Saturday 23 January 2016

ब्लॉग - शोकांतिका आणि कविता - कविता – न घडलेली शोकांतिका

ब्लॉग - दिनांक – २३/०१/२०१६

नटसम्राट सिनेमा १० जानेवारीला पाहीला – नाना पाटेकरांचा अप्रतिम अभिनय तर खराच पण त्याहून महत्वाचे म्हणजे नाटकाचे अतिशय सुंदर पद्धतीने सिनेमा मध्ये केलेले रुपांतर. रुपांतर इतके समजदार पणे केले आहे की मूळ नाटकापेक्षाही नुकताच कट्यार काळजात घुसली या नाटकाचे सिनेमात केलेले रुपांतर पहिले होते पण तेथे ते फसले; इथे ते इतके जमले की मूळ नाटकापेक्षाही सिनेमा अधिक शोकात्म झाला आहे. नट सम्राटाची शोकांतिका अधिक उंचीवर नेली आहे प्रभावी केली आहे आणि नाटकापेक्षा एक प्रकारे अधिक आव्हानात्मक अशी भूमिका सुंदर निभावली आहे.

शोकांतिका एकीकडे आपल्याला रडवते, शोकाकुल करते पण त्यानंतर आपल्याला ती एक आगळ्या वेगळ्या प्रकारे आनंदी करते, एक वेगळेच समाधान, सुख देते आणि म्हणून आपणाला शोकांतिका आवडते, आपण ती आवर्जून ऐकतो, वाचतो, पाहतो आणि इतरांना सांगतो. आपल्या आयुष्यात, आपल्या स्व‍कीयांच्या आयुष्यात कुठलीही शोकांतिका कुणालाच घडावयास नको असते, पण ती घडली तर काय? असेही विचार मनात अनेकदा घोळतात. असे का घडते? शोकांतिकेचे रसायन काय आहे त्याचा शोध निरनिराळ्या लोकांनी घेतला आहे अजून घेतला जातो आहे. त्यांची उत्तरे काहीही असो. ट्रेजेडी किंवा  शोकांतिका साहित्य आणि इतर कला प्रकारांमध्ये अनंत काळापर्यंत अनन्य राहणार .....
नटसम्राट पहिला आणि मग मनात जे अनेक विचार घोळू लागले त्यातून सुचलेली ही कविता...  
  
कविता – न घडलेली शोकांतिका

(लेखन – दिनांक – ११/०१०/२०१६, बडोदे घरी दिवसभर)

उत्तुंग प्रचंड कड्याची कोसळून
अगणित नगण्य शकले होण्यासारखे
पार दुभंगून कोसळायचे होते मला
      अंगाखांद्यावरच्यांच्या विचाराने
      नाही जमले, बघे हो, माफ करा .......

स्वतःच्याही नियंत्रणाबाहेर गेलेल्या
भ्रमिष्ट, भरकटलेल्या तुफाना सारखे
बेफाम, बेलगाम, बेछूट व्हायचे होते मला
      माझ्या मंद झुळूकीवर डोलणाऱ्यांच्या विचाराने
      नाही जमले, बघे हो, माफ करा  .......

निर्दयी, पिसाटलेल्या वादळाच्या विरोधात
उभ्या ठाकणाऱ्या, न वाकणाऱ्या वृक्षासारखे
उन्मळून, मोडून पडायचे होते मला
      वाचण्या वादळांपासून आश्रयणाऱ्यांच्या विचाराने
      नाही जमले, बघे हो, माफ करा ......

अकल्पित, मनस्वी नियतीपुढे न हरता
तत्वांसाठी विनाश पावणाऱ्या नायकासारखे
धीरोदात्तपणे बळी जायचे होते मला
      माझी आस असणार्‍यांच्या विचाराने
      नाही जमले, बघे हो, माफ करा ......

न घडलेल्या शोकांतिकांच्या माझ्या या शोकांतिकेला
शोकाकुल, भयाकुल करणारी,
अघटितचा अर्थ लावणारी,
अस्तित्वाचा शोध घेणारी,
शोकांतिका करून तुमच्या पर्यंत पोचविणे

      नाहीच जमले, बघे हो, माफ करा ......

No comments:

Post a Comment