Sunday 29 June 2014

कविता – भरलेले निरर्थक रकाने

नोकरीतल्या कविता २  
एका सरकारी संस्थेचा ( महानगरपालिकेचा) चीफ अकौंटट म्हणून कोणाचे पेन्शन पेपर्स सही करून त्याला वेळीच पेन्शन आणि इतर निवृत्तीचे लाभ देणे हे मला पुण्याचे काम वाटत असे पण त्याच बरोबर ते काम मला वेळोवेळी उदास करत असे, आत्ममनस्क करीत असे कारण उभ्या आडव्या निर्जीव, निरर्थक रकान्यांच्या कागदपत्राना भरून, सही करून कोण्या एकाला इतिहास केले जात असे, त्याच्या त्या व्यवस्थातंत्रातील अस्तित्वाला इतिहास केले जात असे. त्याही पुढे ती व्यक्ती गेल्यावर तो इतिहास आणखी खोल गाडून टाकला जात असे आणि शेवटी कालांतराने तो गाडलेला इतिहास काढून पुन्हा काही रकाने दुसर्या कागदांवर भरून नष्ट केला जात असे. तो इतिहास शेवटला पूर्ण नष्ट करताना माझ्या मनात न्यायाधीशाने काहीही म्हणणे एकूण न घेता एखाद्याला फाशीची शिक्षा द्यावी असा भाव दाटत असे मन विषण्ण होत असे.
बारा वर्षापूर्वी माझेही एका संस्थेतले आयुष्य, अस्तित्व हंगामी इतिहास झाले आहे, मी या जगातून गेलो कि ते कायमी इतिहासात बदलेल आणि मग कालांतराने नष्ट केले जाईल. ह्यात काही चुकीचे नाही, काळाच्या प्रवाहात ते होणे क्रमप्राप्त, पण मला ते जेंव्हा इतरांच्या बाबतीत करावे लागले, त्याची जी अनुभूती आली त्याविषयीची हि कविता ..........     

कविता भरलेले निरर्थक रकाने दिनांक – १०/०६/२०१४


माझ्या सहीसाठी आलेल्या

उभे-आडवे अनेक रकाने असलेल्या कागदांवर  

मांडलेला असतो ताळेबंद

कोण्या एकाने व्यवस्थातंत्रात खर्चलेल्या आयुष्याचा

त्याला देणेपात्र मोबदल्याचा ||



कागदावरचे रकाने, अक्षरे, आकडे

त्याच्या सरून गेलेल्या आयुष्याबद्दल

काहीच न सांगणारे, निरर्थक

मनातले सारे भाव निपटून

मी एक रकाना भरतो त्याच्या आयुष्याबद्दल ||


पुढे पुन्हा येतील हेच कागदपत्र

जीर्णशीर्ण झालेले

माझ्यापुढे वा या खुर्चीतल्या दुसऱ्यापुढे

भरल्या गेलेल्या जुन्या रकान्यांपुढे

एक रकाना आणखी भरून

कागद बंद होतील फायलीत

संपवून एक अस्तित्व

ज्या विषयी काहीच नव्हते कागदोपत्री ||


कालांतराने नष्ट केले जाईल

बंद केलेल्या त्या जीर्णशीर्ण कागदपत्रांना

कोण्या एकाच्या अस्तित्वाला

आयुष्याच्या ताळेबंदला  

कुठल्यातरी कागदांवर भरून

आणखी काही रकाने

निरर्थक अक्षरांनी  ||


भविष्यात केंव्हातरी

माझ्याविषयी भरलेले

निरर्थक रकाने ..............  ||

(originally composed ------------ thoroughly revised on 10th June 2014 )

No comments:

Post a Comment