Saturday 21 February 2015

कुणाला कसे ते कळणे

ब्लॉग – दिनांक २१/०२/२०१५ - कुणाला कसे ते कळणे’


ब्लॉगच्या वर्धापनदिनाचा ब्लॉग लिहिल्यावर जमलेच नाही ब्लॉग लिहायला. खरं तर मनाशी ठरवले होते कवितेशिवायचे इतरही विषयांवर ब्लॉग लिहावयाचे, पण ते जमलेच नाही. आजही पुन्हा एक जुनी कविता पुनर्लेखीत केली म्हणून हा ब्लॉग लिहिला जातोय. नेहमीप्रमाणे ब्लॉगवर नुसतीच कविता ठेवता आली असती पण या कवितेच्या पुनर्लेखनाने एक वेगळाच अनुभव दिला.

ही कविता १९९२ ची फक्त एकाच कडव्याची शीर्षक नसलेली आणि अर्धवट राहिलेली. गेले वर्षभर इतक्या साऱ्या कविता पुनर्लेखन करताना ज्या कवितांचे पुनर्लेखन अवघड वाटले वा जमेल असे वाटले नाही त्यांना बाजूला टाकल्या होत्या त्यातली ही कविता. पण परवा १९ फेब्रुवारीला सकाळी उदयपूर मध्ये कामाच्या गडबडीत असूनही ते एक कडवे पुनर्लेखीत करण्याचा सूर लागला आणि मग पुढली दोन कडवी सुचून कविता पूर्ण झाली, त्यातला विचार पूर्ण झाला. अर्थात मूळ कडवे लिहिले त्यावेळी काय विचार होता, २२ वर्षापूर्वी एक कडवं लिहिल्यावर आणखी काय सुचत होते ते काहीच आठवत नव्हते पण पुढली दोन कडवी सुचली खरी आणि एक नवी अनुभूति देऊन गेली आणि म्हणून हे सारे ब्लॉग मध्ये लिहिले. अशी ही अत्यंत दीर्घकाळानंतर पूर्ण झालेली कविता ‘कुणाला कसे ते कळणे’    

३.१० कविता – कुणाला कसे ते कळणे (मूळ लेखन १३/११/१९९२, पुनर्लेखन १९/०२/२०१५)


भावनावेगाने
मनाचे तटतटणे
मजपाशी शब्दांचे नसणे
कधीतरी मूकपणे
मनाचे फुटणे
आवाजहीन भळभळणे
शब्दांचेही नसणे
कसे कुणाला ते कळणे
कुणाला कसे ते कळणे            ||

दुखाःवेगाने
मनाचे पिळवटणे
मजपाशी अश्रुंचे नसणे
मनाचे रडणे 
कोरडेच वाहणे
अश्रुंचे नसणे
कसे कुणाला ते कळणे
कुणाला कसे ते कळणे            ||

पोरकेपणाने, एकटेपणाने
मनाचे व्याकुळणे
मायेचे कुणीच नसणे
मनाचे आसुसणे
प्रेमवंचित जगणे
आपले असे कुणीच नसणे
कसे कुणाला ते कळणे
कुणाला कसे ते कळणे            ||


(पहिल्या कडव्याचे मूळ लेखन १३/११/१९९२ सकाळी ७.० पुनर्लेखन १९/०२/२०१५ सकाळी ८.० वाजता, बाकीच्या कडव्यांचे मूळ लेखन १९/०२/२०१५ सकाळी ९.० ते १०.० )

1 comment:

  1. अनेकदा तुमच्या कविता दोन पातळ्यांवर मी बघते एक त्या समृद्ध आशय घेऊन येणाऱ्या असतात, पण दुसरीकडे मात्र त्या मुक्त छंदातून समोर येत असल्याने मला त्या कविता म्हणून तितक्या कळत नसत. वाटत राही की हा अनुभव शेअर करण्यासाठी कवितेऐवजी गद्य प्रकारच का नसेल वापरला? कोणत्या फॉर्म मधून ती इतरांपर्यंत पोचवायची हा सर्वस्वी कवीचा अधिकार. तुमच्या कविता वाचतच खऱ्या अर्थाने मला मुक्तछंदीय कविता रुचू लागल्या. तर आता तुम्हीच मुक्तछंदातून बाहेर येऊन कविता करू लागलात! खूब !!!

    ReplyDelete