Thursday, 31 July 2014

कविता – कशाला नांव ठेवायची आपल्या पूर्वजांना


दिनांक - ३१/०७/२०१४ 

हि कविता मी २० वर्षापूर्वी लिहिलेली, तिला revise केली त्यादिवशी मनात एक विचार आला हे थोडे अतिरंजित चित्र आहे, अजून हि कविता relevant आहे का ? अजूनही TV अथवा वृत्तपत्रे किंवा नव्याने आलेली सामाजिक संकेत / माहिती स्थळे अश्या सार्या गोष्टी दाखवतात का? हा प्रश्न मला पडला कारण मी शक्यतो TV वर दाखवल्या जाणार्या बातम्या पाहायचे सोडले आहे. मनात ह्या कवितेच्या relevance चा प्रश्न आला म्हणून हि कविता ब्लोगवर ठेवली नाही. पण २६/०७/२०१४ रोजी घरी रात्री जेवताना TV पाहत होतो आणि TV वर जे पहिले त्यावरून हे जाणवले कि फारसे बदलले नाही. सर्व news channels पुन्हा पुन्हा बैतुल - मध्यप्रदेश येथल्या नदीत आलेल्या पुरामध्ये बुडालेल्या रस्त्यावरून जाण्याचा प्रयत्न करणारा मोटरसायकल चालवणारा तरुण कसा वाहून गेला त्याची चित्रफित दाखवीत होत्या आणि जाणवले कि फार काही बदलेले नाही. त्यानंतर लगेच हि कविता ब्लोगवर ठेवावी असे मनात आले पण व्यस्तते मुळे शक्य झाले नाही. मला आजही वाटते कि अश्या रक्तरंजित वा दुर्दैवी घटना दाखवल्या जाऊ नयेत वा वृत्तपत्रात छापल्या जाऊ नयेत.   

कविता कशाला नांव ठेवायची आपल्या पूर्वजांना – (दिनांक – २१/०७/२०१४)


कशाला नांव ठेवायची आपल्या पूर्वजांना

दोष्याना दिलेली जाहीर फाशी,

गुलामांची रक्तरंजित द्वंद,

हत्तींची साठमारी,

विरंगुळा म्हणून पाहणारया   |


कशाला नांव ठेवायची आपल्या पूर्वजांना

आपणही वाचतो सकाळी सचित्र वृत्त चविष्टपणे

निर्घृण हत्यांची,

बलात्कारांची,

अमानवीय व्यवहारांची,

वाफाळलेल्या चहाच्या घोटासमवेत

आणि लागतो दिनक्रमाला 

काहीच घडले नसल्याप्रमाणे     |


कशाला नांव ठेवायची आपल्या पूर्वजांना

संध्याकाळी थकल्याभागल्या

मनांना, वृतीना, विरंगुळा म्हणून

टेलीविझन दाखवत असतोच जिवंत चित्रे

इथियोपियात/मेळघाटात भुकेन मरणाऱ्यांची

अमेरिकेत शाळेतील अंदाधुंद गोळीबारात मेलेल्या तान्हुल्यांची

भारतात अन्न विषबाधाने मेलेल्या कोवळ्यांची

गेलेल्यांसाठी आक्रंदणारया लोकांची, आयांची

आपणही सैलावतो जिवंत चित्रांसोबत सुंदर संध्याकाळसाठी |


एखाद्या भाग्यशाली दिवशी

पहायला मिळते जिवंत प्रक्षेपण निवेदनाने रंगलेले

बोरवेल मध्ये पडलेल्या लहानाल्याला

वाचवण्याच्या अयशस्वी प्रयत्नांचे, मृत्यूचे

अतिरेक्यांनी केलेल्या लोकांच्या शिरच्छेदाचे

पाहतो हे सारे आपणही

कधी दारूच्या घोटाबरोबर

कधी मुलाबाळासमवेत जेवणाबरोबर

आपणा कोणाचीही

पापणीही फडकत नाही

घासही अडकत नाही

कशाला नांव ठेवायची आपल्या पूर्वजांना |

कशाला नांव ठेवायची आपल्या पूर्वजांना  ||


(originally composed around 1994 revised thoroughly on 21st July 2014)

No comments:

Post a Comment