Thursday 31 July 2014

कविता – कशाला नांव ठेवायची आपल्या पूर्वजांना


दिनांक - ३१/०७/२०१४ 

हि कविता मी २० वर्षापूर्वी लिहिलेली, तिला revise केली त्यादिवशी मनात एक विचार आला हे थोडे अतिरंजित चित्र आहे, अजून हि कविता relevant आहे का ? अजूनही TV अथवा वृत्तपत्रे किंवा नव्याने आलेली सामाजिक संकेत / माहिती स्थळे अश्या सार्या गोष्टी दाखवतात का? हा प्रश्न मला पडला कारण मी शक्यतो TV वर दाखवल्या जाणार्या बातम्या पाहायचे सोडले आहे. मनात ह्या कवितेच्या relevance चा प्रश्न आला म्हणून हि कविता ब्लोगवर ठेवली नाही. पण २६/०७/२०१४ रोजी घरी रात्री जेवताना TV पाहत होतो आणि TV वर जे पहिले त्यावरून हे जाणवले कि फारसे बदलले नाही. सर्व news channels पुन्हा पुन्हा बैतुल - मध्यप्रदेश येथल्या नदीत आलेल्या पुरामध्ये बुडालेल्या रस्त्यावरून जाण्याचा प्रयत्न करणारा मोटरसायकल चालवणारा तरुण कसा वाहून गेला त्याची चित्रफित दाखवीत होत्या आणि जाणवले कि फार काही बदलेले नाही. त्यानंतर लगेच हि कविता ब्लोगवर ठेवावी असे मनात आले पण व्यस्तते मुळे शक्य झाले नाही. मला आजही वाटते कि अश्या रक्तरंजित वा दुर्दैवी घटना दाखवल्या जाऊ नयेत वा वृत्तपत्रात छापल्या जाऊ नयेत.   

कविता कशाला नांव ठेवायची आपल्या पूर्वजांना – (दिनांक – २१/०७/२०१४)


कशाला नांव ठेवायची आपल्या पूर्वजांना

दोष्याना दिलेली जाहीर फाशी,

गुलामांची रक्तरंजित द्वंद,

हत्तींची साठमारी,

विरंगुळा म्हणून पाहणारया   |


कशाला नांव ठेवायची आपल्या पूर्वजांना

आपणही वाचतो सकाळी सचित्र वृत्त चविष्टपणे

निर्घृण हत्यांची,

बलात्कारांची,

अमानवीय व्यवहारांची,

वाफाळलेल्या चहाच्या घोटासमवेत

आणि लागतो दिनक्रमाला 

काहीच घडले नसल्याप्रमाणे     |


कशाला नांव ठेवायची आपल्या पूर्वजांना

संध्याकाळी थकल्याभागल्या

मनांना, वृतीना, विरंगुळा म्हणून

टेलीविझन दाखवत असतोच जिवंत चित्रे

इथियोपियात/मेळघाटात भुकेन मरणाऱ्यांची

अमेरिकेत शाळेतील अंदाधुंद गोळीबारात मेलेल्या तान्हुल्यांची

भारतात अन्न विषबाधाने मेलेल्या कोवळ्यांची

गेलेल्यांसाठी आक्रंदणारया लोकांची, आयांची

आपणही सैलावतो जिवंत चित्रांसोबत सुंदर संध्याकाळसाठी |


एखाद्या भाग्यशाली दिवशी

पहायला मिळते जिवंत प्रक्षेपण निवेदनाने रंगलेले

बोरवेल मध्ये पडलेल्या लहानाल्याला

वाचवण्याच्या अयशस्वी प्रयत्नांचे, मृत्यूचे

अतिरेक्यांनी केलेल्या लोकांच्या शिरच्छेदाचे

पाहतो हे सारे आपणही

कधी दारूच्या घोटाबरोबर

कधी मुलाबाळासमवेत जेवणाबरोबर

आपणा कोणाचीही

पापणीही फडकत नाही

घासही अडकत नाही

कशाला नांव ठेवायची आपल्या पूर्वजांना |

कशाला नांव ठेवायची आपल्या पूर्वजांना  ||


(originally composed around 1994 revised thoroughly on 21st July 2014)

Monday 14 July 2014

‘गुरूला अनुसरता एक दिवस, कोणाचे तरी गुरु व्हावे’ - कविता – तुमच्यासारखा गुरु कसे व्हायचे ?

दिनांक १२/०७/२०१४ (१४/०७/२०१४)

गुरूला अनुसरता एक दिवस, कोणाचे तरी गुरू व्हावे’


आज गुरूपौर्णिमा, अगदी लहानपणी शाळेमध्ये पण हा दिवस साजरा होत नसे आजही नसेल होत फारसा, कारण ह्या दिवसाचा संदर्भ आध्यात्मिक/धार्मिकच अधिक होता. पूर्वी ह्या दिवशी वर्तमानपत्रात गुरू महात्म्यावर एखादा लेख, एखाद्या गुरूतुल्य व्यक्तीवर लेख, एखाद्या मोठ्या प्रसिद्ध व्यक्तीचा त्यांच्या गुरूविषयक लेख आणि ‘बाबा’ संप्रदायातल्या भक्तांसाठी आयोजित कार्यक्रमाच्या नोंदी असावयाच्या. रेडीओवर नेहमीची गुरूविषयक ठरलेली गाणी (आता ‘गुरू’वरची नवी गाणीच बनत नाहीत), दूरदर्शनवर एखाद-दुसरी मुलाखत, शिष्यांनी म्हटलेल्या गाण्यांचा कार्यक्रम इत्यादी.

मात्र गेल्या तीन–चार वर्षात social media चे (facebook, twitter, blog, whats app, hangouts) पेव फुटल्यापासून एकदमच सारे बदलून गेले आहे. एक क्रांती घडली आहे individual expressionच्या किंवा व्यक्तीने व्यक्त होण्याच्या बाबतीत. पूर्वी मनात असूनही स्वतःच्या भावना, विचार, अनुभव लिहून लोकांपर्यंत पोचवणे शक्य नव्हते कारण संवादाची साधने मर्यादित होती. आपण लिहिले, व्यक्त (express)  केले तरी ते वर्तमानपत्रे, रेडीओ, दूरदर्शन इत्यादी ते लोकांना प्रसारित करतील ह्याची खात्री सर्वसामान्याला नव्हती आणि सगळ्यांचे लिखाण आणि इतर प्रकारचे एक्स्प्रेशन लोकांपर्यंत घेऊन जाण्याची क्षमता प्रसार माध्यमांचीही नव्हती.

ह्या नव्या साधनांनी सर्वसामान्याला व्यक्त होण्यासाठी एक सहजसाध्य मंच दिला आहे आणि किती सुंदर प्रकारे लोक व्यक्त होऊ लागली आहेत या माध्यमांद्वारे. अर्थात या सोबत मोठ्या प्रमाणात इतर अनेक दोष पण लोक ज्या प्रमाणे व्यक्त होतात त्यात आले आहेत, त्यातला एक म्हणजे कुठल्याही घटनेचा, सणाचा एक “hype” होणे आणि मग जो जो म्हणून या साऱ्या सोशल मिडियावर आहे तो तो मग त्या सणाच्या दिवशी लिहू लागतो, अनेक प्रकारची पोस्टर्स, चित्रे, संदेशकार्ड तयार केले जातात आणि एकदा ती या महाजालात ठेवली कि सर्व दूर पसरत जातात. हे सारे व्यक्त होणे खुपसे सुमार असले तरी मुळात मला असा हा व्यक्त होण्यासाठीचा सहजसाध्य मंच/पर्याय आणि त्यामुळे झालेली revolution of expression and democratisation of expression  हे सारे मनापासून पटते, आवडते आणि त्यातूनच मलाही लिहिण्याची प्रेरणा मिळाली आहे, मिळते आहे. आजचे हे लिखाण या व्यक्त होण्याच्या क्रांतीमुळे.

मला अनेक गुरू लाभले, आजही लाभत आहेत आणि नव्या गुरूंना स्वीकारायलाही खूप आवडते पण आहे. माझ्या अनेक  गुरुंपैकी चार जण माझ्यासाठी सर्वकालीन दीपस्तंभासारखे आहेत. पहिल्या माझ्या सासूबाई मालती मुळे, दुसरे ज्यांच्या हाताखाली मी डॉक्टरेट केली ते प्राध्यापक नांदेडकर सर, तिसरे ज्यांच्या कडून मी नाट्यशास्त्र शिकलो ते प्राध्यापक यशवंत केळकर सर आणि चवथे गुरू  सौंदर्यशास्त्राचे प्राध्यापक, शिल्पकार दीपक कन्नल ज्याला आम्ही भैया म्हणतो. ह्यातले दोन गुरू माझ्या सासूबाई आणि केळकर सर आज या जगात नाहीत पण आजही मला ते मार्गदर्शन करत आहेत.

गेली ३० वर्षे त्यांना गुरूस्थानी मानूनही मी त्यांच्याविषयी कधी नाही लिहिले, गुरूपौर्णिमेला त्यांच्याशी संवाद साधणे वा अनेकदा न साधणे एवढेच केले. त्यांच्याकडून शिकता शिकता प्रेरणा घेता घेता मी केंव्हा इतरांचा गुरू होऊ लागलो ते कळलेच नाही. जेंव्हा इतरांनी मला गुरूस्थान द्यायला सुरवात केली तेंव्हा मला माझे गुरू आणखी समजून येऊ लागले. आपण कोणाचे गुरू होणे हा स्वतःला अत्यंत समृद्ध करणारा, उन्नत करणारा, नम्र करणारा आनंददायी अनुभव असतो असे मला वाटते. आपल्याला गुरू असणे आणि आपण गुरू होणे हे आपल्याला आई असणे आणि आपण आई होण्यासारखे आहे. आज गुरूपौर्णिमाच्या दिवशी अनेकांनी छान विचार लिहिले आहेत, मला स्वानुभवाने सांगावेसे वाटते आयुष्यात जमले तर कोणाचातरी खरा गुरू व्हावे. लहानपणीची शाळेत शिकलेल्या विंदांच्या एक प्रसिद्ध कवितेच्या ओळी होत्या -
 
‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे,
घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे’,

ह्या ओळींच्या धर्तीवर विंदांची माफी मागत म्हणावेसे वाटते

‘गुरूने ज्ञान देत जावे, शिष्याने घेत जावे,
गुरूला अनुसरता एक दिवस, कोणाचे तरी गुरू व्हावे |  

आजच्या या दिवशी माझ्या मनातला विचार – ‘गुरूला अनुसरता एक दिवस, कोणाचे तरी गुरू व्हावे’

माझ्या गुरुंविषयी लिहावयाचे आहे सविस्तर पण ते पुढल्या लेखात. आज माझे गुरू प्राध्यापक नांदेडकर यांच्याविषयी आज गुरूपौर्णिमाला (ह्या नव्या व्यक्त होण्याच्या क्रांतीतून प्रेरणा घेऊन) केलेल्या कवितेने जी इतर गुरूनाही लागू पडते तिने हा लेख थांबवतो -


कविता – तुमच्यासारखा गुरू कसे व्हायचे
    

पूर्ण पटते आहे, शिक्षक झाल्यावर
गमतीदार पण सत्य असे तुमचे म्हणणे
‘शिक्षक हा फक्त एक तासाने
ज्ञानी असतो विद्यार्थ्यापेक्षा ||


हे नाही कळले मात्र अजूनही
आयुष्यभर शिष्याला दीपस्तंभ होऊन
मार्गदर्शन देणारा, पुढे नेणारा
तुमच्यासारखा गुरू कसे व्हायचे ||


उरलेले हे एकच आता शिकवा
कसे रहायचे तुमच्यासारखे
शिष्याच्या आयुष्याला
अवकाशासारखे भरून 
तरीही ध्येयक्षितीजरुपी
मार्गदर्शक गुरू होऊन   ||


(composed during 4.30 to 5.0 pm on 12/07/2014 at residence baroda)

Saturday 12 July 2014

कविता - बिंब - प्रतिबिंब

दिनांक – १२/०७/२०१४ 
कविता – बिंब – प्रतिबिंब

आपल्या मनाच्या, अंतरंगाच्या अंतस्थ कोषात जाणे
म्हणजे विविध अंशकोनात मांडलेल्या आरश्यांच्या महालात जाणे  ||

चहुकडील आरश्यात आपली अगणित प्रतिबिंबे
वेगवेगळ्या कोनातून, अगणित एकमेकांना पाहणारी असंख्य प्रतिबिंबे 
नव्हे आपल्यालाच चहुबाजूनी एकाच वेळी पाहणारे असंख्य आपण
वा एकमेकांना पाहणाऱ्या अगणित प्रतीबिम्बाना पाहणारे आपण     ||

बिंबाला, बिंबाच्या प्रतिबिंबाना पाहणारी प्रतिबिंबे         
स्वतःला, स्वतःच्या प्रतिबिंबाना पाहणारी प्रतिबिंबे 
प्रतिबिंबे पाहणारे बिंब वा बिंब होणारी प्रतिबिंबे
कोण बिंब? कोण प्रतिबिंब? कोणाची प्रतिबिंबे?   ||

विचार-बुद्धी सारे संमोहित, भ्रमिष्ट होण्याआधी
स्वतःची ओळख विसरून कोषात कैद होण्याआधी  
जीवाच्या आकांताने पळून यायचे कोशातून
वा टाकायचे क्षणात साऱ्या आरश्यांना फोडून      ||

आता अवतीभवती आरश्यांच्या तुकड्यांत प्रतिबिंबे विखुरलेली
मध्यभागी ढिगावारी माझी बिम्बे छिन्नविछिन्नलेली
ओळख पुसणाऱ्या, अस्तित्वाला गिळणाऱ्या आरश्यांना

फोडले बिम्बाने, प्रतिबिम्बाने की स्वतःला स्वतःने    ||

(year 1998 poem revised thoroughly today during 9 to 11 am. at Baroda Residence)

Monday 7 July 2014

कविता – माझ्यातले हिमलर, हिटलर इत्यादी

कविता माझ्यातले हिमलर, हिटलर इत्यादी - दिनांक ०३/०७/२०१४


उडत्या पाखराला गोळी घालण्यासारखे  

उडत्या मच्छराला हातानी मारण्याचे

कसब साध्य झालंय मला ||


मच्छरनाशक, मच्छरदाणी वापरतच नाही हल्ली मी

बंद करून खोली हाताने फटाफट मारू लागतो मच्छर मी 

अर्जुनाला दिसत असे पक्षाच्या डोळा एकच  

मलाही दिसत असते मच्छर फक्त एकच ||


मच्छराच्या मुठीत चिरडून फुटण्याने

हाताला जाणवणाऱ्या ओलसर किळसवाण्या स्पर्शाने

वेडपिस, क्रौर्यमस्त व्हायला होत मनाने

एक, दोन, तीन ....मच्छर चिरडत जातो हाताने

वाढते हाव त्यांना मारण्याची क्रमाक्रमाने ||


निसटलाच एखादा मच्छर हातातला  

तर जीवाच्या आकांताने सैरभैर पाळणाऱ्या मच्छरला

पिसाटासारखा मागे लागून शेवटी ठेचतोच त्याला ||
 

आताशा मला माझ्यातलेच

हिमलर, हिटलर, इदी अमीन उमजू लागले आहेत,

माझ्या रोमारोमात रुजू लागले आहेत ||



(Revised on 3rd July 2014 10.0 to 11.30 pm at Vimannagar, Pune) 

कविता – हो आत्ममुक्त

कविता हो आत्ममुक्त - दिनांक ०२/०७/२०१४


लवकरच लादले जाऊ लागेल
ओझे अपेक्षांचे तुझ्या इवल्याश्या खांद्यांवर
खांदे बळकट होतील, पुढे जाता मोडतील
ओझे मात्र कायमच राहील

दिला जाईल देव आणि सैतान तुला
सीमित करणारा तुझ्या बुद्धीला, कल्पनेला
आपसूक तू शिकशील
भेदाभेद मानवामानवातील

आम्हीच गिरवून घेऊ
धुळाक्षरे अनीतीची असत्याची
तुझ्याच हातून चिणून घेऊ
तटबंदी तुझ्या भोवती साचेबंद ज्ञानाची

जेत्यांच्या इतिहासातून घ्यायचा अहंगंड
की मानवी क्रौयातून न्यूनगंड
जीवनाच्या संगतीमधून बसवायचा बागुलबुवा देवाचा
की असंगतीमधून बसवायचा बागुलबुवा दैवाचा
हे ठरवावे लागेल तुझे तुलाच
जरी सर्वांनी आपापला सल्ला दिलाच   ||

उमजलीच हि तुझी जडणघडण कधी
होईल आत्यंतिक तगमग मनाची आधी
एकवटून आदिम स्फुलिंग आत्म्याचा
चेतव वन्ही विद्रोहाचा
कर उद्वस्त तटबंदी, शृंखला साऱ्या
अन हो आत्मप्रज्ञ, आत्ममुक्त ||

(original composed on -------------------- revised throughly on 2nd July 2014 11-0 to 12.0 pm)