Sunday 8 June 2014

नोकरीतल्या कविता १ - “साहेब काही द्यायचे का?

नोकरीतल्या कविता १
आपल्या सर्वांच्याच आयुष्यात काही प्रसंग, अनुभव असे विलक्षण येतात कि आपण नखशीकांत हादरून जातो, आपल्या अस्तित्वाच्या प्रयोजनाचा विचार करू लागतो आणि मग बदलतो. एप्रिल १९८९ मध्ये बडोदे महानगरपालिकेचा chief accountant झालो त्याच्या काही दिवस आधी विषारी दारू पिऊन अनेक व्यक्ती मेल्याची दुर्दैवी घटना घडली होती त्यात महानगरपालिकेचे अनेक कर्मचारी पण होते. Chief accountant ची एक महत्वाची कामगिरी म्हणजे निवृत्त, मृत कर्मचाऱ्यांचे पेन्शन केसेस, ग्रच्युईटी इत्यादी मंजूर करणे. महानगरपालिकेमध्ये १५००० हून अधिक कर्मचारी आणि १५०० अधिक पेन्शनर होते त्यामुळे रोजच कुणाच्या निवृत्तीचा, मृत्यूचा पेन्शन केस सहीसाठी समोर येत असायचा. Chief accountant होण्याआधी पाच सहा वर्षाची नोकरी झाली होती त्यामुळे पालिकेत चालणाऱ्या अनेक प्रकारच्या अवैध / भ्रष्ट व्यवहारांची माहित होती. अश्या व्यवहारांची माहिती असणे, आपण स्वतः त्यापासून शक्य असल्याने दूर राहू शकणे हे म्हणजे पाण्यापासून दूर सुरक्षित अंतरावर (शक्य असल्याने) उभे राहून पाण्याच्या ओघाला पाहणे, पाण्यातल्या भोवऱ्याना आणि इतर धोक्यांना पाहणे. हे सारे दूर सुरक्षितपणे घेतलेले अनुभव पाण्यात पडायला लागल्याने अथवा स्वतः पाण्यात पडून पाण्यातल्या सार्या गोष्टींचा सामना करण्यापेक्षा खूप वेगळे असतात. Chief accountant झालो आणि मला त्या पाण्यात पडल्यासारखे झाले आणि सार्या अनुभवांची अनुभूती / परिमिती बदलली. पाण्यात राहून पाण्याशी दुष्मनी न करता ओले न होण्याचे दिव्य होते ते.
नव्याने Chief accountant झालेल्या माझ्या समोर कागदपत्रांवर सही घेण्यासाठी येऊन उभ्या राहिलेल्या निरक्षर, गरीब, असहाय्य विधवेने विचारलेल्या प्रश्नामुळे मी नखशिखांत हादरलो, भ्रष्टाचार कुठल्या पातळीवर आहे मला काय भोगावे लागणार आहे हे हि कळले, पण त्याचबरोबर पेन्शन प्रक्रियेत मी ज्या काही सुधारणा पालिकेत नंतरच्या काळात केल्या त्याचा पाया पण ह्याच प्रश्नाने रचला गेला
हि कविता माझ्या त्या अनुभवाला शब्दबद्ध करणारी ------

कविता - साहेब काही द्यायचे का?

नियतीने नुकत्याच फिरवलेल्या
पांढऱ्या रंगाच्या फटकाऱ्याने रंगलेल्या   
आतून काळोखलेल्या
अस्तित्वाचा मूलाधार हरवलेल्या
पांढऱ्याफटक तरण्या, मध्यमवयीन, वृद्ध स्त्रिया    
माझ्यापुढे येत राहतात        
घेण्यासाठी सरकारी मोबदला
नियतीने लुटून नेलेल्या
त्यांच्या इंद्रधनू रंगाचा ||
मी चुकवतो तो कवडीमोल मोबदला
कर्तव्य नव्हे तर सुहृद भावनेने
दोघांपाशी शब्द नसल्याने संवाद शक्य नसतो
मी हि टाळतो
अचानक शब्द येतात
त्या विखुरलेल्या अस्तित्वातून
साहेब काही द्यायचे का?
त्या नंतर मी पांढराफटक, विखुरलेला
कदाचित त्यांच्याहून अधिक ||

(revised on 08/06/2014 in morning 1.0 am to 10.0 am)

2 comments:

  1. ही कविता वाचताना माझे डोळे नकळत भरून आले. पुर्वी कधी मला या अशा गोष्टी, कविता वाचताना - "काही लोकांना वास्तव अती रंजीत करून जगासमोर आणणे फार आवडते असे वाटे." पण आता हे तुमच्या कडूनच येते आहे तेंव्हा ती शक्यता नाही. सत्य कटू असते इतकेच नव्हे तर ते जीवघेणे असते हे पटावे अशी ही कविता.

    ReplyDelete
  2. Nice..... Very Nice..... अगदी अंगावर शहारे आले.

    ReplyDelete