Saturday 22 March 2014

कविता - ठेव

ठेव 
(प्रसिद्धी ललित जून २००१)


चिऊ - काऊनच्या साक्षिन दिलेला घास 
'आला मंतर, कोला मंतर; बाळाचा बाऊ छूमंतर....'
म्हणून बरे केलेले तुझे बाऊ 
सार काही मागे पडलंय....

        चांदोमामाशी, त्याच्यावरल्या रथाशी 
        नात तूच तोडलंस .......
        हल्ली तू गोष्टी करीत असतोस 
        चंद्रावरल्या अपोलो स्वाऱ्यांच्या

बागुलबुवाच्या नावान घाबरण्यातली 
मजा केव्हाच संपली.
अजूनही तू रमतो आहेस थोडाफार 
परीकथांमध्ये, साहसकथामध्ये.
लवकरच तेही संपेल
तुही होशील आमच्यासारखा 
यंत्रवत, झापड लावून गरगर फिरणारा

       कधीतरी तुझ्याकडे येईल 
       तुझ हरवलेलं बाल्य नव्या रुपान 
       तेंव्हा चिऊ-काऊ-चांदोमामाशी राखून ईमान,
       हवाली कर त्याच्या आम्ही सोपवलेली 
       तुझ्या मनाच्या अंधारया कोपऱ्यातली
       पिढ्यानपिढ्यापासूनची ठेव.
       

1 comment:

  1. असा ठेवा सुपूर्त करण्याची कल्पनाच किती गोड!

    ReplyDelete