दिनांक – १७/१०/२०१५ – कॅनडा डायरी - निसर्गाच्या
रंगोत्सवाचा निरोप घेताना
इथे टोरांटोला येऊन जवळ जवळ १७ दिवस कसे संपले ते कळलेच
नाही, आता उद्या निघणार परत जायला. इथली जीवनशैली, इथली शहरे, प्रेक्षणीय स्थळे,
दुकाने, मॉल्स, नायगरा सारखे जागतिक नैसर्गिक आश्चर्य असे अनेक पाहून झाले त्याहून
महत्वाचे म्हणजे पानगळी (fall season) च्या आधीचा इथल्या निसर्गाचा रंगोत्सव मनसोक्त
पाहून झाला. रंग बदलून पाने गळून जाण्याचा काळ ३० ते ४० दिवसाचा असतो, तो कालखंड
लक्षात घेऊनच कॅनडाला जाण्याचे ठरवले होते आणि सुदैवाने त्यातले मधले सर्वोत्कृष्ट
२० दिवस मला निसर्गाचा हा रंगोत्सव पाहायला मिळाला.

कविता – फुलव तुझ्यासारखा मलाही
(कल्पना – टोरांटोमध्ये अनेकदा फिरताना; लेखन १७/१०/२०१५
दुपारी १२.०० ते १२.३० श्रीपादचे घरी –
टोरांटो)
होण्याआधी येत्या पानगळीत
निष्पर्ण, रूक्ष, रंगहीन
निसर्गा आहेस तू मांडला
रंगोत्सव अगणित छटांचा
झाडोझाडी, पानोपानी
देण्या सर्वांना ओसंडून
देण्या सर्वांना भरभरून ||
निसर्गा तुझाच अंश मी ही
वाटण्या सर्वांना भरभरून
माझ्यात जमवलेले सारे काही
फुलव तुझ्यासारखा मलाही
होण्याआधी मी या पानगळीत