Thursday 26 February 2015

पहिल्या वहिल्या गोष्टी

दिनांक – २६/०२/२०१५ – पहिल्या वहिल्या गोष्टी  

आयुष्यात केलेला पहिल्या वहिल्या गोष्टींचे महत्त्व, अप्रूप, आठवणी वेगळ्याच असतात, त्याला कोणीही अपवाद नाही, काही हे सारे छान पणे व्यक्त करतात, करू शकतात, काही नाही करू शकत किंवा नाही करत. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यातील सगळ्याच पहिल्या वहिल्या गोष्टी नाही सांभाळून ठेवता येत, काही जमतात काही काळ पण बहुतेक गोष्टींबाबत अनेक कारणांनी ते शक्य होत नाही; पण मन मात्र हे समजून घेत नाही आणि त्याला आपले वाटत राहते आपण हे केले असते तर ती गोष्ट टिकवता आली असती, ते केले असते तर हे करता आले असते इत्यादि. मला माझी स्कूटर २७ वर्ष टिकवायला जमली आहे आजही वापरतो पण ती ही अजून किती काळ वापरू शकेन मी हा प्रश्नच आहे.

आमचे पहिले घर १९८७ साली घेतलेला ओनरशिप flat होते त्यात चार वर्ष राहिलो, मनामध्ये लहानपणापासून जमिनीसकटचे बाग करता येईल अश्या घराचे स्वप्न असल्याने तशी संधी येताच flat विकून आणखी लोन घेऊन १९९१ साली नव्या मोठ्या घरात गेलो पण पहिल्या घराच्या स्मृती कायमच्या बरोबर घेऊन गेलो. ह्या अनुभूतिची १९९२ साली लिहिलेली ही कविता .......

कविता – भिंती (मूळ लेखन – ०३/११/१९९२ पुनर्लेखन २४/०२/२०१५ )


फिरता चार भिंतींमध्ये त्या
घर मन-स्वप्नातले  साकारले
होता भिंती आमच्या त्या
      क्षण शब्दातित अनुभवले                ||

म्हणालो भिंतींना, सजवायला तुम्हाला
      काहीच नाही मजपाशी आजला
म्हणाल्या भिंती काहीच नको आम्हाला
      घेऊन या हसत्या खेळत्या वसंताला        ||

प्रतीक्षा बाळाच्या आगमनाची
      तयारी त्याच्या स्वागताची
बाळाचे येणे, हसणे, रडणे
      बाळाचे खेळणे, धडपडणे बोलणे
आम्ही एकत्रच अनुभवले
      सुख-दुःख वाटून घेतले                  ||

बाळ वाढले भिंतीच्या ऊबेत, मायेत 
मोठा झालो मी ही, जास्तच कदाचित
आधी उत्तुंग वाटलेल्या
भिंती खुज्या वाटू लागल्या
नव्या भिंतींच्या मोहात
सोपल्या त्यांना दुसर्‍याच्या हातात               ||

पाय जड झाला – अडला
      त्या भिंती सोडता 
परी न थांबला 
मनातली घरचौकट बदलता               ||

आठवणीनी त्या भिंतींच्या
ओलावतात कडा डोळ्यांच्या
वाटते त्या भिंतींमध्ये परतावे 
      पुन्हा जगावे, तिथेच मरावे
नाही शक्य हे आता 
भिंती दुसऱ्यांना सोपता                  ||

उमजले मला जे
उमजेल तुम्हालाही ते
करता आपण घर भिंतींमध्ये
भिंतीही करतात घर मनामध्ये
येते सोडता, तोडता, विकता भिंतींना

      येत नाही विसरता त्यांच्या स्मृतींना        ||

1 comment:

  1. आपली कविता वाचून सुचलेली वहात जाणारी मुक्त कल्पना :
    मनामध्ये भिंती नसाव्यात,
    भिंती बांधाव्याच लागल्या तर,
    चौसोपी वाडा असावा,
    त्यास अनेक दरवाजे आणि
    खिडक्याही असव्यात,
    त्यात आमच्या सारख्या
    अनेकांना रहाण्यास जागा असावी.

    कोनाडे नकोच असावे,
    असलेच तर...
    तेथे कुणी दु:खी अश्रू ढाळणांरे नसावे.
    कुठेही अंधाराचा लवशेषही नसावा,
    अंधारातील भूतही नसावे,
    सर्वत्र स्वच्छ उजेडच उजेड असावा,
    सोनेरी पंखाच्या परीराणीचे सर्वजण ऐकणारे असावे.

    मनीच्या सर्व रेषा एकमेकांना
    न छेदणाऱ्या सरळच असाव्या,
    काही जुळणाऱ्या काही मिळणाऱ्या,
    काही सुंदर गोलाकार वळण घेणाऱ्या,
    तर काही उंच उंच बरारी घेणाऱ्या असाव्या,
    काळ्या कुळकुळीत नसाव्या,
    चमचम चमकणाऱ्या
    स्वत:चे तेज असलेल्या असाव्या.

    असाव्या मनीच्या खिडक्या
    बाहेरच्या सुंदरतेचा आढावा घेणाऱ्या,
    तर दरवाजे असावेत सताड उघडे,
    चांगल्याला आमंत्रित करणारे....
    वाईटाला बाहेरच थोपविणारे......

    बसायला नरम नरम
    देवकपाशीचा बिछाना असावा,
    आणि असावे छत
    अत्यंत सुंदर,
    मोहक
    आभाळासारखे निळे निळे,
    तारकामय.
    त्यात शीतल चंद्रही हवा
    आणि उबदार सूर्यही हवा.
    कधीमधी निरागस खोडकर डोळे मिटणाऱ्या
    तर कधी चमचम चमकणाऱ्या
    चांदण्याही असाव्या.
    सुंदर सुंदर कल्पना
    त्यात ओवलेल्या असाव्या,
    नवनवीन शोध असावे,
    बेरजा असाव्या, गुणाकार असावेत
    वजाबाकीचा, भागाकाराचा
    लवशेशही नसावा,
    सर्व काही पूर्ण असावे,
    अपूर्ण अर्धवट असे
    काहीच नसावे
    मग ते अंक असोत
    वा कल्पना असोत.
    तेथे मीपणा नसावा,
    सर्वत्र आनंदी आनंद असावा
    आनंदाचा झराच असावा म्हणा ना.
    कोणीही यावे, काही घ्यावे, काही द्यावे
    भरभरून आनंद घ्यावा द्यावा उपभोगावा.
    अनंतेचि राहावे सकळ सुंदर आनंदित.
    ........ नितीनचंद्र 'NI3C'

    ReplyDelete