Friday 15 January 2016

ब्लॉग - सरता वर्ष २०१५ (२) - कविता - येणे क्षणांचे

ब्लॉग - दिनांक - १५/०१/२०१६ - सरता वर्ष २०१५ (२)

२०१५ संपण्याच्या निमित्ताने लिहिलेल्या ब्लॉगमध्ये जरी आढावा घेणे एक प्रकारे निरर्थक वाटले असे मी लिहिले आहे तरी प्रत्यक्षात मनाने तो घेतलाच आणि लिहावा असेही वाटले म्हणून हा त्या ब्लॉगचा  दुसरा भाग .....

ब्लॉग लिहावयास घेतला आणि जाणवले की गेल्या वर्षभरात ४८ ब्लॉग मी नोव्हेंबर २०१५ पर्यंत लिहिले होते म्हणजे आणखी दोन लिहिले गेले असते तर हाफ सेन्चुरी झाली असती ब्लॉगची वर्षभरात .... पण लगेच मनात विचार आला काय अर्थ आहे ५० च्या आकड्याला वा अर्ध शतक ह्या शब्दांना .....

१९८५ च्या आधी ३१ डिसेंबरला वर्ष संपण्याचे काही महत्त्वच नव्हते, अर्थात गुढी पाडव्याला सुरु होणाऱ्या किंवा गुजरात मध्ये असल्याने दिवाळीत सुरु होणाऱ्या नव्या वर्षाचे महत्त्व होते, साजरे करणे पण होते. १९८५ नंतर मुख्यत्वे tv वरील विविध वाहिन्या आणि नंतर प्रसार माध्यमातून ३१ डिसेंबर साजरा करण्याचे लोण घराघरात पोचले आणि आम्ही ही १९९१ नंतर वर्ष बदल साजरा करू लागलो. १९९३ ते २०१४ या २१ वर्षाच्या काळात माझ्या घरी दर ३१ डिसेंबरला पार्टी रंगली. मी आणि माझे ८ मित्र आणि त्याची कुटुंबे यांच्यामध्ये हे अव्याहत घडत  राहिले. आम्हाला मुले होते गेली तशी पार्टी मेम्बर्सची संख्या वाढत गेली, नंतर मुले जशी मोठी होत गेली घराबाहेर गेली, तस तशी गेली १० वर्षे ती कमी कमी होत होती पण तरीही आम्ही ८ – ९ जोडपी तर भेटत होतोच. पण कुठल्याही चांगल्या गोष्टीत कधी तर बदल येतोच तो या वर्षी आला. या वर्षी आम्हीच बडोद्यात नसल्यामुळे २१ वर्षांनी ३१ ला पार्टी झाली नाही आणि त्या दिवशी रात्री पुण्यात असल्याने आणि कुठेही न गेल्याने १९९० च्या आधी ज्या साधेपणाने ३१ ची रात्र साजरी करत असू तशी केली – missed all my friends and party with them ...

२०१५ असेच अनेक बदलाचे गेले – वर्षामध्ये खूप प्रवास झाला, फिरणे झाले आणि या वेळेचे फिरणे व्यावसायिक कमी आणि व्यक्तिगत किंवा कौटुंबिक अधिक होते. व्यावसायिक फिरणे कमी झाले कारण वर्षाचे जवळ जवळ ७ महिने मला कामच नव्हते. २००२ ला नोकरी सोडल्यावर पहिल्यांदा असे घडले की मला व्यावसायिक कामच मिळाले नाही. या आधीच्या साऱ्या वर्षात मी काम नाकारत असे इतके काम येत असे. काम नाही अर्थात आर्थिक उत्पन्न पण नाही. काम नसणे वा उत्पन्न कमी होणे ह्याहून महत्वाचे म्हणजे ही काम नसण्याची परिस्थिती का निर्माण झाली आहे आणि ती कशी तात्पुरती आहे असे सारे सारे ठाऊक असूनही या पुढे मनात काम नाही मिळाले तर काय हा विचार काही वेळा काही क्षणासाठी का होईना चमकून गेला, अमुकाला फोन करून पहावा असाही मनात विचार डोकावला. एक अनामिक भीतीची शिरशिरीही चमकून गेली. हे ही जाणवले एक अगदी सूक्ष्म फट पुरते मनाची अभेद्य वाटणारी तटबंदी ढासळायला....

दुसरे महत्वाचे हे जाणवले की व्यावसायिक काम फारसे नसल्याने वेळ भरपूर होता तरी पण त्याचा उपयोग करून ज्या अनेक गोष्टी इतर वेळेस कराव्याशा वाटतात पण  करता येत नाहीत त्या काही फार प्रमाणात माझ्या हातून झाल्या नाहीत. व्यावसायिक कामात व्यस्त असताना मनात सतत हे येत असते की ह्यामुळे वाचन बाजूला राहते आहे वा अमुक एक आवडीची गोष्ट करता येत नाही आणि मग त्या व्यस्ततेतून जसा वेळ मिळेल तसा तो काढून आपण त्या गोष्टी करत राहतो आणि त्यामुळे त्या होतात. म्हणजे व्यस्त असताना आपण इतर ऐच्छिक गोष्टी जेवढ्या साध्य करतो तेवढ्या त्या आपण मोकळे असताना होत नाही हे समजले.

कोणी म्हणेल किंवा माझेच एक मन म्हणाले काय हरकत आहे काहीच नाही केले अथवा नाही झाले तर. प्रत्येक क्षणातून काहीतरी मिळवलेच पाहिजे असा अट्टाहास का? प्रत्येक क्षण उत्पादक (productive) वा सृजनशील (creative) का असायला हवा? ह्या वृत्तीने हल्लीच्या लहान मुलांचे आयुष्य पालकांनी व्यस्त करून टाकले आहे. शाळा नसेल तेंव्हा अभ्यास, हे दोन्ही नसेल तेंव्हा व्यक्तित्व विकासाचे वेगवेगळे क्लासेस, नाहीतर कुठली तरी कला शिकण्याचे क्लासेस किंवा आणखी काही.

काहीच न करण्याचा, नुसता वेळ घालवण्याचा विचार फारसा पटला नाही पण काम नव्हते आणि मोकळ्या वेळात फार काही उत्पादक वा सर्जक घडले नाही त्यामुळे निरूद्योगीपणाची वा वेळ वाया घालवण्याची अनुभूति मिळाली आणि सोबत वर्षभर भरपूर आराम आणि फिरणे  झाले. ह्या वेळ घालवण्याचे छान उदाहरण म्हणजे हा ब्लॉग ३०-३१ डिसेंबरला वा शेवटी १ -२ जानेवारीला लिहिला जाण्या ऐवजी आज १५ जानेवारीला लिहिला जातो आहे...... थोडक्यात असे आगळे वेगळे अनुभव देत सरले माझे वर्ष २०१५ !!!  

आत्ता जरी नुसताच काही न करता वेळ घालविणे एक प्रकारे योग्य ठरवित असलो तरी तसे क्षण घालविणे अवघड असते .... ब्लॉग लिहताना आलेल्या ह्या उलट सुलटं विचारातून सुचलेल्या काही ओळी पुढील प्रमाणे ........

कविता – येणे क्षणांचे

सुख-दुःखाचे, भरलेले – रिकामे,
सर्जक – वांझ, बंदिस्त – मोकळे
जखडणारे - घडविणारे - मोडणारे
अगणित प्रकारचे अकल्पित
अविरत, अखंडपणे येणारे क्षण .........

क्षणांना टाळण्याचे वा निवडण्याचे
स्वातंत्र्य कुठे कुणाला असते ? ||

येता सतत सुखी, भरलेले, सृजनाचे क्षण वाट्याला
लागले वाटू ओझेच तयांचे
जणू दुःख असावे अतीव सुखाचे
येता शेवटी रिकामे, मोकळे, वांझ क्षण वाट्याला
कळले असते ओझे असह्य तयांचे
जणू मोडल्या खांद्यांवर प्रिय च्या देहाचे    ||

क्षणांना टाळण्याचे वा निवडण्याचे

स्वातंत्र्य कुठे कुणाला असते ? ||

3 comments: