Friday 13 June 2014

कविता – विमान प्रवास

दिनांक - १२/०६/२०१४ 

कविता – विमान प्रवास

विमानाची आकाशात झेप सारे आधार सोडून
आपणही सारे आधार सारी जोखड कापून
निसंग व्हाव सारी आवरण काढून ||

मृत्यू सहप्रवासी प्रत्येक क्षणाचा आपला
इथे आपल्याला मांडीवर घेऊन बसलेला
अनुभवीत उबदार, गुबगुबीत स्पर्श त्याच्या मांडीचा
आरामशीर रेलावत पाहावा  नजारा बाहेरचा  ||

शुभ्र कापशी वा मदमस्त काळ्या ढगांनी  
अनेकविध रंगांनी , बहुकोनीय किरणांनी
रचलेला केलिडोस्कोप पहावा निसर्गाचा
ठेवून सताड उघडा दरवाजा ओठांचा ||

सळसळता डोळ्यासमोर विजेची नागीण
गपकन डोळे घ्यावे मिटून
पडता /पसरता इंद्रधनुष्य विमानात
खेळून घ्यावी रंगपंचमी मनसोक्त ||
   
पांढऱ्या कापशी ढगातून अलगद सरकताना विमान
बांधावा महाल स्वप्नांचा अलवार डोळे मिटून
काळ्या महिषी ढगात झिंगल्यागत लथडणारया विमानात
खेळावी बुलफाईट जरी भीतीचा गोळा असता पोटात ||

मनमुराद असे खेळून भागल्यावर
विमान सुखरूप उतरल्यावर
उतरावं मृत्युच्या आश्वस्त प्रेमळ मांडीतून
ठेवावा पाय धरतीवर त्याचं बोट धरून
लहानुला आईच्या कुशीत शिरतो तसा ||

(revised thoroughly on 12th June 2014) 

4 comments:

  1. किती एक छोटीशीच छान कल्पना आणि तिचा सुंदर विस्तार !!!

    ReplyDelete
  2. फारच सुंदर कल्पना👌
    सर तुम्ही बडोद्याला नाट्य कार्यशाळा घेताना एकदा सांगितलं होतं.. विमानप्रवासात श्वासावर लक्ष केंद्रित करून कसे सहज मेडिटेशन करता येते..
    ते मला आज आठवले☺

    ReplyDelete