Tuesday 31 March 2015

शोध अज्ञाताचा, साधण्या संवाद अज्ञाताशी .....५ - तुझं माझ्याशी संभाषण

दिनांक – ३१/०३/२०१५ - शोध अज्ञाताचा, साधण्या संवाद अज्ञाताशी .....५  

सर्वच तथाकथित साधू, संत, बाबा, महाराज इत्यादिंचा एक महत्त्वाचा दावा असतो देवाशी संभाषणाचा, देव त्यांच्याशी बोलतो याचा. अनेकांचा ह्यावर विश्वास बसतो आणि अशा बाबांना, संताना देवत्व मिळते. देव असे प्रत्यक्ष संभाषण करीत नाही हे ज्यांना वाटते त्यांनी देवाशी बोलण्याचा दावा करणाऱ्या बाबांवर विश्वास नाही ठेवला तरी वैयक्तिक स्तरावर सर्वच आस्तिक देवाशी संवाद / संभाषण साधण्याचा प्रयत्न करतातच.
देवाची प्रार्थना हे आपले संभाषणाच असते त्याच्याशी पण नेहमीच एकतर्फी, समोरून काहीच उत्तर नाही म्हणून मग आपण त्याचे उत्तर, त्याने दिलेला संदेश शोधतो संकेतांमध्ये, शकुनांमध्ये, घडणार्‍या घटनांमध्ये. त्यातून जेंव्हा तुम्ही एकटे असता आणि त्या अज्ञाताचा/देवाचा शोधच घ्यायच्या प्रयत्नात असता तेंव्हा संभाषणाचा एकतर्फीपण प्रकर्षाने जाणवतोच. ही कविता एकच कडव्याच्या स्वरुपात तेंव्हा लिहून ठेवली होती, नीट जमली नव्हती ती शेवटी २५ मार्चला लखनौ मधल्या एकांतात पूर्ण झाली .......

 कविता – तुझं माझ्याशी संभाषण ( मूळ लेखन ११/०६/१९९६ पुनर्लेखन २५/०३/२०१५)

(मूळ लेखन ११/०६/१९९६ tss ऑफिस washington USA, दुपारी ४.२० ते ४.३०; पुनर्लेखन २५/०३/२०१५ लखनौ संध्याकाळी)

तुझ्या बरोबर एकांतातले सहजीवन म्हणजे
एकट्याने पेशन्सचा डाव मांडणे
पत्ते पुनःपुन्हा पिसायचे, लावायचे
कधी पत्ते लागतात, अनेकदा नाही         |
लागलेल्या, न लागलेल्या पत्यातून
निर्मिणाऱ्या केलीडोस्कोपिक रचना
हेच तुझं माझ्याशी संभाषण
कधी उमजणारे, अनेकदा नाही            |१|

(पुढील दोन कडव्यांचे लेखन २६/०३/२०१६ सकाळी ७.१५ ते ९.० लखनौ – हॉटेल लेवाना )

तुझ्या बरोबर एकांतातले सहजीवन म्हणजे
एकट्याने न संपणारे शब्दकोडे सोडवणे
शब्द पुनःपुन्हा पारखायचे, जुळवायचे
कधी शब्द जुळतात, अनेकदा नाही        |
जुळलेल्या न जुळलेल्या शब्दातून
सृजलेल्या अशब्द, शब्दातित नेणीवा
हेच तुझं माझ्याशी संभाषण
कधी उमजणारे, अनेकदा नाही            |२|

तुझ्या बरोबर एकांतातले सहजीवन म्हणजे
एकट्याने गतआयुष्याची चित्रफित बनविणे, पाहणे
आठवणी पुनःपुन्हा जगणे, संगती लावणे
कधी घटनांची संगती लागते, अनेकदा नाही        |
आठवलेल्या, न आठवलेल्या भूतकाळातून
लागलेल्या सरलेल्या आयुष्याचा अर्थ-अनर्थ
हेच तुझं माझ्याशी संभाषण

कधी उमजणारे, अनेकदा नाही            |३|

शोध अज्ञाताचा, साधण्या संवाद अज्ञाताशी .....४ - आयुष्याचे कोडे

दिनांक - ३१/०३/२०१५ - शोध अज्ञाताचा, साधण्या संवाद अज्ञाताशी .....४ 

कोडी सोडवायला आवडो अथवा न आवडो, आयुष्याचे/जीवनाचे  न सुटणारे कोडे आपल्या पैकी प्रत्येकाला अथवा बहुतेकांना पडतेच. सुटणार नाही हे ठाऊक असूनही जेंव्हा आपण आपल्याशी एकांतात असतो तेंव्हा कळत-नकळत आपले मन, आपली बुद्धी ते सोडवायचा प्रयत्न करते. काही हे कोडे सोडविण्याच्या नादातून, व्यसनातून प्रयत्नपूर्वक सुटका करून घेऊ शकतात पण बहुतेक अधूनमधून वा नेमाने ते सोडविण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक वा अजाणता करीत राहतात.
मे ते जुलाई १९९६ ह्या दोन महिन्याच्या अमेरिका यात्रेत मी सगळ्यांमध्ये असूनही एकटेपणा पहिल्यांदा अनुभवला, एकांत अनुभवला आणि तो पर्यंत जीवनाच्या एका टप्प्यापर्यंत पोचलो होतो त्यामुळे सरलेल्या आयुष्याचा, केलेल्या कमाईचा, ते जगता जगता निर्माण झालेल्या कोड्याचा आढावा घेणे आपोआप / अटळपणे झाले. या आढाव्या सोबत “शोध अज्ञाताचा” हा track ही चालूच होता – या दोन्हींच्या संदर्भातली ही कविता ........

कविता – आयुष्याचे कोडे (मूळ लेखन – ०४/०६/१९९६; पुनर्लेखन २४/०३/२०१५)

(मूळ लेखन – ०४/०६/१९९६ Hotel Carlyle Suits, Washington, USA 00.00 to 0.25 am; पुनर्लेखन २४/०३/२०१५ हॉटेल लेवाना – लखनौ दुपारी ३.३० ते ५.३० )

ह्या एकटेपणात, एकांतात
बसलो आहे सोडवावयास आयुष्याचे कोडे          ||

बालमासिकातील चित्रकोड्यांतील
उंदराला पोचावयाचे असते बीळापर्यंत
भुकेल्या सशाला गाजरापर्यंत
हरवलेल्या कोकराला आईपर्यंत
मी पोहोचू पाहिले साऱ्यांपर्यंत
चूक तिथेच झाली बहुतेक
गुंतागुंत तिथेच झाली कदाचित
नको त्या मार्गावरून भरकटलो
दिशाभान हरपलो, आकांतलो
ओढल्या नको त्या दोऱ्या
हातानी कापऱ्या, अधिऱ्या
निरगांठी बसल्या अनेक
न सुटणारा झालाय गुंता
न सुटणाऱ्या कोड्यात आता
मी गुरफटून गळफांस लागलेला                 ||
चित्रकोड्यातल्या त्या साऱ्यांना
कोणीतरी दुसरा पोहोचवतो तरी मुक्कामी
इथे दुसरा निव्वळ सर्वसाक्षी, निष्क्रिय
मला स्वतःलाच सोडवावे लागणार
माझ्या आयुष्याचे कोडे                  ||

ह्या एकटेपणात, एकांतात

बसलो आहे सोडवावयास आयुष्याचे कोडे          ||

Sunday 22 March 2015

शोध अज्ञाताचा, साधण्या संवाद अज्ञाताशी .....३ - कविता – ये अज्ञाता ये

दिनांक – २२/०३/२०१५ – शोध अज्ञाताचा, साधण्या संवाद अज्ञाताशी .....३  


अगदी प्राचीन काळ सोडला तर काही पिढ्यांपूर्वी  देवाला न मानणे, नाकारणे हे अत्यंत अवघड होते. आपल्या इथे धार्मिक सहिष्णुता होती म्हणजे जो पर्यंत माणूस सश्रद्ध आहे तो पर्यंत त्याने अमुक एक देवच वा उपासना पद्धत मानली पाहिजे अशी सक्ती नव्हती पण त्या व्यक्तीने त्याच्या जातीचे, समूहाचे नीति नियम पाळणे आणि दुसर्‍यांच्या बाबतीत ढवळाढवळ न करणे हे त्याला इतरांकडून/समाजाकडून सहिष्णु वागणूक मिळण्यासाठी जरुरी होते. आता आपल्या येथे देवाला न मानणे अथवा धर्मपरिवर्तन करून दुसऱ्या देवाला मानणे शक्य झाले आहे पण देवाला मानणे किंवा त्याला न मानणे, देवावर श्रद्धा असणे वा नसणे म्हणजे आस्तिक वा नास्तिक असणे, हे ठरविण्या विषयीचा माझा किंवा आपल्या आणि पुढल्या पिढीतल्या अनेक लोकांचा मुख्य प्रश्न म्हणजे काहीच समजत - उमजत नसताना मिळालेली  देव / धर्म ही संकल्पना / संस्था. आपल्याला मुख्यत्वे पुढील तीन –चार स्वरुपात देव ही संकल्पना मिळते – १. देवाची भक्ती केली तर तो आपल्या इच्छा पुऱ्या करतो, संकटे दूर करतो, आपण चुका केल्या तर नियती अथवा यम दंड देतो पण देव हा माउली आहे, प्रेमळ आहे त्याला शरण गेल्यास तो आपल्या चुका पोटात घेतो आणि आपल्याला चुकांच्या शासनातून, दंडातून वाचवतो किंवा २. या उलट देव रागावतो, कोपतो, शासन देतो त्याला प्रसन्न ठेवण्यासाठी, करण्यासाठी हे करावयास हवे, ते करावयास हवे अथवा ३. देव कर्ता-करविता आहे, सारे काही त्याच्या इच्छेने होते  इत्यादि.

आज कायद्याने आणि इतर बाबातीमुळे शक्य असले तरी सज्ञान झाल्यावर देवाला आपल्याला उमजलेल्या / पटलेल्या स्वरुपात स्वीकारणे वा त्याला काही / पूर्ण अंशी नाकारणे हे फार मोठे दिव्य होऊन बसते कारण लहानपणी झालेले देवाचे संस्कार (childhood conditioning). हे  जितके खोल तितके ते पुसून काढून (process of unlearning) देव नाकारणे अवघड होते. त्याला नाकारता नाकारता स्वीकारत रहाणे, त्याच्या विषयी विसंवादी, विरोधाभासी भूमिका उघडपणे घेण्यापेक्षाही / इतरांना ती जाणवण्यापेक्षाही स्वतःला स्वतःच्या अंतर्मनात, आचरणात ती जाणवणे आणि ह्या त्रिशंकू म्हणा, दुटप्पी म्हणा, गोंधळलेल्या अवस्थेविषयी काय करावे ते न सुचणे, ठरविता येणे हे सारे देवाविषयीच्या माझ्या कवितांमध्ये दिसते असे मला वाटते.

माणसाला तो सज्ञान होईपर्यंत जर देव / धर्म इत्यादि काही न देता त्याला फक्त समता, बंधुता, मानवतेची  नैतिक मुल्ये देण्यात आली आणि सज्ञान झाल्यावर तो  देव / धर्म ही संकल्पना घेऊ अथवा नाकारू शकला तर किती बरे होईल.........

 कविता – ये अज्ञाता ये (मूळ लेखन ३०/०५/१९९६; पुनर्लेखन २१/०३/२०१५)

(मूळ लेखन ३०/०५/१९९६, Washington, USA दिवसभरात, पुनर्लेखन २१/०३/२०१५ बडोदे घरी सकाळी)

जाणता अजाणता केलेल्या चुका
होऊन रक्तपिपासू जळवा मन:शांति शोषतात
काढल्या तर व्रण त्यांचा राहतो भळभळत         ||

छोट्या-मोठ्या, गंभीर-नगण्य चुका
वाढतात कॅन्सर सारख्या मनाच्या आत  
कापूनही मनाला पुनःपुन्हा मूळं अक्षयचं राहतात    ||

होऊन सावल्या भेडसावणाऱ्या साऱ्या चुका
पळवितात मला रक्त ओकेपर्यंत
पळता दूर, लांबच लांब विक्राळ होतात      ||

तुझ्याकडे क्षमेसाठी यायचे तर तक्षक तर्काचा
होरपळतो विषारी फूत्कारांनी
गठाळून टाकते अनामिक भीती दंडाची            ||

मी हा असा शोषित, क्षत वीक्षित, दिवाभीत  
येऊ पाहतोय तुझ्या अलौकिक प्रकाशात
घेण्या शासन, उभं रहायचे आहे मला
घेऊन पायाखाली चुकांच्या सावलीला
ये अज्ञाता ये
होऊन शासन माझ्या चुकांचे
कर काहीही माझे
अखेरीस मात्र घे जवळ

आईसारखा                ||


Friday 20 March 2015

शोध अज्ञाताचा, साधण्या संवाद अज्ञाताशी .....२ - कविता – तू सापडलास

दिनांक - २०/०३/२०१५

 कविता – तू सापडलास (मूळ लेखन ११/०६/१९९६; पुनर्लेखन १४/०३/२०१५)

(मूळ कविता–दिनांक ११/०६/१९९६ दुपारी ४.३० ते ५.३० TSS Office,washington; पुनर्लेखन १४/०३/२०१५ सकाळी घरी )

कळता तू असतोस चराचरात
शोधावयास घेणारच होतो तुला
अवतीभवतीच्या माणसामाणसात
तर तू दाखविल्यास वाकुल्या
एकांताच्या सीमेवरून मला         ||

एकट्याने तुला भेटण्याचा मोह पडला
तूही निष्ठेने फशी पाडून आणलेस मला
एकांताच्या वाळवंटात मृगजळ होऊन  
अन नाहीसा झालास मला एकटा करून     ||

येऊ लागले मग, तुझे फसवे संदेश चहु दिशांतून
क्षितिजापलीकडील सोडून आलेल्या मानवी वस्त्यांतून
अर्थच नव्हता तुझ्या फसव्या लपाछपीच्या खेळात
सामील होऊन तुझ्या मागे फटफटण्यात          ||

निराशेने, रागाने गाडण्या स्वतःला स्वत:त 
खोदत गेलो चर खोल डोहासारखा
अचानक तू सापडलास अंतरात 

बक्कळ गोड पाण्याच्या झऱ्यासारखा             ||

Wednesday 18 March 2015

शोध अज्ञाताचा, साधण्या संवाद अज्ञाताशी .....१

ब्लॉग दिनांक – १८/०३/२०१५ – शोध अज्ञाताचा, साधण्या संवाद अज्ञाताशी .....१ 


अमेरिका प्रवासाच्या आधी कवितांद्वारा जो अज्ञात आहे त्याच्या विषयी विचार, संवाद सुरू झाला होता पण अमेरिकेतली दोन महिन्याच्या एकटेपणात, एकांतात हा संवाद वाढला आणि त्या काळात सर्वात अधिक कविता ह्या सूत्राला धरून झाल्या. मी एकाच वेळी आस्तिकही आणि नास्तिकही होतो. कॉलेज शिक्षण आणि त्यानंतरच्या काळात विविध वाचनाने मी वैचारिक पातळीवर/स्तरावर नास्तिक झालो होतो पण मुलांची किंवा स्व‍कीयांची आजारपणे किंवा कुठल्याही प्रकारची संकटे आप्त स्व‍कीयांवर आली की मात्र देवाचा धावा करणारा म्हणजे आचाराच्या पातळीवर आस्तिकच होतो. स्वतःमधला हा विरोधाभास, मतलबीपणा खटकत होता. आस्तिकता आणि नास्तीकते मधील त्रिशंकू अवस्था मनात अनेक प्रश्न उभे करू लागली होती, अर्थात आजही नास्तिकता वाढली असली तरी आस्तिकता पूर्ण गेलेली नाही आणि आजही तीच त्रिशंकू अवस्था, मनात तोच गोंधळ, तोच विरोधाभास आहे म्हणून आजही अज्ञाताला जाणण्याच्या कविता लिहितो आहे मी. देवाला/अज्ञाताला भजण्या / पामण्या साठीच्या वा त्याला नाकारण्या / दुस्वासण्या साठीच्या ह्या कविता नाहीत. ह्या कविता म्हणजे माझा मी घेत असलेला स्वतःचा आणि अज्ञाताचा शोध आहे तो अजून अधूरा आहे. ‘शोध अज्ञाताचा, साधण्या संवाद अज्ञाताशी’, ह्या मालिकेतील  अमेरिकेत पोचल्या नंतर तिथल्या एकांतवासात, एकटेपणात झालेली पहिली कविता सादर ....

  कविता – वाटलं नव्हत कधी अशी संधी मिळेल (मूळ कविता १८/०५/१९९६, पुनर्लेखन १८/०३/२०१५)

(मूळ कविता १८/०५/१९९६ Portland, USA दुपारी २.४५ ते ३.३०; पुनर्लेखन १८/०३/२०१५ विमाननगर पुणे दुपारी)

वाटलं नव्हत कधी अशी संधी मिळेल
नसलेल्या की असलेल्या
नसूनही असलेल्या वा असूनही नसलेल्या
तुझ्याबरोबर एकांतात असण्याची
एकमेकात एकमेकांना पाहण्याची             ||

एकांतात स्वत:शीच असणे
म्हणजेच तुझ्याबरोबर असणे
तुझ्याजवळ आल्यावर मी बोलत राहतो स्वतःशीच
असंबद्धपणे अनेक गोष्टींविषयी
तापाने भ्रमिष्ट झाल्यासारखा;
तू काहीच बोलत नाहीस
बोलणारही नाहीस
जाणवून देशील क्वचित तुझं अस्तित्व
धुक्यातल्या दंवाच्या ओलाव्यासारखे
विसंगतीत जाणवलेल्या संगती सारखे            ||

तू अमिती आरसा
तुझ्याबरोबर असणे म्हणजे
आरशारूपी तुझ्यात पडलेल्या प्रतिबिंबाशी
आत्मघाती द्वंद्व
तू हस्तक्षेप करीत नाहीस
करणारही नाहीस
हे द्वंद्व निरंतर चालणारे
तू मला तुझ्यात सामावेपर्यंत  
वा मी तुझ्याकडे पाठ फिरवेपर्यंत               ||

तुझ्यापासून दूर जाणे शक्य नसते
स्वतःपासून दूर जाणेही शक्य नसते
कितीही टाळले तरी खेळावेच लागते
हे आत्मघाती द्वंद्व
तुझ्यातल्या माझ्या प्रतिबिंबाशी             ||

वाटलं नव्हतं कधी अशी संधी मिळेल
तुझ्याबरोबर एकांतात असण्याची 

स्वतःशी अंतिम द्वंद्व खेळण्याची           ||

जाता क्षितीजापलीकडील दूर देशीच्या अज्ञात आकाशी, दाटली ओढ घरट्याची

ब्लॉग – दिनांक – १८/०३/२०१५ जाता क्षितीजापलीकडील दूर देशीच्या अज्ञात आकाशी दाटली ओढ घरट्याची 

आज ब्लॉग वर काव्य-त्रयी (तीन कविता) ठेवीत आहे. ग्रीक नाट्य साहित्यात नाट्य-त्रयी (play-triology) लिहिल्या गेल्या. एकाच अनुभूतिला व्यक्त करू पाहणाऱ्या थोड्या थोड्या कालांतराने अनुभूतिचे क्रमिक टप्पे मांडण्यासाठी लिहिल्या गेलेल्या ह्या तीन कविता आहेत म्हणून त्यांना काव्य-त्रयी म्हणतो आहे.

एप्रिल १९९६ साली अमेरिकेतली नगरपालिकांमधील आर्थिक प्रबंधन ह्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी दोन महिने अमेरिकेला जाण्याची संधी चालून आली. त्या काळी एका महानगरपालिकेत काम करणाऱ्या अधिकार्‍यासाठी ती फार मोठी संधी होती आणि एक प्रकारे मोठी achievement होती. त्यामुळे माझ्या मनाला पंख फुटले होते आणि त्यांना  क्षितिजापलीकडील अज्ञात आकाशात उडण्याचे वेध लागले पण जाण्याचा दिवस जस जसा जवळ येत गेला तस तसे माझे दुसरे मन घर सोडून, मुलांना सोडून जाण्याच्या कल्पनेने व्याकूळ होऊ लागले, नको जाऊया असे विचार मनात बळावू लागले आणि मग दोन मनांमध्ये द्वंद्व सुरू झाले.

त्या काळी मी माझ्या कारकि‍र्दीच्या ज्या टप्प्यावर होतो त्या संदर्भात होऊ घातलेला अमेरिकेचा अभ्यास दौरा अत्युच्य शिखर / पायरी होते. ह्या बिंदू पर्यंत मी आयुष्यात प्रगती करण्यासाठी, मोठा होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात मानणारा आणि प्रयत्न करणारा होतो. आयुष्य, कारकीर्द निग्रहाने, योग्य प्रयत्नांनी घडवता येते, जमेल त्याने तसे ते घडवले पाहिजे आणि नशिबाने तो पर्यंत मी स्वतःला घडविण्यात, प्रगतीच्या, यशाच्या पायऱ्या चढण्यात सुदैवाने/नशिबाने यशस्वी ठरलो होतो. पण मनाचे विचित्रच असते, अमेरिकेला जाण्याचे ठरले आणि ह्या प्रवासाच्या आधी आणि ह्या प्रवासात स्वत:शी असण्यासाठी मिळालेल्या एकांतात कारकि‍र्दी विषयी, अधिकाधिक मोठे होण्या विषयीच्या माझ्या वृतीविषयी, विचार – मतांविषयी विरुद्ध विचार मनात निर्माण झाले आणि त्या मंथनातून माझे विचार/तत्त्वे पुढल्या काळात पूर्णपणे बदलली.

ह्या आणि पुढल्या अनेक ब्लॉग मध्ये १९९६ च्या अमेरिकेतली दोन महिन्यांच्या एका वेगळ्या प्रकारच्या एकांतवासातील कविता ठेवण्याचा विचार आहे .......   ह्या तीन कवितांमधील पहिली कविता प्रवासाला जाण्यापूर्वी एक आठवडा बाकी असताना लिहिली होती तर दुसरी तिथे पोचल्यावर एक आठवड्याने आणि तिसरी अमेरिका सोडण्याला एक – दोन आठवडे बाकी असताना लिहिली होती 


१ कविता – ओढ क्षितिजापलीकडील अज्ञात आकाशाची

(मूळ कविता दिनांक ३०/०४/१९९६, Tom Chapman’s house – Delhi रात्री १०.० ते १०.३०; पुनर्लेखन १५/०३/२०१५ बडोदे घरी सकाळी)

क्षितिजापलीकडील दूर देशीच्या वाऱ्याने
फितविले मनःपंखांना
पिसापिसात सळसळते आहे
स्वप्न अज्ञात आकाशाला कवेत घेण्याचे         
घरट्याच्या काडी काडीत गुंफलेला मी
बेगुमानलेल्या ह्या पंखांपुढे निःसहाय मी          ||

नेहमीच्या आकाशात त्याच त्याच भराऱ्या मारून
कंटाळलेल्या पंखांचे बंड समजते आहे मला
पण आकाशाखाली वाऱ्यावर सोडू कसे घरट्याला
मनःपंखाना ओढ उंचचउंच जाण्याची
जीवाला आस घरटे जपण्याची
घरटे आणि पंखांमधला असा त्रिशंकू मी           ||

त्या परक्या आकाशातल्या एकाकीपणी कदाचित
पंखाना उमजेल साथ तुमच्या पंखांची
पिसांमधून फिरणाऱ्या तुमच्या चोचींच्या प्रेमाची
घरट्यातील विसाव्याची, उबेची
घेऊन येतील पंखच मला परत
झालो जरी स्वैर, बेगुमान, बेईमान मी            ||

२ कविता – दूर देशीच्या आकाशी

(मूळ कविता १२/०५/१९९६ जीनीनचे घर – डोवर संध्याकाळी ६.३० तो ७.००; पुनर्लेखन १५/०३/२०१५ सकाळी बडोदे )

क्षितिजापलीकडील ह्या आकाशाच्या लालुचीने
मनःपंखांना फितविणाऱ्या वाऱ्याने
पाळलेय इमान अज्ञाताचे पड उलगडण्याचे
नवोन्मेश चेतविण्याचे  
त्यांच्या जुगलबंदीने विकसतोय, मुक्त होतोय मी   
घरट्याच्या चिंतेने, विरहाने व्याकुळतोय मी                     ||

बेभान झालेल्या पंखांना
एकटेपण उडण्यातले जाणवतच नाहीये जराही
इथले सारेच पक्षी एकटे दुकटे उडणारे
हरवून जायला थवाच नाहीये कुठेही
कुतुहलाने माझ्याकडे वळणाऱ्यांशी
संवाद – संबंध वाढतच नाहीये कसलाही           ||

मावळतीला कुठल्यातरी अनोळखी दारा
       एकटे सोडून निघून जातो वारा
झोपेत शोधतात पंख ऊब नेहमीच्या पंखांची 
       विसरून हकिकत त्यांच्या नसण्याची
झोपतात वेडूले बंडखोर पंख मग मा‍झ्याच कुशीत
जागाच राहतो मी, घरटे नाही येथे घेण्या मला कुशीत      ||

३ कविता – उमजता ऊब घरट्याची

(मूळ कविता २४/०६/१९९६ Stamford Station and in the train, दुपारी ३.४० ते ४.० पुनर्लेखन १६/०३/२०१५, नागपूर येथे दुपार ते संध्याकाळ)

जेवढे उडावे तेवढे क्षितिजाचे विस्तरतच जाणे
आकाश अधिकाधिक परके होत जाणे
हाती कधीच न लागणे
प्रत्येक क्षणी अज्ञाताला जाणू पहाणे
जणू मृगजळामागे लागणे,
काहीच न जाणणे, सारे ज्ञात विसरणे            ||

उशिरा उशिरा का होईना
उमजला बंडखोर पंखांना
फोलपणा परक्या आकाशात उडण्याचा
क्षितिजाला ओलांडू पाहण्याचा 
सर्व अज्ञाताला जाणण्याच्या अट्टाहासाचा         
उंचच उंच जाऊ पाहण्याचा ||

आवळून घट्ट क्षितिजाला
करावे का घरट्याएवढे त्याला ?
चटकन हो म्हणाले मनःपंख
त्यानाही हवे आहे आता
ओळखीचे आपलेसे आकाश

अन घरट्याची ऊब                          ||