Friday, 12 June 2020

अस्तित्वात नसणाऱ्या देवा / चराचरात असणाऱ्या देवा

दिनांक - १२ /०६/२०२०

कोरोनाने जगभर जे थैमान घातले आणि त्यामुळे जगात होणारे मृत्यू आणि जगात - भारतात जो लॉकडाऊन जाहीर करण्यात आला त्यात धर्मस्थळे पण बंद करण्यात आली. आधुनिक काळात किमान तुम्हा-आम्हांच्या जीवनात पहिल्यांदाच राजसत्तेने धर्मस्थळे बंद केली.  ह्या सर्व पार्श्वभूमीवर एप्रिल २०२० च्या अंती सुचलेली कविता.


कविता – अस्तित्वात नसणाऱ्या देवा 

ह्या कोरोना महामारीत
ओस पडली आहेत
तुझी पूजा स्थळे, प्रार्थना स्थळे
कारण – अकारण तुझ्या स्थळी धावणाऱ्या
तुझ्यासाठी एकत्र जमणाऱ्या तुझ्या भक्तांना
थांबवले आहे, रोकले आहे
तुझा अन त्यांचा मतलबी उपयोग करणाऱ्या
राज्यसत्तेने
अस्तित्वात नसणाऱ्या देवा तुला
काय फरक पडणार आहे म्हणा ..................

संकटात तुझ्या पायी यायचे तर
तुझ्या स्थळी येण्यापासून
थांबवले आहे भक्तांना
तुझ्याच स्वघोषित दलालांनी
तथाकथित साधू, संत, महात्मे, गुरु पुजाऱ्यांनी
साऱ्या धर्मधुरंधरांनी धर्मसत्तेने
भक्त जगले तरच तुझे अन त्यांचे अस्तित्व
असा विचार करून;
अर्थात अस्तित्वात नसणाऱ्या तुला
काय फरक पडणार आहे म्हणा ..................

जगलेल्या, वाचलेल्या भक्तांना
देतील तुझे स्वघोषित प्रेषित ग्वाही
तुझ्या त्यांच्या वरच्या प्रेमाची
भक्तांचे ह्या महामारीतून वाचणे
ठरेल तुझ्या अस्तित्वाची, दायाळूपणाची प्रचीती
पुन्हा उतू जाऊ लागतील तुझी पूजास्थळे, प्रार्थनास्थळे
अर्थात अस्तित्वात नसणाऱ्या तुला
काय फरक पडणार आहे म्हणा ..................

ह्या महामारीत लाखो मेले, लाखो मरतील
तुझ्या नसण्याचे सत्य सोबत घेऊन
लाखोंचा विश्वास उडेल तुझ्यावरचा
त्यांची स्वप्नेच नव्हे, आयुष्ये उध्वस्त होऊन
पण संभाव्यतेच्या नियमाने घडतील
अशक्य असे चमत्कार, योगायोग
टिकून राहील त्याने तुझे अस्तित्व
प्रत्यक्षात नसूनही
कोणाचेही काहीही न करूनही
अर्थात अस्तित्वात नसणाऱ्या तुला
काय फरक पडणार आहे म्हणा ..................

तुला मी मानले – न मानले काय
असे हे सारे लिहिले - न लिहिले काय
कोणी ते वाचले – न वाचले काय
काहींनी – साऱ्यांनी तुला स्वीकारले – नाकारले काय
अस्तित्वात नसणाऱ्या तुला
काय फरक पडणार आहे म्हणा ..................


ज्यांचा देवाच्या अस्तित्वावर विश्वास आहे त्यांना ही कविता कदाचित आवडणार नाही पण 'अस्तित्वात नसणाऱ्या तुला' ह्या शब्दांच्या ऐवजी 'चराचरात असणाऱ्या देवा तुला' हे शब्द घेऊन किंवा देवाचे इतर गुणविशेष घेऊन जरी ही कविता खालील प्रमाणे बदलून लिहिली तरी कवितेतील विचारांचा गाभा - त्यांची यथार्थता बदलणार नाही असे मला वाटते ......

कविता - चराचरात असणाऱ्या देवा 


ह्या कोरोना महामारीत
ओस पडली आहेत
तुझी पूजा स्थळे, प्रार्थना स्थळे
कारण – अकारण तुझ्या स्थळी धावणाऱ्या
तुझ्यासाठी एकत्र जमणाऱ्या तुझ्या भक्तांना
थांबवले आहे, रोकले आहे
तुझा अन त्यांचा मतलबी उपयोग करणाऱ्या राज्यसत्तेने
चराचरात असणाऱ्या देवा
तुझे कार्य तू करणारच म्हणा ..................

संकटात तुझ्या पायी यायचे तर
तुझ्या स्थळी येण्यापासून
थांबवले आहे भक्तांना
तुझ्याच स्वघोषित दलालांनी
तथाकथित साधू, संत, महात्मे, गुरु पुजाऱ्यांनी
साऱ्या धर्मधुरंधरांनी धर्मसत्तेने
भक्त जगले तरच तुझे अन त्यांचे अस्तित्व
असा विचार करून;
अर्थात सर्वांचे योगक्षेम पाहणाऱ्या देवा
तुझे कार्य तू करणारच म्हणा ..................

जगलेल्या, वाचलेल्या भक्तांना
देतील तुझे स्वघोषित प्रेषित ग्वाही
तुझ्या त्यांच्या वरच्या प्रेमाची
भक्तांचे ह्या महामारीतून वाचणे
ठरेल तुझ्या अस्तित्वाची, दायाळूपणाची प्रचीती
पुन्हा उतू जाऊ लागतील तुझी पूजास्थळे, प्रार्थनास्थळे
सर्वज्ञ, परम कृपाळू देवा तुला
काय फरक पडणार आहे म्हणा ..................

ह्या महामारीत लाखो मेले, लाखो मरतील
तुझ्या नसण्याचे सत्य सोबत घेऊन
लाखोंचा विश्वास उडेल तुझ्यावरचा
त्यांची स्वप्नेच नव्हे, आयुष्ये उध्वस्त होऊन
पण संभाव्यतेच्या नियमाने घडतील
अशक्य असे चमत्कार, योगायोग
लाखो वाचतील, नवे जीवन पामतील
टिकून राहील लाखोंचा विश्वास तुझ्यावरचा
प्रत्यक्षात असूनही - नसूनही
कोणाचेही करूनही - न करूनही
अर्थात निरपेक्ष अशा तुला
काय फरक पडणार आहे म्हणा ..................

भक्त मंदिरी आले – न आले काय
तुझ्यापाशी आले – न आले काय
तुला भजिले काय – न भजीले काय
तुला दान दिले – न दिले काय
सर्वज्ञ, परम कृपाळू देवा तुला
चराचरात असणाऱ्या तुला
काय फरक पडणार आहे म्हणा ...........  

तुला मी मानले – न मानले काय
असे हे सारे लिहिले - न लिहिले काय
कोणी ते वाचले – न वाचले काय
काहींनी – साऱ्यांनी तुला स्वीकारले – नाकारले काय
चराचरात असणाऱ्या तुला
काय फरक पडणार आहे म्हणा ..................

Friday, 8 May 2020

स्थलांतरितांचे स्थलांतर


दिनांक - ०७/०५/२०२० -   स्थलांतरितांचे स्थलांतर

कोरोना महामारीने जगातील अनेक गोष्टी बदलायला घेतल्या आहेत, ही महामारी जितकी दीर्घकाळ चालेल तेवढा ती कायमी परिणाम मानवी जीवनाच्या सर्व - समाजिक, आर्थिक, राजकीय, मानसिक करणार आहे. अनेक गोष्टी घडत आहेत त्यातलीच एक म्हणजे हंगामी स्थलांतरितांचा प्रश्न, त्यांची सध्या होत असलेली  सर्व प्रकारची  परवड .....

हंगामी स्थलांतरित म्हणजे जे वर्षामध्ये १ ते १० महिने शहरात येतात आणि बाकीचा वेळ ते त्यांच्या छोट्या शहरातील वा गावातील घरी घालवतात वा तेथील उपजीविकेसाठी परत जातात. सध्याचे जे कायदे आहेत, समाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी ज्या योजना आहेत त्यांच्या सध्याच्या प्रारूपा मध्ये हंगामी स्थलांतरितांचा समावेश होत नाहीत,  त्यांना लाभ मिळत नाहीत. उदाहरण म्हणजे शहरात आलेल्या  हंगामी स्थलांतरिताला रेशनवर अन्न मिळत नाही, आरोग्य, शिक्षण सेवेचा, माफक दराच्या कर्जाचा आणि इतर सुविधांचा लाभ मिळत नाही. त्यांची नोकरी पण हंगामी स्वरुपाची असल्याने कायमी स्वरूपाच्या कामगारांना कायद्या अन्वये  जे लाभ मिळतात हे ही ह्यांना मिळत नाहीत.



शहरातील कायमी गरीब रहिवासी संगठीत पणे अधून मधून आवाज उठवतात, त्यांना  मतदानाचा हक्क  असल्याने त्यांच्या कडे नेत्यांचे, प्रशासकांचे, समाजिक संगठनांचे लक्ष जाते पण हे हंगामी स्थलांतरित अनेक ठिकाणाहून आलेले असल्याने संगठीत नसतात, फक्त चार पैसे कमवून घरी नेण्यासाठी आलेले असल्याने त्यांच्या फार अपेक्षा नसतात,   शहरात त्यांना मतदानाचा हक्क नसल्यामुळे राजकारणी लोकांसाठी पण हे महत्वाचे नसतात आणि तुम्हा आम्हा सर्व सामन्यांचा ह्यांच्याशी फारसा संबंध नसल्याने आपल्यासाठी पण ते महत्वाचे नसतात अशा प्रकारे हे लोक शहरांमध्ये होते तरी ते अदृश होते सर्वांसाठी, दुर्लक्षित होते सर्वांकडून !!!

सगळ्या शहरांमध्ये एकूण किती आहेत हंगामी स्थलांतरित हे कोणाला कोणाला माहित नाही - अंदाजित आकडा दीड कोटी च्या घरात अत्ता जाणवतो आहे - कदाचित ह्याहून अधिक ही निघेल.


त्यांचे शोषण, त्यांच्या विषयीचे दुर्लक्ष, त्यांचे अदृश्यपण -  हे सारे  असेच चालत राहिले असते अनंतकाळ, पण कोरोना महामारी  आणि लॉकडाउन  आले साऱ्या शहरांमध्ये - देशात आणि ते पण त्यांच्या नेहमीच्या परत जाण्याच्या वेळेस. लॉकडाउन आले आणि काय झाले वा अजूनही होते आहे ते आपण सर्वाना माहित आहे - नोकऱ्या गेल्या - उत्पन्न थांबले, राहण्याच्या जागा सोडाव्या लागल्या आणि दुसरा कुठली मदत नाही, सरकार कडून,  नेत्यांकडून, शहरीवासियांकडून कधी कसलीही मदत मिळालेली नसल्याने आणि मिळेल असा विश्वास नसल्याने या हंगामी स्थलांतरितांनी आपल्या मूळ निवासी परत जाण्याची धडपड सुरु केली आणि ते दृश्य झाले सर्वांसाठी.


सरकार किंवा शहरी समाजावर इतका अविश्वास ह्यांच्या मनात होता - आहे की सरकार परत जाण्याची काहीच सोय देत नाही हे पाहिल्यावर ह्यांच्या पैकी अनेकांनी हजारो मैलाचा प्रवास सुरु केला आणि त्यामुळे ते आणखी दृश्य झाले, प्रसार माध्यमांचा आवडीचा विषय झाले अर्थातच मग ते आपल्या दिवाणखाण्यातील चर्चेचा विषय झाले आहेत.   ह्या साऱ्या पार्श्वभूमीवर झालेली ही कविता ....... इतके कष्ट सोसून घरी परत निघालेल्या स्थलांतरितांना अर्पण ......





आरामात घरात बसून टीव्ही पाहताना
शहरांना सोडून
आपल्या घराकडे शेकडो कोस उन्हातानातून
कच्या-बच्याना, म्हाताऱ्या कोताऱ्याना घेऊन
डोक्यावर भंगलेल्या स्वप्नांची, अपेक्षांची गाठोडी घेऊन
निघालेल्या स्थलांतरितांना
वेडे म्हणू नका, दोष देऊ नका, थांबवू नका .......


तुमच्या पूजनीय नेत्यांनी, सरकारांनी
त्यांच्यासाठी खूप केले हा अंधविश्वास ठेऊ नका
महामारीचा फैलाव वाढवतील ह्या भीतीने
त्यांना कैदेत टाकण्याची मागणी करू नका
सरकारचा आदेश मोडला म्हणून 
सध्याच्या रीतीभातीने देशद्रोही ठरवू नका.......


अगतिकतेने, भ्रमनिरासतेने पण मुक्त इच्छेने
पाठ फिरवली आहे, 
इतके दिवस शहरात अदृश्यपणे 
दुर्लक्षित – शोषित आयुष्य जगणाऱ्यानी
ह्या संवेदनहीन, रोगिष्ट शहरांकडे,
शोषण करणाऱ्या मालकांकडे,
निष्क्रिय सरकारकडे, आपणा सर्वांकडे
जाऊ द्या त्यांना, मुक्त होऊ द्या त्यांना........   


तुम्हाला जमलेच तर एवढे करा
ह्या सरकारला जागे करा, सुज्ञ करा, माणुसकी शिकवा .......



ह्याच कवितेचा गुजराथी अनुवाद पण केला आहे, तो पण दिला आहे 



કવિતા - સ્થળાંતરિતોનું સ્થળાંતર


આરામથી ઘરમાં બેસીને
ટીવ્હી પર જોઇને
શહરોને છોડીને
સેંકડો માઈલના પ્રવાસે પોતાના ઘરને
બળબળતા તાપમાં, કચ્ચ્યા – બચ્ચાઓને, ડોસા-ડોસીને
માથે ભાંગેલા – તૂટેલા શમણાઓ – અપેક્ષાઓના બાચકા લઈને
નીકળેલા સ્થળાંતરીતોને
પાગલ ના માનશો, દોષી ના માનશો, ના રોકશો એમને ......

તમારા પૂજનીય નેતાઓએ, સરકારોએ
            ઘણું બધું કર્યું છે આ લોકોમાટે એવો અંધવિશ્વાસ ના રાખશો
આમાંના ઘરે જવાથી મહામારી વધુ ફેલાશે એવા ડરથી
એમણે જેલમાં નાખવાની માંગણી ના કરશો
સરકારની વિરુધ્ધ વર્ત્યા તેથી તેઓને
હાલની નવી રીતભાતથી દેશદ્રોહી ના ઠેરવશો........

અગતીકતાથી, ભ્રમનિરાશાથી પણ મુક્ત ઈચ્છાથી
હવે પીઠ ફેરવી છે અત્યાર સુધી
અદૃશ્યરીતે દુર્લાક્ષિત – શોષિત જીવન જીવનારા લોકોએ 
આ સંવેદનહીન, અસમાંવેશક, બીમાર શહેરો તરફ
શોષણ કરતા માલિકો તરફ
નિષ્ક્રિય સરકાર તરફ, આપણા બધા તરફ
જવાદો હવે તેમને, મુક્ત થવા દો તેમને
તમારાથી થાય તો એટલુજ કરજો
આ સરકારને જગાડો, સુજ્ઞ કરો, માનવીય કરો ......


Thursday, 10 May 2018

कविता – लगेच ये रे



गळाभेट होता तुझी कुणाशीही
अटळ त्याचे विलीन होणे तुझ्याशी
टाळतो आहेस कदाचित म्हणूनही  
अशी गळाभेट तू माझ्याशी 

अविरत सरकता हा पट्टा काळाचा
न चालूनही एकमेकांकडे घडविणार भेट अपुली
अविचार का तुझा निरुपायाने भेटण्याचा
असता अटळ भेट अपुली

लगेच ये रे भेटायाला
तयार मी तुझ्यात विलीन होण्याला


(दिनांक – ९ – १०/०५/२०१८, निर्माण भवन – दिल्ली)




Tuesday, 5 September 2017

गर्दीत मी

दिनांक ०५/०९/२०१७

गर्दीत मी ...

कधी वाटले नव्हते मी गर्दीचा भाग घेईन, गर्दीची अनुभूति घेईन. आयुष्याची ५६ वर्षे मुंबईकर अथवा इतर मोठ्या शहरातले लोक गर्दी रोज नेमाने जशी जगतात तशी मी कधी अनुभवलीच नाही.  लहानपणी वा कॉलेजमध्ये जाताना बडोद्यात गर्दीच नव्हती, नंतर बडोद्यात २० वर्ष नोकरी केली पण कधीच गर्दीतून जावे लागले नाही, नंतरच्या १५ वर्षे कन्सलटन्सी करताना दैनंदिन आयुष्यातील गर्दीचा अनुभव येण्याचा प्रश्नच नव्हता.  क्वचित मुंबईला गेल्यावर लोकल च्या गर्दीतून प्रवास केला तेवढाच गर्दीचा अनुभव अथवा क्वचित उत्सवात आलेला गर्दीचा एखादा दुसरा अनुभव .....

एका नव्या कामाच्या निमित्ताने जुलै पासून दिल्लीत आलो आणि रोज सकाळ – संध्याकाळी नोकरीला जाण्याच्या निमित्ताने मेट्रोच्या आणि रस्त्यावरच्या गर्दीतून प्रवास सुरु झाला. अर्थात मुंबईच्या लोकलच्या गर्दी समोर दिल्लीच्या मेट्रोची गर्दी काहीच नाही पण तरीही गर्दी म्हणावी अशी ही गर्दी नक्कीच आहे. दिल्लीची गर्दी मुंबईच्या गर्दी समोर कमी आहे पण तिचा अनेकविध रीतीने अनुभव घेता येईल इतपत मोकळी आहे, मुंबईची गर्दी एकच एक अनुभव मिळेल इतकी घट्ट आहे !!!

गर्दी म्हटली की आपल्या नजरे समोर खूप गोंगाटाचे, कोलाहलाचे, लोकांच्या बडबडीचे दृश्य उभे रहाते पण ते आता बरेच बदलले आहे. रस्त्यावर वाहनांचे आणि इतर अनेक गोष्टींचे कर्कश्य आवाज असतात पण माणसांच्या संवादांचे, बोलण्याचे नसतात. आताची गर्दी जवळ जवळ मुकीच झाली आहे, त्यातून दिल्लीच्या आणि इतर शहरातल्या मेट्रोची गर्दी तर नक्कीच जवळ जवळ मुकी झाली आहे. अनोळखी माणसांनी एकमेकांशी बोलणे घडतच नाही, अगदीच दोन नात्यातली माणसे अथवा मित्र प्रवास करत असले तर आणि त्याहून महत्वाचे ते आपसा आपसात काही बोलले तरच, नाहीतर माणसे मोबाइल मध्ये गढलेली, संगीत ऐकण्यात – पुस्तक वाचण्यात रमलेली, झोपलेली नाहीतर त्रयस्थपणे नुसतीच स्वत:मध्ये हरवून बसलेली वा आजूबाजूच्या लोकांकडे – घटनांकडे शून्यपणे पाहत असलेली. अशा ह्या माणसां सोबत, गर्दी  सोबत माझाही प्रवास मुकेपणाने होतो आहे. एकही शब्द न बोलता विमान प्रवास करण्याचा तर गाढ अनुभव होताच आता तो मेट्रोत, मेट्रो स्टेशनवर, रस्त्यावर असणाऱ्या गर्दीतही घेतो आहे.   
गर्दी मुकी असली, स्वत:मध्ये हरवलेली, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींविषयी त्रयस्थ असली, unconcerned असली तरीही त्या गर्दी कडे डोळसपणे पहिले की तिची अनेक रूपे / आकार / आयाम जाणवू लागतात. गर्दीतल्या माणसांचे अंतरंग कळू लागते, त्यांचे गर्दीत असणे कळू लागते, आपले गर्दीतले अस्तित्व, स्थान कळू लागते. अशाच साऱ्या अनुभूतितून आकाराला आलेली ही कविता .......

कविता - गर्दीत मी 

(दिनांक ३१/०८/२०१७, सर्वोदय एनक्लेव्ह – दिल्ली, रात्रो ९ ते १२ )

गर्दी विवक्षित ठिकाणी जाणारी - परतणारी
गर्दी इतस्तत: कुठेही कशीही जाणारी
गर्दी चहूकडून एकत्र येणारी, चहूकडे पांगणारी

गर्दी कुठेही न जाणारी, घुटमळणारी
गर्दी क्षणोक्षणी निरनिराळे आकार, रूपे घेणारी
गर्दी संवेदनहीन, विचारशून्य, हिंस्र करणारी 

गर्दी भेदभाव तात्पुरते संपवणारी
गर्दी बंधने घालणारी,  स्वातंत्र्य हिरावणारी,
गर्दी ओळख, व्यक्तित्व, अहंकार मिटविणारी 

गर्दीत माणसे काळाच्याही पुढे धावू पाहणारी
आशेच्या, उमेदीच्या जादुई चाकांनी पळणारी
 महत्वाकांक्षांच्या स्वप्नांच्या ईन्धणाने चालणारी

गर्दीत माणसे नेमाने यंत्रवत जाणारी येणारी
सरणाऱ्या फोल क्षणांच्या ओझ्याने वाकून चालणारी
एकटेपण घालवण्या सरावाने, निरुपायाने येणारी

गर्दीत माणसे एकच एक त्रयस्थपणा  असणारी   
मुकी, अबोल, स्वतःत - कोषात हरवू पाहणारी
स्वतः भोवतीच्या कोषांना, बंधनांना तोडू पाहणारी

गर्दीत अशा ह्या मी ना कशाच्या पुढे वा – मागे पळण्या
ना स्वप्ने, ना महत्वाकांक्षा, ना अपेक्षा असण्या
ना कोषात जाऊ पाहणारा, ना कोषाला तोडू पहाण्या

गर्दीत अशा ह्या मी ओळख, अस्तित्व, अहं संपविण्या
ना भविष्यात, ना भूतात तर वर्तमानात जगण्या 
फक्त साक्षी भावाने उरण्या, सर्वार्थाने मुक्त होण्या

Tuesday, 15 August 2017

बेरेहेम आसमा मेरी मंझील बता है कहा

दिनांक - १५ ऑगस्ट, २०१७

ह्या माहितीच्या महाजाळ्याने / समुद्राने आयुष्यच बदलून टाकले आहे - समुद्रात बुडी मारून मोती, रत्ने शोधावी तसे ह्यात शोधत जायचे आणि मग अनेक माहित असलेल्या पण अप्राप्य /असाध्य गोष्टी तर काही वेळेस माहित नसलेल्या गोष्टी अचानक गुप्त धन सापडावे त्याप्रमाणे ह्या माहिती जाळात मिळतात, असेच काहीसे मला आज सापडले .......

तलत महमूद हा माझा अतिशय आवडता गायक आणि त्याच्या अनेक आवडत्या गाण्यांपैकी खूप आवडणारे गाणे म्हणजे 'बेरेहेम आसमा, मेरी मंझील बता है कहा' ......

बेरेहेम आसमा... मेरी मंझील बता है कहां...

जो न सोचा था वो हो गया
क्यूं नसीबा मेरा सो गया...
गम की ऐसी घटा छा गयी
चैन दिल का कहीं खो गया
ये बता. किसलीये ले रहा है मेरा इम्तेहां
बेरेहेम आसमा...

बुझ गया है ये दिल इस तरह
चांद पिछले पेहेर जिस  तरह...
इतनी तारीकीयो में  ये बता
राह ढूंढे कोई किस तरह
खो गयी मंझिले हो गया गुम काही कारवां
बेरेहेम आसमा...

जा रहे है न जाने किधर
देख सकती नही कुछ नजर
छोड दी नांव मजधार में
किस किनारे लागे क्या खबर...
क्या करें दूर तक रोशनी का नहीं है निशां
बेरेहेम आसमा...


वर्षानुवर्षे हे गाणे ऐकत आलो, गाण्याची ही तीन कडवी तोंड पाठ केलेली पण गाणे नेहमीच थोडे अधुरे वाटायचे, 'मतला' - गझल ला पुरा करणारा शेर असतो तसे ह्या गाण्याला पूर्ण करणारे कडवे आले नाही असे नेहमी वाटायचे.

पूर्वीची अनेक गाणी रेडियो वर अथवा रेकॉर्ड वर अधुरी असतात हे माहित असूनही ह्या बाबतीत शोध कसा काय पण कधी घेतला नाही हे खरे. 'बहाना' नावाच्या १९६० सालच्या चित्रपटातले हे गाणे मदनमोहन यांचे संगीत आणि राजेंद्र क्रिष्ण यांचे शब्द एवढेच कॅसेट वरून माहित होते. अचानक काल हे गाणे यु ट्यूब वर शोधले आणि खजिनाच सापडला - गाण्याची पुढली तीन कडवी सापडली - शब्दांच्या रुपात आणि तलत च्या आवाजात - आणि इतके वर्ष अधुरे जाणवणारे गाणे पूर्ण कळले .....  'बेरेहेम आसमा' हे त्याने कोणाला उद्देशून म्हटले आहे हे कळले..... कळले कसले अंगावर आले, मन, बुद्धी, विचार सारे सारे काही हेलावून टाकले.   आधीच्या तीन कडव्यांसकट आता पुढची तीन कडवी वाचा म्हणजे तुम्हालाही उमजेल मी काय म्हणतो आहे ......

मुझसे किस्मत ने धोखा किया
हर कदम पर नया गम दिया
है खुशीकी कसम के यहां
चैन का सांस तक ना लिया...
बुझ गया, दिल मेरा, रास आया न तेरा जहां...
बेरेहेम आसमा...

तेरी दुनिया में यूं हम जियें
आसूओन्के समंदर पिये...
दिल में शिकवे तडपते रहे
होठ लेकीन हमेशा सीयें
कब तलक, हम रहें, तेरी दुनिया में यूं बेजुबां
बेरेहेम आसमा...

अब कोई भी तमन्ना नहीं
अब यहां हम को जीना नहीं
जिंदगी अब तेरे जाम से
एक कतरा भी पिना नहीं
मौत को भेज के खत्म कर दे मेरी दास्तां
बेरेहेम आसमा...

चौथे कडवे आधीच्या तीन कडव्याप्रमाणे गाणाऱ्याची (नायकाची) अवस्था मांडणारे पण शेवटच्या दोन कडव्यात त्याने 'बेरेहेम' अश्या त्या जगत नियंत्याला जो प्रश्न विचारला आहे, जे सुनावले (ऐकवले) आहे आणि शेवटी जे मागणे मागितले आहे ते म्हणजे वेदनेचा कळस आहे - गाण्यातल्या कल्पनेला / विचारला शिखर पूर्णता देणारे आहे. हे झाले शब्दांचे - ह्या शेवटच्या दोन कडव्यात लागलेला तलत चा आवाज आणि मदन मोहन यांची संगीत रचना शब्दांना नुसती न्याय देणारीच नाही तर घनता देणारी - जिवंत करणारी आहे.

तलत च्या मुलायम, मखमली, किंचित कापऱ्या पण त्यामुळेच अधिक भावपूर्ण आवाजाबद्दल, त्याच्या सहज गाण्याबद्दल अनेकांनी अनेक प्रकारे लिहिले आहे जे सारे खरे आहे मी अधिक काय लिहिणार. पण तलत ची अशी अनेक दर्दभरी गाणी ऐकताना मला असे जाणवले की ही गाणी आणि तलत चा आवाज हा रेझर ब्लेड / वस्तऱ्याच्या धारेसारखा आहे - ब्लेड ने जसे आधी जराही वेदना न होता बोट अथवा दाढी कापली जाते आणि भळाभळा रक्त सहजपणे वाहू लागते तसे तलत चे गाणे ऐकताना होते.....   मनावर चढवलेली कठीण आवरणे नकळत कापून त्याचा आवाज गाण्याचे शब्द, भाव गाभ्यात पोचवतो ..... मन भळाभळा वहायला स्वतःचीआधीची जखम असायला हवी असे नाही ......त्याचा आवाज वेदनेला शुद्ध, निरपेक्ष, अशरीर रुपात मनाच्या गाभ्यात पोचवतो आणि आपला कॅथार्सिस करतो .......

आणखी काय लिहू तुम्हीच अनुभूती घ्या त्याच्या आवाजाची आणि ह्या गाण्याची .......

https://youtu.be/zv5kb_Tp9QI