Saturday 29 March 2014

कविता - रस्त्याच्या कडेवरले

रस्त्याच्या कडेवरले

तिन्हीसांजेला कातरवेळी
शहराबाहेर जाणाऱ्या गर्द अंधाऱ्या रस्त्यावर
डोळे, मन, जाणीवा बधीर करणारा
मृत प्रखर पांढरा प्रकाश ओकणाऱ्या वाहनांची
अंगावर येणारी सतत, यंत्रवत वाहणारी रांग
अपरिहार्यपणे सोसत घरी परतणारा मी |

अचानक डोळ्याच्या डाव्या कोपऱ्यातून
जिवंत प्रकाशाची, लसलसणारी अनुभूती,
रस्त्याच्या कडेला गाडीचे आपसूक थांबणे,
माझ्या समोर थोड्या थोड्या अंतरावर
रक्तवर्ण सोनेरी जिवंत प्रकाश फाकणाऱ्या चुलींची रांग
चुलीनभोवती त्या अलौकिक रक्तिम प्रकाशाने
रसरशीत, राजसी दिसणार्यांची कोंडाळी
मध्यभागी कणकेच्या गोळ्यावर
सहज लास्य करणाऱ्या कणखर हातांच्या आदिमाया |

मृत गाडीच्या अंधाऱ्या कोठडीतून मी पहात राहतो
त्या रक्तिम दिव्य प्रकाशाने उलगडलेला
वृद्ध चेहऱ्यावरील सुरकुत्यांच्या जाळ्यातील मानवी जीजीविषेचा पट,
रापलेल्या चेहऱ्यांचा राकटपणा, कोवळ्या चेहऱ्यांची झळाळी;
चुलीवरच्या खापराचे उतरणे, साऱ्यांचे भव्य-दिव्य पणे लकाकणे
विझण्याआधी दिवा मोठा व्हावा तसे,
धगीवर पाण्याचा शिडकाव, धुराचा छोटासा लोळ,
साऱ्यांचे काळवंडून काळोखात विरून जाणे |

मी निघतो तेथून
उद्या सकाळी तुम्हा आंम्हा सर्वाना दिसतील
कोळपलेली, काळवंडलेली हि सारी चिपाड शरीरे
निर्जीवपणे-अज्ञातपणे वाहू लागताना माणसांच्या लोंढ्यात ||

No comments:

Post a Comment