Sunday 2 August 2015

संपली सफर कवितांच्या मनोराज्यातील आणि तीन पुनर्लेखीत कविता

दिनांक ०२/०८/२०१५

१६ जून ते ०१ ऑगस्ट ह्या काळात ब्लॉग नाही लिहिला पण काही जुन्या कवितांचे पुनर्लेखन cum नवीन लेखन  केले त्या ह्या कविता. ह्या कविता त्याकाळी अर्धवट सोडून दिलेल्या होत्या अथवा नीट जमल्या नाहीत म्हणून सोडून दिलेल्या होत्या त्यांना पूर्ण केल्या. जुन्या कवितांचे पुनर्लेखन करण्याचे काम जे दीड वर्षापूर्वी सुरु केले होते ते आता संपले आहे. जवळ जवळ ११५ अधिक जुन्या कवितांचे पुनर्लेखन ह्या कालखंडात झाले. जुने कागदपत्रे शोधल्यास अजूनही बोटावर मोजण्या इतक्या कविता सापडतील कदाचित पण जुन्या कवितांचे पुनर्लेखन करताना नवीन कविता लिहिण्याचे सुख - आनंद मिळत होता तो नाही मिळणार. या पुढे त्या साठी नव्या कविताच सुचाव्या - लिहाव्या लागतील. हे मोठे काम पार पडल्यावर एक पोकळी जाणवते आहे. पोकळी जाणवते आहे कारण ह्या कामामुळे गेल्या  दीड वर्षाचा काळ सृजनशील गेला. हे काम १५ जुलै आसपास पूर्ण झाल्यावर गेल्या काही दिवसात काहीच सृजनशील लेखन घडलेले नाही  पण गेले दीड वर्ष मात्र आपल्याच कवितांना दहा दहा - वीस वीस वर्षानंतर वाचणे, त्यांच्या अंतरंगात पुन्हा शिरणे, ते भाव पुन्हा पण बदलेल्या आपण अनुभवणे - काही वेळा जुन्या कवितेला फारसा धक्का न लावता सारखी करणे, तर काहीना जवळ जवळ नव्याने लिहिणे वा जास्तीची कडवी लिहिणे आणि शेवटी मूळ कवितेला पुनर्लेखीत करताना  तिची भाग २ अशी संपूर्ण नवीन जोड कविता लिहिणे ह्या साऱ्याने अवर्णनीय आनंद मिळाला.  १० - १५ वर्षांनी असलो तर तेंव्हा पुन्हा करू 'सफर कवितांच्या मनोराज्यातील' आणि पुन्हा पुनर्लेखीत करीन ह्या साऱ्या कविता आत्ता मिळालेला शब्दातीत आनंद मिळविण्य, तूर्तास इथेच थांबावे ........

कविता – नाही का? - मूळ लेखन २३/१०/१९८२; पुनर्लेखन २३/०६/२०१५

(मूळ लेखन २३/१०/१९८२ सकाळी १०.१५ ते १०.३०; पुनर्लेखन २३/०६/२०१५ दुपारी १.३० ते ३.३०)

जीवन, त्यातला प्रत्येक क्षण
नाविन्याने, उन्मेषाने
रसरशीतपणे, आनंदाने, जगावा असा
नाही का?                                  |

अक्षर गिरवून गिरवून वळणदार करावं
तसचं दुसऱ्यांनी आखून दिलेलं
जीवन गिरवलं, आखीव - रेखीव केलं
लौकिक अर्थाने यशस्वी, कृतार्थ झालं ......        |

जमले नाही ते
उत्स्फूर्त, स्व‍च्छंद, धुंद, सृजनशील
असे बरेच काही
अलौकिक जीवन जगणे ..........                | (नवे लेखन)

जीवनाविषयीचे हे शल्यही
आखीव-रेखीव-लौकिक शब्दात,
दुसऱ्यांनी आधी गिरवून मांडलेले
वळणदारपणे मी घोटले,  नाही का?........         | (नवे लेखन)

 कविता – सैतान - मूळ लेखन ३०/०४/१९८६; पुनर्लेखन ०३/०७/२०१५

(मूळ लेखन ३०/०४/१९८६ सकाळी १०.० ते १०.१५; पुनर्लेखन ०३/०७/२०१५ सकाळी ८.३० ते ९.० )

देवाचे ठाऊक नाही
सैतान मात्र नक्की माझ्यात आहे
तुमच्यातही असावा कदाचित
सतत जाणवणारे त्याचे अस्तित्व
कधी आपल्यात, कधी इतरांत                ||

युगानुयुगांचे त्याला संपविण्याचे यत्न
अनुसरत मीही केले विफल प्रयत्न
उमजले निष्फळतेतून त्याचे रहस्य
जगलेल्या प्रत्येक क्षणाच्या अपूर्णतेतच
संजीवन त्याला, अस्तित्व त्याला
जगवतो, पोसतो, मोठा करतो आपणच   
नाकारून, लपवून, दुर्लक्षून, दाबून त्याला        ||

स्वीकारले डोळसपणे त्याला,
संपवणार नाही अशी खात्री दिली त्याला
संवाद करतो त्याच्याशी, वेळ देतो त्याला,
डोळ्यात तेल घालून लक्षही ठेवतो,
बदल्यात तो आता देवासारखे वागतो                ||

तुमचे ठाऊक नाही
देवाचे ठाऊक नाही
सैतान मात्र नक्की माझ्यात आहे              ||

कविता – कुणाच्याही नकळत - मूळ लेखन पहिले कडवे १३/११/१९९२; नवे लेखन ०६/०७/२०१५
(मूळ लेखन पहिले कडवे १३/११/१९९२ सकाळी – ८.० ते ८.१५; नवे लेखन ०६/०७/२०१५ सकाळी ८.३० ते ९.०)

आसमंतभर वसंत पसरू लागलेला
साऱ्यांसाठी आणले नवसृजन
नवे उन्मेष, नवे चैतन्य, नवे शब्दच
आणले नाहीत माझ्यासाठी
आता मी लवकरच
निष्पर्ण, निःशब्द, निष्प्राण
पुढल्या वसंतापूर्वी
पानगळीत सरपण म्हणून
जळून गेलेला असेन
कुणाच्याही नकळत                     ||

आसमंतभर वर्षाऋतु पसरू लागलेला
साऱ्यांसाठी आणले जीवन
भावनांचा ओलावा शब्दांमागचा
सुखदुःखाचे अश्रू
आणलेच नाहीत माझ्यासाठी
आता मी लवकरच  
अंतर्बाह्य सुकलेला, कोळपलेला
शब्दहीन, भावहीन
पुढल्या वसंतापूर्वी
पानगळीत सरपण म्हणून
जळून गेलेला असेन
कुणाच्याही नकळत                     ||


2 comments:

  1. पूर्वी कधीतरी मी तुम्हाला असं म्हंटले होते का कि जुन्या कविता पुनर्जीवित करणे हे नक्कीच छान असेल, आनंददायी असेल यात शंकाच नाही. पण नव्याने लेखन सुरु राहू देत. कारण जुन्या कविता नाहीतर एक दिवस संपतील. जुन्या कवितांचे पुनर्लेखन जर इतके आनंददायी असेल, आणि तो आनंद सातत्याने मिळावयास हवा असेल तर सतत कविता जुन्या व्हायला हव्यात ना ? म्हणजेच उद्या परवाची बेगमी आजच करायला हवी ना? जगण्याचे अनेकविध अनुभव जेंव्हा तुम्ही शब्दबद्ध करता तेंव्हा असे वाटून जाते कि "अरे आपण पहातच नाही साऱ्या गोष्टींकडे असे, असाही विचार करता येतो की"

    म्हणून सांगते, ही पोकळी वगैरे विचार मनात आणूच नका आणि जेंव्हा जे जे वाटत राहते ते शब्दात उतरू द्या. सगळ्यांनाच नाही जमत हे. दुसरा पुन्हाच जुनाच मुद्दा, एखादी कविता ब्लोगवर ठेवताना तुम्ही तिची पार्श्वभूमी, किंवा कवितेबद्दल तुमची विचार किती छान पद्धतीने समोर ठेवता. मग का फक्त अनुभवांना शब्दाचे कोंदण देताना फक्त कविता हा एकच फॉर्म तुम्ही वापरावा? पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!!!

    ReplyDelete
  2. सृजनाचे अविष्कार ज्याच्या मनात साकारतात
    त्याने का वसंताकडे नवा उन्मेष, नवे चैतन्य मागावे?
    भावना ज्याचे शब्द लाभावे अशी इच्छा करतात
    त्याने का भावनांच्या ओलाव्यासाठी तृषार्त राहावे ?
    चंदनासारखे दरवळतो त्याने
    का सरपणात स्वत:ची अखेर पहावी?

    ReplyDelete