Monday, 7 July 2014

कविता – हो आत्ममुक्त

कविता हो आत्ममुक्त - दिनांक ०२/०७/२०१४


लवकरच लादले जाऊ लागेल
ओझे अपेक्षांचे तुझ्या इवल्याश्या खांद्यांवर
खांदे बळकट होतील, पुढे जाता मोडतील
ओझे मात्र कायमच राहील

दिला जाईल देव आणि सैतान तुला
सीमित करणारा तुझ्या बुद्धीला, कल्पनेला
आपसूक तू शिकशील
भेदाभेद मानवामानवातील

आम्हीच गिरवून घेऊ
धुळाक्षरे अनीतीची असत्याची
तुझ्याच हातून चिणून घेऊ
तटबंदी तुझ्या भोवती साचेबंद ज्ञानाची

जेत्यांच्या इतिहासातून घ्यायचा अहंगंड
की मानवी क्रौयातून न्यूनगंड
जीवनाच्या संगतीमधून बसवायचा बागुलबुवा देवाचा
की असंगतीमधून बसवायचा बागुलबुवा दैवाचा
हे ठरवावे लागेल तुझे तुलाच
जरी सर्वांनी आपापला सल्ला दिलाच   ||

उमजलीच हि तुझी जडणघडण कधी
होईल आत्यंतिक तगमग मनाची आधी
एकवटून आदिम स्फुलिंग आत्म्याचा
चेतव वन्ही विद्रोहाचा
कर उद्वस्त तटबंदी, शृंखला साऱ्या
अन हो आत्मप्रज्ञ, आत्ममुक्त ||

(original composed on -------------------- revised throughly on 2nd July 2014 11-0 to 12.0 pm) 

2 comments:

  1. लेकाला घडवताना, किंवा तो घडताना बाबाचा हा खरंतर त्यांच्याशी आणि स्वतःशीच संवाद…. बरे वाईट, यश अपयश, कवेत घ्यावयाची शिखरे या पलीकडला. जगण्यातल्या अनवट जागा दाखवून देणारा!
    पुन्हा एकदा जुनीच आठवण, या सगळ्या कविता आधी इथे ठेवण्यापूर्वी, एकत्र करा, डिजीटल फॉर्म मधेच कदाचित, आणि एखाद्या खास कारणांनी त्या दोघांना त्या भेट द्या. आज सर्व कवितांचे अर्थ पोचतील ना पोचतील, पण एक दिवस नक्की सारे उमजेल. त्या वेळी ह्या "बाबाच्या कविता" त्यांच्या साठी अक्षय ठेवा बनेल.
    पण इथे आधी पोस्ट करून मग त्या कविता त्यांना भेट देण्यात काही मजा नाही… आधी एक हाती त्या साऱ्या कविता एकत्र करा, आवश्यक ते संस्करण करून त्यांना त्या द्या आणि मग जशा जमतील तशा ब्लॉगवर येवू देत. बघा पटतंय का?

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete