Wednesday 18 March 2015

शोध अज्ञाताचा, साधण्या संवाद अज्ञाताशी .....१

ब्लॉग दिनांक – १८/०३/२०१५ – शोध अज्ञाताचा, साधण्या संवाद अज्ञाताशी .....१ 


अमेरिका प्रवासाच्या आधी कवितांद्वारा जो अज्ञात आहे त्याच्या विषयी विचार, संवाद सुरू झाला होता पण अमेरिकेतली दोन महिन्याच्या एकटेपणात, एकांतात हा संवाद वाढला आणि त्या काळात सर्वात अधिक कविता ह्या सूत्राला धरून झाल्या. मी एकाच वेळी आस्तिकही आणि नास्तिकही होतो. कॉलेज शिक्षण आणि त्यानंतरच्या काळात विविध वाचनाने मी वैचारिक पातळीवर/स्तरावर नास्तिक झालो होतो पण मुलांची किंवा स्व‍कीयांची आजारपणे किंवा कुठल्याही प्रकारची संकटे आप्त स्व‍कीयांवर आली की मात्र देवाचा धावा करणारा म्हणजे आचाराच्या पातळीवर आस्तिकच होतो. स्वतःमधला हा विरोधाभास, मतलबीपणा खटकत होता. आस्तिकता आणि नास्तीकते मधील त्रिशंकू अवस्था मनात अनेक प्रश्न उभे करू लागली होती, अर्थात आजही नास्तिकता वाढली असली तरी आस्तिकता पूर्ण गेलेली नाही आणि आजही तीच त्रिशंकू अवस्था, मनात तोच गोंधळ, तोच विरोधाभास आहे म्हणून आजही अज्ञाताला जाणण्याच्या कविता लिहितो आहे मी. देवाला/अज्ञाताला भजण्या / पामण्या साठीच्या वा त्याला नाकारण्या / दुस्वासण्या साठीच्या ह्या कविता नाहीत. ह्या कविता म्हणजे माझा मी घेत असलेला स्वतःचा आणि अज्ञाताचा शोध आहे तो अजून अधूरा आहे. ‘शोध अज्ञाताचा, साधण्या संवाद अज्ञाताशी’, ह्या मालिकेतील  अमेरिकेत पोचल्या नंतर तिथल्या एकांतवासात, एकटेपणात झालेली पहिली कविता सादर ....

  कविता – वाटलं नव्हत कधी अशी संधी मिळेल (मूळ कविता १८/०५/१९९६, पुनर्लेखन १८/०३/२०१५)

(मूळ कविता १८/०५/१९९६ Portland, USA दुपारी २.४५ ते ३.३०; पुनर्लेखन १८/०३/२०१५ विमाननगर पुणे दुपारी)

वाटलं नव्हत कधी अशी संधी मिळेल
नसलेल्या की असलेल्या
नसूनही असलेल्या वा असूनही नसलेल्या
तुझ्याबरोबर एकांतात असण्याची
एकमेकात एकमेकांना पाहण्याची             ||

एकांतात स्वत:शीच असणे
म्हणजेच तुझ्याबरोबर असणे
तुझ्याजवळ आल्यावर मी बोलत राहतो स्वतःशीच
असंबद्धपणे अनेक गोष्टींविषयी
तापाने भ्रमिष्ट झाल्यासारखा;
तू काहीच बोलत नाहीस
बोलणारही नाहीस
जाणवून देशील क्वचित तुझं अस्तित्व
धुक्यातल्या दंवाच्या ओलाव्यासारखे
विसंगतीत जाणवलेल्या संगती सारखे            ||

तू अमिती आरसा
तुझ्याबरोबर असणे म्हणजे
आरशारूपी तुझ्यात पडलेल्या प्रतिबिंबाशी
आत्मघाती द्वंद्व
तू हस्तक्षेप करीत नाहीस
करणारही नाहीस
हे द्वंद्व निरंतर चालणारे
तू मला तुझ्यात सामावेपर्यंत  
वा मी तुझ्याकडे पाठ फिरवेपर्यंत               ||

तुझ्यापासून दूर जाणे शक्य नसते
स्वतःपासून दूर जाणेही शक्य नसते
कितीही टाळले तरी खेळावेच लागते
हे आत्मघाती द्वंद्व
तुझ्यातल्या माझ्या प्रतिबिंबाशी             ||

वाटलं नव्हतं कधी अशी संधी मिळेल
तुझ्याबरोबर एकांतात असण्याची 

स्वतःशी अंतिम द्वंद्व खेळण्याची           ||

No comments:

Post a Comment