अनेक गाणी रेडियो वर अथवा रेकॉर्ड वर अधुरी असतात हे माहित असूनही ह्या बाबतीत शोध कसा काय पण कधी घेतला नाही हे खरे. 'बहाना' नावाच्या १९६० सालच्या चित्रपटातले हे गाणे मदनमोहन यांचे संगीत आणि राजेंद्र क्रिष्ण यांचे शब्द एवढेच कॅसेट वरून माहित होते. अचानक काल हे गाणे यु ट्यूब वर शोधले आणि खजिनाच सापडला - गाण्याची पुढली तीन कडवी सापडली - शब्दांच्या रुपात आणि तलत च्या आवाजात - आणि इतके वर्ष अधुरे जाणवणारे गाणे पूर्ण कळले .....  'बेरेहेम आसमा' हे त्याने कोणाला उद्देशून म्हटले आहे हे कळले..... कळले कसले अंगावर आले, मन, बुद्धी, विचार सारे सारे काही हेलावून टाकले.   आधीच्या तीन कडव्यांसकट आता पुढची तीन कडवी वाचा म्हणजे तुम्हालाही उमजेल मी काय म्हणतो आहे ......

मुझसे किस्मत ने धोखा किया
हर कदम पर नया गम दिया
है खुशीकी कसम के यहां
चैन का सांस तक ना लिया...
बुझ गया, दिल मेरा, रास आया न तेरा जहां...
बेरेहेम आसमा...

तेरी दुनिया में यूं हम जियें
आसूओन्के समंदर पिये...
दिल में शिकवे तडपते रहे
होठ लेकीन हमेशा सीयें
कब तलक, हम रहें, तेरी दुनिया में यूं बेजुबां
बेरेहेम आसमा...

अब कोई भी तमन्ना नहीं
अब यहां हम को जीना नहीं
जिंदगी अब तेरे जाम से
एक कतरा भी पिना नहीं
मौत को भेज के खत्म कर दे मेरी दास्तां
बेरेहेम आसमा...

चौथे कडवे आधीच्या तीन कडव्याप्रमाणे गाणाऱ्याची (नायकाची) अवस्था मांडणारे पण शेवटच्या दोन कडव्यात त्याने 'बेरेहेम' अश्या त्या जगत नियंत्याला जो प्रश्न विचारला आहे, जे सुनावले (ऐकवले) आहे आणि शेवटी जे मागणे मागितले आहे ते म्हणजे वेदनेचा कळस आहे - गाण्यातल्या कल्पनेला / विचारला शिखर पूर्णता देणारे आहे. हे झाले शब्दांचे - ह्या शेवटच्या दोन कडव्यात लागलेला तलत चा आवाज आणि मदन मोहन यांची संगीत रचना शब्दांना नुसती न्याय देणारीच नाही तर घनता देणारी - जिवंत करणारी आहे.

तलत च्या मुलायम, मखमली, किंचित कापऱ्या पण त्यामुळेच अधिक भावपूर्ण आवाजाबद्दल, त्याच्या सहज गाण्याबद्दल अनेकांनी अनेक प्रकारे लिहिले आहे जे सारे खरे आहे मी अधिक काय लिहिणार. पण तलत ची अशी अनेक दर्दभरी गाणी ऐकताना मला असे जाणवले की ही गाणी आणि तलत चा आवाज हा रेझर ब्लेड / वस्तऱ्याच्या धारेसारखा आहे - ब्लेड ने जसे आधी जराही वेदना न होता बोट अथवा दाढी कापली जाते आणि भळाभळा रक्त सहजपणे वाहू लागते तसे तलत चे गाणे ऐकताना होते.....   मनावर चढवलेली कठीण आवरणे नकळत कापून त्याचा आवाज गाण्याचे शब्द, भाव गाभ्यात पोचवतो ..... मन भळाभळा वहायला स्वतःचीआधीची जखम असायला हवी असे नाही ......त्याचा आवाज वेदनेला शुद्ध, निरपेक्ष, अशरीर रुपात मनाच्या गाभ्यात पोचवतो आणि आपला कॅथार्सिस करतो .......

आणखी काय लिहू तुम्हीच अनुभूती घ्या त्याच्या आवाजाची आणि ह्या गाण्याची .......

https://youtu.be/zv5kb_Tp9QI

Wednesday 12 April 2017

शोध अज्ञाताचा, साधण्या संवाद अज्ञाताशी ११ - कविता - गरज तुला माझ्या अस्तित्वाची

दिनांक  – १२/०४/२०१७ - शोध अज्ञाताचा, साधण्या संवाद अज्ञाताशी ११  

हे विश्व निर्माण कसे झाले? त्याचा निर्माता कोण? ते कसे चालते? कोण चालवते ह्या विश्वाला? ह्या विश्वाला चालवणारी शक्ती (देव) आहे की नाही, असलाच तर गुणाने, रूपाने, रंगाने, आकाराने, स्वभावाने कसा आहे, त्याची ह्या जगाच्या अवाढव्य पसाऱ्या मध्ये भूमिका काय? माणसासमोर पडलेल्या अशा अनेक प्रश्नां मुळे माणसाच्या कल्पकतेची परिसीमा देव ह्या संकल्पनेच्या बाबतीत घडलेली जाणवते. जे गुणविशेष माणसाशी निगडीत आहेत म्हणजे मर्त्यपणा, ज्ञानाची सिमितता इत्यादि ते अर्थातच देवाच्या बाबतीत संभवत नाहीत हे जरी खरे असले तरी त्या निर्गुण निराकाराला सगुण साकार होण्यासाठी माणसाची कल्पकताच आवश्यक असते अशा प्रकारचे विचार आधीच्या कवितेतही मांडले गेले आहेत, ह्याही कवितेत ते आणखी वेगळ्या प्रकारे व्यक्त झाले आहेत ..........

कविता - गरज तुला माझ्या अस्तित्वाची – लेखन – बडोदे घरी - सकाळी ०२/११/२०१६


अनादी तू, अनंत तू माझ्या तोकड्या आयुष्याने

अज्ञात तू, अकल्प तू माझ्या सीमित ज्ञानाने     

अमर तू अक्षर तू माझ्या मर्त्यपणाने

तरीही माझे एकच म्हणणे

निर्गुणा सगुण होण्या गरज तुला माझ्या भावनांची

निराकारा साकार होण्या गरज तुला माझ्या कल्पनांची

कृपाळा कृपेला तुझ्या गरज माझ्या अपराधांची


देवा अस्तित्वाला तुझ्या गरज माझ्या अस्तित्वाची 

Tuesday 11 April 2017

शोध अज्ञाताचा, साधण्या संवाद अज्ञाताशी १० - कविता - सज्ज मी नियतीशी लढायाला

दिनांक - ११/०४/२०१७


शोध अज्ञाताचा, साधण्या संवाद अज्ञाताशी १०  

तो निर्गुण निराकार अस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न जरी बाजूला ठेवला तरी त्याचे सगुण, साकार रूप हे मानवाच्या बुद्धीने-भावनेने जन्माला घातलेले आहे ह्यात शंकाच नाही आणि म्हणूनच सगुणाकडून निर्गुणाकडे वाटचाल आणि शेवटी त्या निर्गुणाला पावणे असा मार्ग शास्त्रांनी सांगितला आहे. दिनांक ०७/०५/२०१५ च्या ब्लॉग मध्ये मी हाच विचार वेगळ्या प्रकारे मांडला होता. आपल्याला देव हा आपल्या आई वडिलांकडून, ज्या धर्मात, जातीत जन्माला आलो, ज्या समाजात वाढलो त्यातून मिळतो, म्हणजे संस्कारातून मिळतो, पण असा देव अनेकदा आपला वाटत नाही,  देव विकत, उधार घेता येत नाही तो आपल्यातून जन्माला आला तर तो आपला वाटेल, आपल्याला पटेल ह्या विचारातून आकाराला आलेली कविता ब्लॉगवर ठेवली होती.

 सगुण रुपातला देव जर माणसाच्या बुद्धीने – भावनेने जन्माला येत असेल तर त्या माणसाच्या मृत्यू बरोबर त्या माणसाने कल्पिलेले त्याचे सगुण साकार रूप ही संपते, लयाला जाते, म्हणजेच सगुण रूपातला देव माणसाबरोबर मरतो. माणसाच्या मनातले व्यक्तिगत सगुण रूप कशाला, जेंव्हा जेंव्हा देवाने सगुण रूप धारण केले अथवा संपूर्ण समाजाने त्याला ते दिले, ज्याला आपण अवतार म्हणतो ते संपले आहेत. मरण शब्द आपण नाही वापरत – अवतार कार्य संपले असे म्हणतो पण त्यामागचे तत्व / सत्य तेच रहाते. अनेक संस्कृती लयाला गेल्या त्यांच्या सोबत त्यांच्या देव संस्कृती लयाला गेल्या आहेत. देवाचे सगुण रुपाला पण लय आहे, नियती आहे. सगुण रूपाच्या मागच्या निर्गुण तत्वाकडे जावे, त्याला पावावे तर ते निष्क्रिय, कशातही ढवळाढवळ न करणारे, नियती पासून न वाचविणारे.

देवाच्या सगुण आणि निर्गुण रुपाची नियती शरणता आणि नियतीची सर्वोपरिता कोणी बोलून जरी नाही दाखवली तरी प्रत्येक माणसाला, त्याच्या मनाला – बुद्धीला पडलेला आणि न सुटलेला यक्षप्रश्न आहे. हा प्रश्न सोडविण्याच्या प्रयत्नातूनच अनेक धार्मिक आणि तात्त्विक सिद्धांतांचा जन्म झालेला आहे.  दुःख, दुर्दैव, मृत्यू ह्यांची अनिश्चित अटळता आणि त्या निर्गुणा वा सगुणाची नियती पुढील हतबलता अशा अनेक विचारातून जन्माला आलेली ही कविता .......

कविता – सज्ज मी नियतीशी लढायाला – दिनांक ०३/०३/२०१६

(संकल्पना १५/०२/२०१६ पासून, प्रत्यक्ष कविता लेखन – ०३/०३/२०१६ – सकाळ आणि दुपार – नाशिक म्युनिसिपल कॉर्पोरेशन )

अनेक सभ्यता, संस्कृती, पंथ जन्मले – अस्तले
संपले त्यांच्या सोबत सगुणरूप तुझे त्यांनी निर्मिलेले
सगुण रूप तुझे तसेच नेमाने रहाते संपत
प्रत्येक मरणाऱ्या माणसा माणसा सोबत
उमजले तुही नियतीने बद्ध, असहाय आमच्यासारखा
अकारण जन्मणारा – मरणारा आमच्यासारखा       ||

कसे पटावे आम्हाला तुझे नियती शरण सगुण रूप
कल्पिले आम्हीच मग तुझे अनादी, अनंत निर्गुण रूप
नियतीच्या पाशातून मुक्त असे स्वयंभू रूप
नियतीच्या पाशातून सोडविणारे सर्वशक्तिमान रूप             
उपयोगच झाला नाही तुला निर्गुण रुपात कल्पण्याचा, भजण्याचा
अखंड चालूच आहे मनस्वी, निरंकुश, निर्दयी कारभार नियतीचा                    ||

कसे पटावे आम्हाला निर्गुणा तुझे अपयश नियतीला आवरण्याचे
कल्पिले आम्हीच मग थोतांड कर्मविपाकाचे, पुनर्जन्माचे
पाप - पुण्याचे, स्वर्ग – नरकाचे, मायावादाचे
जन्म – मृत्युच्या, नियतीच्या चक्रातून सुटण्याचे अर्थात मोक्षाचे
जन्मदात्यांनी वाचवत राहावे अपत्याला साऱ्या दोषांपासून
तद्वत शतकानुशतके वाचवत आहोत आम्ही तुला साऱ्या दोषांपासून                ||

चार्वाक – बुद्धा पासून अनेकांनी नाकारले तुला
स्वीकारले डोळसपणे, निर्भयपणे दुःख, दुर्दैव, मृत्यूला
खरे तर आम्ही साऱ्यांनी मिटवावयाला हवे तुला
द्यायला यथार्थ मान, सन्मान, लढा नियतीला
आधी घडले नाही, पुढेही बहुधा घडणार नाही
तू वास्तवात नसूनही बहुतेक तुला नाकारणार नाही                          ||

मी मात्र आता नाकारतो तुला, तुझ्या अस्तित्वाला

सज्ज मी नियतीशी माझी लढाई लढायाला                                      ||

Sunday 2 April 2017

ठरवावे एक आणि व्हावे भलतेच २ - कविता - काय करू ?

दिनांक ०२/०४/२०१७

ठरवावे एक आणि व्हावे भलतेच - २

हेच शीर्षक देऊन १०० वा ब्लॉग दिनांक ०२/०२/२०१७ म्हणजे बरोबर १४ महिन्यांपूर्वी हा  ब्लॉग  सुरु करून दोन वर्षे पूर्ण झाली म्हणून लिहिला होता, तेंव्हा मनात पुढे खूप काही लिहिणे होते पण झाले भलतेच ..... अशा काही गोष्टी घडत गेल्या की त्या पुढला ब्लॉग लिहिला गेलाच नाही.

दोन महिन्यापूर्वी ब्लॉग पुन्हा लिहावा असे वाटू लागले, पण खूप काही लिहिण्यासाठी मनात दाटून आल्याने सारा गोंधळच उडाला मनात आणि अर्थात प्रत्यक्षात काही लिहिणे झालेच नाही. एकीकडे ब्लॉग सुरु करण्याचे मुहूर्त शोधणे झाले - कुणाचा वाढदिवस, सणाचा दिवस, जीवनातील महत्वाच्या घटनेचा दिवस पण तेही दिवस साधले गेले नाहीत - शेवटी कुढल्या दिवसाची, घटनेची, मुहूर्ताची वाट न पाहता ज्या क्षणी आज आत्ता मनात आले त्या क्षणी हे शब्द लिहिले. नशिबाने काल आणि आज मिळून एक नवी कविता गझल फॉर्म मध्ये आकाराला आली होती तीच आता आज ब्लॉग वर ठेवत आहे.

परवा वाचताना एक उर्दू शेर आवडला, त्याचा मजा म्हणून स्वैर अनुवाद केला आणि फेसबुक वर पुढील प्रमाणे काल  सकाळी ठेवला

मैं नाकाम-ए-मसर्रत हूँ मगर हँसता ही रहता हूँ
करूँ क्या मुझ को क़ब्ल-अज़-वक़्त मर जाना नहीं आता
अख़्तर शीरानी

नाकाम-ए-मसर्रत = ख़ुशियों से वंचित  /  क़ब्ल-अज़-वक़्त = समय से पहले

स्वैर मराठी अनुवाद

सुखांनी वंचीत असूनही, हसत जगत राहतो

करू काय वेळे आधी मरता येत नाही ना मला

पण हळूहळू कविता आकारात गेली मनात पुढीलप्रमाणे, अर्थात कवितेत काल अनुवाद केलेला शेर बदलला 

कविता - करू काय - लेखन - दिनांक १-२ एप्रिल, २०१७

गरज नसूनही, साऱ्यांसाठी समभावे फुलत राहतो
करू काय, कुणा एकासाठी फुलता येत नाही ना मला            ||१||

मान्य नसूनही तुम्हा अनेकांना, सर्वांना आपले मनात राहतो
करू काय, कुणा एकासाठी दुसऱ्याला नाकारता येत नाही ना मला ||२||

कदर नसूनही, बिनाशर्त कर्तव्य, प्रेम करत राहतो
करू काय, अटींनी बद्ध कर्तव्य, प्रेम मान्य नाही ना मला        ||३||

जाता पुढे नसे मागे परतणे, जाणूनही हे पुढे वाहत राहतो
करू काय, काळ प्रवाहाला थांबवता येत नाही ना मला         ||४||

कुठलेच पाश, इच्छा उरली नसूनही, मी जगत राहतो
करू काय, वेळे आधी मरता येत नाही ना मला                    ||५||

देवा नाकारूनही तुला, साऱ्यांसाठी पुजत राहतो
करू काय, तुझ्यासारखे त्यांचे योगक्षेम सांभाळणे शक्य नाही ना मला ||६||

ब्लॉगची ही पुन्हा केलेली सुरवात किती काळ चालेल ते ठाऊक नाही, पण जो पर्यंत चालेल तो पर्यंत लिहित राहीन ....