Sunday 14 June 2015

कविता – वाटते पिढी संपली

ब्लॉग – दिनांक १४/०६/२०१५

काल बडोद्यात पहाट उगवली ती या वर्षीचा पहिला पाऊस घेऊन आणि आज सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस आला म्हणजे पावसाळ्याचे आगमन झाले म्हणायचे. पाऊस अश्यावेळेस आला की पहिल्या पावसात भिजायला पण कोणी बाहेर पडले नाही. सर्व मुले शाळेत जायच्या गडबडीत होती. आता तर अवघ्या तिसर्‍या वर्षीच वा त्याआधीच play group मध्ये घातले जाते त्यामुळे ती सुद्धा घरी नव्हती त्यामुळे पाऊस पडला पण त्यात खेळायला, भिजायला कोणीच नव्हते. पाऊस सकाळी पडला म्हणून नव्हे तर हेच चित्र तो इतर वेळेस पडला तरी दिसते. अगदी तो योग्य वेळी संध्याकाळी ५ वाजता आला असता तरी काही अंशी हेच चित्र दिसले असते. पाऊस पडला आणि रस्त्याच्या वळचणीने पाणी वाहू लागले पण ते नुसतेच वाहत होते त्यात कोणी होड्या सोडली नव्हत्या, सोडलेल्या होड्यांसोबत काठाने चालणारी छोटी पावलेही नव्हती......

बरोबर एक महिन्यापूर्वी हे चित्र रेखाटणारा सुंदर शेर वाचला कोणाचा होता ते कळले नाही पण तो मनाला खूप भावला म्हणून त्याचा मराठीत अनुवाद केला, पण अनुवाद बाजूलाच राहिला त्या शेर वरून मला स्वतंत्र कविता सुचली तेंव्हा त्याचे ऋण मान्य करायलाच हवे. नीट आठवत नाही पण तो शेर काहीसा असा होता
                  बारीश का पाणी अब उदास बहेता है
                  कागजकी कश्ती छोडने बाले बच्चे अब बडे हो गये  ||

खरच मी अनेक वर्षात पावसाच्या पाण्यात होड्या सोडनारी वा गोट्या खेळणारी वा बकुळ, प्राजक्त सारख्या फुलांचा सडा वेचणारी मुले हल्ली पहिलीच नाही. असतील ही तशी मुले मोठ्या शहरांच्या झोपडपट्टी विस्तारत, वा अगदी छोट्या शहरात किंवा गावांमध्ये पण शहरातल्या बहुतांशी विस्तारत तरी अशी मुले गायबच झाली आहेत. ह्या साऱ्या विषयी सुचलेली कविता सादर आहे, ब्लॉग लिहिता लिहिता दोन नवीन कडवी सुचली आणि कवित आणखी समृद्ध झाली  ........... 

 कविता – वाटते पिढी संपली - लेखन – १९/०५/२०१५

(मूळ लेखन – १९/०५/२०१५ – बडोदे – अहमदाबाद – बडोदे प्रवासात )

रस्त्याच्या कडेने पावसाचे पाणी आता ओकेबोके वाहते
त्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडणारी पिढी संपली वाटते             ||

रस्त्यावर जमणारे पावसाचे पाणी आता दुर्लक्षित जिणे जगते
त्या पाण्यात खेळणारी, डुंबणारी पिढी संपली वाटते      || (ले. १४/०६/१५ दुपारी १२.३०)

प्राजक्त, बकुळ फुलांच्या सड्याचे पडल्या जागीच निर्माल्य होते
फुलांचा सडा भरभरून वेचणारी पिढी संपली वाटते       || (ले. १४/०६/१५ दुपारी १२.३०)

सारी नाती संपलेल्या चंद्राला पोरकेपण जाचते
त्याला मित्र, भाऊ, मामा मानणारी पिढी संपली वाटते                 ||

एकटेपणा सोबत चंद्राला रोज उपाशीच रहावे लागते
तानूल्या सोबत त्यालाही जेवू घालणारी पिढी संपली वाटते             ||

कलत्या दुपारी रस्त्यांना आता एकटेपण सतावते
गोट्या, लगोरी, विटी दांडू खेळणारी पिढी संपली वाटते                 ||

सिगरेटची पाकिटे, काड्यापेटीची खोकी,
निकामी टायर्स, रंगीत दगड, चिंचोके
आता हे सारे कचऱ्यातच मिळते 

या वस्तूंनी व्यवहार करणारी पिढी संपली वाटते                      ||



1 comment:

  1. काव्यसंग्रह निघायला हवा आता!

    ReplyDelete