ब्लॉग – दिनांक १४/०५/२०१५ - पहिल्या-वहील्या
कविता
गेले वर्षभर जवळ जवळ १०० जुन्या कविता
पुनर्लेखीत केल्या पण माझ्या सर्व जुन्या कवितांमधील सर्वात पहिली कविता कोणती? ती
मी पुनर्लेखीत केली का? इत्यादि प्रश्न कोणाला पडलाही असेल. मलाही तो होता? जी
कवितांची जुनी आणि नवी वही हाती उपलब्ध आहे त्यात जी कविता पहिल्या पानावर
लिहिलेली आहे तीच नक्की पहिली कविता आहे का? असली तर मी ती केंव्हा केली होती?
त्यामुळे माझे कविते विषयक इतिहास संशोधन घरात चालत होते आणि शेवटी प्रयत्नांना यश
आले आणि पहिल्या नव्हे तर पहिल्या दोन कविता ज्या एकाच दिवशी लिहिल्या गेल्या
असाव्यात त्या मिळाल्या, अर्थात त्यातली पहिली दुसरी कोणती ते आठवत नाही म्हणून डायरीमध्ये
जी पहिली लिहिलेली आहे ती पहिली असे समजून घेतले आहे. पहिल्या कविता ह्या
२६/०९/१९८१ या दिवशी लिहिल्या गेल्या असा खात्रीलायक लिहित पुरावा मिळाला आहे !!!!
मुंगीच्या महाभारतासारखे काय हे अनमोल इतिहास संशोधन !! आज त्या सादर करत आहे.
अर्थात मला आठवते त्याप्रमाणे मी १९७९
च्या सुमारास कविता करावयास लागलो होतो पण ते सारे लेखन इतके टुकार असावे आणि मीच
स्वतः फाडून टाकले असावे किंवा नीट नकलून नाही घेतले कारण ह्या कवितांच्या आधीचे
लिखित स्वरुपात काहीच सापडलेले नाही, आणि स्मरणात तर मुळीच नाहीत.
वयाच्या २० वर्षी लिहिलेल्या काल-आज पुनर्लेखीत केलेल्या माझ्या
पहिल्या वहील्या दोन कविता-
कविता – असावी आस जन्मोजन्मी - मूळ लेखन २६/०९/१९८१; पुनर्लेखन १३/०५/२०१५
(मूळ लेखन २६/०९/१९८१; पुनर्लेखन १३/०५/२०१५ दुपार ते रात्र, बडोदे
घरी )
ग्रीष्मातील धरतीसम रखरखले जीवन जरी
असावा ओलावा तुझ्या प्रीती वर्षावाचा मनाशी
||
श्रावण मेघांच्या मत्त सरीसम कोसळता दु:खे
मजवरी
असावे सुख फक्त तुझ्या आठवणींचे
हृदयाशी ||
शिशिरातल्या वृक्षासम वठले, रिक्तले
जीवन जरी
असावा वसंत सदैव फुललेला तुझ्या
चैतन्याचा अंतरी ||
नैराश्याची घनकाळी अमावास्या दाटता मनावरी
असावी आशेची तिरीप तुझ्या प्रेमाची
मनाशी ||
मीलनाच्या मृगजळा मागे धावताना संपले
जीवन जरी
असावी आस जन्मोजन्मी तुझ्या मीलनाची
आत्म्यापाशी ||
कविता – तू व्हावे
(मूळ लेखन २६/०९/१९८१; पुनर्लेखन १४/०५/२०१५ सकाळी, बडोदे घरी )
तू ग्रीष्मातील रात्र होऊनी रातराणीने
गंधावे
त्या धुंदीत मिठीत शिरून जावे ||
तू ओल्या श्रावणरात्री भावसरींनी चिम्बावे
त्या धुंदीत मिठीत शिरून जावे ||
तू शरदातील चांदण्याने सागरासम मत्त व्हावे
त्या धुंदीत मिठीत शिरून जावे ||
तू शिशिरातील पहाट होऊनी दवांत
झाकाळावे
त्या धुंदीत मिठीत शिरून जावे ||
तू सौंदर्याच्या मैफलीतील साकी होऊनी इष्काने
धुंदावे
त्या धुंदीत मिठीत शिरून जावे ||
सकाळी “तू व्हावे” ही कविता वर लिहिल्या प्रमाणे पुनर्लेखीत केली पण ती करताना तिच्यासाठी एक चाल सुचू लागली अर्थात त्या चालीत ती कविता बसवणे आले त्यामुळे अनेक शब्द घालणे काढणे आले, सोबत हे पुनर्लेखन करताना स्वतःलाही मोकळे सोडले. कवितेचे काहीही करण्यासाठी. इतर वेळेस कवितेचे पुनर्लेखन करताना मी शक्यतो कविता लिहिली त्यावेळचा होतो आणि अगदी मोजके आणि आवश्यक असे बदल करतो. वीस-तीस वर्षानंतर बदललेल्या मला आत्ताच्या या पुनर्लेखन प्रक्रियेत येऊ देत नाही. पण हे दुसरे पुनर्लेखन करताना मी ते बंधन दूर केले झुगारून दिले आणि काही तासापूर्वी पुनर्लेखीत केलेली कविता बदलली ......
कविता
– तू व्हावे (२)
(पुनर्लेखीत कविता १४/०५/२०१५ दुपारी ३.० ते ४.० )
तू ग्रीष्मातील रात्र होऊनी रातराणीने
गंधावे
अन त्या धुंदीत, मिठीत माझ्या, तू मंद
मंद दरवळावे ||
तू ओल्या श्रावणरात्री भावसरींनी चिंबावे
अन त्या धुंदीत, मिठीत माझ्या, तू मनसोक्त बरसावे ||
तू शरदातील चांदण्याने सागरासम मत्त व्हावे
अन त्या धुंदीत, मिठीत माझ्या, तू बेफाम उधाणावे ||
तू शिशिरातील पहाट होऊनी दंवाने झाकाळावे
अन त्या धुंदीत, मिठीत माझ्या, तू नकळत
उमलावे ||
तू सौंदर्याच्या मैफलीतील साकी होऊनी इष्काने
धुंदावे
अन त्या धुंदीत, मिठीत माझ्या, तू मजला बेहोषावे ||
कसा मांडला जातोय कवीचा, त्याच्या लेखन प्रक्रियेचा सारा प्रवास. कविता कवीचा अनुभव किती आणि कल्पना विलास किती हा सातत्याने पडणारा प्रश्न. म्हणूनच माझी कधी काळी इच्छा होती कविची मी कोणी असावे, कोणत्याही रुपात आई, प्रेयसी, सखी, पत्नी, बहीण, मैत्रीण किंवा अगदी मुलगी देखिल आणि त्याचा लेखनप्रवास असा जवळून समजून घेता यावा… तुम्ही तो आपणहूनच अशारितीने समोर मांडत आहात कि एकातून दुसऱ्यात दुसऱ्यातून तिसऱ्या कवितेकडे एका रेशमी लडीतून तो घडावा तसे हे दर्शन.
ReplyDeleteइतके दिवस सतत गंभीर, चिंतनाच्या स्वरूपाच्या कवितांच्या पार्श्वभूमीवर ह्या कविता म्हणजे
निळ्या अंधारी रंगात
चिंतन चंदेरी ….
प्रेमाच्या विविध अभिव्यक्तींच्या, अनेक छटांच्या प्रेमात असणाऱ्या मला या कविता आवडतील यात नवल ते काय!