Sunday 2 August 2015

कविता - मला उमजलेले

दिनांक - ०२/०८/२०१५

पुनर्लेखनाचा प्रकल्प संपल्या नंतरची नवीन कविता

कविता – मला उमजलेले - मूळ लेखन २६/०६/२०१५

(मूळ लेखन २६/०६/२०१५ संध्याकाळी ७.० ते ८.३० आणि २७/०६/२०१५ सकाळी ९.० ते १२.०, क्लब महिंद्र रिसॉर्ट, विराजपेट)
               
सदैव कशांकशाच्या मागे धावणे सोडून,
नुसतेच बसण्यात,
मनाजोगे चालण्यात,
खूप काही मिळवणे आहे                             ||

यशाची शिडी उंचच उंच चढणे सोडून,
जमिनीवरच चालण्यात,
दुसर्‍यासाठी शिडी बनण्यात,
वेगळीच उंची गाठणे आहे                            ||

ध्येयाचा खात्रीचा यशस्वी मार्ग टाळून,
आडमार्ग चोखाळण्यात,
चुकलेल्यांना ध्येयी पोचविण्यात,
अंतिम अक्षर ध्येयप्राप्ती आहे                        ||

सत्तेने लोकांना अंकित ठेवणे टाळून,
अधिकार, हक्क सोडण्यात,
प्रेमाने आपलेसे करण्यात,
नैतिक सत्ता मिळणे आहे                            ||

संपणार नाही इतके गोळा करणे थांबवून,   or  (गरजेहून अधिक गोळा करणे थांबवून)
ते वाटून टाकण्यात,
इतरांच्या ओंजळी भरण्यात,
अंती भरल्या हातांनी जाणे आहे                       ||

शास्त्रांत, देवळात देवाला शोधणे थांबवून,
स्वत:मध्ये शोधण्यात,    
माणसांतील देवाला तोषण्यात,
देव होणे, देवत्व पावणे आहे                          ||

भूत-भविष्य काळात रमणे सोडून,
वर्तमानात जगण्यात,
क्षण प्रत्येक साजरा करण्यात,

जीवन पूर्णत्वाने जगणे आहे                          ||

No comments:

Post a Comment