कविता – माझ्यातले हिमलर, हिटलर इत्यादी - दिनांक – ०३/०७/२०१४
उडत्या पाखराला गोळी घालण्यासारखे
उडत्या मच्छराला हातानी मारण्याचे
कसब साध्य झालंय मला ||
मच्छरनाशक, मच्छरदाणी वापरतच नाही हल्ली मी
बंद करून खोली हाताने फटाफट मारू लागतो मच्छर मी
अर्जुनाला दिसत असे पक्षाच्या डोळा एकच
मलाही दिसत असते मच्छर फक्त एकच ||
मच्छराच्या मुठीत चिरडून फुटण्याने
हाताला जाणवणाऱ्या ओलसर किळसवाण्या स्पर्शाने
वेडपिस, क्रौर्यमस्त व्हायला होत मनाने
एक, दोन, तीन ....मच्छर चिरडत जातो हाताने
वाढते हाव त्यांना मारण्याची क्रमाक्रमाने ||
निसटलाच एखादा मच्छर हातातला
तर जीवाच्या आकांताने सैरभैर पाळणाऱ्या मच्छरला
पिसाटासारखा मागे लागून शेवटी ठेचतोच त्याला ||
आताशा मला माझ्यातलेच
हिमलर, हिटलर, इदी अमीन उमजू लागले आहेत,
माझ्या रोमारोमात रुजू लागले आहेत ||
(Revised
on 3rd July 2014 –
10.0 to 11.30 pm at Vimannagar, Pune)
No comments:
Post a Comment