Tuesday 2 December 2014

कविता – ठाऊक नसूनही – असूनही

कविता – ठाऊक नसूनही – असूनही 

(मूळ लेखन ०४/०६/१९९२ ९.० ते ९.३० सकाळी पुनर्लेखन ०२/०२/२०१४ दुपारी १.० ते ४.०)


चेहर्‍यावर स्मिताची हलकी लकेर लेऊन
आता गेलाय किती शांत झोपून  
ढगांच्या शुभ्र कापशी पायऱ्या चढत
चांदण्यांचा सडा वेचत,
पक्ष्यांच्या रहदारीतून चालत
स्वारी पोचली की स्वप्नांच्या मनोराज्यात         ||

आवडलेले पाहुणे जाऊ नयेत म्हणूनी
हट्ट केला लडिवाळ बोबड्या बोलांनी
लालूच दाखवली खेळण्यांनी, चॉकलेटनी
कट्टी केली चिमण्या दातांखाली मुडपून बोटांनी
रागाने भीमटोले मारले इवल्याश्या मुठींनी
हलकल्लोळ केला आक्रंदूनी
त्याला ठाऊकच नाही
‘कुणालाही कुणासाठी थांबता येत नाही’

त्याच्या लडिवाळ हट्टाने
पाहुण्यांचा पाय जडावतो
आम्ही मात्र वैतागतो, चिडतो
लाडाने, धाकाने त्याला गप्प करतो
असूनही तेच भाव आमच्याही मनात
शिष्टाचाराच्या बुरख्याआड दडवत    ||

उदयाला तो पाहुण्यांना विसरलेला असेल
खेळातून त्याला नवा अर्थ मिळू लागेल
आम्हाला मात्र ते जमणार नाही ठाऊक असूनही

 ‘कुणालाही कुणासाठी थांबता येत नाही”    || 

No comments:

Post a Comment