Wednesday 18 March 2015

जाता क्षितीजापलीकडील दूर देशीच्या अज्ञात आकाशी, दाटली ओढ घरट्याची

ब्लॉग – दिनांक – १८/०३/२०१५ जाता क्षितीजापलीकडील दूर देशीच्या अज्ञात आकाशी दाटली ओढ घरट्याची 

आज ब्लॉग वर काव्य-त्रयी (तीन कविता) ठेवीत आहे. ग्रीक नाट्य साहित्यात नाट्य-त्रयी (play-triology) लिहिल्या गेल्या. एकाच अनुभूतिला व्यक्त करू पाहणाऱ्या थोड्या थोड्या कालांतराने अनुभूतिचे क्रमिक टप्पे मांडण्यासाठी लिहिल्या गेलेल्या ह्या तीन कविता आहेत म्हणून त्यांना काव्य-त्रयी म्हणतो आहे.

एप्रिल १९९६ साली अमेरिकेतली नगरपालिकांमधील आर्थिक प्रबंधन ह्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी दोन महिने अमेरिकेला जाण्याची संधी चालून आली. त्या काळी एका महानगरपालिकेत काम करणाऱ्या अधिकार्‍यासाठी ती फार मोठी संधी होती आणि एक प्रकारे मोठी achievement होती. त्यामुळे माझ्या मनाला पंख फुटले होते आणि त्यांना  क्षितिजापलीकडील अज्ञात आकाशात उडण्याचे वेध लागले पण जाण्याचा दिवस जस जसा जवळ येत गेला तस तसे माझे दुसरे मन घर सोडून, मुलांना सोडून जाण्याच्या कल्पनेने व्याकूळ होऊ लागले, नको जाऊया असे विचार मनात बळावू लागले आणि मग दोन मनांमध्ये द्वंद्व सुरू झाले.

त्या काळी मी माझ्या कारकि‍र्दीच्या ज्या टप्प्यावर होतो त्या संदर्भात होऊ घातलेला अमेरिकेचा अभ्यास दौरा अत्युच्य शिखर / पायरी होते. ह्या बिंदू पर्यंत मी आयुष्यात प्रगती करण्यासाठी, मोठा होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात मानणारा आणि प्रयत्न करणारा होतो. आयुष्य, कारकीर्द निग्रहाने, योग्य प्रयत्नांनी घडवता येते, जमेल त्याने तसे ते घडवले पाहिजे आणि नशिबाने तो पर्यंत मी स्वतःला घडविण्यात, प्रगतीच्या, यशाच्या पायऱ्या चढण्यात सुदैवाने/नशिबाने यशस्वी ठरलो होतो. पण मनाचे विचित्रच असते, अमेरिकेला जाण्याचे ठरले आणि ह्या प्रवासाच्या आधी आणि ह्या प्रवासात स्वत:शी असण्यासाठी मिळालेल्या एकांतात कारकि‍र्दी विषयी, अधिकाधिक मोठे होण्या विषयीच्या माझ्या वृतीविषयी, विचार – मतांविषयी विरुद्ध विचार मनात निर्माण झाले आणि त्या मंथनातून माझे विचार/तत्त्वे पुढल्या काळात पूर्णपणे बदलली.

ह्या आणि पुढल्या अनेक ब्लॉग मध्ये १९९६ च्या अमेरिकेतली दोन महिन्यांच्या एका वेगळ्या प्रकारच्या एकांतवासातील कविता ठेवण्याचा विचार आहे .......   ह्या तीन कवितांमधील पहिली कविता प्रवासाला जाण्यापूर्वी एक आठवडा बाकी असताना लिहिली होती तर दुसरी तिथे पोचल्यावर एक आठवड्याने आणि तिसरी अमेरिका सोडण्याला एक – दोन आठवडे बाकी असताना लिहिली होती 


१ कविता – ओढ क्षितिजापलीकडील अज्ञात आकाशाची

(मूळ कविता दिनांक ३०/०४/१९९६, Tom Chapman’s house – Delhi रात्री १०.० ते १०.३०; पुनर्लेखन १५/०३/२०१५ बडोदे घरी सकाळी)

क्षितिजापलीकडील दूर देशीच्या वाऱ्याने
फितविले मनःपंखांना
पिसापिसात सळसळते आहे
स्वप्न अज्ञात आकाशाला कवेत घेण्याचे         
घरट्याच्या काडी काडीत गुंफलेला मी
बेगुमानलेल्या ह्या पंखांपुढे निःसहाय मी          ||

नेहमीच्या आकाशात त्याच त्याच भराऱ्या मारून
कंटाळलेल्या पंखांचे बंड समजते आहे मला
पण आकाशाखाली वाऱ्यावर सोडू कसे घरट्याला
मनःपंखाना ओढ उंचचउंच जाण्याची
जीवाला आस घरटे जपण्याची
घरटे आणि पंखांमधला असा त्रिशंकू मी           ||

त्या परक्या आकाशातल्या एकाकीपणी कदाचित
पंखाना उमजेल साथ तुमच्या पंखांची
पिसांमधून फिरणाऱ्या तुमच्या चोचींच्या प्रेमाची
घरट्यातील विसाव्याची, उबेची
घेऊन येतील पंखच मला परत
झालो जरी स्वैर, बेगुमान, बेईमान मी            ||

२ कविता – दूर देशीच्या आकाशी

(मूळ कविता १२/०५/१९९६ जीनीनचे घर – डोवर संध्याकाळी ६.३० तो ७.००; पुनर्लेखन १५/०३/२०१५ सकाळी बडोदे )

क्षितिजापलीकडील ह्या आकाशाच्या लालुचीने
मनःपंखांना फितविणाऱ्या वाऱ्याने
पाळलेय इमान अज्ञाताचे पड उलगडण्याचे
नवोन्मेश चेतविण्याचे  
त्यांच्या जुगलबंदीने विकसतोय, मुक्त होतोय मी   
घरट्याच्या चिंतेने, विरहाने व्याकुळतोय मी                     ||

बेभान झालेल्या पंखांना
एकटेपण उडण्यातले जाणवतच नाहीये जराही
इथले सारेच पक्षी एकटे दुकटे उडणारे
हरवून जायला थवाच नाहीये कुठेही
कुतुहलाने माझ्याकडे वळणाऱ्यांशी
संवाद – संबंध वाढतच नाहीये कसलाही           ||

मावळतीला कुठल्यातरी अनोळखी दारा
       एकटे सोडून निघून जातो वारा
झोपेत शोधतात पंख ऊब नेहमीच्या पंखांची 
       विसरून हकिकत त्यांच्या नसण्याची
झोपतात वेडूले बंडखोर पंख मग मा‍झ्याच कुशीत
जागाच राहतो मी, घरटे नाही येथे घेण्या मला कुशीत      ||

३ कविता – उमजता ऊब घरट्याची

(मूळ कविता २४/०६/१९९६ Stamford Station and in the train, दुपारी ३.४० ते ४.० पुनर्लेखन १६/०३/२०१५, नागपूर येथे दुपार ते संध्याकाळ)

जेवढे उडावे तेवढे क्षितिजाचे विस्तरतच जाणे
आकाश अधिकाधिक परके होत जाणे
हाती कधीच न लागणे
प्रत्येक क्षणी अज्ञाताला जाणू पहाणे
जणू मृगजळामागे लागणे,
काहीच न जाणणे, सारे ज्ञात विसरणे            ||

उशिरा उशिरा का होईना
उमजला बंडखोर पंखांना
फोलपणा परक्या आकाशात उडण्याचा
क्षितिजाला ओलांडू पाहण्याचा 
सर्व अज्ञाताला जाणण्याच्या अट्टाहासाचा         
उंचच उंच जाऊ पाहण्याचा ||

आवळून घट्ट क्षितिजाला
करावे का घरट्याएवढे त्याला ?
चटकन हो म्हणाले मनःपंख
त्यानाही हवे आहे आता
ओळखीचे आपलेसे आकाश

अन घरट्याची ऊब                          || 

3 comments:

  1. These modifications are nice but still I would suggest to stick to originals as our thoughts keep on changing . They look like comments on original ones reducing value of both creations. More time passes mind becomes more revolutionary. Avoid bandkhor Ravikant. Sorry but I could not stop. Both creations are nice independently. Thanking you

    ReplyDelete
  2. Avoid being bandkhor. As time passes our thoughts change. But they bounce back to original. I had written longer comment but could not deliver it to you as it got deleted before publishing it. May be they were not reach you. Thanking you.

    ReplyDelete
  3. तुम्ही कविता ब्लॉगवर ठेवताना जी त्याची पार्श्वभूमी समोर ठेवता, ती पाहता तुम्ही कविता तर लिहाच पण इतर लेखन प्रकारही तुम्ही चांगले हाताळू शकाल याची खात्री वाटते. का टाळता आहात अशा अनेक अनुभवांचे भांडार तुम्ही खुले करू शकाल जे वाचणे आनंददायी असेल.

    मुळात मला एखाद्या अनुभवातून जात असता त्यास शब्दबद्ध करता येणे हेच फार महत्त्वाचे वाटते, आणि जे तुम्हाला जमते फार छान! किती कमीत कमी शब्दात अवघी भावावस्था तुम्ही नजरेसमोर साकार करता. कौतुकास शब्द अपुरे पडतात.

    लवकर येऊ देत सार्‍या कविता त्या काळातल्या या ब्लॉगवर.

    ReplyDelete