Saturday 3 October 2015

लादलेला एकांत, मुकेपण

ब्लॉग – दिनांक ०२/१०/२०१५ - लादलेला एकांत, मुकेपण

जीसेभी देखिये वो अपने आपमें गुम है   |
जुंबा मिली है मगर हमजुंबा नही मिलता   ||

स्वतः मध्ये गुंग असणारे, कोणाशी संवाद न करणारे लोक दिवसागणिक वाढत आहेत असे सतत जाणवत रहाते मला; अशा लोकांची संख्या वाढते आहे त्याहूनही महत्वाचे म्हणजे नको असला तरीही एकांत, मुकेपण, असंवाद लादला जातो आहे माझ्यावर, माझ्यासारख्या अनेकांवर ही भावना दृढ होत चालली आहे मनात. एकांताची, मौनाची कितीही महती असली, ती पटलेली असली, आचरली असली तरी रोज कमी जास्त प्रमाणात अनुभवावा लागणारा हा लादलेला एकांत – मुकेपण नकोसा वाटतो, मनात अनेक विचार निर्माण करतो.......

या भावना स्वगत म्हणून स्वतःशी व्यक्त करण्याचे मनात गेले अनेक दिवस येऊनही जमले नाही शेवटी मुंबई – टोरेंन्टो ह्या दीर्घ प्रवासाने त्यासाठी पुरेसे वातावरण उभे केले आणि हे लिखाण घडण्यासाठी आवश्यक तो धक्का दिला.

ऋत्विक कडून २९ सप्टेंबरला रात्री १०.३० ला निघालो आणि २५ तासांनंतर टोरेंन्टो – कॅनडा येथे ३० सप्टेंबर दुपारी १.३० ला श्रीपादला भेटलो तोपर्यंत बोललेल्या ८ ते १० please, thanks, sorry आणि escuse me या तत्सम शब्दांपलीकडे कोणाशीही कसलाही संवाद नाही, बोलणे नाही, नुसता लादलेला एकांत, मुकेपण – झोपून, सिनेमे पाहून, खिडकी बाहेर पाहून नाहीतर नुसतेच डोळे मिटून नको त्या विचारांच्या आवर्तनात वेळ संपवलेला. नको असला, टाळला तरी स्पर्श होत राहणाऱ्या शेजारच्या प्रवाशाशी पण कसलाही संवाद नाही. त्याचा आणि इतरांचा अटळ स्पर्श होत असतो पण त्यातही संवाद नसतो.....

कुणाला वाटेल विमान प्रवासात असे घडत असेल, आंतरराष्ट्रीय प्रवासात असे घडणे स्वाभाविकच.... पण तसे नाहीये भारतातील अगदी तासाहून कमी वेळेच्या विमान प्रवासात, रेल्वे प्रवासात, अगदी हल्ली केलेल्या मुंबई – पुणे – मुंबई या बस प्रवासातही, वा विमान, रेल्वे, बस स्थानकांवर; अनेकदा घडणार्‍या रिक्षा – taxi प्रवासातही सोबतच्या प्रवाशाशी कसलाच संवाद घडत नाही.

हल्ली कुठल्याही प्रवासात आधीच्या तुलनेत सारे कसे शांत शांत असते, जीवघेणे शांत असते. नाही म्हणायला कोण्या लहान मुलाने, (म्हणजे ज्याला ह्या नव्या रिती भाती समजावता येणे शक्य नाही अश्या वयाच्या मुलाने) अनाहूत संवाद साधला तर तात्पुरता प्रतिसाद समोरच्या व्यक्तीकडून येतो, पण त्या मुलाच्या पालकांना आपल्या मुलाच्या वागण्याची लाज वाटून त्याला त्या संवादातून काढले जात. त्याहून वयाने थोडी मोठी असलेली, समज आलेली मुले तर या नव्या एकटेपणाच्या, मौनाच्या संस्कृतीत घडलेली, घडणारी, अनोळखी व्यक्तीशी संवाद न करण्याचे शिकवलेली मुले तेंव्हा त्यांच्याशी संवाद तर अशक्यच. लहान मुले रडलीच तरच आवाज होतो प्रवासात आणि त्याचीही पालकांना लाज वाटते, वैताग होतो आणि पूर्वी सारखे कोणी दुसऱ्या प्रवाशाने त्या मुलाला गप्प करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रश्नच नाही उलट अनेकांना तर त्याच्या रडण्याचा त्रास होतो आहे तेही स्पष्ट जाणवते, जाणवून दिले जाते. नाही म्हणायला अजून भारतातल्या आणि परदेशातल्या प्रवासात जर ट्रिपला निघालेल्या भारतीय प्रवाश्यांचा आणि त्यातही गुजराथी आणि मराठी प्रवाश्यांचा समूह असेल तर मात्र भरपूर आवाज होत असतो किंबहुना आम्ही ट्रिपचा आनंद कसा मोकळेपणाने पूर्णपणाने साजरा करतो आहे हे इतरांना दाखविण्यासाठी वाजवी पेक्षा जास्त आवाज आणि दंगा केलेला असतो. प्रवासात कोणी कोणाशी बोलतच नाही त्यामुळे नव्या ओळखी होत नाही, ओळख वगैरे जाऊ द्या औट घटकेच्या साध्या निरर्थक गप्पाही होत नाहीत  –

पल दो पलका साथ हमारा, पल दो पालके याराने है,
इस मंझील पर मिलने वाले उस मंझील खो जाने है .......
किंवा यथा काष्ठंच काष्ठ

हे माहीत असूनही प्रवासाच्या वेळेत काही क्षणासाठी एकमेकांशी गुंतणे, आमच्या कडे जरूर या, पुन्हा जरूर भेटू असा भावुक निरोप घेणे आता घडत नाही. पु. ल. देशपांडे आणि त्यांच्या समकालीन लेखकांनी लिहिलेल्या कथा, कादंबऱ्यातून;  कलाकारांनी केलेल्या सिनेमातून, सुरवातीच्या दूरदर्शन मालिकांतून दिसणारे, मिळेल त्या माध्यमातून एक-दुसर्‍याशी संवाद करणारे समाजजीवन आणि माझ्या आणि माझ्या आधीच्या पिढ्यांनी अनुभवलेले, जगलेले जीवन आता राहिलेले नाही.   
नुसता प्रवासातच संवाद घडत नाही असे नाही, तर मॉल मध्ये गेल्यावर साऱ्या वस्तू मांडून ठेवलेल्या असतात, पाट्या असतात, नेहमीचे – कायमचे असे माणूस नसते,  हवी ती वस्तू घ्यायची बाहेर पडायचे. तेच हॉटेल्स मध्ये बुफे असेल तर हवे ते घ्यायचे आणि एकटे असाल तर एका कोपर्‍यात गप्प जेवायचे, अगदी जेवणाची ऑर्डर दिले तरी मोजकेच संवाद बोलायचे. शेजाऱ्यांपैकी क्वचित कोणाशी जुजबी बोलणे होते, सकाळी – रात्री चालायला गेलो तरी संवाद नाही कारण चालायला जाणारे पण एकटेच कानात इअरफोन घातलेले; बँकेत, पोष्टात आणि इतर अनेक ठिकाणी इंटरनेट मुळे जाण्याची गरजच उरलेली नाही त्यामुळे संवादाचा प्रश्नच नाही.

इतरांसारखे कानात इअरफोन घालून वा सतत पुस्तक वाचून असला हा सक्तीचा एकांत – मौन सुसह्य करावे म्हटले तर ते जमत नाही. संगीत ऐकायला आवडते, पुस्तक वाचायला आवडते पण का कोणास ठाऊक पण आजूबाजूचे जग त्यातले आवाज, घडामोडी, माणसे त्यांचे वागणे हे सारे सोडून संगीतात बुडवून घेणे वा पुस्तकात डोके खुपसून बसणे अजून तरी जमलेले नाही

दुसरी व्यक्ति संवाद करत नाही तर आपण पुढाकार घेऊन करावा म्हटले तर जाणवते की ती दुसरी व्यक्ति ‘अपने आपमें गुम है’ आणि आपण बोललो त्याच्याशी तरी तो ‘ हमजुंबा ‘ नसणार आहे, संवाद घडणार नाहीये. गरजेपेक्षा अधिक बोललेले पण चालत नाही हल्ली बहुतेकांना आणि त्यांचेही बरोबर आहे, जग किती वेगवान झाले आहे. ते तर परके असतात अगदी आपल्या ओळखीच्या लोकांकडे पण अनाहूत (भेट नक्की न करता) जाऊन अनौपचारिक गप्पा, बोलणेही अशक्य ...... प्रश्न हा आहे की कधी ठरवून का संवाद होतो, गप्पा होतात?

खरे तर स्वतःहून घेतलेला थोड्या काळाचा एकांत वा मौन किती चांगला अनुभव देते पण अशा या लादलेल्या एकांताने, मौनाने आत्मिक उन्नती वा शांती मिळत नाही उलट अशा या एकांतात, मौनात मनात अनावश्यक विचारांची आवर्तने चालत राहतात, थांबवता येत नाहीत. काही काळाच्या ध्यानात ती थांबवता येतात पण सतत चालणाऱ्या अशा या एकांतात मला तरी ते शक्य होत नाही पण हा एकांत संपवू कसा, हे मौन टाळू कसे........

‘स्वगत’ लिहिणे, म्हणजे स्वतःशी बोलणे (तेही होत नाही हल्ली) हा एक मार्ग दिसतो ह्यातून..... म्हणून आजचे हे ‘स्वगत’ .........