Tuesday, 13 May 2014

कविता – बिनचेहऱ्याचामाणूस १ आणि कविता – बिनचेहऱ्याचामाणूस २

कविता – बिनचेहऱ्याचामाणूस १  

होऊ लागला आहेस तू आता
आमच्यासारखा बिनचेहऱ्याचा
दिसतोय मला तुझ्या डोळ्यातला
प्रश्न गोंधळचा, अविश्वासचा |
पदोपदी देत असतो मीच उपदेश तुला
स्वतःची वेगळी ओळख घडण्याचा  
अवघड आहे तरीही उदाहरणार्थ बघून माझ्याकडे
प्रयत्न कर हा विरोधाभास समजण्याचा
मी आहे स्वतंत्र, यशस्वी
विशिष्ट ओळख असलेला माणूस बिनचेहऱ्याचा ||

कविता – बिनचेहऱ्याचामाणूस २ 

विशिष्ट ओळख असलेल्या माझ्यासारख्या
बिनचेहर्याच्या व्यक्तींचा समूह म्हणजे -------
आपले संभाषण तुटले
छोटा आईला ठणकावून सांगत होता
माझी तुलना दादुशी करू नकोस
मी सगळ्यांपेक्षा वेगळा आहे -------- |

त्याचं संभाषण ऐकून
तुझे मंद समजूतदार हसणे, माझ्याकडे पाहणे
मला उगाचच सहेतुक, खोचक वाटले
नंतर तुझा निरागस (?) प्रश्न –
एकादुसर्याशी तुलना केल्यानेच
आपली ओळख, वेगळेपण सिद्ध होते ना बाबा?  |

मला जाणवला तुझा शब्दांवरील अविश्वास, प्रश्नाचा पोकळपणा
परिस्थिती कशीबशी सावरून घेणारे माझे उत्तर ----
छोट्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस,
तुझ्या ह्या नाजूक पौगंडावस्थेच्या संक्रमण काळात
मुळच्या आदिम, मुक्त, स्वतंत्र विचारांकडे
घसरण्याचा धोका संभवतो तुला      |

एका लौकिकदृष्ट्या यशस्वी बापाच्या
आज पोकळ, खोट्या वाटणार्या शब्दांवर विश्वास ठेव
भर त्यामध्ये वजन, अर्थ तुझ्या विश्वासाचा                              
लवकरच वेगळेपणाच्या, स्वतंत्रतेच्या आदिम उर्मी,  
व्यक्तिमत्वाचे कंगोरे वगैरे गळून पडतील
तू हि होशील आम्हा सर्वांसारखा

विशिष्ट ओळख असलेला माणूस बिनचेहऱ्याचा ||

No comments:

Post a Comment