Sunday 22 March 2015

शोध अज्ञाताचा, साधण्या संवाद अज्ञाताशी .....३ - कविता – ये अज्ञाता ये

दिनांक – २२/०३/२०१५ – शोध अज्ञाताचा, साधण्या संवाद अज्ञाताशी .....३  


अगदी प्राचीन काळ सोडला तर काही पिढ्यांपूर्वी  देवाला न मानणे, नाकारणे हे अत्यंत अवघड होते. आपल्या इथे धार्मिक सहिष्णुता होती म्हणजे जो पर्यंत माणूस सश्रद्ध आहे तो पर्यंत त्याने अमुक एक देवच वा उपासना पद्धत मानली पाहिजे अशी सक्ती नव्हती पण त्या व्यक्तीने त्याच्या जातीचे, समूहाचे नीति नियम पाळणे आणि दुसर्‍यांच्या बाबतीत ढवळाढवळ न करणे हे त्याला इतरांकडून/समाजाकडून सहिष्णु वागणूक मिळण्यासाठी जरुरी होते. आता आपल्या येथे देवाला न मानणे अथवा धर्मपरिवर्तन करून दुसऱ्या देवाला मानणे शक्य झाले आहे पण देवाला मानणे किंवा त्याला न मानणे, देवावर श्रद्धा असणे वा नसणे म्हणजे आस्तिक वा नास्तिक असणे, हे ठरविण्या विषयीचा माझा किंवा आपल्या आणि पुढल्या पिढीतल्या अनेक लोकांचा मुख्य प्रश्न म्हणजे काहीच समजत - उमजत नसताना मिळालेली  देव / धर्म ही संकल्पना / संस्था. आपल्याला मुख्यत्वे पुढील तीन –चार स्वरुपात देव ही संकल्पना मिळते – १. देवाची भक्ती केली तर तो आपल्या इच्छा पुऱ्या करतो, संकटे दूर करतो, आपण चुका केल्या तर नियती अथवा यम दंड देतो पण देव हा माउली आहे, प्रेमळ आहे त्याला शरण गेल्यास तो आपल्या चुका पोटात घेतो आणि आपल्याला चुकांच्या शासनातून, दंडातून वाचवतो किंवा २. या उलट देव रागावतो, कोपतो, शासन देतो त्याला प्रसन्न ठेवण्यासाठी, करण्यासाठी हे करावयास हवे, ते करावयास हवे अथवा ३. देव कर्ता-करविता आहे, सारे काही त्याच्या इच्छेने होते  इत्यादि.

आज कायद्याने आणि इतर बाबातीमुळे शक्य असले तरी सज्ञान झाल्यावर देवाला आपल्याला उमजलेल्या / पटलेल्या स्वरुपात स्वीकारणे वा त्याला काही / पूर्ण अंशी नाकारणे हे फार मोठे दिव्य होऊन बसते कारण लहानपणी झालेले देवाचे संस्कार (childhood conditioning). हे  जितके खोल तितके ते पुसून काढून (process of unlearning) देव नाकारणे अवघड होते. त्याला नाकारता नाकारता स्वीकारत रहाणे, त्याच्या विषयी विसंवादी, विरोधाभासी भूमिका उघडपणे घेण्यापेक्षाही / इतरांना ती जाणवण्यापेक्षाही स्वतःला स्वतःच्या अंतर्मनात, आचरणात ती जाणवणे आणि ह्या त्रिशंकू म्हणा, दुटप्पी म्हणा, गोंधळलेल्या अवस्थेविषयी काय करावे ते न सुचणे, ठरविता येणे हे सारे देवाविषयीच्या माझ्या कवितांमध्ये दिसते असे मला वाटते.

माणसाला तो सज्ञान होईपर्यंत जर देव / धर्म इत्यादि काही न देता त्याला फक्त समता, बंधुता, मानवतेची  नैतिक मुल्ये देण्यात आली आणि सज्ञान झाल्यावर तो  देव / धर्म ही संकल्पना घेऊ अथवा नाकारू शकला तर किती बरे होईल.........

 कविता – ये अज्ञाता ये (मूळ लेखन ३०/०५/१९९६; पुनर्लेखन २१/०३/२०१५)

(मूळ लेखन ३०/०५/१९९६, Washington, USA दिवसभरात, पुनर्लेखन २१/०३/२०१५ बडोदे घरी सकाळी)

जाणता अजाणता केलेल्या चुका
होऊन रक्तपिपासू जळवा मन:शांति शोषतात
काढल्या तर व्रण त्यांचा राहतो भळभळत         ||

छोट्या-मोठ्या, गंभीर-नगण्य चुका
वाढतात कॅन्सर सारख्या मनाच्या आत  
कापूनही मनाला पुनःपुन्हा मूळं अक्षयचं राहतात    ||

होऊन सावल्या भेडसावणाऱ्या साऱ्या चुका
पळवितात मला रक्त ओकेपर्यंत
पळता दूर, लांबच लांब विक्राळ होतात      ||

तुझ्याकडे क्षमेसाठी यायचे तर तक्षक तर्काचा
होरपळतो विषारी फूत्कारांनी
गठाळून टाकते अनामिक भीती दंडाची            ||

मी हा असा शोषित, क्षत वीक्षित, दिवाभीत  
येऊ पाहतोय तुझ्या अलौकिक प्रकाशात
घेण्या शासन, उभं रहायचे आहे मला
घेऊन पायाखाली चुकांच्या सावलीला
ये अज्ञाता ये
होऊन शासन माझ्या चुकांचे
कर काहीही माझे
अखेरीस मात्र घे जवळ

आईसारखा                ||


1 comment:

  1. पालक म्हणून हि एक प्रकारे पळवाट झाली की मी माझ्या मुलास योग्य शिकवण देऊ शकत नाही. देव मान किंवा नको मानू नकोस हे ठामपणे सांगू शकत नाही कारण इतक्या वर्षांत मलाच कदाचित ते उमगले नाही. खरं पाहता आता टीन एज मध्ये असणाऱ्या मुलांचे आईवडील किंवा त्या आधीचे असणाऱ्या बहुतांशी लोकांवर "देव/धर्म आहे असे अस्तिक संस्कार" झाले असता जर आपल्याला मोठेपणी आपली एक ठाम भूमिका घेता येत नसेल आणि म्हणून मी सोयीची भूमिका घेत म्हणायचे सज्ञान झाल्यावर काय ते ठरवू देत त्याला......... not fair :(

    किती अवघड होऊन बसेल एखाद्यासाठी सज्ञान झाल्यावर देव/धर्म हि संकल्पना स्विकारणे किंवा नाकारणे. हे म्हणजे सज्ञान झाल्यावर अचानक एखाद्या व्यक्तीने तुम्हाला मी तुझा बाप आहे, मला बाप मान असे सांगितले तर कोणी मानेल का? किंवा हे ज्यांना तू समजतोस ते तुझे आईबाप नाहीत तर कोणी ते मानेल का? तसे होऊन बसेल. मुळात आताच्या स्ट्रेसफूल जगात सज्ञान होईपर्यंत त्याला कोण आधार देईल? काही गोष्टींवर विश्वास ठेवायला शिकवावे लागते मुलांना. जसे कि स्वत:च्या क्षमतेवर विश्वास, जगातल्या चांगुलपणावर विश्वास तसंच काही गोष्टी अगदी आपल्या हाताबाहेर असतात या गुहीतकावर विश्वास. आईबाप म्हणून आपण त्यांचे सारे प्रॉब्लेम्स सोडवण्यास सक्षम असतो का? आपल्यापरीने ते करत असू ही, आपल्या परिने आधारही देत असू पण तो पुरेसा आहे का? कदाचित हो, कदाचित नाही.

    त्यापेक्षा योग्य वयात योग्य शिकवण दिली जाणे हे योग्य नाहीये का? सर्व स्तरावरच… कारण एका ठराविक वयानंतर घराच्या संस्कारांपेक्षाही मोठा पगडा, मोठी घडण सभोवलाचा समाज करत असतो. त्यामुळे घरी आईबापांनी एक शिकवायचे समाजाने वेगळेच आणि काय नक्की स्वीकारू या द्विधेत बिचारी मुले.

    मुळात या समाजात हा सर्वात मोठा बदल घडेल का कधी कि कोणताही धर्म, कोणतीही जात तुमची असो, ती तुमच्या चार भिंतींच्या आत. समाजाला, सरकारला त्याच्याशी काही घेणे देणे नाही. त्याचे प्रदर्शन तुम्ही घराबाहेर करावयाचे नाही. यातून एक चांगले घडेल कि देव/धर्म यासाठीचे संस्कार बाहेरून येणार नाहीत.

    मग मी एक भूमिका रुजवू शकते. देव म्हणजे घरात असलेल्या किंवा नसलेल्या मूर्ती नाहीत, कोण्या एका स्थानात, कोण्या एकाच दगडात तो वसतो असेही नाही. ती तुझ्या माझ्या सारखा माणूस नाही त्यामुळे माणसाची जात करते ते देवाण घेवाणीचे नियम तिथे लागत नाहीत. माणसांसारखी पेढे, नारळ, फुले अजून काय याची लाच घेत इच्छा पुऱ्या करणारा तो "देव" नव्हे. किंवा यातले मी काहीच केले नाही म्हणून माझ्यावर डूख धरून माझे वाईट करतो तो ही "देव" नाही. माझ्या अथक प्रयत्नांना जिथे मर्यादा येतात आणि तरीही गोष्टी घडतात ते घडवणारी शक्ती म्हणजे देव. माणसाच्या आकलना पल्याड असंख्य गोष्टी घडतात चांगल्या/वाईट तेंव्हा तो जो कोणी कर्ता तो देव. तरीही माझे जे काही चांगले वाईट घडण्यास तो जबाबदार नाही. त्याला देव म्हणूनच संबोधले पाहिजे असे नाही. त्याला पुजलेच पाहिजे असे नाही पण पण ते करायची इच्छा असेल तर कोणी करू शकतो. जी या विश्वाचे नियंत्रण करते ती हि शक्ती. तिचा स्वीकार कसा करायचा, आपल्या आयुष्यात तिचं काय स्थान असावे हे व्यक्ती सापेक्ष. कदाचित त्यात वेळोवेळी बदलही घडतील. देव म्हणजे गणपतीच, देव म्हणजे एखादी देवीच, देव अल्लाच, देव म्हणजे येशूच असे नाही. पण जर कोणास या रुपात त्या शक्तीला मानावयाचे असेल तरी ठीकच ना. पण जे काही मानायचे, ज्यावर विश्वास ठेवायचा तो आपल्या मनात, जास्तीत जास्त घरात. त्याचे समाजात रस्त्यावर जाऊन प्रदर्शन नाही करायचे. इतरांना त्या गोष्टींसाठी वेठीस नाही धरायचे.

    ReplyDelete