Thursday 19 June 2014

कविता – महानगर

कविता – महानगर

ह्या अवाढव्य महानगरावर

प्रतिसूर्य दिव्यांच्या प्रकाशात

कारखान्यांनी सोडलेल्या रंगीबेरंगी धुरात

दाटीवाटीने उभ्या इमारतींच्या घरांमध्ये

आभाळही न दिसणाऱ्या त्यांच्या खिडक्यांमध्ये     

आभाळ दिसणाऱ्या नर्कमय झोपडपट्ट्यांमध्ये

मांगल्याची, चैतन्याची, नवसृजनाची प्रतिक पहाट

आता कधीच उगवत नाही

येते इथे ती प्रेताचा पांढरेपणा लेवून

क्षितिजावर दिवसरात्रीला विलगून

जाते कधी निघून

ते अहोरात्र जागणाऱ्या

ह्या महानगरातल्या कोणालाही

कधी कळतच नाही

कधीच कळत नाही --------   ||१||

(originally composed on 10th January 1995 during 9.0 to 9.10 pm and revised on 16th June 2014 12.30 to 1.00 pm at Pune )

ह्या अवाढव्य महानगरात

संध्येच्या भाळी असत

लादलेले अकाली मरण

लोकल्स, बसेस, कार्समध्ये गुदमरत

सरल्या फोल क्षणाचे ओझे वाहत

घरी परतणाऱ्या श्रांत शरीराना 

त्याहून क्लांत मनांना,

उभारीच नसते

रया गेली तरीही तोंडाला रंग फासून येणाऱ्या

संध्येकडे पाहण्याची

सोडियम, मर्क्युरी, नियोन, फ्लुरोसंट दिव्यांचा प्रकाश                                   

गपकन घास करतो संध्येचा

अन रात्र उतरते

लेवून अंधारवस्त्र

कृत्रिम प्रकाशाने विसविशलेले, जर्जलेले  ||२|| 

(originally composed on 11th January 1995 0.00 to 0.30 am, revised on 16th June 2014 1.0 to 1.30 pm)

या अवाढव्य महानगरातली

रात्र विसविशीत अंधारवस्त्रातली 

अविरत धडधडणाऱ्या यंत्रांनी          

यंत्रवत, निशाचर माणसांनी

भगभगणाऱ्या प्रतिसूर्य दिव्यांनी

अनैसर्गिक वासनांनी-वृतिनी

पिंसपिंस झालेली, क्षत-विक्षत झालेली

नर्म शृंगार, कलांचा रंगोत्सव, संजीवनी स्पर्श हरवलेली

महानगरातली अशी हि रात्र

घेत नाही कुशीत कुणाला

मायाळू चौघडी होऊन

गाडून टाकते चराचराला

देहधर्माची जडशीळ चादर होऊन |


या अश्या अॅबसरड रात्रीत 

नाक्या नाक्यावरच्या लेडीज बार्समध्ये

नग्न नुमाईश रुपाची

प्रथा सामुदाईक उपभोगाची 

जुळत नाही अद्वैत शरीरमीलनातून मनाचे

घडतो फक्त देहधर्म ओरबाडून लक्तर मनाचे 

नक्षत्रांनी भरजरीत अश्या अंधारवस्त्राने

नग्नतेला झाकणारी रात्र

स्वतःच नग्न या महानगरात ||३||


ह्या अवाढव्य महानगरात

पहाट नाही मांगल्याची,

सांज नाही रंगांची

रात्र नाही मायेची

दिवसरात्र इथे ससेहोलपट जीवांची

अटळ फरफट काळासोबत जीवांची ||४||


(originally composed on 11th January 1995 9.00 am to 11.30 am, revised on 16th June 2014    4.0 to 5.30 pm)

1 comment:

  1. Suggestions : जीवाची -> प्रेताळलेल्या जीवांची. रुपाची -> रुपाची रुप्याची, अॅबसरड ?
    दोन ओळीत जागा वाढवावी. शब्द नीट दिसत नाहीत. नर्म नम तर शृंगार शगार वाटते. तेवढेच वाचायला फावेल.
    कधी काळातच नाही एकदाच असावे. तेथे छोटीशी कविता संपल्यासारखे उगाच वाटते.

    बाकी छानच! एखादी फडकती होउन जावू दे. अच्छे दिन आयेंगे | हम ही तो लायेंगे |

    ReplyDelete