Sunday 29 June 2014

कविता – वारसा

दिनांक - २९/०६/२०१४ 

कविता वारसा ( कवितेचे मूळ लेखन – १९९७ मध्ये)

(पूर्व प्रसिद्धी–‘महाराष्ट्राबाहेरील मराठी’ – २००१, संपादन – निरंजन उजगरे – मॅजेस्टिक प्रकाशन)

हडकुळ्या खांद्याच्या दोन्ही बाजूंस पाय टाकून

एका हातांन

तितकंस ताठ न राहिलेल डोक धरून,

दुसऱ्या हातात बरबटलेला

काळा मुरमुरयांचा लाडू घेऊन,

अनभिषिक्त अढळपदी ऐटीत बसलेला तो,

अर्धउपाशी, पण टवटवीत बाल्य ल्यालेला चेहरा

रंगीबेरंगी दुनिया पाहताना चकाकणारे डोळे .........||


त्याच्या मांडीखाली

पडलेल्या खांद्यांच, मोडलेल्या कण्याच

विझलेल्या डोळ्याचं,

थकल्या मनान, सवयीन यंत्रवत

झपझप चालणार शरीर .....||


खाली चालत असलेले पाय घासले जाऊन

त्याचे नकळत वाढलेले पाय

केंव्हा चालू लागतील

आयुष्य झिजवून टाकणारी खडबडीत वाट,

हे कळणारच नाही.........||


लवकरच

तोही चालू लागेल

सरलेले बालपण

खांद्यावर बसवून


झिजत झिजत...........||

1 comment:

  1. छान कविता. हि दृश्ये सगळ्यांनीच कधी ना कधी पाहिलेली असतात, पण अशा कल्पना फक्त तुम्हालाच कशा सुचतात?

    ReplyDelete