Saturday 28 June 2014

कविता - महानगर २ / शहर

दिनांक - २६/०६/२०१४ 

कविता – महानगर २ / शहर

या मानवनिर्मित पंचतारांकित स्वर्गाच्या
आकाशस्थ मजल्यावरून पाहतोय शहरात उगवणारी पहाट
आजूबाजूच्या गगनचुंबी इमारतींमध्ये, बैठ्या महालांमध्ये अंधार,
त्यातील काही खिडक्यातून दिसताहेत
सुंदर प्रकाशात वावरणारी सुळसुळीत माणसे
खाली जमिनिपाशी रस्त्यांवर, झोपड्यांमध्ये, चाळींमध्ये
पहाटेआधीच्या संधीप्रकाशात दिसणारे
लहान मोठे, मोडके तोडके,
माणसांचे अगणित सिलहाउट
बिनचेहऱ्याचे, बिनअस्तित्वाचे ||

या मानवनिर्मित पंचतारांकित स्वर्गाच्या
आकाशस्थ फिरत्या उपहारागृहातून घेतोय
३६० अंशी फेरफटका शहरातील दुपारीचा   // दुपारच्या शहराचा
बैठ्या-उंच महालातील काही माणसे आत्ता उठताहेत,
काही गेली कामाला वैभवी वाहनातून
तिकडे खाली रस्त्यांवर, झोपड्यांमध्ये, चाळींमध्ये
करीत हलकल्लोळ संमिश्र आवाजांचा, 
हलताहेत माणसे सारी वेगाने, दिशाहीनपणे
बिनचेहऱ्याची, बिनव्यक्तित्वाची होऊन ||

या मानवनिर्मित पंचतारांकित स्वर्गाच्या
आकाशस्थ मजल्यातील वैभवी पिंजऱ्यातून
पाहतोय शहरातील मध्यरात्र
सोबतीला आहेत आजूबाजूच्या बैठ्या-उंची महालातले
मद्यात, शृंगारात, भांडणात, पार्ट्यामध्ये गुंतलेले
तिकडे खाली रस्त्यावरच्या पिवळ्या प्रकाशात,
झोपड्यांमधील अंधारात
दिवसा पिसाटासारखे धावणारे
गतीबरोबर फरफटणारे,
पिळले, शोषले जाणारे
सारणाऱ्या वांझ क्षणांनी उद्वेगणारे, पिचणारे
शहर, त्यातली माणसे झोपली आहेत आता
बिनचेहऱ्याची, बिनप्रकाशाची होऊन  ||

जातो एका शहरातून दुसऱ्या तेथेही
असेच मानवनिर्मित पंचतारांकित स्वर्ग,
बैठे, उंच, प्रशस्त वैभवी महाल
खुज्या झोपड्या, कळकट चाळी, फलॅटची खुराडी   
अशीच पहाट, दिवस, रात्र
अशीच बिनचेहऱ्याची, बिनअस्तित्वाची, बिनप्रकाशाची माणसे
अन असाच निष्क्रिय, मूक प्रेक्षक मी ||

(originally one stanza was composed on 14/02/1997, thoroughly revised during 8.0 am to 10.30 am at home on 28/06/2014)

1 comment:

  1. जर चाळीत, झोपडीत राहणारी माणसे जर बिन चेहऱ्याची, बिन अस्तित्त्वाची असतील, तर महालातील लोकांना तरी ते का असावे? कि फक्त आपण म्हणतो, मानतो म्हणून. उंची हॉटेल मध्ये हजारो रुपये खर्च करून लेकाला जेवू घालणारे लोक आणि दिवसभर काबाडकष्ट करून संध्याकाळी त्याच पैशातून दोन घास लेकराला खाऊ घालणारी आई यात कोण असतं बिन चेहऱ्याचे, बिन अस्तित्वाचे? चष्मा बदलला कि सारे काही वेगळे दिसू लागते ना ….

    ReplyDelete