Saturday 1 August 2015

‘गुरूला अनुसरता एक दिवस त्यास मनीचे भाव सांगावे’

दिनांक ३१/०७/२०१५ गुरुपौर्णिमा
गुरूला अनुसरता एक दिवस त्यास  मनीचे भाव सांगावे

गेल्या वर्षी गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूला अनुसरता एक दिवस, कोणाचे तरी गुरू व्हावे हा ब्लॉग लिहिला आणि त्यात मी माझ्या अनेक गुरुंपैकी चार गुरु जे माझ्यासाठी सर्वकालीन दीपस्तंभासारखे आहेत त्यांचा उल्लेख केला होता. ते चार गुरु म्हणजे

१. माझ्या सासूबाई मालती मुळे, . ज्यांच्या हाताखाली मी डॉक्टरेट केली ते प्राध्यापक नांदेडकर सर, . ज्यांच्याकडून मी नाट्यशास्त्र शिकलो ते प्राध्यापक यशवंत केळकर सर आणि  . सौंदर्यशास्त्राचे शिल्पकार, प्राध्यापक  दीपक कन्नल  ज्याला आम्ही भैया म्हणतो. ह्या चौघांविषयी कधीच काही लिहिले नव्हते, गेल्या गुरुपौर्णिमेला प्राध्यापक नांदेडकर सरांविषयी लिहिले गेले आणि नंतर दुसऱ्या एका ब्लॉगमध्ये माझे आणखी एक गुरु प्राध्यापक यशवंत केळकर यांच्याविषयी लिहिले गेले, पण मनात असूनही इतर दोन गुरुंविषयी लिहिणे जमले नाही. आज माझ्या आगळ्या वेगळ्या मानस गुरु विषयी म्हणजे ज्यांना आम्ही सारे भैया म्हणतो असे कलाइतिहास, कलासमीक्षा विषयांचे प्राध्यापक आणि शिल्पकार दीपक कन्नल विषयी लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे.

भैया ह्या नाम विशेषणातून ह्या गुरु विषयीची अनौपचारिकता स्पष्ट झालीच आहे, त्याला मानस गुरु असे म्हटले कारण हा लेख तो वाचेल तो पर्यंत त्यालाही आणि इतर कोणालाही त्याला मी माझा गुरु मानतो हे माहीत नाही. तो आगळा वेगळा गुरु आहे कारण तो ज्या विषयांचा तज्ञ आहे ते विषय किंवा इतर कुठलाही विषय मी त्याच्याकडे औपचारिकपणे शिकलेलो नाही.  त्याची काही व्याखाने ऐकली आहेत, फार थोडे लिखाण वाचले आहे आणि गप्पांमधून त्याचे विचार ऐकले आहेत एवढेच आणि तरीही तो माझा वेगळ्याच कारणाने गुरु आहे.

१९९८१ सालाने आणि आस्वाद या ग्रुपने मला दोन गुरु दिले एक माझे नाट्यगुरू केळकर सर आणि दुसरा हा भैया.१६ ते २१ वर्षाच्या मुलांच्या ग्रूपचा त्यांच्याहून १२ १५ वर्षांनी मोठा असलेला मार्गदर्शक, प्रोत्साहक अशा ह्या भैयाची ओळख मी आस्वाद मध्ये १९८१ मध्ये जाऊ लागल्यावर झाली.  त्या नंतर ती कलेकलेने वाढतच गेली. काय दिले आहे भैयाने मला गुरु म्हणून? सर्वप्रथम सर्व कलांकडे पाहण्याची आवड आणि स्वतंत्र दृष्टी. कोणी कितीही मोठा कलाकार असला, त्याविषयी कितीही आदर असला तरी त्याची जी कला आपण पाहतो, ऐकतो  आहे तिचे मूल्यमापन करताना ते सारे विसरून जायचे आणि आपल्याला ती कलाकृती आवडली की नाही त्याचा निर्णय घ्यायचा. पण मला हे वाटते ही बाब त्याने इतरांना पण शिकवली असेल किंवा इतरांनी ते माझ्यासारखे शिकून घेतले असेल. भैयाला मी गुरु मानले आहे ते ह्याहून एका मोठ्या गोष्टी साठी. आपल्यासमोर माणसांच्या स्वभावाची निरनिराळी प्रारूपे असतात. एकाहून अधिक चांगल्या वाईट गुणवैशिष्ठ्यांनी   नटल्यामुळे आणि त्या गुणवैशिष्ठ्यांच्या निरनिराळ्या संयुगांमुळे प्रत्येक व्यक्ती वेगळी ठरते, एकमेवाद्वितीय ठरते. प्रत्येक व्यक्ती एकमेवाद्वितीय जरी असली तिचे वर्गीकरण ढोबळ प्रकारांमध्ये, प्रारूपांमध्ये करता येते  आणि आपण ते करतो. काही व्यक्ति एकांगी तर काही समतोल तर काही विरोधाभासी व्यक्तिमत्वाच्या असतात. वेगवेगळ्या गुणवैशिष्ठ्यांमधून निर्माण होणारी जीवन जगण्याची पद्धत, रीत व्यक्तीला आणखी एकमेवाद्वितीय करते पण त्याच बरोबर व्यक्तींच्या वर्गीकरणासाठी आपल्याला आणखी काही ढोबळ प्रकार देते. उदाहरण म्हणजे काही व्यक्ति नीटनेटकेपणाने जगणाऱ्या, कारकीर्द आणि संसार करणाऱ्या तर काही व्यक्ति कलंदर, आव्हांगार्द, चाकोरी बाहेरचे, सृजनशील जीवन जगणाऱ्या !!

भैयामध्ये, त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये मला असेच एक विशिष्ठ  संयुंग (combination) आणि जगण्याची रीत /पद्धत आढळली आणि जरी मी ती अंगीकारण्यात यशस्वी झालो नसलो तरी त्याचे जगणे मला जगण्याला मार्गदर्शन करत राहिले आहे म्हणून तो माझा मानस गुरु .....

भैयाच्या व्यक्तिमत्वाचे गुण विशेष म्हणजे आपण जो विषय, जे क्षेत्र, जे कार्य अंगिकारले आहे त्यावर सखोल अभ्यासाने/ परिश्रमाने अधिकार मिळविणे पण आपण कितीही केले तरी निवडलेल्या विषयातील सर्व ज्ञान आपल्याला कवेत घेता येत नाही, त्यावर अधिकार मिळवता येत नाही, काहीतरी उरतेच त्यामुळे आपण पूर्ण वा सकल ज्ञानी या सत्यभानामुळे/ जाणीवेमुळे  आलेली एकूणच ज्ञानभंडाराविषयीची (body of knowledge) आणि इतर ज्ञानी / अधिकारी व्यक्तींविषयीची आंतरिक नम्रता; पण त्याचबरोबर आधी म्हटल्याप्रमाणे कोणी कितीही मोठा ज्ञानी असला, अधिकारी व्यक्ति असलाकलाकार असला, त्याविषयी कितीही आदर असला तरी त्याचे विचार आपण ऐकतो आहोत, त्याची जी कला आपण पाहतो आहे तिचे मूल्यमापन करताना त्या व्यक्तीचे मोठेपण, त्याच्या विषयीच आदर बाजूला ठेऊन, सारे विसरून जायचे आणि आपल्याला तो विचारती कलाकृती आवडली की नाही त्याचा निर्णय घ्यायचा. त्या व्यक्तीचा / कलाकाराचा एखादा विचार पटला नाही तर त्या व्यक्ती कलाकाराविषयी एकूण आदर कमी होण्याचे करणे नाही किंवा त्या विचाराविषयी/कृतीविषयी लगेच जाहीरपणे नाराजी व्यक्त करण्याची गरज नाही. पण वेळप्रसंगी गरज पडल्यास त्या व्यक्तीला व्यक्तीशः वा जाहीरपणे काय नाही पटले हे सनदशीर / सभ्य मार्गाने सांगण्यापासून मागे हटायचे नाही. ह्याशिवाय कोणाला स्वतःहून आरे जारे करायचे नाही पण दुसर्‍याने आरेकेले तर कारेने उत्तर देण्याची समोरच्याला जाणवेल इतकी सदैव तयारी. ज्यामुळे समोरचा आरेकरणारच नाही. आपल्याजवळचे ज्ञान मुक्तहस्ताने इतरांना द्यायचे पण त्याहून महत्वाचे म्हणजे ज्ञान मिळविण्याचा मार्ग दाखवायचा. अहंकार नसणे, उर्मटपणा नसणे म्हणजे कणा नसणे वा काहीही स्वीकारून घेणे नव्हे. हा एक जो गुणविशेषांचा एक विशिष्ठ समतोल आहे तो माझ्यासाठी आदर्श ठरला आहे.

हे झाले भैयाच्या व्यक्तिमत्वाच्या काही गुणविशेषांविषयी आणि त्यातल्या समतोलाविषयी ह्याहून अनेक गुणविशेष आहेत भैयामध्ये पण मी इथे फक्त माझ्या आदर्शाच्या संदर्भित असलेले त्याचे गुणविशेष इथे  मांडले आहेत.भैयाच्या जगण्याच्या पद्धतीत / रीतीत असाच एक विशीष्ट समतोल आहे त्याने नीटनेटकेपणाने यशस्वी कारकीर्द आणि संसार करताना, साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडताना कलंदरपणा, आव्हांगार्द  वृत्ती जपली, जोपासली आहे, चाकोरी बाहेरचे - सृजनशील जीवन जगाला आहे. हे जे combination हा जो समतोल त्याने साधला आहे त्यासाठी तो माझा आदर्श आहे गुरु आहे. ज्या प्रमाणे भारतातील आणि मराठी संतानी ऐहिक जीवनात कर्तव्यकर्मे करीत असतानाच काया-वाचे-मने ईश्र्वरभक्ती करता येते, त्यासाठी  सर्वसंगपरित्याग करण्याची जरुरी नाही. प्रपंच करता करता ईश्वर मिळवता येऊ शकतो. स्वार्था सोबत परमार्थ साधता येऊ शकतो ही शिकवण सर्वसामान्यांना दिली त्याप्रमाणे भैयाने, माझ्या या आगळ्या वेगळ्या मानस गुरूने ऐहिक जीवनात कर्तव्यकर्मे करीत असताना म्हणजेच प्रपंच, कारकीर्द, ज्ञानसाधना नीटनेटकेपणाने, जबाबदारीने, यशस्वीपणे करताना कलंदरपणा, आव्हांगार्दवृत्ती, बेफिकिरी जपता-जोपासता येते, चाकोरी-साचेबंद पणा तोडून मुक्त-कल्पक-सृजनशील असणे जगता येतेहे दाखवून दिले आहे. अर्थात त्याला ही जगण्याची रीत / पद्धत जमली, समतोल साधता आला तो मला जमलेला नाही  पण हे असे जगणे माझ्यासाठी एक आदर्श आणि ते भैयाच्या जीवनातून शिकायला मिळाले म्हणून तो माझा गुरु. याशिवाय अनेक गोष्टी आहे, जसे की मी कधीही त्याला चिंतेत, तणावात पहिला नाही ह्या गोष्टींना त्याला तोंड द्यावे लागले नसेल असे नाही पण ह्या गोष्टीना त्याने लोकांमध्ये, आचरणामध्ये येऊ दिले नाही. त्याचे ज्ञान, त्याचा अधिकार, त्याचे मोठेपण माझ्याशी नव्हे तर कोणाशीही वागताना त्याने कधीच मध्ये येऊ दिलेले नाही. शुद्ध आचरण, निष्कलंक चरित्र, होईल ती मदत करायला तयार असे अनेक गुण जे एका गुरुमध्ये, एका व्यक्तिमध्ये असलेच पाहिजेत ते सर्व त्याच्यात आहेतच आणि म्हणूनच मी ते चर्चिले नाहीत.

गुरूला अनुसरता एक दिवस त्यास  मनीचे भाव सांगावे’  हा विचार मनात घेऊन, आपली पहिली ओळख झाल्यापासून ३४ वर्षाहून अधिक काळानंतर माझे हे मनोगत भैया तुला (माझ्या मानस गुरूला) आज गुरुपौर्णिमेला सादर ........

5 comments:

  1. असा गुरु लाभणे हे भाग्य! आणि अजाणता घडलेले गुरु-शिष्याचे नाते का आणि कसे याचे सार शिष्याने नेमक्या शब्दात गुरूपर्यंत पोहचवणे हे गुरुचे भाग्य. खूप नेमके आणि नेटके भाव तुम्ही व्यक्त केले आहेत असे वाटते. हे वाचताना कोठेही भाबडेपणाने, आंधळेपणाने "जे जे त्याच्या ठायी ते सर्व उत्तम" असा भाव दिसत नाही. एखादी व्यक्ती तुम्हाला गुरुवर्य का वाटते याची नेमकी फ्रेम कदाचित गवसली आहे असे वाटते. अशा गुरु-शिष्यास सलाम!

    ReplyDelete