Sunday 8 June 2014

नोकरी सोडताना ५ - कविता – आत्माच बदलीन म्हणतो

नोकरी सोडताना ५  
बडोदे महानगर पालिकेतील नोकरी जरी २००२ साली सोडली तरी ती सोडण्याविषयीचा विचार १९९७ साली रुजला अर्थात नोकरी सोडणे झाले नाही आणि कोर्पोरेशन मध्येच २००२ ला नोकरी सोडे पर्यंत राहणे झाले त्याविषयी आधीच्या पोस्त मध्ये लिहिले होते. हि कविता पण तेंव्हाची पण त्या कालखंडातील सुरवातीची जेंव्हा कोर्पोरेशन सोडून जावेसे वाटू लागले होते व त्यासाठी प्रयत्न सुरु करावेसे वाटू लागले होते.. 
कविता – आत्माच बदलीन म्हणतो

माडीवरच्या खोलीसारखी माझीही कॅबिन

टेबलाच्या अलीकडे वाट पाहत बसलेला मी

दरवाजा उघडतो, तो येतो

टेबलाच्या पलीकडे बसतो, बोलू लागतो

त्याच्या शब्दातून बाहेर पडतो

मदोन्मत्त झालेला बलात्कारी पुरुष तो

अंगवस्त्रे शालीनतेची खसकन फेडून टाकतो

सभ्यतेला हिंस्त्रपणे ओरबाडतो, भोगतो ||

मग येतो दुसरा, बोलू लागतो

त्याच्या शब्दातून बाहेर पडतो

लाळ घोळणारा लिबलिबीत भ्रष्ट स्पर्शाचा पुरुष तो

सर्वांगावर एक किळसवाणा चिकटपणा पसरतो ||

मग येतो तिसरा, चवथा ......

घृणास्पद बलात्कार पुनःपुन्हा होत राहतो

अधूनमधून माझाही स्वतःवरचा ताबा सुटतो

आत आलेल्या दुर्बलांवर बलात्कार मी हि करतो ||

शिकलो शेवटी मी या बलात्कारी मरणप्राय वेदनांपासून

तैयार ठेवतो बुद्धी, मन, आत्मा रंग फासून

शरीर नग्न व्हावयास सोपे कपडे लेवून ||

माडीवरच्या खोलीसारखी माझी ही कॅबिन कधीतरी सोडीन म्हणतो

आत्म्याने शरीरवस्त्र बदलणे नव्हे हे, आत्माच बदलीन म्हणतो

आत्माच बदलीन म्हणतो |

(revised it on 7th June 0.30 to 1.30 am)

1 comment:

  1. सरकारी नोकरी करताना मन मारून टाकणे किती महत्वाचे हे यावरून समजते. ज्याला आत्मा आहे, मन आहे त्याला वाचूनच दरदरून घाम फुटेल.

    ReplyDelete