Saturday 29 November 2014

‘दादा भीक घाला हो’ / ‘भीक दे गे माय’

दिनांक – २९/११/२०१४

‘दादा भीक घाला हो’ / ‘भीक दे गे माय’

आपणा सर्वांसमोर जागोजागी निरनिराळे भिकारी निरनिराळ्या प्रकारे भीक मागतात आणि बहुतेक आपण सारे त्या भीक मागण्याला वेगवेगळ्या प्रकारे react होतो. कोणी भीक मागीतली तर तिला कसे react व्हावे हे अजूनही मला समजलेले नाही. बहुधा मी भीक देत नाही कारण भीक दिल्याने पुण्य मिळेल आणि माझा पुढला जन्म चांगला होईल ह्यावर माझा सुतराम विश्वास नाही. तेंव्हा धार्मिक कारणाने मी भीक कधीही कोणाला देत नाही पण मानवतेच्या कारणाचे काय? तिथेच सारा गोंधळ आहे मानवतेच्या दृष्टीकोनातून अनेकदा मी भीक देतो, अनेकदा देत नाही पण त्यात सातत्य व स्पष्ट भूमिका नाही मज जवळ. जागोजागी भेटणाऱ्या खोट्या भिकार्‍यांचा राग येतो, कधी भिकारी निर्माण करणाऱ्या एकूणच आपल्या सामाजिक-आर्थिक व्यवस्थेचा राग येतो, कधी खऱ्या भिकार्‍यांबद्दल खूप कणव दाटून येते  तर कधी खूप असहाय्य वाटते, कधी स्वत:चा राग येतो, कधी स्वत:च्या सुदैवाबद्दल, समृद्धी विषयी अपराधीपणाची भावनाही मनात दाटते आणि शेवटी काही न करता मन मारून टाकून ह्या वास्तवाकडे पाठ फिरवणेही करतो. या प्रश्नाकडे कायमची पाठ फिरवणे जमत नाही कारण फार तर काही तासानंतर अथवा फार तर काही दिवसांनंतर भीक मागणारा हात माझ्यापुढे पसरला जातो आणि वास्तव समोर उभे ठाकते आणि पुन्हा सुरुवात विसंवादी प्रतिक्रियेची.  
खरे – खोटे भिकारी, त्यांचे खरे-खोटे भीक मागणे ह्या पलीकडे जाणवते ती सर्व स्तरांच्या लोकांमध्ये असलेली भीक मागण्याची वृत्ती, जी  स्वत:मध्येही आढळली आणि तेंव्हा पासून भीक देण्याच्या बाबतीत जरी पूर्णतः गोंधळलेला, विसंवादी असलो तरी स्वतः मधल्या भि‍केच्या वृत्तीचा  समूळ नायनाट करण्याचा जाणीवपूर्वक. संनिष्ठ आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करतो आहे.


वरील साऱ्या अनुभूतिविषयी आणि विचारांविषयी (वीस वर्षापूर्वी लिहिलेल्या पण आजही माझ्यासाठी आणि परिस्थितीशी सयुक्तिक / relevant असलेल्या) दोन कविता ज्यांचे काही दिवसापूर्वी पुनर्लेखन केले त्या सादर करित आहे. सोबत आधी ब्लोगवर (१२/०४/२०१४ रोजी ) दुसर्‍या संदर्भात ठेवलेली पण ह्याच अनुभूतिविषयी असलेली ‘बदललेला तो’ ही कविता सादर आहे .......... 

कविता – हात – (मूळ लेखन १४/१२/१९९३ पुनर्लेखन ११/११/२०१४ )


मंदिराबाहेर, रेल्वेमध्ये
हॉटेल्स, लग्नमंडपांपुढे,
चार रस्त्यावर
एकूणच जागोजागी
आपल्यापुढे पसरणारे अनेक हात |
कधी झडलेले
कधी लहानुले
कधी तुटके
कधी लुळे
कधी धडधाकटही
साऱ्यांवर एकच वाक्य
‘दादा भीक घाला हो !’            ||

खोडून काढावस वाटत
ते दळभद्री वाक्य
प्रत्येक हातावरल
प्रत्यक्षात हुरूप संपतो
कळत  जेंव्हा -----
दुसराच कोणी भीक मागत असतो
सत्तेची, सन्मानाची
या हातांच्या उद्धाराची दुहाई देत          ||

त्या हातांसाठी मग मी काहीच करत नाही
पसरलेच जात राहतात हात
जागोजागी माझ्यापुढे अव्याहतपणे
घृणा वाटू लागते माझीच मला
घृणेतून क्रोध दाटतो रोमारोमात
कलम करून टाकावेसे वाटतात
भीक मागणारे सारे हात                 ||

कलम करण्या हात
सर्वात जधन्य भीक मागणाऱ्याचे
पाहता चहूकडे निरखून
आपणच सारे दिसलो
सत्तेची, संपत्तीची,
रुपाची, समाजमान्यतेची
हात पसरून भीक मागताना              ||

कलम करून टाकले त्याच दिवशी
उघडपणे भीक घालणारे
छुपेपणाने अनंत भीका मागणारे
माझे दुटप्पी हात                       ||
 (Originally written on 14/12/1993 during 0.30 to 1.00 am, revised on 11/11/2014)


कविता - तुम्ही काय करता? ( मूळ लेखन ०७/०९/१९९४, पुनर्लेखन २३/११/२०१४)


तुम्ही-आम्ही पैदासलेल्या
गलिच्छ उकिरड्याला
रोजगारासाठी उपसणारे
ते इवलेसे हात.........
लपवत फिरतो उकिरडा करणारे माझे हात
तुम्ही काय करता?         ||

तुम्ही – आम्ही फेकून दिलेल्या
डिशेश, फूडपॅकेट्स, कप्स
चाटणाऱ्या त्या लहानुल्या जिवण्या.........
काहीच उरू देत नाही मी त्यांना खाण्या
अश्या वेळेस तुम्ही काय करता?                ||

तुम्ही आम्ही केलेल्या
सुखाच्या प्रदर्शनाकडे
पाहणारे ते निस्तेज, आशाळभूत डोळे.........
कातडे ओढून डोळ्यावर मा‍झ्या टाळतो ते डोळे    
तुम्ही काय करता?               ||

 तुम्ही आम्ही उभारलेल्या
या जगाच्या भरडयंत्रात भरडून
छिन्नविछिन्न, उध्वस्त होणारी ती निश्राप जीवनं .......
मारून टाकतो मी, माझा आत्मा, माझे मन
सांगा ना, तुम्ही काय करता?       ||

(originally composed on 07/09/1994  during 1.0 to 2.0 pm, revised thoroughly on 23/11/2014 during 8.30 to 9.00 am)


कविता - बदललेला तो 

पूर्वी तो पायी चालणारा,
कधी तरी बसने फिरणारा होता
चार रस्त्यावर गाड्यांभोवती पडणारे 
भिकार्‍यांचे कोंडाळे त्याला व्यथित करीत असे
रागही येत असे भीक न घालणार्‍या  श्रीमंतांचा ।

क्वचित कोण्या भिकाऱ्याने चुकून पसरलाच हात त्याच्यासमोर
तर तो रिकामे खिसे उगाचच चाचपडत निघून जात असे अपराधीपणे ।

मेहनतीने वा  नशीबाने तो फिरू लागला स्वत:च्या वाहनाने,
रिक्षा, टॅक्सी वा  स्वत:च्या वाहनाने फिरताना
वाहनांच्या आत अगदी त्याच्यापर्यंत हात पसरवणाऱ्या
भिकार्‍यांचे कोंडाळे त्यालाही पडू लागले ।

बहुतेक वेळा तो चिडायचा त्या बिनमेहनतु लोकांवर,
क्वचित भीक द्यायचा मेहनत करण्याची शिकवण देत ।

आता तो फिरतो विमानात, शोफरवाल्या महागड्या गाड्यांमधून,
जागोजागी बंद काचेच्या त्याच्या गाडीला घेरणारे भिकारी  पाहून
चीडही येत नाही कोणाचीही वा व्यथितही  होत नाही तो कोणासाठी
नाही उरला तो अपराधी भाव, नाही ते मेहनतीची शिकवण देणे ।

त्याच्या भाव विश्वातून भिकारयाना, त्यांच्या विषयीच्या भावनांना
हद्दपार करण्याची श्रीमंती कला शिकला आहे तो आता  ।


2 comments: