Sunday, 18 May 2014

नोकरी सोडताना ४ - कविता – संपेल आता दररोजचे

दिनांक – १८/५/२०१४

नोकरी सोडताना ४
बडोदे महानगर पालिकेतील नोकरी जरी २००२ साली सोडली तरी ती सोडण्याविषयीचा विचार १९९७ साली रुजला आणि राजीनामा देणे शक्य नव्हते म्हणून SOCLEENSOCLEEN या संस्थेने घेतलेल्या Baroda Beyond 2000AD या प्रोजेक्टवर deputation वर जाण्याची दरखास्त कोर्पोरेशन कडून मंजूर करून घेतली होती आणि एक वेळ अशी आली होती कि ओर्डर झाली कि प्रोजेक्टवर कॉर्पोरेशन सोडून जायचे, अर्थात ते जाणे झाले नाही आणि कोर्पोरेशन मध्येच २००२ ला नोकरी सोडे पर्यंत राहणे झाले. हि कविता तेंव्हाची जेंव्हा आता काही दिवसात मी कोर्पोरेशन सोडणार असे वाटत होते.  
कविता – संपेल आता दररोजचे

संपेल आता दररोजचे
सत्तेच्या अति-नील प्रकाशाने झळाळलेल्या
कॅबीनमध्ये जाऊन ते सुपरमॅन होणे
कुण्या अज्ञातासाठी सत्ता वापरणे
असहाय्यपणे ते भोगले जाणे
अन अनिच्छेने ते इतरांना भोगणे |

संपेल आता दररोजची
सज्जनातून दुर्जन अन पुंन्हा सज्जन होण्याची
ससेहोलपट ती जीवघेणी ||

संपेल आता दररोजचा
विळखा भ्रष्ट कुत्र्यांचा
तुकडे टाकतोय तो पर्यंत गोंडा घोळणाऱ्या
नाहीतर मलाच खाऊन संपविणाऱ्या  ||

संपेल आता दररोजचे
दुःस्वप्न हे कदाचित माझापुरते
पण सत्तेची ती कॅबीन, त्यात कोणाचे तरी सुपरमॅन होणे
भोगणे, भोगले जाणे, भक्ष्यणे, भक्षिले जाणे
चालूच राहील अव्याहत दररोज ||

(originally composed 4th February 1997 10.0 am to 10.30 am last stranza composed today 5 to 6 pm)

सहज वाचलेले त्यावरून सुचलेले !!!

दिनांक - १५/०५/२०१४

पूर्वी असे मी करीत नसे पण हल्ली एखादा चांगला शेर वाचला अथवा एखादे चांगले वाक्य, सुविचार वाचला कि त्याला कवितेमध्ये रुपांतर करण्याचा मोह होतो. ह्या मोहातून लिहिले जाते तिला कविता नाही म्हणता येणार पण चारोळी म्हणता येईल अर्थात मला चारोळी हि टर्म आवडत नाही. असेच एक इंग्लिश वाक्य वाचले facebook वर, आवडले म्हणून share केले, ते इतरानाही आवडले म्हणून त्यांनीही share केले. त्या इंग्लिश वाक्य वरून केलेल्या मराठी आणि  गुजराती ओळी पुढील प्रमाणे आहेत -

नसे मोकळा तिरस्करण्या मी त्याना
                                          जे तिरस्कारती मला ।
असे व्यस्त प्रेम करण्यात मी त्याना 

                                         जे प्रेमाने नाहती मला ।।

નથી ફુરસત મને, ધિક્કારવાની તેઓને, 

જેઓ ધિક્કારે છે મને ।

છું વ્યસ્ત હું, પ્રેમ કરવામાં  તેઓને,

જેઓ પ્રેમ કરે છે મને ।।

Tuesday, 13 May 2014

कविता – बिनचेहऱ्याचामाणूस १ आणि कविता – बिनचेहऱ्याचामाणूस २

कविता – बिनचेहऱ्याचामाणूस १  

होऊ लागला आहेस तू आता
आमच्यासारखा बिनचेहऱ्याचा
दिसतोय मला तुझ्या डोळ्यातला
प्रश्न गोंधळचा, अविश्वासचा |
पदोपदी देत असतो मीच उपदेश तुला
स्वतःची वेगळी ओळख घडण्याचा  
अवघड आहे तरीही उदाहरणार्थ बघून माझ्याकडे
प्रयत्न कर हा विरोधाभास समजण्याचा
मी आहे स्वतंत्र, यशस्वी
विशिष्ट ओळख असलेला माणूस बिनचेहऱ्याचा ||

कविता – बिनचेहऱ्याचामाणूस २ 

विशिष्ट ओळख असलेल्या माझ्यासारख्या
बिनचेहर्याच्या व्यक्तींचा समूह म्हणजे -------
आपले संभाषण तुटले
छोटा आईला ठणकावून सांगत होता
माझी तुलना दादुशी करू नकोस
मी सगळ्यांपेक्षा वेगळा आहे -------- |

त्याचं संभाषण ऐकून
तुझे मंद समजूतदार हसणे, माझ्याकडे पाहणे
मला उगाचच सहेतुक, खोचक वाटले
नंतर तुझा निरागस (?) प्रश्न –
एकादुसर्याशी तुलना केल्यानेच
आपली ओळख, वेगळेपण सिद्ध होते ना बाबा?  |

मला जाणवला तुझा शब्दांवरील अविश्वास, प्रश्नाचा पोकळपणा
परिस्थिती कशीबशी सावरून घेणारे माझे उत्तर ----
छोट्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस,
तुझ्या ह्या नाजूक पौगंडावस्थेच्या संक्रमण काळात
मुळच्या आदिम, मुक्त, स्वतंत्र विचारांकडे
घसरण्याचा धोका संभवतो तुला      |

एका लौकिकदृष्ट्या यशस्वी बापाच्या
आज पोकळ, खोट्या वाटणार्या शब्दांवर विश्वास ठेव
भर त्यामध्ये वजन, अर्थ तुझ्या विश्वासाचा                              
लवकरच वेगळेपणाच्या, स्वतंत्रतेच्या आदिम उर्मी,  
व्यक्तिमत्वाचे कंगोरे वगैरे गळून पडतील
तू हि होशील आम्हा सर्वांसारखा

विशिष्ट ओळख असलेला माणूस बिनचेहऱ्याचा ||

कविता – मी एकला

दिनांक - १२/०५/२०१४
कविता – मी एकला
अचानक त्या इवल्याश्या पिल्लाची
उलटी धाव माझ्या गाडीखाली
त्याची आर्त किंकाळी ऐकत
असहायपणे मी तसाच पुढे ||

आता त्या पिल्लाभोवती जमले असेल
कोंडाळे अनेक कोवळ्या रडक्या चेहऱ्यांचे
खूप पूर्वी अश्या प्रसंगी कोवळे आम्ही
आधार द्यायचो एकमेकांना अश्रुनी, लहानुल्या हातानी ||                      

आता आज इथे गाडीत मी एकला
आधार नसलेला, अश्रूही नसलेला ||    
                                             
(composed origionally on 06/01/1997 8.0 to 8.15 pm Jaipur Airport, revised on 12/05/2014 in Hotel Taj at Hubali 10.00 to 10.45 pm)

Sunday, 11 May 2014

कविता – काजव्यानो

दिनांक – १२/०५/२०१४
जुन १९९९ मध्ये २१ दिवसाच्या ईशान्य भारताच्या प्रवासाला आम्ही सारे गेलो होतो. परतीच्या प्रवासात सिलीगुरी मुक्कामी काजव्यांशी मुलाकात झाली. माझी जवळजवळ त्यांच्याशी वीस वर्षानंतर भेट तर माझ्या मुलांची आयुष्यातील पहिली भेट. माझ्या आणि मुलांच्या काजव्यांशी झालेल्या त्या ऐतिहासिक भेटीची हि कविता जून १९९९ मध्ये लिहिली होती आज १२/०५/२०१४ रोजी तिला संस्कारित केली..  
कविता – काजव्यानो

काजव्यानो अनेक तपानंतर
ह्या दूर देशी अचानक तुमची गाठभेट
आजही सर्द चिंब आषाढी तीन्हीसांजेनंतर
धावत्या चांदण्यांनी भरलेले आकाश
तुम्ही जमिनीवर फुलविलेले ||

लहानपणीसारखा बेभानपणे
तुमच्यामागे धावणारच होतो
अचानक जाणवले तुम्हाला कधीही न अनुभवलेल्या
माझ्या शहरी कच्या – बच्यांची नाळ
हवी जोडावयाला हवी तुमच्याशी ||

त्यांना शिकवून त्यांच्या हातून तुम्हाला पकडून
दोन तळहातांच्या पोकळीत घेतल्यावर
तुमच्या कळत-नकळत अश्या स्पर्शाने
झाला कोवळा रोम रोम, अन
हिरवट पिवळ्या मायावी प्रकाशाने
झळाळले तळहात अन मन ||

पूर्वीचे ते सकाळला काड्यापेटीतले
तुमचे निर्जीव होणे टाळले कटाक्षाने
सोडल्यावर उडती चांदणी होऊन  
निघून जाणे तुमचे पाहिले भरल्या मनाने ||

काजव्यानो भेटीने या उलगडले सारे पदर आपल्या नात्यांचे
पण जुळले का हो नाते माझ्या कच्या-बच्यांशी तुमचे ?  ||

Wednesday, 7 May 2014

नोकरी सोडताना – 3 - कविता – पारा उडालेला आरसा

नोकरी सोडताना – 3

मी वीस वर्षे महानगरपालिकेत नोकरी केली, तिथे मिळालेल्या जाणकारी आणि अनुभवामुळेच मी आज जो काही आहे तो आहे. महानगरपालिकेतून बाहेर पडण्याची अनेक करणे होती – क्षेत्रामध्ये नवे काही करण्याची, नवे अनुभव घेण्याची, आर्थिक प्रगती इत्यादी पण बाहेर पडण्याचे सर्वात महत्वाचे कारण होते महानगरपालिकेच्या वातावरणातून, तंत्रातून बाहेर पडणे. मी एका अश्या संस्थेत होते जी राजकारणाची आणि तदनुषंगाने येणाऱ्या साऱ्या चांगल्या – वाईट गोष्टींची प्राथमिक शाळा आहे, पाठशाळा आहे. अश्या संस्थेत प्रदीर्घ काळ काम करताना तुम्ही कितीही शुद्ध, स्वच्छ नैतिक राह्यचा प्रयत्न केलात तरी अनेक कारणामुळे तुम्हाला अनेक तडजोडी (compromises) करावकराव्या लागतात आणि अश्या प्रत्येक वेळी मला जाणवायचे कि माझ्या मनाच्या/आत्म्याच्या आरश्याचा पारा थोडा आणखी उडाला आहे आणि तसे सतत होणे म्हणजे एक दिवस माझे मन मला माझ्या चांगल्या – वाईट कर्मांचा हिशोब देण्याच्या लायकीचे न उरणे.

तोरा मन दरपन केहेलाये है | भले बुरे सारे करमोको देखे और दिखाये | ची शक्यताच संपणे.

प्रश्न माझ्या हातून होणाऱ्या चांगल्या-वाईट कर्मांचा नव्हताच तर त्यांचे मुल्यांकन करणाऱ्या मापदंडाने / मनाने भ्रष्ट होण्याचा होता. अश्या या गंभीर धोक्याचा सामना करण्याचा एक मार्ग होता महानगरपालिका योग्य संधी मिळताच सोडणे आणि ते मी केले. ह्या साऱ्या विचारांच्या पार्श्वभूमीवर मी नोकरीचा राजीनामा देण्याच्या काही दिवस अगोदर झाली पुढील कविता -----

कविता – पारा उडालेला आरसा

पाऱ्याचा नवा मुलामा घेईस्तोवर
वा तुटून फुटून चकनाचूर होईस्तोवर
पारा उडालेल्या आरश्याच्या नशिबी
असते अडगळीतले उपेक्षित जिणे |

पारयाचे ठिगळ लावताही येत नाही
पारा उडालेल्या जागी आरश्याला,
खरवडून काढताही येत नाही
सहजासहजी उरलेला पारा आरश्याला,
भट्टीत तावून सुलाखून
पाऱ्याची एकसंध नव्हाळी घेऊन
घ्यावाच लागतो पुनर्जन्म आरश्याला ||

पुनर्जन्माचे अग्निदिव्य देऊ घेतले आहे
देण्या नवा मुलामा सत्वाचा, आत्म्याच्या आरश्याला
विखरून मुक्त होईन ह्या छिन्न अस्तित्वातून
वा झळाळेन अग्निपक्षासारखा पुनर्जन्मून राखेतून
तुम्हाला अन काळालाच ठेवले आहे साक्षीला ||

(composed on 15/07/2002 in office, revised on 17/07/2002 at 10.30 pm at home, rerevised on 06/05/2014) 

Tuesday, 6 May 2014

नोकरी सोडताना – २ - કવિતા - ઈતિહાસ થતા / कविता - इतिहास होताना

नोकरी सोडताना – २

एकूणच नोकरी सोडताना आपण त्या संस्थेसाठी, आपल्या सहकाऱ्यान साठी आणि इतर साऱ्यानसाठी इतिहास बनत आहोत असा भाव मनात कळतनकळत दाटत जातो. त्यातून सरकारी नोकरीत तर हा जास्तीच अनुभवास येतो. निवृतीच्या सहा महिने आधी सर्विस बुक बंद करणे, पेन्शन केस तयार होणे हि प्रक्रिया चालते आणि एक प्रकारे त्या माणसाचा त्या संस्थेमधला इतिहास बंद होऊ लागतो. बडोदे महानगरपालिकेत मुख्य लेखाधिकारी म्हणून मी निवृत्त होणारया हजारो कर्मचाऱ्यांच्या सर्विस बुक आणि पेन्शन केस वर अंतिम सही करून त्यांना इतिहास केले होते. त्याहीपुढे जाऊन ४० वर्षाहून जुन्या सर्विस बुक आणि पेन्शन केसेसना रेकोर्ड वरून दूर करण्याची सही करून मीच अनेक इतिहास मिटविले होते ह्या सत्याची जाणीव माझ्याच सर्विस बुकला मीच बंद करताना आणि माझाच पेन्शन केस मीच मंजूर करताना अतिशय तीक्ष्णपणे झाली. जणूकाही वैश्विक सत्याचा अचानक साक्षात्कार व्हावा तसे काहीसे झाले जेंव्हा माझ्याच  निवृतीच्या कागदांवर सही करून मीच मला इतिहास केले कालांतराने इतरांनी त्याला मिटविण्यासाठी. ह्या साऱ्या अनुभूतीतून साकारली पुढली कविता निवृतीच्या दोन दिवस आधी. पुन्हा ह्याहि वेळेस माझ्या भावनांनी व्यक्त होण्यासाठी आधार घेतला गुजराथी भाषेचा. कदाचित माझी कार्यालयीन भाषा गुजराथी असल्यामुळे माझ्या निवृत्ती आधीच्या अनुभूतिनी गुजराथी भाषेचा आधार घेतला व्यक्त होण्यासाठी आणि एक प्रकारे ते सयुक्तिकच होते. हि कविता केल्याच्या बारा वर्षांनी आज त्या मूळ कवितेला संस्कारित करण्याचा आणि तिचा अनुवाद करण्याचा योग आला.   

કવિતા - ઈતિહાસ થતા

સમજતો થયો ત્યારથી મનમાં ઘુમરાતો પ્રશ્ન,
ઈતિહાસ રચાય છે કઈ રીતે ?
ઈતિહાસ મટી જાય છે કઈ રીતે?
છેલ્લે જબાબ જડ્યો
જયારે મેં જોયો પોતાને
બંદ કરેલી સર્વિસ બુકમાં,
નવા ખોલેલા પેન્શન કેસમાં,
જકડાયેલો ઈતિહાસ થઈને  ||

પછી તો બધુજ સ્પષ્ટ થયું મનમાં
મેજ હજારોને બનાવ્યા હતા ઈતિહાસ
તેમની સર્વિસ બુક બંદ કરીને,
તેમના પેન્શન કેસ ખોલીને,
કાલાંતરે હજારોના આ ઈતિહાસોને
મેજ મિટાવ્યા હતા કળીકાળની જેમ  ||

હવે અસ્તિત્વમાં હોવા છતાં,
બની ગયો છું ઈતિહાસ કાગળોમાં
કોઈ સંસ્થા માટે, કેટલાક લોકો માટે
કાલાંતરે મટી જવા કાયમ માટે || 

(composed on 28/10/2012 11.0 to 11.15 pm)


कविता - इतिहास होताना

समजू लागले तेंव्हापासून
मनामध्ये घोटाळणारा प्रश्न
ईतिहास घडतो कसा?
ईतिहास मिटतो कसा?
अखेरीस उत्तर मिळाले
जेंव्हा मी पहिले मला
बंद केलेल्या सर्विस बुक मध्ये
नव्या उघडलेल्या पेन्शन केस मध्ये
जखडलेला इतिहास होऊन ||

सगळेच स्पष्ट झाले मग मनात
हजारोंना मीच बनविले होते ईतिहास
त्यांच्या सर्विस बुकात बंद करून
त्यांचे पेन्शन केस उघडून  
कालांतराने हजारोंच्या या इतिहासाना
मीच मिटविले होते कलीकाळासारखे ||

आता अस्तित्वात असूनही   
बनलो आहे इतिहास कागदोपत्री
कोण्या संस्थेसाठी, काही लोकांसाठी
कालांतराने कायमचा मिटून जाण्यासाठी ||

(translated from Gujarathi on 4th May 2014 6.15 to 6.45 pm)